मे महिन्याचे दिवस. उकाडा जबरदस्त वाढलेला. आणि गावात चोऱ्यांचे प्रमाणही वाढलेले. दर ४-५ दिवसांनी एक एक नवीन चोरी होऊ लागलेली. भुरटे, सराईत आणि हुमदांडगे असे सगळेच चोर मोकाट सुटलेत की काय असे वाटण्या इतके चित्रविचित्र , सुरस आणि चमत्कारिक चोऱ्यांचे प्रकार ऐकायला मिळू लागलेले. एक एक किस्से ऐकून लोक थक्क होत.
होता होता एक दिवशी चक्क आमच्या कॉलनीतच चोरी झाली. तोही प्रकार इतका चमत्कारिक की पहाटेच्या वेळी कटावणीने दार उघडू पाहणाऱ्या चोरांना घरातील आजोबांनी (चष्मा घातला नसल्यामुळे) मालकाचे मित्र समजून स्वत:च कडी वगैरे काढून आत घेतले ! मग घरमालकाने आरडाओरडा केल्यावर शेजारचे लोक धावून आले अन चौर्यप्रसंग टळला.
आमची छोटी बंगली कॉलनीच्या एका टोकाला आहे. मागे एक अपार्टमेंट, पुढे रस्ता, डावीकडे रिकामा प्लॉट अन उजवीकडे पडीक जागा. तीत दलदल अन गवत माजलेले. चारी बाजूंना कंपाऊंड. गेट उघडताना होणाऱ्या कर्कश्श आवाजामुळे आमच्या घरी कुणी आले की ४ घरांपलीकडच्या पाटील मावशीनासुद्धा समजे. शिवाय मुख्य दाराला लोखंडी सरकता दरवाजा बसवलेला. त्याला डबल कुलूप. म्हणून आम्ही काहीसे निर्धास्त. अन तरीही एके दिवशी आमच्याच घरात चोर शिरला की ! म्हणजे त्याचे असे झाले...
तर त्या रात्री सुमारे १२ वाजत आलेले. माझ्या डोळ्यावर झोपेचा अंमल चढू लागलेला. एकाएकी मला झोपेतच भास झाला की कुणीतरी आपल्याकडे टक लावून पाहत आहे. पुष्कळदा बसमध्ये आपल्या पाठीमागचा किंवा कडेचा माणूस विनाकारण आपल्याकडे एकटक पाहू लागला की एक विचित्र संवेदना होते. तसंच काहीसं वाटू लागलं. डोळे उघडून कुस वळवली. तर रातदिव्याच्या मंद प्रकाशात समोर कॉटशेजारी एका उंच काठी उभी असून तिच्यावर एक कपडा टाकलेला आहे व ती माझ्याकडे टक लावून पाहते आहे असे मला आढळून आले. आपण पाहतो आहे हे स्वप्न की सत्य हे समजून घेण्यासाठी मी डोळे चोळून पुन्हा पाहिलं, तर काठी नाही अन काही नाही.
दुसरी कूस घेतली अन डोळे मिटणार इतक्यात कॉटखाली एक गाठोडं पडलेलं दिसलं. माझा कल टापटीप राखण्याकडे असल्यामुळे कॉटखाली मी कधी काही सामान ठेवत नाही. कदाचित चिरंजीव लोळत लोळत कॉटखाली पडला की काय म्हणून पुन्हा कॉटवर नजर टाकली. तिथे चिरंजीव मस्त साखरझोपेत गुंग होता. पुन्हा कॉटखाली पहिले तर गाठोडे आता हळूहळू हलत असलेले. मग मात्र झोप खाडकन उडाली ! मेंदूने काही विचारप्रक्रिया करण्यापूर्वी स्वरयंत्राला दिलेल्या प्रतिक्षिप्त आज्ञेमुळे माझ्या तोंडून एक कर्णभेदक किंकाळी बेडरुमचा आसमंत फोडून बाहेर पडली.
त्या किंकाळीचा परिणाम एवढा जबरदस्त झाला की ते कॉट खालचे गाठोडे ताडकन उडाले अन बेडरुमबाहेर पडले. एका मिनिटात शेजारच्या अपार्टमेंट मधले सगळे दिवे एकसाथ लागले आणि सगळ्या खिडक्यांमधून झोपाळू /त्रासिक चेहेरे बाहेर डोकावू लागले. त्यानंतरच्या ५ मिनिटात ज्या गोष्टी घडल्या त्यांची क्रमवारी लावणे अवघड आहे पण साधारणपणे अशा होत्या.
तोंडावर शर्ट पांघरलेल्या चोराने बेडरूमच्या दाराची कडी बाहेरून बंद करण्याचा प्रयत्न चालवला. उद्देश हा की पळताना कुणी पाठलाग करू नये. सुदैवाने ती नादुरुस्त होती. ('गेला महिनाभर तुमच्या कानीकपाळी ओरडते आहे...कधी आणणार आहात सुताराला बोलावून कडी दुरुस्त करायला ?' हा माझा डायलॉग त्यानंतर पुढे महिनाभर बंद झाला. ) .
