दिवसेंदिवस
अनुराधा पाटील यांचा पहिला कवितासंग्रह "दिगन्त" १९८१ ला प्रसिद्ध झाला. दुसरा "तरीही" ८५ ला व तिसरा "दिवसेंदिवस" ९१ ला. आजच्या तरुण वाचकांना हे नाव कदाचित माहीतही नसेल पण २५-३० वर्षांपूर्वी समीक्षकांनी, लेखकांनी व कवींनी, हो, कवींनीही, त्यांच्या कवितेचे पोट भरभरून कौतुक केले होते. आज माझ्यासमोर आहे "दिवसेंदिवस". कविता वाचतांना आठवण येते पावसाळ्यात ढग दाटून आलेल्या संध्याकाळातील विषण्णतेची. अशा वेळी तुम्ही एकटे असतांना आठवणी जागृत होतात त्या बहुदा आल्हादकारक नसतातच. आणि त्यात तुमचा स्वभाव अंतर्मुख असेल तर जखमा भळाभळा वाहू लागतात. त्यात या संग्रहातील बर्याच कविता कवियत्रीच्या कवितांबद्दल आहेत. हे नाते तसे अडचणीचेच. इतर व्यथांबद्दल तुम्ही जिवलगाशी बोलणे व त्यांना वाट करून देणे शक्य तरी असते पण येथे तेही शक्य नसते. येथे " आपुलाच वाद आपणाशी ". आख्या संग्रहात याला अपवाद म्हणाव्यात अशा दोन चार कविताच सापडतील. असो. आज दोन कविता देत आहे. लेख जरा मोठा होईल पण परत या वाटेला येऊंच असे नाही.
काही द्यायचंच असेल
काही द्यायचंच असेल
तर मला निरंतर दु:ख दे
म्हणजे सदैव तुझी आठवण येईल
असे काही मागणारांचाच
वसा पुढे चालवला
पण फुटलेत तरी जगण्याला
क्वचित कुठे हिरवे कोंब
आणि उमलून आलीत
देहमनाच्या फांदीवर
जीवनोत्सुक क्षणांची
लालबुंद कोवळी पानं.
तुझा विसर पडला त्या दिवसांची
आज पुन्हा मला आठवण येतेय्
दु:खाचं मूळ कारण असणारा तू
तुलाच आता मी मागेन म्हणतेय्.
पहिले मागणे होते कुंतीचे. नवरा मेल्यावर हस्तिनापूराला आल्यापासून तिची फरफटच चालली होती. युवराज्ञी, सम्राटाची पट्टराणी... पण इंद्रप्रस्थातील काही दिवस सोडले तर ती जणु वनवासातच होती. तिने दु:ख मागितले व कृष्णाने तिला दिले ! व हा वसा भारतातील स्त्रीयांनी पुढे चालवला ! ही ही त्यातील एक. फरक एवढाच की जीवनवेल पूर्णत: सुकून गेली नाही. आणि याचे काव्यात्मक दर्शन पुढील सहा ओळीत दिसते. हिरवे कोंब व लालबुंद कोवळी पाने... खडतर काळावर मात करून सौंदर्यावे नवजीवन फुलवणारे सृजन. हे घडते क्वचितच पण त्यावेळीही काळाने ज्यावर हळुवार पांघरुण घालून आपण विसरू शकणार नाही असे क्षणही नजरेआड केले आहेत हे लक्षात येते. ही करुणाघनाची अमोल कृपाच म्हणावयास पहिजे. नाही तर माणुस कोलमडूनच पडेल. आता कवियत्री निरंतर दु:ख मागत नाही. ते अशक्य आहे हे तिला कळून चुकले आहे. आता तिची झेप फार फार मोठी आहे. कृष्णाकडेच मागावयाचे, मग आठवण रहावी म्हणून दु:ख कशाला ? तो तर जीवनाचा अविभाज्य भाग, किंवा भोग म्हणा, आहेच. आपल्याकडे आहेच, ते मागण्यात काय हशील ? तिला हवे आहे, जगण्याचा मूळ स्त्रोत, तो स्वत:च ! सर्व विश्वाला बाहूत घेणारा विश्वात्मक. काय मागणे आहे ! क्षुल्लक सुरवातीपासून कोठे पोचला आहे शेवट ?
