✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता

द विच : एक परी (उत्तरार्ध)

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Wed, 04/04/2012 - 11:16  ·  लेख
लेख
द विच : एक परी (पूर्वार्ध) 'हॅकर्स अंडरग्राउंड' एक अद्भुत, अनोखे आणि थरारक जग. जगभरच्या संगणक वापरकर्त्यांसाठी असलेले सर्वात मोठे नंदनवन, जिथे जागोजागी कल्पवृक्ष आणि कामधेनू उभ्या होत्या. तर मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅडॉब, जावा सारख्या कंपन्यांसाठी सर्वात मोठे शत्रूचे ठाणे, जिथे जागोजागी आंतरजालीय नक्षलवाद्यांच्या आणि समाजवाद्यांच्या टोळ्या मोर्चे बांधून लचके तोडायला बसल्या होत्या. 'हॅकर्स अंडरग्राउंड' म्हणजे काही मातब्बर हॅकर्सनी उभारलेले एक जग होते, जिथे जगातले महागात महाग सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टिम, पॅचेस, विविध अपडेट्स जे जे म्हणून तुम्हाला विनाकारण प्रचंड रक्कम मोजून विकत घ्यावे लागते ते सगळे फुकटात अगदी क्रॅक मारून, अधिकृत करून फुकटात दिले जात असे. विंडोजची नवी ऑपरेटिंग सिस्टिम आली ? दोन दिवसात क्रॅक सकट, की-जेन सकट फुकट उतरवून घ्यायला हॅकर्स अंडरग्राउंड मध्ये उपलब्ध आहे. नवीन अ‍ॅंटिव्हायरस हवा आहे ? नॉर्टन पासून पांडा पर्यंत वर्षभर सबस्क्राईब केलेले अनेक पर्याय हॅकर्स वरती उपलब्ध आहेत. काही तांत्रिक अडचण आहे ? कीबोर्ड साफ कसा करावा इथपासून ते मदरबोर्ड रिपेअरींग पर्यंत सगळी माहिती अगदी स्क्रीन शॉट सकट हॅकर्सवरती मिळणार म्हणजे मिळणार. 'हॅकर्स अंडरग्राउंड' दिवसें दिवस प्रचंड लोकप्रिय होते होते आणि धोकादायक देखील. आणी ह्या अशा जगात कधी कधी लहान-सहान मदत शोधत जाणारा मी, आता ऍडमिन म्हणून आमंत्रित केला गेला होतो. ==================== 'हॅकर्स अंडरग्राउंड' म्हणजे एक अनोखेच विश्व होते. त्या विश्वात प्रवेश करावा की नको हे मला काहीच ठरवता येत नव्हते. शेवटी मी गुमराहचा सल्ला घेतला. गुमराहने माझे चांगलेच ब्रेन वॉशिंग केले आणि 'हॅकर्स अंडरग्राउंडचा' नवा शिलेदार म्हणून मी बिनघोरपणे माझे पाऊल पुढे टाकले. 'गिव्ह अँड टेक'च्या जमान्यात काही मोजकेच शिलेदार आपली बुद्धिमत्ता आणि वेळ खर्च करून नवशिक्यांसाठी आणि गरजूंसाठी हे विश्व चालवत होते. अर्थात ज्या ऍडमिनच्या शिफारशीने तुम्ही इथे ऍडमिन बनता, तो ऍडमिन सोडला तर इतर कोणाची नावे देखील तुम्हाला कळत नाहीत आणि तुमची देखील कोणी चौकशी करत नाही. ऍडमिन देखील सदस्य म्हणूनच वावरतात आणी मदत करत राहतात. काही अडचण मग ती सदस्यांना असो वा ऍडमिनला सोडवण्यासाठी एकच व्यक्ती उपलब्ध होती आणि ती म्हणजे 'मार्कस'. हा मार्कस म्हणजे देखील एक अनोखा मनुष्य होता. त्याच्या विषयी कधीतरी सवडीने नक्की लिहीन. ह्या संपूर्ण विश्वाचा डोलारा, कॉपीराइट्सचे नियम - कायदे सगळे हा मनुष्य एकहाती सांभाळत असे. नवीन नवीन असताना माझ्याकडे