Skip to main content

बाठोणी (सासव)

लेखक गणपा यांनी गुरुवार, 12/04/2012 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल अर्धा संपत आलाय. काही दिवसातच घरा घरांतुन आंब्यांचा सुगंध दरवळु लागेल. तस बाजारात आंब्यांच्या राजाच आगमन झालेल आहेच. पण सध्या त्यांचे नगा-गणीक भाव पहाता महागाईने आधीच फाटलेल्या खिशाला ठिगळं लावायची पाळी यायची. त्यामुळे तुर्तास अजुन काही दिवस वाट पहाण्या शिवाय गत्यंतर नाही. माझं घर आणि आजोळ कोकणात (दोन्ही एकाच गावात समोरा समोर) असल्याने 'एप्रिल-मे'मध्ये घरी कधी आंब्यांचा दुष्काळ जाणवला नाही. एप्रिल महिन्याच्या मध्यावर मामा आंब्याची करंडी घेउन मुंबईतल्या घरी हजर असायचाच. मे महिन्यात शाळेला सुट्टी लागली की मग गावी आंब्यांचा फडशा पाडण्याच्या कामगीरीवर जातीने रुजु व्हायचो. आम्हा भावंडांमध्ये आंबे, ताडगोळे, शहाळी रिचवायच्या शर्यती लागायच्या. एप्रिलमध्ये लोणची, पन्हं, मुरांबे आदींच्या तावडीतुन वाचलेल्या कैर्‍या, आजी- मामाने माळ्यावर पेंड्यांमध्ये पिकायला ठेवलेल्या असायच्या. आम्ही गेलो की त्याचा फन्ना तर उडायचाच पण स्वतःच्या हाताने (दगड मारुन वा बेचकीने) वाडीतल्या झाडांवरचे आंबे पाडुन खाण्यात जी मजा असायची ती वेगळीच. असो तर सांगायचा मुद्दा काय तर बालपणी आम के आम आणि गुठलीयोंके दाम पण नाही. मे महिन्यात हटकुन घरी होणारा पदार्थ म्हणजे बाठोणी (बाठ्यांच सासव.) इथे आफ्रिकेत तस पाहिल तर बारा महिने झाडांवर कैर्‍या लागलेल्याच असतात, पण आंब्यांचा खरा मौसम हाच, एप्रिल-मे. सध्या बाजारात सर्वत्र रायवळ आंबे दिसु लागलेत. काल आईच्या हातच्या बाठोणीची आठवण झाली. म्हटल मौका हे दस्तुर भी है. होउन जाउदे. तसा हा पदार्थ बनवण्याच्या दृष्टीने काही फार पेश्शल नाही. मुळात रायवळ आंब्यांची आंबट गोड चव आणि त्यात थोडी मॉडिफिकेशन केलं की झालं. :) साहित्य : माणशी किमान दोन ते तीन बाठे येतील या हिशोबाने रायवळ (चोखायचे) आंबे घ्यावे. एक कुणाच्या दाढेलाहील लागणार नाही. ;) मी सहा घेतले. :) फोडणीसाठी : १ मोठा चमचा जीरं. १ लहान चमचा लाल तिखट. १ लहान चमचा काळीमिरी पुड (भरड) मीठ चवी नुसार. २ मोठे चमचे साजुक तुप. कृती : आंबे, सालं सुटी होतील इतपत हलक्या हाताने दाबुन घ्यावे. सालं काढुन बाठे गरा सकट बाजुला काढावे. सालीत उरलेला गर चमच्याने काढुन घ्यावा. वाटल्यास दोन आंब्यांचा पुर्ण रस काढावा. कढईत तुपावर जीर, काळीमिरी, लाल तिखट आणि मीठाची फोडणी करावी. बाठे आणि रस अलगद फोडणीत सोडावे. चमच्याने हलकेच एकत्र करावे. लहान आचेवर ५ मिनिटं शिजवावे. शक्यतो गरमा-गरमच वाढावे. (वाटल्यास सोबतीला चपाती-पुरी-भाकरी. नाहीतर नुसतेच.) आंब्याच्या आंबट गोड चवीला किंचित तिखट आणि मीठाची अफलातुन जोड. बघता काय सामिल व्हा. :)

वाचने 55977
प्रतिक्रिया 70

प्रतिक्रिया

अहाहा! अप्रतिम. हा पदार्थ चाखायला एखाद्या कोकण्याचं घरच गाठावे लागते. हॉटेलात नाही मिळत.