दुसरी कविता आहे आजच्या धकाधकीच्या, कशावर विश्वास ठेवावा हेच न कळणार्या दिवसांतील एका सार्वत्रिक गरजेवरील. आज कोणतीही चांगली बातमी वाचली तर आपण सहजपणे त्यावर विश्वासच ठेवू शकत नाही. एखाद्याने अनाथाश्रमाला लाखाची देणगी दिली तर तुमच्या मनात पहिला विचार काय येतो ? " नक्कीच काळा पैसा, रेव्ह्यनू खात्यात असावा !" खरे की नाही ? आज गरज आहे ती निस्वार्थीपणाने वागणारी माणसे जगात आहेत यावर आपला विश्वास बसण्याची. तसे झाले तर तुम्हीही त्या दिशेने एक पाऊल पुढे टाकाल. माझ्या मित्रांत अनेक जण आहेत जे चांगल्या कार्याला मदत करावयास तयार आहेत पण भरवशाचे कोणीच समोर नाही. आशेचा किरण दाखविणारी पुढील कविता पहा :
आपल्यातच गुंगून
आपल्यातच गुंगून
सरसर कापणी करणारी माणसं
गुरांच्य मागे
रमत गमत चालणारी पोरं
झाडाखाली लेकरं पाजत
बसलेल्या बाया
हात हलवून निरोप देतात सगळे
शेताच्या बांधानं
धावत जाणार्या गाडीला.
गाडीच्या खिडकीखिडकीतून
आत शिरते तेव्हा
हवेत पसरलेली
अपरिचित गंधाची लाट
आणि खर्या वाटावयाला लागतात
अचानक
कुणीतरी सांगत असलेल्या
जगभरच्या निरर्थक गोष्टी.
एक सुरेख शब्दचित्र आपल्या समोर उभे रहाते. आपण सर्वांनी पाहिलेले. कामात गुंगलेली माणसे, गुरांच्या मागून जाणारी पोरं, काहीच घाई नसल्याने रमतगमत जाणारी, (स्वत: आठवून बघा, तुम्ही केव्हा "रमतगमत"
चालला होता ? फार मागे जावे लागेल, कदाचित तुम्हाला लोक "पोरं" म्हणत होते त्या काळापर्यंत; त्या नंतर बहुधा नाहीच ! ) आणि " लेकरांना " पाजत बसलेल्या बाया ; माणसे, पोरं आणि लेकरे .. उतरती भाजणी. ही सर्व तुमची गाडी धावत जात असतांना हात हलवून निरोप देत आहेत. तुम्ही त्यांना धड दिसतही नाही, तुम्ही परत कधी भेटणारही नाही, पण तरीही त्यांना वाटलेला निरपेक्ष आनंद ते व्यक्त करत आहेत व तुम्हालाही त्यात सामील करून घेत आहेत." निरपेक्ष " हे महत्वाचे. तुम्ही नकळत हात हलवता, ती मागे गेली तरी. ही एकत्र व्यक्त झालेली सामुहिक संवेदना अतिशय आश्वासक आहे. तुम्ही हात हलवला तसाच मागच्या डब्यातील माणसानेही हलवला. काही क्षणांपुरते गाडीतील व गाडी बाहेरील सर्वजण " अहं ब्रह्मास्मि " या सनातन तत्वाशी एकरूप होतात. कवीयत्रीला ही गंधाची लाट जाणवते, अपरिचित असली तरीही. वाळवंटात लंगड्याचे सोंग घेणार्या लुच्च्याला आपला घोडा बसावयास देणार्या अरबाची गोष्ट मग खरी वाटू लागते. मी ही कविता वाचली व तेव्हापासून प्रवासात केव्हाही शाळेतील मुले दिसली की हे sss अशी हाक मारून, हसून हात हलवतो. मुलांच्या तोंडावर प्रथम अविश्वासाची भाचना दिसते व मग एक अनिर्वाज्य हास्याची लाट पसरते. मग गाडी दिसेनाशी होईपर्यंत ती हात हलवतच रहातात.बराच वेळ मी सुखात चिंब भिजलेला असतो.
अनुराधा पाटील औरंगाबादच्या. हा अप्रतिम कविता संग्रह एखादेवेळी पुण्या-मुंबईत मिळणार नाही. पण लागली तर मदत करावयास आमचे मित्र प्रा. डॉ. आहेतच की.
शरद
वाचने
3370
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर लेखन आणि उत्तम ओळख करुन
अप्रतिम
तुझा विसर पडला त्या
उत्तम
सुरेख
अं?
In reply to सुरेख by श्रावण मोडक
छ्या...
In reply to अं? by निनाद
नेहमीप्रमाणेच!
आभारी आहे सर
अप्रतिम...
सुंदर विवेचन आणि उत्तम ओळख.