वेगवेगळे रिमोटस तयार करणे, याहू, एम्-एस-एन साठी टॉकिंग बॉटस बनवून देणे,लिट ट्रान्सलेटर, हॅश कोडर बनवणे अशी लहान लहान कामे होती. पुढे काही काळातच मी फेक वेबकॅम, अँटिव्हायरस क्रॅकिंग, की-जेन इत्यादींवरती देखील काम करायला लागतो. ह्या काळात मी, गुमराह आणी द विच चे त्रिकूट खूपच जवळ आले. आमचे रोजचे फोन,दिवस दिवस चाट तर चालू असेच. अर्थात फोन करण्याची ऐपत नसल्याने मी याहू कॉल्सवरतीच भागवत असे. द विच तर कधी कधी माझ्या घरच्यांशी देखील गप्पा मारत असे. ह्या फोन्सचा एक फायदा झाला, तो म्हणजे द विच चे मराठी 'तू कशी हाय?' इथपर्यंत सुधारले आणि आमच्या मातोश्रींचे इंग्रजी 'आय एम फाईन, हाऊ आर यू' पर्यंत सुधारले. अशातच एके दिवशी मला 'द विच' चा फोन आला. 'मी मुंबईत येते आहे आणि मुंबई पासून तुझे शहर किती दूर आहे' ह्या दोन प्रश्नांची उत्तरे मिळवून तिने सरळ फोन ठेवून दिला. कधी येणार आहे, कशी येणार आहे, का येणार आहे.. काही काही सांगितले नाही. ह्यानंतर आठवडाभर ती नेटवरून गायबच झाली. सात-आठ दिवसांनी पुन्हा फोन आला आणि माझा पत्ता माहिती करून घेऊन पुन्हा कट झाला. ह्यावेळी निदान 'मी बुधवारी येते आहे' येवढे सांगण्याची कृपा आमच्यावरती झाली होती. बुधवारी मी सकाळपासूनच आतुरतेने द विच ची वाट पाहत होतो. ह्याआधी तिला फोटोत देखील कधी बघितले नसल्याने आठवतील तेवढ्या परदेशी ललनांच्या चेहर्‍यांची उजळणी करून झाली होती. साधारण दुपारी २ च्या सुमाराला कॅफेबाहेर एक रिक्षा थांबली आणि त्यातून गोरीपान, निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची 'द विच' आमच्या कॅफेकडे बघायला लागली. मी लगबगीने उठून तिचे स्वागत केले आणि आधारासाठी हात पुढे केला. 'डिअर साठ वर्षाची असले तरी अजून आधाराची गरज लागत नाही मला, उलट लोकांना मीच आधार देत असते.' असे म्हणत आणि डोळे मिचकावत द विच आमच्या कॅफेत प्रवेशकर्ती झाली. "तुला कोणी यंग ब्युटिफुल येणार वाटले होते का?" ह्या तिच्या प्रश्नाने आमच्या चेहर्‍यावरचे भाव तिने सहज वाचल्याचे समजले आणि कबुली देण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. पण एखाद्या तरुणीला देखील लाजवेल असा उत्साह, उमदेपणा आणि निरागसता 'द विच' मध्ये भरभरून वाहत होती. तिच्या बरोबर वेळ कसा गेला ते देखील कळले नाही. तिच्या बरोबर मग मी मस्त महाराष्ट्रीय थाळी खायला गेलो, तिच्या आग्रहाखातर ऊसाचा रस पिला, तिला गणपतीचे मंदिर दाखवले आणि बरेच काय काय केले. तिला भेटल्यावरती आपण तिला पहिल्यांदाच भेटतो आहोत हा विचार काही क्षणातच नाहीसा झाला आणि आम्ही अगदी मिसळून गेलो. माझ्या भयाण इंग्रजीचा मारा सोडला तर तिचा देखील दिवस छान गेला असावा. संध्याकाळी तिला न्यायला तिचा कोणीतरी मित्र येणार होता. फोनवर पत्ता समजावून घेत घेत एकदाचा तो देखील कॅफेत पोचला आणि आमच्या भेटीचा (द विच च्या शब्दात डेटिंगचा) दिवस संपला. तिच्या