मुलगा जागा होऊन 'आई, आई, ..काय झाले ?..’ असे ओरडू लागला. मी बेडरुमचे दार आतून खेचले. त्याबरोबर चोर बाहेरील दाराकडे पळत सुटला आणि देवघरात झोपलेल्या व किंकाळी ऐकून जागे होऊन चष्म्याची तुटकी काडी सावरत, अंधारात चाचपडत बाहेर येणाऱ्या आजीबाईंना धडकला. या आजीबाई मी नोकरीला गेल्यावर आमच्या मुलाला सांभाळीत व आमच्या घरीच रहात.
बहुधा त्यांच्या चष्म्याची तुटकी काडी चोराच्या डोळ्यात गेली असावी. कारण तो ठो ठो करत ग्यालरीच्या दाराकडे पळाला. त्याचवेळी उकाड्यामुळे बाहेर ग्यालरीत झोपलेले मिस्टर किंकाळी ऐकून जागे होऊन ग्यालरीच्या दाराचे बाहेरून लावलेले कुलूप काढून आत येत होते. त्यांच्या पायात पाय अडकून चोर अन ते दोघेही भुई सपाट झाले.
या सगळ्यामध्ये माझ्या किंकाळ्या, मुलाचे 'आई, आई', आजींचे 'ताई, ताई’, मिस्टरांचे 'कोण आहे, कोण आहे ?' आणि खिडक्यामधल्या शेजाऱ्यांचा आरडा ओरडा यांचे पार्श्वसंगीत नॉन स्टॉप सुरु होते.
आता कुठे मिस्टरांच्या डोक्यात प्रकाश पडला की चोरी होत आहे. त्यांनी ताबडतोब खाली पडलेल्या चोराची गच्ची पकडून एक भडकावून दिली. त्याबरोबर चोराने उठून पळत जाऊन मागच्या दारातून बाहेर पलायन केले. तर त्याला समोर कंपाऊंडच्या भिंतीवरून डोकावणारी व काठ्या इ. शस्त्रांनी सज्ज असलेली शेजाऱ्यांची फौज दिसली. लगेच त्याने घुम जाव करून अंधारातच संपूर्ण इमारतीला एक प्रदक्षिणा घातली अन अखेर बागेच्या कठड्यावर एक पाउल ठेवून गेटच्या वरून थेट रस्त्यावर हनुमान-उड्डाण केले अन पाहता पाहता पसार झाला.
घरातले दिवे फटाफट लागले. मी सोडून सगळे विचारू लागले, ‘काय झालं, काय झालं ?’
'अहो, चोर, चोर...' मी.
शेजारी चोराला शोधू लागले. तो पसार झाल्याचे निष्पन्न होताच चौकशांचा पाउस घरच्यांवर पडला.
'काय गेले पहा हो...' अनाहूतांचा सल्ला. पाहिले. माझ्या उशाशी ठेवलेला मोबाईल त्याच्या कपाटात ठेवलेल्या त्याच्या पालकासह ( चार्जर ) गायब झाला होता ! मिस्टरांच्या, भिंतीवर अडकवलेल्या पॅन्टच्या खिशातील २००० रु. ही गायब झाले होते.
'तरी नशीब हो, कुणाला मारले बिरले नाही..' शेजाऱ्यांचे सांत्वन.
'पोलिसाना कळवायच्या भानगडीत पडू नका बरं...नाहीतर भीक नको, कुत्रा आवर अशी गत व्हायची...’ आणखी एक अनाहूत व्यवहारी सल्ला.
'पण चोर आत शिरला तरी कसा ?' कुणीतरी विचारले.
मग माझी बत्ती पेटली की रात्री मागचे दार नुसतेच लोटलेले होते व झोपताना त्याला आतून कडी लावायची राहून गेली होती ! पाळत ठेऊन असलेल्या त्या भुरट्याने ही संधी बरोबर साधली.
या चोरीचा किस्सा कॉलनीतल्या लोकांना व घरी ( सांत्वनाला ?) आल्यागेल्यांना पुढे २ महिने पुरून उरला !
वाचने
4942
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे
योगायोग म्हणतात तो
बघा लीनाताई
In reply to योगायोग म्हणतात तो by मनीषा
छान चौकटभाऊ, बरोबर खिंडीत
In reply to बघा लीनाताई by चौकटराजा
तुम्ही मागच्या दरवाज्याची कडी
चोरी...
??
उगा कशाला सशक्त... वगैरे श्या
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
असे काय नाय काय
In reply to उगा कशाला सशक्त... वगैरे श्या by सस्नेह
मी सिंहगड रोडला राहते.मुख्य
ऑ ?
In reply to मी सिंहगड रोडला राहते.मुख्य by किचेन
कसबा पेथेत माझ माहेर आहे.
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
हे विश्वची माझे घर .... ही
In reply to कसबा पेथेत माझ माहेर आहे. by किचेन
मस्त किस्सा!
भारी किस्सा.
very nice
चोरी अबब....
पगार सुरक्षित ठेवायची जागा बदला आता.
In reply to चोरी अबब.... by स्वातीविशु
अरे चोरा!
In reply to पगार सुरक्षित ठेवायची जागा बदला आता. by गणपा
आम्च्या पण घरी झाली होती हो