पुणे-नशिक प्रवास एक सुस्त(z...z...) अनुभव
मित्रहो ,
परवा काही कामानिमीत्त पुण्याहून नाशिकला येण झालं, त्याचा हा वृत्तांत ....
प्रवास म्हटला की कधी कधी कंटाळवाणा असतो तर कधी कधी एखादा चुस्त अनुभव देउन जातो. तुम्ही कोठे आणि कुणाबरोबर प्रवास करताय यावर बरच काही ठरतं.शिवाय प्रवास आपण कशानं करतोय यावरही बरच काही ठरत असतं.
असो, बरच विषयांतर झालं, मुळ मुद्यावर येतो, नमनालाच घडाभर तेल नको घालायला.
नाशिकला लवकर पोहोचायचं असल्याने पहाटे चारला मला उठवायला पार्टनरला सांगून ठेवले. त्याची सध्या नाईट शिप्ट संपून गेलेली होती पण त्या शिप्टच्या सवयीमुळे त्याला रात्री झोप लागत नाही. त्यामुळे त्याने बरोबर चार वाजता ओरडून उठवले. दहा मिनीटात दात घासून अंघोळ केली तयार झालो. एवढ्या सकाळी नाश्टा करायची सवय नसल्याने लगेच घरातून निघालो अन चालत चालत नाशिक फाट्याच्या हायवे पर्यंत आलो. इतक्या सकाळी कुठली आलीय एस्टी म्हणून एखादी खाजगी गाडी दिसते का ते पाहू लागलो. तेवढ्यात एक ट्रकवाला आला अन माझ्याजवळच थांबला. "चला, नाशिक हाय काय?" असे त्याने उच्चारले. बोलण्यावरून तो सातारा सांगलीकडचा असावा. गाडीही MH 11 पासींगची होती. होणारी सोय पाहून मी त्याला हो म्हटले अन गाडीत बसलो.
पुढे भोसरीच्या नाक्यावर दोन जण गाडीत आले. केबीन मध्ये ड्रायव्हर धरून आम्ही चार जण होते. चालत्या वाहनात मला लगेच झोप लागते तरीही मोशी पर्यंत मी व्यवस्थीत जागा होतो. चाकण कधी आले अन गेले ते कळलेही नाही कारण आमचा टांगा पल्टी होवून घोडे कधीच फरार झाले होते. गाडीत ड्रायव्हर ने काळू आईची गाणी लावलेली होती. ती सीडी त्याने चाकण सोडल्यानंतर बदलली. त्याने आता खंडोबाची गाणी लावल्याने त्याच्या ठेक्याने माझी झोप उडाली अन मीपण भक्तीभावाने त्या गाण्यांत रस घेवू लागलो. होता होता ड्रायव्हरने सिगरेट शिलगावली अन बाजूच्या दोन प्रवाशांपैकी एकाने तंबाकु मळण्यास सुरूवात केली. मलाही त्याने ती मळलेली तंबाकु ऑफरली. मी अर्थातच नकार दिला.
खेड मंचर पुन्हा माझ्या झोपेत गेले. मंचर गावातून गाडी जात असतांना एका खड्यात पुढले चाक गेल्याने गाडीला मोठा हिसका बसला अन माझी झोप उडाली. तसा फार काही गंभीर प्रकार नसावा कारण ड्रायव्हर भाऊने फक्त दोन शिव्या दिल्या. झोप उडाली तसे माझे लक्ष माझ्या पोटाकडे गेले. पोटाने भुक लागल्याची ओळख करून दिली. ड्रायव्हरदेखील सकाळीच निघालेला असल्याने त्यालाही भुक लागली होती.
नारायणगाव सोडल्यासोडल्या पुढल्या एका हॉटेलात त्याने गाडी थांबवली. एवढ्या सकाळी तेथे फार गर्दी नव्हती. त्यामुळे आम्ही चारही जण एका टेबलावर बसलो. तेथे फक्त पोहे उपलब्ध असल्याने सगळ्यांनी पोहेच खाल्ले. नंतर चहा सांगितला. ड्रायव्हर भाऊ चहा घेत नसल्याने आम्ही तिघांनी चहा घ्यायला सुरूवात केली. सहप्रवाशापैकी एकाने त्याच्याजवळील बिस्कीटचा पुडा काढला. त्यातले एकदोन बिस्कीट त्या दोघांनी घेते व मला एक बिस्कीट दिले. पोहे जरी थंड असले तरी गरमागरम चहा-बिस्कीटाने तरतरी आली. नंतर आम्ही गाडीत बसलो. ड्रायव्हरच्या पोटात अन्न गेल्यामुळे त्याने सिगारेट सुलगावत गाडी भन्नाट काढली. शेजारी प्रवाशाने पुन्हा तंबाकूचा बार भरला. ह्यावेळी त्याने मला काही विचारले नाही. मलाही झोप अनावर झाली होती. मी बसल्याबसल्या पेंगू लागलो अन कधी झोपलो ते समजलेदेखील नाही.
मला हलवून हलवून ड्रायव्हरने उठवले तेव्हा नाशिक आलेले होते. त्याने मला कोठे उतरायचे ते विचारले. माझे डोके जड झाल्यासारखे वाटत होते. ट्रकच्या बाहेर पाहिले तर मला निट उमजेचना की मी नाशकातल्या नक्की कोणत्या भागात आहे ते. थोडे भानावर आल्यासारखे वाटल्याने ट्रक द्वारका सर्कलपाशी उभा असल्याचे समजले. तेथून माझे कामाचे ठिकाण रिक्षा करून जाण्याच्या अंतरावर असल्याने मी तेथेच उतरण्याचा निर्णय ड्रायव्हरला सांगितला. मी खाली उतरण्याच्या तयारीला लागलो.
हातात बॅग घ्यावी म्हणून मी बाजूला बघीतले तर बॅग जागेवर नव्हती. जवळपास किंवा इंजीनाच्या बाजूच्या आडव्या बाकड्याखाली असावी म्हणून पाहीले तर बॅग तेथेही नव्हती. मी ड्रायव्हरला विचारले की, "अहो ती काळी आडवी बॅग कोठे आहे?" त्याने विचारले की, "म्हणजे ती काळी बॅग तुमची होती काय? ती बॅग तर घेवून तर ती दोघं पॅसेंजर धारगावातच उतरून गेली बघा."
मला मोठा धक्का बसला. बॅगेत दोन दिवसाच्या मुक्कामाचे कपडे तर होतेच पण एका मित्राला देण्यासाठीचे दहा हजार रुपयेदेखील होते. ड्रायव्हरला बॅग चोरी गेल्याचे समजताच त्याने हळहळ व्यक्त केली अन म्हटला की, "साहेब मला ओ काय माहीत ती बॅग तुमची होती ते? त्या दोगांनी बरोबर बॅग लंपास केली बघा."
आता होण्यासारखे काय होते? जे जवळ पैसे होते ते तर गेलेच होते. पोलीसात जावून काय होते ते माहीत असल्याने पोलीस स्टेशनला न जाण्याचा निर्णय घेतला.
मला अजूनही प्रश्न पडतो. प्रवासात मला झोप लागते हे मान्य, पण येवढी गाढ झोप अन जड झालेले डोके त्या चहाबरोबर खाल्लेल्या बिस्कीटाचा परिणाम नसावा ना?
वाचने
4018
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
व्वा आवडलं 'प्रवास वर्णन'. निदानपक्षी थोडेफार कथासूत्र आहे त्यात. अभिनंदन.
@ पाभे - छोटे का होईना कथासूत्र असलेले लिखाण चांगले जमले आहे. विंडंबन अजिबात वाटत नाहिये.
मागे अशीच एक बातमी पेपरात वाचली होती. सहप्रवाशाने बिस्कीटे खायला घातल्यानंतर काही अवधीत तो प्रवासी झोपी गेल्यावर की बेशुध्द झाल्यावर जवळपासचे त्याचे सर्व सामान लंपास केले होते. पुणे मुंबई एक्सप्रेस रस्त्यावर घडलेली ही घटना. अशीच अजून एक घटना .. एका आयटी नोकरदाराने होळी की रंगपंचमीच्या दिवशी एसटी गाड्यांना गर्दी असल्याने व म्हणून गाडी न मिळाल्याने पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी एका चारचाकीवाल्याकडे लिफ्ट मागितली. आणि त्यातील लोकांनी त्याला लुटण्यासाठी बेशुध्द केले. पण क्लोरोफॉर्म ची मात्रा जास्त झाल्याने त्या तरूण नोकरदाराने आपले प्राण गमावले.