ह्या मित्राबरोबर एक छानशी गोडशी मुलगी देखील आली होती. १७/१८ वर्षाची ती मुलगी एखाद्या बाहुली सारखी दिसत होती. द विच ने पुन्हा एकदा बाय बाय केले आणि "अरे ओळख करून द्यायला विसरलेच, 'ही माझी मुलगी कॅथरीन आणि कॅथरीन तू पॅपिलॉनला ओळखतेसच." असे सांगून पुन्हा एकदा डोळे मिचकावले. त्या बाहुलीने देखील खट्याळपणे हसून दाखवले आणि शेवटी स्वतःची खरी ओळख करून दिली आणि "मी बबलगर्ल" सांगून माझी विकेट काढली. ह्या भेटीनंतर द विच बरोबरच बबलगर्लशी देखील माझे सूत चांगलेच जुळले आणि समवयस्क असल्याने आमच्या गप्पा देखील रंगू लागल्या. 'द विच' हे काय रसायन आहे हे मला बबलगर्ल कडून हळूहळू उलगडले आणि मी अक्षरशः थक्क झालो. 'द विच' चा जन्म झाला तोच मुळी तुरुंगात. आईची आणि बँकेची फसवणूक करून बाप परागंदा झाला होता आणि त्या केसमध्ये आई मात्र अडकली होती. मुलीला जन्म देताच त्या बिचारीने प्राण सोडले आणि 'द विच' ची रवानगी आधी आश्रमात आणि कळत्या वयात दत्तक म्हणून वॉटसन कुटुंबाकडे झाली. वॉटसन कुटुंबात तिला पहिल्यांदा हक्काचे प्रेम अनुभवायला मिळाले. शिक्षणाची गाडी रुळावरती यायला लागली. पण नियतीला ते बघवले नसावे. अचानक आलेल्या हार्ट अ‍ॅटॅक मध्ये मिस्टर वॉटसन दगावले आणि वॉटसन कुटुंब गरिबीच्या कड्याकडे वेगाने धावू लागले. अशावेळी छोटी 'जेन' अर्थात 'द विच' हिमतीने पुढे झाली आणि फ्लॉवर गर्ल पासून ते पिझ्झा शॉप, बेबी सिटिंग पर्यंत सर्व कामे हिमतीने करत तिने घर सावरले आणि स्वतःचे शिक्षण देखील चालू ठेवले. ह्या सगळ्या काळात तिला अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले. अपमानापासून ते बलात्कारापर्यंत सगळे भोग तिच्या वाटेला आले. घर सावरले जात असतानाच मिसेस वॉटसन देखील कालवश झाल्या आणि जेन पुन्हा एकदा एकाकी झाली. अशातच तिला बँकेची नोकरी चालून आली. बँकेच्या नोकरीतच तिचा संगणकाशी परिचय झाला. आधीच थोडीशी अबोल असलेल्या आणि आता पूर्णच एकाकी झालेल्या जेन च्या जिवाला एका आभासी जगाचा ओलावा मिळाला आणि ती हरखूनच गेली. फावल्या वेळात संगणकाचे शिक्षण घेणे तिने चालू केले आणि जोडीला चालू केले अनाथ मुलांसाठी समाजकार्य. तिच्या पगारातला एक मोठा हिस्सा संगणकावरती आणि ह्या मुलांवरती खर्च होऊ लागला. "आजच्या घडीला ती २४ अनाथ मुलांच्या पालन पोषणाचा आणि शिक्षणाचा खर्च उचलत आहे आणि त्यातला एकाला तर तिने दत्तक घेऊन आपल्या घरीच आणून ठेवले आहे, आणि ती मी आहे पॅपिलॉन." 'द विच' चे हे रूप माझ्यासाठी अगदीच शॉकींग होते. एक हॅकर म्हणून दरारा असलेली, माझ्या चुकांमध्ये देखील मला पाठीशी घालणारी, माझ्यासाठी बिनधास्त पंगे घेणारी ही 'द विच' अशी असेल असे कोणाला वाटले होते? पुढे पुढे तर मी तिला मदर टेरेसाच म्हणायला लागलो होतो. पण सुखाचे दिवस टिकत नाही म्हणतात हेच खरे. एके दिवशी एयरपोर्टवरून येत असताना कॅथरीनच्या गाडीला अपघात झाला आणि ती