शाकाहार्‍यांवर कृपा केलीस म्हणून धन्यवाद. फोटू आणि पाकृ भारी. माझ्याकडच्या पाकृच्या पुस्तकात याची पाकृ आहे पण चव कशी असेल या शंकेमुळे वाचनमात्रच राहिले. त्यात फक्त एकच फरक म्हणजे थोडा गूळ घालायला सांगितलाय.

In reply to by रेवती

रेवती आंबे जर जास्त गोड नसतील वा आंबट असतील तर मग त्यात थोडा गुळ घालतात. काही ठिकाणी ओला नारळ आणी हिरव्या मिरच्यांच वाटण करुन ते ही घालतात. मी स्वतः मात्र नारळ घातलेल कधी चाखलं नाही. त्यामुळे आंब्यांची चव आणि रंग दोन्हीत फरक पडेल म्हणा. पण तेही एकदा करुन पहायला हवं. :)

गंपा पाककृती टाके सारखा,खाण्यालाही उत चढे तोंडात पाणि चहुकडे... ,नी आता अंबे शोधू कुणीकडे... :-)

व्वा, मस्त दिसतंय. काल एका मेक्सिकन शॅकमध्ये छोटूकसे आंबे दिसले होते ते आणून करून बघेन.

In reply to by स्वानन्द

हो, बाठ म्हणजे कोयच. तिचं काय करायचं? तर जेवताना चपातीला लावून तिच्यावरचा गर संपवायचा. जेवून झाल्यावर ताटावरच हात सुकवत गप्पा मारताना बाठ चोखत चोखत तिच्या प्रत्येक तंतूतला रस चोखून घ्यायचा. पटाशीच्या दातांत बारीकशि फट असते तिथे बाठ अलगद घासून तिचा तंतू आणि तंतू(आम्ही बाठीचे केस म्हणतो) पांढरा करायचा. मग हात धुवून एक काडी घेऊन दातात अडकलेले तंतू काढत अजून गप्पा मारत बसायचे. गणपा, मस्त पाकृ.

In reply to by साती

तर जेवताना चपातीला लावून तिच्यावरचा गर संपवायचा. जेवून झाल्यावर ताटावरच हात सुकवत गप्पा मारताना बाठ चोखत चोखत तिच्या प्रत्येक तंतूतला रस चोखून घ्यायचा. पटाशीच्या दातांत बारीकशि फट असते तिथे बाठ अलगद घासून तिचा तंतू आणि तंतू(आम्ही बाठीचे केस म्हणतो) पांढरा करायचा. मग हात धुवून एक काडी घेऊन दातात अडकलेले तंतू काढत अजून गप्पा मारत बसायचे.
+१ आईतर इतकी वैतागते की बास आता बाठा फुटेल. दया कर त्याच्यावर अश्या विनवण्या करते. ;)

In reply to by मेघवेडा

+३

In reply to by साती

'कोकणस्थाने चोखलेल्या बाटीतुन झाड उगवत नाही 'असे म्हणतात, त्याचे कारण हेच असावे,

व्वा गणपा, मस्तं पाककृती आणि कातिल छायाचित्रं. इथेच बोट, च् च् चमचा बुडवून खावेसे वाटत आहे. सासव खाल्ले आहे. मस्त असते चव.

नविन च आहे प्रकार ... पण आवडला ... :) करुन बघेन नक्की ...

सुरेख :) अमोल केळकर

रायवळ आंब्यांच(घोंटां) सांसंव एकदम टेस्टी लागत. असो. ८ दिवसात घरी जाणार असल्याने नो प्रॉब्लेम. आइ खाउ घालेलच :)

नविनच प्रकार दिसतोय्....पण झ्कास फोटो.. नक्किच करुन बघणार..

