Skip to main content

काळ कोठडी (भाग ३)

Published on गुरुवार, 12/04/2012
भाग १ भाग २ त्याच्या अंगाची आग आग होत होती.. पण तो हतबल होता.... केवळ वाट बघणेच त्याच्या हातात होते.. आणि तो वाट बघत राहिला.. .. ... उषा गेली त्याला खूप वेळ झाला, वाट बघता बघता राहुलला झोप कधी लागली समजलेच नाही. अचानक जाग आली त्याला, डोके जसे बधीर झाले होते.. काळामिट्ट अंधार.. तो जोरात ओरडला, पण आवाज घशातच अडकला. चाचपडत, अदमास घेत त्याने पाण्याचे भांडे शोधायचा प्रयत्न केला..ठ्न्न.. जोरात भांडे खाली पडले, रिकाम्या खोलीत आवाज जास्तच घुमला. तशी बाजूच्या खोलीतून उषा पळतच आली, पटकन लाईट लावला तिने.. राहुलला उचलून त्याला आलेला घाम पुसला. पाणी पाजलं. राहुल अडखळत तिला विचारात होता, कुठे गेली होतीस.. तिने उत्तर देणे टाळले! तसे राहुलनी अंग झटकून तिला लांब केले.. त्याच्या डोळ्यात तिला दिसला फक्त तिरस्कार.. अंतर्बाह्य ढवळून निघाली ती.. डोळे क्षणात भरून आले.. काय सांगणार होती ती त्याला? कुठे गेली होती हे तिला तरी कुठे समजले होते.. काका आणि उषा घराबाहेर पडले, साधारण ९चा सुमार. रस्त्यावर थोडीफार गर्दी होतीच. दोन गल्ल्या पार करून हमरस्त्यावर आले ते, काकांनी दूर कुणाला तरी खूण केली असावी.. एक गाडी त्यांच्या समोर येऊन थांबली.. दोघेही मागच्या सीटवर बसले, गाडी सुरु झाली. कुठे जायचं चालकाला माहीत असावं, गाडी वळणा वळणाच्या रस्त्याला लागली. काचांवर काळे पडदे टाकलेले असल्याने तिला अंदाज येणे शक्य नव्हते. काकांचे अस्तित्व त्यांच्या तोंडातल्या सिगारेटचे पेटके तोंड जाणवून देत होती.. बाकी आवाज फक्त गाडीचा. बऱ्याच वेळाने, गाडी थांबली. बाहेर येऊन उषाने दीर्घ श्वास घेतला. तोवर काका पुढे चालू पडले होते, पळतच त्यांच्या मागे निघाली. एका फाटकातून आत गेले, तसे दरवानाने अडवले तिला, स्त्रियांना वेगळा प्रवेश होता. दुसऱ्या दारातून आत आली ती, आता काका दिसत नव्हते. १० -१२ बायका होत्या, सगळ्या प्रौढ .. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. उषाकडे वारंवार वळून पाहत होते, तिच्या सौदर्या बद्दल असूया स्पष्ट जाणवत होती. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती आजूबाजूचे निरीक्षण करू लागली. लांबलचक हॉल, गच्च भरला नसला तरी जाणवण्या इतपत गर्दी होती तिथे. पण कोणीच कुणाशी बोलत नव्हते. समोरच्या बाजूला काळी भिंत होती, तिथेच छोटेसे स्टेज केलेले होते. गादी असावी, त्यावर पांढरीशुभ्र चादर अंथरली होती. २ लोड ठेवले होते, स्टेजवर जाण्यासाठी ३ पायऱ्या होत्या. स्टेजच्या उजव्या बाजूला पुरुष मंडळी, डाव्या बाजूला स्त्री वर्ग अशी व्यवस्था होती. दोन्ही बाजूला भिंतीवर कंदील लावले होते. कंदिलाच्या अपुऱ्या प्रकाशात काळ्या रंगाच्या भिंती अंगावर येत होत्या. फार प्रकाश असा नव्हताच, हॉलमध्ये. सगळ्यांची नजर समोर, त्या स्टेजवर स्थिर होती. स्टेजच्या वरती भिंतीवर एक विचित्र अशी आकृती कोरलेली होती, तिचा आकार काही केल्या उषाच्या लक्षात येईना.तिने बारीक नजर करून तिकडे लक्ष केंद्रित केले. अचानक सगळे उठून उभे राहिले. तशी गडबडीने ही पण उभी राहिली.स्टेजवर एक वयस्कर व्यक्ती आली होती. उशाला आठवले हेच ते ज्यांनी आपल्याला पैसे पुरवले.तीच लांब दाढी, काळी कफनी.. आणि ते निळे डोळे, त्यात बघितले की खोल सागराच्या तळाशी उभे असल्यासारखे वाटते. आता सगळे कसलीशी प्रार्थना म्हणू लागले, भाषा अत्यंत क्लिष्ट पण मधुर होती. नकळत ने पण हात जोडले. आसमंत हळूहळू जड होत होते, बाबांच्या डोक्यावर असलेली ती आकृती हळूहळू आकार घेत असल्यासारखी वाटू लागली.बाबांचे घनगंभीर बोल कानावर पडले, "अशी कोणती वस्तू आहे जी आपणा सर्वांना एकमेकांशी बांधून ठेवू शकते.. अगदी युगानुयुगे आपले नाते घट्ट ठेवू शकते. भावना, देह सारे काही नश्वर आहे. प्रत्येक जण कधी न कधी मरणारच. या चक्रातून सुटका कशी मिळणार. किती वेळा आपण हे किड्या मुंग्याचे जीवन जगणार आणि मरणार. आपली अवस्था त्या देवळा बाहेरच्या भिकार्यापेक्षा वाईट आहे, तो भूक भागवायला भीक मागतो अन भूक भागवतो, आपल्याला तो ईश्वर काय देतो.. काही इच्छा पूर्ण करून आयुष्यभराची गुलामी? त्याची पूजा करा अन्यथा कोपण्याची भीती? त्या भीतीपोटी आपण त्याला नमस्कार करतो. हीच भीती आपल्या आई-वडिलांना घातली गेली, त्यांच्या पालकांना, त्यांच्या पालकांना .. पिढ्या ण पिढ्या आपल्या भीतीवर आपण ती मूर्ती पोसतोय. श्रद्धा, भक्ती ही फक्त त्या भीतीची दुसरी रूपे. आपण सर्व या चक्रातून बाहेर पडूया. जीवन आणि फक्त जीवन .. ह्या विश्वाच्या अस्तित्वासोबत आपले अस्तित्व जोडूया. सुखात जगूया. काय आहे का मंजूर तुम्हाला? देणार का तुम्ही अशी एक प्रिय वस्तू, ज्यामुळे तुम्हाला मिळेल फक्त आणि फक्त सुख. भरपूर आयुष्य, रोगमुक्त जीवन. आपला सर्वेसर्वा हा तुम्हाला सारे काही देण्यासाठी इथे आलेला आहे ... " बाबा बोलत होते, त्यांचा शब्द न शब्द जसा एखाद्या गोड गाण्याप्रमाणे मनावर कोरला जात होता. सगळ्यांच्या होकारात उषानेही होकार मिळवला. आता बाबांचे स्वयंसेवक गर्दीमधून फिरत होते, त्यांच्या हातात एक छोटे भांडे होते. उषाच्या जवळ आले, भांड्यात काय टाकू हा प्रश्न तिला सतावत होता. पैसे घरीच विसरून आली होती ती. पण तिने भांड्यात बघताच तिला आश्चर्याचा धक्का बसला, कसला तरी काळपट पदार्थ त्यात होता. तिची भयचकित नजर स्वयंसेवकाला सारे काही सांगून गेली, त्याने दुसऱ्या बाईला इशारा करताच तिने उषाचा हात हातात घेतला, सफाईदारपणे नस शोधली आणि हातातल्या ब्लेडने पटकन एक काप दिला. स्वयंसेवकाने वेळ न दवडता, सारे रक्त त्या भांड्यात जमा केले.. २ मिनिटांनी हातावर कसलेसे औषध लाऊन तो निघून गेला. उषाला प्रतिकार करायला, विचार करायला कुणी संधीच दिली नव्हती.बाबांचे बोलणे सुरूच होते. स्वयंसेवक ते भांडे घेऊन बाबांजवळ गेले.. बाबांनी ते भांडे उचलून त्या आकृतीपाशी धरले.. मंत्रघोष सुरु झाला.. पांढरट दिसणारी ती आकृती, लालसर काळी दिसू लागली. एकदम सगळे कंदील ढणाणुन पेटले. काळ्या भिंतीवर लाल पिवळ्या जिभांनी अग्नी तांडव करू लागला. मंत्रघोष टिपेला पोहोचला. अंगातले सारे रक्त कुणी शोषून घेत आहे, असा भास उषाला होत होता. हळूहळू सारे काही शांत झाले. तेच स्वयंसेवक आता प्रत्येकाला प्रसाद देत होते.. तिनेही तो प्रसाद मुकाट घेतला. प्रसाद म्हणून आधीच्याच भांड्यातले उरलेले रुधिर वाटले जात होते. बाबांच्या म्हणण्यानुसार आता तिथे उपस्थित असलेले सारे, एका विशिष्ट पातळीवर समान होते. त्यांची पूजा "हीदुर्ष" नामक त्या आकृतीला मान्य झाली. आता अजून ३ पूजा पार पडल्यावर हे सारे मुक्त होतील, आता ते हिदुर्षाचे पायिक होते. त्यांनी बाकी कुठल्या ईश्वराची पूजा-अर्चा करणे थांबवले पाहिजे. ह्या प्रसादाचा प्रभाव त्यांना दुसऱ्या दिवशी सुर्योदयापासून पाहायला मिळेल. सर्वांना निघायची आज्ञा मिळाली होती. बाबांनी उषाला जवळ बोलावून घेतले, म्हणाले "चिंता मत बेटी, अब तेरे सारे गम हिदुर्ष भुला देंगे | बस उसकी सेवा करती जा |" उशांनी फक्त मान हलवली, काका आलेच होते. त्यांनी तिला घरी सोडले. घरात येऊन तिने घड्याळ पहिले २ वाजले होते.राहुल स्वस्थ झोपला होता, एक निश्वास टाकत ती झोपायला निघून गेली. झोप लागणे अशक्य होते, ती जागा, ती आकृती, ते बाबा .. प्रसादाची साधारण कडवट चव .. विचारांच्या विळख्यात तिचे मन भांबावून गेले होते. त्या गुंगीतच डोळे मिटले असतील नसतील तोच काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून ती धावतच राहुलच्या खोलीत आली होती. राहुलची क्रुध्द नजर पाहून उषा इतकेच म्हणाली, "विश्वास ठेव, मी काहीही पाप केलेलं नाही. उद्या सारे काही सांगीन. काका माझ्या सोबत होते.उद्या ते घरी येणार आहेत." तशी राहुलची नजर वितळली, त्यानी तिला हलकेच जवळ ओढली. आपल्यामुळे हिला काय काय दिव्य करावे लागत असेल हाच विचार त्याच्या मनात थैमान घालत होता. त्याच्या छातीवर डोके ठेवून उषा पण निवांत झाली. काही वेळातच दोघांनाही झोपेने घेरले.. "बम भोले! अलख निरंजन!", मठात जागर झाला. स्वामी रंगनाथ समाधीतून बाहेर आले. त्यांच्या चिंताक्रांत चेहरा बघून शिष्यगण शांत झाले. स्वामी उठले, चालत चालत मठाच्या बाहेर आले. अमावस्येचे चांदणे पसरले होते.. आकाशात कुणी ताऱ्यांची रांगोळी काढली होती. अस्वस्थ गुरूला पाहून शांत राहील तो शिष्य कैसा? मंदार स्वामीजींपाशी आला.. नम्रपणे चौकशी केली.. स्वामींचा आदेश झाला.. "उठा रे, गाठोडी बांधा. उद्याच्याला कोकणात उतरायचे आहे"...
क्रमशः
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1690
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

जरा लवकर लवकर भाग लिहा हो! लिंक तुटते नाहीतर.