जागेवरच ठार झाली. येवढी धीरोदात्त असूनही 'द विच' हा आघात मात्र सोसू शकली नाही. अक्षरशः ती कोलमडून पडली. कुठेतरी स्वतःचे बालपण आणि तारुण्य कॅथरीन मध्ये ती बघत असावी, जपत असावी. अनेक वादळाला सामोरे गेलेली 'द विच' ह्या वयात ह्या प्रसंगाने मात्र पूर्ण खचली. हळूहळू नेटवरचा तिचा वावर देखील कमी होत गेला. आठवडा पंधरा दिवसांनी येणारे कॉल्स आता दोन्-तीन महिने देखील येईनासा झाले. तोवर माझी परिस्थिती जरा बरी झाली असल्याने मीच अधे मध्ये तिला कॉल लावायचो पण बर्‍याचदा तो उचलला जायचा नाही किंवा २/४ मिनिटात ती संभाषण आटोपते घ्यायची. तिला बहुदा आता ह्या जगापासून आणि आमच्यापासून देखील दूर जायचे होते. मी देखील मग तिला त्रास होऊ नये म्हणून फोनच्या ऐवजी ईमेल्स ची वाट पसंत केली. ईमेल्सला देखील फक्त त्रुटक उत्तरे मिळायची. अशातच गुमराह एकदम नाहीस झाला आणि मी पूर्णच खचलो. आधी 'द विच' आणि आता 'गुमराह' मला एकटे टाकून सगळ्यापासून दूर झाले आणि मला अगदी पोरके वाटायला लागले. माझे मन त्या दुनियेत रमेना. शेवटी मी देखील त्या जगाला शेवटचा गुडबाय केला आणि सर्व आठवणी मागे सोडून सगळ्याचा निरोप घेतला. गुमराहचा तर पत्ताच नव्हता, पण ख्रिसमस, माझा वाढदिवस, दिवाळी अशा प्रसंगी 'द विच' ची शुभेच्छापत्रे मात्र आठवणीने ईमेलवरती धडकत होती. मी तर इतका विरक्त झाल्यासारखा झालो होतो की मी त्यांची पोच देखील देत नव्हतो. अशातच मागच्या आठवड्यात अचानक 'द विच' चा फोन आला आणि तो आवाज ऐकून पुन्हा एकदा मी रोमांचित झालो. सगळ्या चौकश्या झाल्यावरती 'द विच' अचानक म्हणाली "तुला माहितीये, परवा खूप दिवसांनी इंटरनेटला कनेक्ट केले. माझ्या लॅप्पीत बहुदा ट्रोजन शिरल्याचे जाणवले. रिमूव्हल शोधायला सर्च केला तर एक फोरम मिळाला." "मग घेतलेस का नाही रिमूव्हल डाऊनलोड करून?" "नाही रे. तुला सांगते, काय हे आजकालचे फोरम रे, रिमूव्हल स्टेप बाय स्टेप कसे करावे हे वाचायला तिथे रजिस्ट्रेशन करावे लागते आणि रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत १०$. आणि रिमूव्हलची .exe हवी असेल तरी १०$. "ते तर आता सगळ्यांनीच चालू केले आहे. पैसा तेव्हा देखील महत्त्वाचा होता आणि आता तर अतिमहत्त्वाचा झाला आहे बाई. मग शेवटी भरलेस का मग पैसे ?" "तेच भरायला आले होते, पण तो फोरमच हॅक झालाय. रजिस्ट्रेशन पण गरजेचे नाही आणि सॉफ्टवेअर पण फुकट डाऊनलोडाला उपलब्ध झाले आहे. स्ट्रेंज ना?" "खरंच स्ट्रेंज आहे." मी येवढेच म्हणालो आणि फोन संपल्या संपल्या कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा 'हॅकर्स अंडरग्राउंड'च्या पेजवरती हजेरी लावली आणि फक्त 'she is back' येवढीच पोस्ट टाकली. एका तासात ५७९ लाईक्स आणि ३५९ आनंदाने आणि उत्साहाने भरलेल्या कॉमेंट्स लगोलग येऊन आदळल्या. 'she' म्हणजे कोण हे सांगायची मला गरज पडली नाही. ========================= (समाप्त)