वा!!! दिसायलाच इतकी सुंदर डिश आहे. चवीला असणारच... नक्की करून बघणार.. :)

गंपाने शाकाहारी पाकृ टाकलेली बघून ड्वाले पाणावले. पहिल्यांदाच ऐकतो / पाहतो आहे ही पाकृ. चव छान आलीये रे गणपा.

वेगळ्या प्रकारची पा़कृ दिल्याबद्दल धन्यवाद.. कोंकणात असताना माझी आजी असाच पदार्थ कच्ची किंवा अर्धी पिकलेली कैरी वापरुन करायची.. "कोयाडं" म्हणतात का यालाच? ते असेल तर, मला ते आवडायचं नाही. उकडलेल्या कैरीला खरंतर आंबट आमरसाला शिजवून गुळमट बनवून फोडणी दिल्यासारखं काहीतरी. पण घरात बाकी सगळे हा पदार्थ आवडीने चट्टामट्टा करायचे, त्याअर्थी बहुतांश लोकांना आवडण्यासारखा असावा.

In reply to by गवि

कच्ची कैरी , बारीक चिरून आणि कोय ठेवायची बर का ! नंतर गुळ बारीक करून घालयचा , जिरे मोहरी कडीपत्ता यांची तुपासोबत फोडनी देउन शिजवायचे ... अशी कृती असावी ..आमच्या कडे याला कायरस म्हणतात ..

नवीन प्रकार कळला आज! मस्त दिसतेय डिश!! :)

गण्या गण्या अरे कशे कशे इमोशनल अत्याचार आमच्यावर करतोस रे बाबा ! च्यामारी कधी ऐकले नाही असे पदार्थ तू इतक्या सुंदरतेने सादर करतोस ! -^- नमस्कार करतो तुला... :)

माझ्या माहेरी हा पदार्थ वटपोर्णिमेला केला जातो. पण त्याच नाव वेगळ आहे. @गणपा - तुमच गाव वसई विरार च्या आसपास आहे का हो (मागे भुजींग ची पाक्रु तुम्हीच टाकली होती)

बाठोणी (बाठ्यांच साकव.) > इथे टायपो झालाय का? साकव म्हणजे छोटा पूल. सासव म्हणजे वरचा फोटुतला खाउ! याला गुजराथी लोक गोळ्केरी म्हणतात असे वाटतय. आणि धणेपूड्पण घालतात. असेच कच्च्या करवंदाचे पण करतात. - उगीच ज्ञान पाजळणारी माउ

अफ्टर रिअल लाँग गणपा शेफ हॅज पुट हीज पाकृ... दॅट टू अ व्हेज पाकृ! माईन्ड बॉगलिंग पाकृ.. अ‍ॅज इट इज सीन व्हेरी अममम ब्युटीफुल इट मस्ट बी टेस्टींग पण वेरी गुड. कीपीडप! :) - प्यारेश कोठारे

ही एक वेगळीच पाकृ दिसतेय! या आधी आंबा कधी शिजवलेला पाहिला नव्हता. कल्पना करूनही चवीचा अंदाज येत नाहीये, पण गणपा भाऊंचं रेकमेंडेशन असल्याने एकदा करून बघेन :)

