Skip to main content

रंग...!

लेखक वेणू
Published on गुरुवार, 29/03/2012
अनेक रंग माझ्या ओंजळीत दिलेस... अगदी हळूवारपणे... हरखून गेले ते रंग पाहताना... माझ्या ओल्या डोळ्यात त्या इंद्रधनूचं प्रतिबिंब तरळलं.... नजर हलेना माझ्याच भरलेल्या ओंजळीवरून... तू : पाहतेस काय? मी : हे...... हे रंग.. कित्ती आहेत!! सुंदर एक- एक... तू : हम्म, तुझेच आहेत मी :सारे? तू : हो मी :काय म्हणू? तू : डोळ्यांनी सांगितलं सारं.. हे रंग वापर, उधळ तुला हवे तसे मी : मनसोक्त? तू :हो, म न सो क्त मी :हा हिरवा, हा लाल, हा केशरी, हा पारवा, करडा- गव्हाळ! हा का देतो आहेस? तू :तुझी कांती, गव्हाळ म्हणून मी :पण ह्या रंगामूळेच तुला खूप काही ऐकावं लागलंय आजवर तू : तुला, कटूच आठवण येणार असेल, तर आण तो इकडे मी : काय करशील त्याचं? तू : ठेवेन जपून, तुझ्या इतकाच मी : वेड लावलंस आज मला तू : .... मी :आयुष्याचा कॅनव्हास पुन्हा रंगवायला घेईन तू :शुभ्र कागदावर? मी :हम्म, मला मदत करशील? तू : बोल ना, काय ते मी :खूप दिवसांनी इतके रंग एकत्र पाहते आहे रे, कुठला- कुठे- कसा उतरवू, सांगशील? तू :सुरुवात कर हिरव्याने..!! मी : सुखाचा रंग तो, तू सर्वाथाने देऊ केलेल्या तू :त्याच्या भोवती गुलाबी पेर मी : आपल्या इवल्या विश्वातल्या प्रेमाचा? तू : मग घे, केशरी-उधळ मुक्तपणे मी :माझ्यातली बंडखोरी हेरतोस? तू : आता ओत अवकाशाचा आकाशी अथांगपणा मी :तुझ्या मनाचा ठाव घेणारा? तू : मग पारवा मी : माझ्यातला अवखळपणा? तू :मग बुंद लाल मी :तुझ्यातल्या जगण्याच्या जिद्दीसारखा, गडद पण मोहक, असा? तू : आता पिवळट हलक्या- फिकट छटा मी :वृद्धपकाळापर्यंत टिकणारी सोबत म्हणून? तू : ..... मी : अरे, पण चित्र पूर्ण करायला, काळा नको? तू :.... मी असेपर्यंत, 'दु:ख' असे थेट ओंजळीत येणार नाही तुझ्या! -बागेश्री ब्लॉगवर पूर्वप्रकाशित : http://venusahitya.blogspot.com/2012/01/blog-post.html
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4204
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

मी असेपर्यंत, 'दु:ख' असे थेट ओंजळीत येणार नाही तुझ्या! व्वा हे सगळ्यात जबरदस्त....

मेलोड्रॅमेटीक वाटलं.

वॉव .. काय बोलु खरच कळत नाहिय.. खूप दिवसानी खूप अप्रतिम वाचल्याचा आनंद होतोय .. अप्रतिम ....अप्रतिम ....अप्रतिम ....

सो स्वीट. गोग्गोड. जीवनातील तरल भावनांबद्द्ल असच फुलपाखरी आपण लिहू शकता. स्वरांच्या राज्यातल्या सात मोहावनार्‍या स्वरांबद्दल, जीवन समृद्ध करनार्‍या सहा चवींबद्द्ल,तार्‍यांबद्दल व त्यात शोभणार्‍या चांदोबाबद्दल, तुम्ही दाखवू शकता हळुवारता सांजेच्या तिरीपीची आणि तुम्हीच दाखवू शकता शुद्ध्-शुभ्र जलतुषारांचे पावित्र्य. तुम्ही नाजूक फुलांबद्दल लिहा अन् तरंगत्या झोपेतल्या साखरस्वप्नांबद्दलही लिहा. निळ्या डोळ्यातील कुतूहलाबद्दल आणि काळ्या डोळ्यातल्या मायेबद्दल. गायीच्या वात्सल्याबद्दल आणि भूभूच्या जीव ओवाळून टाकणार्‍या मैत्रीबद्दल. मिपा हे अशाच लिखाणासाठी तर आसुसलेले आहे.