Book traversal links for द विच : एक परी (उत्तरार्ध)

  • ‹ द विच : एक परी (पूर्वार्ध)
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
5208 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

धन्यवाद सगळ्यात आधी समाप्त

जेनी...
Wed, 04/04/2012 - 11:20 नवीन
धन्यवाद सगळ्यात आधी समाप्त केल्याबद्दल.:) वाचत आहे .. हि पोस्ट समाप्त च्या लेबलासाठी होति खास्केल ;) परा खरच छान लिहितोस ....
  • Log in or register to post comments

:)

मी-सौरभ
Wed, 04/04/2012 - 11:20 नवीन
हे तर आमी कालच वाचलं ;) पराशेट हॅकर्स च्या कथा पूर्ण करतात आणि जरा ज्यादा ट्यारपी असलेल्या कथा पेंडींग ठेवतात असं दिस्तयं :)
  • Log in or register to post comments

दोन्ही भाग एकदम वाचले...

नन्दादीप
Wed, 04/04/2012 - 12:03 नवीन
दोन्ही भाग एकदम वाचले... मस्त...
  • Log in or register to post comments

पराची परी

आदिजोशी
Wed, 04/04/2012 - 12:29 नवीन
कथा पूर्ण केल्याबद्दल तुला एक कटींग. आणि कथेसाठी एक सिंगल मॉल्ट भेट :)
  • Log in or register to post comments

एकदम

अँग्री बर्ड
Wed, 04/04/2012 - 12:51 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments

आवडेश. पराच्या हॅकिंग कथांची

मृत्युन्जय
Wed, 04/04/2012 - 13:13 नवीन
आवडेश. पराच्या हॅकिंग कथांची मौज अश्यात आहे की त्या खर्‍या वाटतात. असे वाटते की परा खरोखरच एखादा हॅकर असावा आणि अश्या एखाद्या टोळीशी त्याची ओळख असावी :)
  • Log in or register to post comments

लगेच संपवल्या बद्दल प्रथम

५० फक्त
Wed, 04/04/2012 - 13:36 नवीन
लगेच संपवल्या बद्दल प्रथम धन्यवाद. आनंद वाटला वाचुन.
  • Log in or register to post comments

आणि त्यातला एकाला तर तिने

बाळ सप्रे
Wed, 04/04/2012 - 13:41 नवीन
आणि त्यातला एकाला तर तिने दत्तक घेऊन आपल्या घरीच आणून ठेवले आहे, आणि ती मी आहे पॅपिलॉन."
पॅपिलॉन तो की ती ?? जरा भरकटलो इथे..
  • Log in or register to post comments

कॅथरीन पॅपिलॉनला सांगत असते

मृत्युन्जय
Wed, 04/04/2012 - 14:07 नवीन
कॅथरीन पॅपिलॉनला सांगत असते हो "की ती उचलुन आणलेली पोरगी मी आहे" "ती मी आहे. पॅपिलॉन. " असे न वाचता त्याने जसे लिहिले आहे तसेच वाचा, :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

पराशेट

मी-सौरभ
Wed, 04/04/2012 - 14:11 नवीन
एक ',' विसरलात स.प.रा. जी :)
आणि त्यातला एकाला तर तिने दत्तक घेऊन आपल्या घरीच आणून ठेवले आहे, आणि ती मी आहे, पॅपिलॉन."
असचं म्हणायच होतं ना तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

वरील सर्वजण

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/04/2012 - 14:45 नवीन
धन्यवाद.
आणि त्यातला एकाला तर तिने दत्तक घेऊन आपल्या घरीच आणून ठेवले आहे, आणि तो मी आहे पॅपिलॉन."
हे वाक्य खरेतर मी "आणि त्यातल्या एका जीवाला तर तिने दत्तक घेऊन आपल्या घरीच आणून ठेवले आहे, आणि तो मी आहे पॅपिलॉन." असे रचलेले होते पण गडबडीत चुकीचे काही टंकले गेले. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. @ श्री. निश कृपया प्रत्येक ठिकाणी येउन हे रडगाणे गाणे आता खरच थांबवा. कधी तरी एखाद धाग्यावरती, प्रतिसादाखाली तुम्ही तुमच्या मनातला संताप बाहेर काढणे ठिकच आहे. पण आता खरच उबग आला आहे. प्लिज थांबवा आता हे.. कृपया संपादक दखल घेतील काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