असाच एक साउथ इंडिअन प्रकार दही घालुन करतात,
@ aparna akshay, हा अनवट पदार्थ दिसतो. पाकृ येउदे की मग. :)
पण रायवळ आंबे घसा खवखवतात ना ?
@ पिवशे, देठा कडला भाग काढुन टाकायचा. त्यात कंजुशी करायची नाही. ;) मग नाही घसा खवखवणार. :)
बाठ म्हणजे कोय का? आणि कोयीचं काय करायचं? ती पण खायची?
@ स्वानंद /मृत्युन्जय, होय बाठा/बाठ/घोट म्हणजे कोयच. पण जोवर कैरी कोवळी असते तोवर ती कोय, पण एकदा का त्यावरच आवरण कडक झालं की मग तो बाठा/बाठ/घोट. नाही तो खाण्याची हिंमत आजवर झाली नाही. ;) पण तो फुटेल की काय इतपत दातांवर घासुन घासुन सगळा रस / गर गिळंकृत करतो. @ गवि, "कोयाडं" वेगळ. ते अर्धव कच्च्या कैर्‍या/आंब्या पासुन करतात. हे संपुर्ण पिकलेल्या आंब्यांच करतात. @ शिल्पा नाईक, वसई विरार च्या पुढे डहाणुरोड हे माझ गाव. बाकी आमचे सगळे नातेवाईक याच पट्ट्यात वसलेले. @ लीमाउजेट , धन्स.. वेंधळेपणा लक्षात आणुन दिलास. :)
असेच कच्च्या करवंदाचे पण करतात.
हे कधी चाखलं काय पाहिलं ही नाही. कच्ची करवंद म्हटली की ती खार्‍या पाण्यातली किंवा लोणच्यातली इतपतच धाव. बाकी सर्व वाचक प्रतिसादकांच्या सहभागा बद्दल धन्स. :)

In reply to by गणपा

होय बाठा/बाठ/घोट म्हणजे कोयच. पण जोवर कैरी कोवळी असते तोवर ती कोय, पण एकदा का त्यावरच आवरण कडक झालं की मग तो बाठा/बाठ/घोट. परफेक्ट. धन्यवाद. सासव मस्तच. आमच्या घरी काहीजण आमरसातही नुसती काळी मिरी, किंचित मीठ घालून खातात.

मस्तच रे गणपा.. ( थोडा गूळ घालून केलेले सासव मस्तच लागते. आंबट, गोड, तिखट चवींचे मिश्रण.. अहाहा..) अननसाचेही सासव करतात, ते ही मस्त लागते. स्वाती

आगागागा... तुडुंब हळवा झालेलो आहे!

आंब्यापासून असल काही बनेल याचा कधीच विचार केला नव्हता,एरवी नेहमी फक्त आमरस हादड्णार्‍यांना हा बदल नक्कीच आवडेल यात काही शंका नाही, एकदम मस्त आहे फोटो आणी माहीतीही , एक प्रश्न : हा पदार्थ बनवायला फक्त रायवळ आंबाच पाहीजे की दुसरा कुठचाही चालतो ?

In reply to by प्राध्यापक

आंब्यांचे दोन मुख्य प्रकार एक रायवळ आणि दुसरा कलमी आंबा. बाकी जाती आणि पोट जाती बक्कळ आहेत. या पदार्थासाठी रायवळ आंबेच हवेत असं नाही. कुठलाही रसाळ आंबा असला की झाल. :) उद्या खिशाला परवडणार असेल तर मग हापुस आंबा वापरायलाही हरक नाही. पण या पदार्थासाठी तोतापुरी सारख्या आंब्यांच्या फंदात न पडलेल बर. :)

In reply to by गणपा

शेपू आंबाही चांगला ठरावा.. त्याचा खास फ्लेवर ज्यांना आवडत असेल त्यांच्यासाठी.. मला तर आवडतो बुवा.

रस करून खाता येणार नाहीत असे आंबे असतील तेव्हा करून खायला बरी आहे पाकृ. पहिल्यांदाच गणपाच्या पाकृला "बरी" म्हणून बोळवता आले. :-)

In reply to by नगरीनिरंजन

हा हा हा ननि, मागे माझा मिपावर झालेला 'पोपट' तुमच्या पहाण्यात आलेला दिसत नाही. ;)

:(

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका, भरीत पाहून ठीक आहे पण आंबे पाहुन सुद्धा :( हे म्हणजे अंमळ बुचकळ्यात पडलो आहे ;-) पाकृ आवडेश गंपाशेठ! आयुष्‍यात पहिल्यांदाच आंब्याला फोडणी दिलेली पाहिली आहे. घरी कधी करुन पाहताना आणि ते घरच्या लोकांनी पाहुन उडालेला गहजब कमी करण्‍यासाठी थोडेसे समुपदेशन करावे लागणार हे नक्की :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आजकाल कुठल्याही पाकृवर फक्त :( करून का निघून जाताय?

In reply to by स्मिता.

आजकाल कुठल्याही पाकृवर फक्त करून का निघून जाताय?
सध्या फक्त चिरमुरे आणि लाही पिठ खातात म्हणे ते.

च्यायला... गणप्या, तुझ्या मानेवर भुतासारखा बसणार आहे. कित्येक दिवस इथं तुझे आणि सोक्याचे धागे उघडले नव्हते. आज उघडला आणि मेलो. आता मानेवर बसणार तुझ्या. सासव खाऊ घातलंस तरच सुटका.

च्यायला, या भल्या माणसाच्या पाककृत्या पाहिल्या नसत्या तर जगात काय काय करुन खाल्ल्या जातं हे कळ्ळ असतं का असा प्रश्न मला गंपाच्या पाककृतीनंतर नेहमीच पडतो. आंब्यापासून आमरस एवढंच आम्हाला माहिती आहे. भो चालू दे तुझं...! हे आम्ही पहिल्यांदाच पाहतोय, वाचतोय. :) -दिलीप बिरुटे

बाठोणी / बाठवणी पाहून तोंडाला पाणी सुटले लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या गणपाभौ आम्ही पण ह्यात थोडा गुळ घालतो :) बाकी तुमच्या पाकृ आणी सादरीकरणाला सलाम :)

एक तर अजून आंबे प्रचंड महाग आहेत, वरनं हे असले फोटो! कुठे फेडशील हे पाप? आँ? आम्ही याला सासव म्हणतो कारण त्यात खोबर्‍याबरोबर थोड्या मोहर्‍या, अगदी अर्धा चमचा, वाटून घालतो. (गोव्यात मोहरीला सासवा म्हणतात.) असलं सासव अंबाडे, अननस यांचही करतात. अंबाड्यात गूळ घालतात. हा पदार्थ असा आहे, की आंबट तिखट आणि गोड या तिन्ही चवी समप्रमाणात लागल्या पाहिजेत. पोळ्यांबरोबर रस खाऊन झाला की कोय चोखून खाताना अशी काही ब्रह्मानंदी टाळी लागते की बस!

In reply to by पैसा

असलं सासव अंबाडे, अननस यांचही करतात लहानपणी अनेकदा खाल्लेली अनसा-फणसाची भाजी आठवली! हा पदार्थ असा आहे, की आंबट तिखट आणि गोड या तिन्ही चवी समप्रमाणात लागल्या पाहिजेत. अगदी हेच उडीद-मेथी दाणे घालून केलेल्या उडीद-मेथीबाबत म्हणता येईल.

In reply to by पैसा

तुम्ही दिलेली पाकक्रुतीच खर्‍या सासव ची आहे. आमच्याकडे मालवणला सारस्वत सोडून बाकीचे याला आंब्याच रायत म्हणतात. ofcourse, u know RAYATA is always different than SASAV. तुम्ही काकडीच, भोपळ्याच, आंबाड्याच, आणि अगदीच तर मिरचीच रायत करु शकता. पण पण पण सासव फक्त आंब्याचच.

आत्मा त्रुप्त झाला. पुर्वी खालेल्या (स्पाईसी मेंगोची) चटपटा आमची आठवण जागी झाली. पण ही पा.क्रु. त्या हुन सरस व निराळी आहे. मी तरी प्रथमच पाहतो आहे.

(गोव्यात मोहरीला सासवा म्हणतात.) >> वाचून हसता हसता खुर्चीतून पडले हो. बाकी पाकृ मस्तच... करून पाहायलाच हवी. गंपाभौ आणखी शाकाहारी पाकृ येऊ द्या हां.

जबरा दिसतंय, मालक.. करुन बघणार.

नविनच प्रकार कळला .