बसला किनी फटका?
खाल? खाल पुन्हा पारले जी?
बाकि लेखात बरच काही (खरोखर) सांगण्या जोग असल्यान लेख उत्तम झालाय. उगा सुइइइइ पळणारी अन जराशी पंक्चर झालीली गाडी अन महमद रफी कोण वाचणार
भले शाब्बास!!
गुंगी येणारे बिस्कीट कुठे मिळेल अथवा पाकृ कोणी सांगेल काय? :-)
पैसे मित्राला द्यायचे असतील तर ते तसेही बुडीत खातीच त्यामुळे थोडक्यात निभावले म्हणायचे, हो किनई कुंदन? ;-)
पुणे-नाशीक ट्रकमधुन प्रवास व खाजगी आरामबस मधुन केलेला प्रवास, किमतीत फरक किती?
परवाच चेपुवर वाचलेले वाक्य आठवले - अकल, बदाम खानेसे नही धोका खानेसे बढती है!
किस्सा आवडला!
In reply to :-) by सहज
आता मी काय केले सहज राव?
मी तर बिस्कीट पण खाल्ले नाही. ;-)
कोणत्याही गाडीत बसल्यावर झोप लागणे हा माझा सुद्धा गुणधर्म आहे, एस्टिने तर मी ब-याच वेळा माझ्या स्टॉपच्या पुढे दोन स्टॉप उतरुन परत आलो आहे. एकदा ऑफिसच्या फाईली हरवल्या होत्या, पण त्यावेळी खरंच ' जे होते ते चांगल्यासाठीच' याचा खुप उत्तम अनुभव आला आहे.
मस्त लिवलंय हो पाभेमहाराज.
काय वाट्टेल ते झालं तरी कॅश कॅरी करायची नाही हे सूत्र ज्याम लक्षात ठेवा. इथे खात्यात भरून तिथे काढली असती तरी परवडलं असतं.
>एकदा ऑफिसच्या फाईली हरवल्या होत्या, पण त्यावेळी खरंच ' जे होते ते चांगल्यासाठीच' याचा खुप उत्तम अनुभव आला आहे.
असं फिफ्टी ओन्लीनं म्हटलंय ते मात्र कसं हे कळलं नाही
In reply to पाभे, दु:खात सहभागी आहे by संजय क्षीरसागर
असं फिफ्टी ओन्लीनं म्हटलंय ते मात्र कसं हे कळलं नाही - ते इथं उघडपणे सांगणं शक्य नाही, तो विषय सध्या कायद्याच्या चौकटीत आहे.
लेखन फार भावलं
मगाच्य मानसानं लइ पकवलं होतं
पा भे भारीच हो..
पण या निमित्ताने आम्हास वल्ली जींच्या या आगळ्या वेगळ्या धाग्याची आठवण झाली
पा भे भारीच हो..
पण या निमित्ताने आम्हास वल्ली जींच्या या आगळ्या वेगळ्या धाग्याची आठवण झाली
In reply to पा भे भारीच हो.. पण या by स्पा
मा. श्री. स्पाजी, हल्ली तुम्हाला सगळ्याच गोष्टी दोन दोन वेळा होतात का हो ?
त्यापेक्षा तु "टायगर" का खात नाहीस ;)
किहिच्या काहि .....ट्रक ने कशाला जायचे? थोदे उशिरा जायचे ना!
In reply to किहिच्या काहि .....ट्रक ने by मि एन आर आइ
यापुढे काळजी घेईन हां. काय्ये की तिथल्यासारखी वाहतूक सेवा इथं नाहीय्येना. अन पहिल्या पगारात गाडीही घेता येत नाही इथं.
(हळू घ्या बरका. )
बाकी आयडी जबरा घेतलाय. हे म्हणजे NRI आहे की मि. एन. आर. इं(गळे), मि. एन. आर. इ(थापे), मि. एन. आर. इं(गळ्ळहळ्ळीकर) काय समजना. झाकली मुठ.
छान जमलीय कथा!
आवडले.