>>>@ श्री. निश परा, गल्ली

प्यारे१
Wed, 04/04/2012 - 14:54 नवीन
>>>@ श्री. निश परा, गल्ली चुकली का रे? इथं नाही दिसत प्रतिसाद त्याचा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

प्यारोबा

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/04/2012 - 14:58 नवीन
अहो पंख लागले त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

परिकथेतील राजकुमार साहेब, आता माफी मागतो तुमची पण

निश
Wed, 04/04/2012 - 15:00 नवीन
परिकथेतील राजकुमार साहेब, आता माफी मागतो तुमची पण मला खर तर हेच दाखवायाच होत कि सतत तेच केल तर तुम्हालाही कंटाळा आला ना. मग सतत उगाच विडंबन ऐकुन मलाहि कंटाळा आला होता. सतत काही लिहिल की झालच त्याच विडंबन वर कस तुमच आधिच चुक होत रटाळ होत हे च हे सांगण. त्या बद्द्ल माझ बोलण होत. आणि परा शेठ माझा तुमच्यावर राग व आकस नाही आहे पण दुसर्‍यांच्या लिखाणावर टिका करणार्‍यानि स्वतावर व स्वतावरच्या लिखाणावर केलेली टिका खिलाडुपणाने नको का घ्यायला. असो माझा तुमच्यावर राग नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्यवाद.. भावना पोहोचल्या..

बाळ सप्रे
Wed, 04/04/2012 - 15:17 नवीन
धन्यवाद.. भावना पोहोचल्या.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पॅपिलॉन

पहाटवारा
Wed, 04/04/2012 - 15:03 नवीन
पॅपिलॉन च्या अ‍ॅडमिनिस्ट्रेशन च्या अजुन कहाण्या येऊ देत ..
  • Log in or register to post comments

एकदम झकास. कथा पूर्ण

प्रचेतस
Wed, 04/04/2012 - 16:05 नवीन
एकदम झकास. कथा पूर्ण केल्याबद्दल खास अभिनंदन.
  • Log in or register to post comments

सुंदर

अन्या दातार
Wed, 04/04/2012 - 18:05 नवीन
जबरा! खिळवून ठेवणार्‍या घटना आहेत. एक उगीचच शंका: कथा काल्पनिक कि सत्य??
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Wed, 04/04/2012 - 18:26 नवीन
पण आणखी जरा गुंतागुंतीचा प्लॉट आवडला असता.
  • Log in or register to post comments

आवडली

तिमा
Wed, 04/04/2012 - 19:35 नवीन
कथा आवडली. ती काल्पनिक असेल किंवा नसेल. मी मात्र ती खरी आहे असं धरुन जास्त एन्जॉय केली.
  • Log in or register to post comments

दोबारा........

इरसाल
Wed, 04/04/2012 - 21:21 नवीन
दुसर्यादा वाचुनही आनंद झाला.
  • Log in or register to post comments

मस्त!

sneharani
गुरुवार, 04/05/2012 - 10:25 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

मस्त कथा. पुर्ण वाचुन

इझाबेला स्वान
गुरुवार, 04/05/2012 - 12:49 नवीन
मस्त कथा. पुर्ण वाचुन काढली. अजुनही येउदेत.
  • Log in or register to post comments

कथा आवडली

विसुनाना
गुरुवार, 04/05/2012 - 17:58 नवीन
कथा आवडली. अगदी योग्य जागी वळसे घेणारी आहे. *** पण- त्या क्यॅथरीनला कशाला मारलं वो, पाऽऽप? ;)
  • Log in or register to post comments

मस्तच..

चिगो
गुरुवार, 04/05/2012 - 18:18 नवीन
कथा आवडली, पराशेठ..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा