Skip to main content

सुरस दिल्ली आणि चमत्कारिक आग्रा.

लेखक बॅटमॅन
रविवार, 11/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
तर या डिसेम्बरात दिल्ली-आग्रा भागात गेलो होतो.उत्तर भारतात जाण्याची ही अस्मादिकांची पहिलीच वेळ. काम होते एका दिवसाचे परंतु जरा जिवाची दिल्ली करावी म्हणून ठरवले जरा रजा टाकू आणि इकडे तिकडे चोहीकडे फिरू. मग फिरलो. भोज्ज्याला शिवून परत येण्याइतका वेळ असलेले पर्यटक दिल्ली-आग्र्यात जिथे जिथे म्हणून जातात तिथे तिथे गेलो-बरीच ठिकाणे पहायची राहून सुद्धा गेली पण त्याला नाइलाज होता.म्हणजे वेळेपुढे, थंडीपुढे आणि अस्मादिकांच्या सनातन आळसापुढे. एखादा गेंडा मारून त्याच्या कातड्याचे केलेले असावे असे वाटायला लावणारे एक जाडजूड जॅकेट इथे भीमथडीवरच खरीदून गेलो म्हणून निभाव लागला. नाहीतर पंडितराज जगन्नाथांच्याच भाषेत सांगायचे झाले तर दिल्लीतील थंडीपुढे इतर कपडे म्हणजे "शाकाय वा स्यात् लवणाय वा स्यात्". सांगायचा मुद्दा म्हणजे १) दिल्लीत फिरलो आणि २) आग्र्यात फिरलो. (मग काय लई भारी झाला का बे तू च्यायला?-आमच्या काही मित्रांची सनातन कमेंट) तर पॉइंटाचा मुद्दा क्रमांक १ अंतर्गत फिरलो ते म्हणजे संसद, नॅशनल म्युझियम, राजपथ, चांदणी चौक , लाल किल्ला, पराठे वाली गल्ली,जामा मशीद, कुतुब मिनार, न गंजलेला शुद्ध लोखंडी विष्णुस्तंभ, लोटस टेम्पल,इ.इ. पैकी कुतुब मिनार आणि लोटस टेम्पल इथे अस्मादिकांचा फोटो काही "यवनी/इथलीच नवनीतकोमलांगी" यांनी काढल्यामुळे ती स्मृती अजूनही आमच्या दिलात विराजमान आहे. दिल्ली उर्फ इंद्रप्रस्थात पाऊल ठेवताक्षणीच मनातील हरितात्या जागा झाला. आजपर्यंत जी ठिकाणे फक्त इतिहासाच्या पुस्तकामुळे माहिती होती ती प्रत्यक्ष पाहताना लई मजा आली. ते काही दिवस मी राहायला अवधचा नबाब सुजाउद्दौल्याचा बाप सफदरजंग याच्या थडग्याजवळ ग्रीन पार्क भागात होतो.सर्व महत्वाची ठिकाणे १० किमी च्या परिघात आहेत तिथून. कुठे सफदरजंग मकबरा , कुठे लोधी रोड असे फिरत आणि रात्री आलू पराठा अथवा तंदुरी डिशेस चापत दिल्ली पाहिली. आता जास्ती पाल्हाळ लावत नाही. पण काही निरीक्षणे नोंदविल्याशिवाय चैन पडली नाही: १. दिल्ली मेट्रो जगातभारी(ज्याप्रमाणे अक्ख्या पुण्यात जगप्रसिद्ध ) २. सगळीकडे कॅमेरा अलाउड आहे-विनामुल्य अथवा नाममात्र चार्जेस घेऊन-अगदी म्युझियममध्ये देखील!! माझ्या दृष्टीने दिल्लीवारीचा हाय पॉइन्ट म्हणजे नॅशनल म्युझियम. तसे तर कोलकात्यातील नॅशनल म्युझियम देखील अप्रतिम आहे आणि दिल्लीतल्यापेक्षा मोठेच आहे. दिल्लीतील म्युझियम चा विशेष तो काय? तर- १ . हडप्पा संस्कृतीच्या नावाखाली नेटवर जें फोटोज पाहायला मिळतात त्यातल्या निम्म्या वस्तू तरी इथे आहेत. २. दारा शुकोह, तानसेन, मलिक अंबर यांची अस्सल पोर्ट्रेट्स इथे आहेत. ३. ब्राह्मी लिपीतील चिन्हांपासून आत्ताच्या देवनागरी, बंगाली, कन्नड, तमिळ इत्यादी भाषांची लिपी कशी तयार झाली त्याचा तक्ता-प्रत्येक अक्षरासाठी! ४. कोलंबसपूर्वकालीन अमेरिकेच्या संस्कृतीचा स्वतंत्र कक्ष- खास दक्षिण अमेरिकेहून, त्यात देखील मेक्सिकोहून आणलेल्या अनेक वस्तू इथे आहेत. ५. खास नेव्हीचे वेगळे म्युझियम असून मराठा आरमाराशी निगडीत एक जुना नकाशा आहे आणि इ.स.१६७६ साली मराठा नौदलाने ब्रिटीशांचा पराभव केला त्या प्रसंगाचे लहानसे शिल्प आहे. ६.श्री शिवाजी महाराजांचा एक होन आहे! वरील मुद्दा क्र.१ आणि ६ मुळे माझे सगळे पैसे फिटले. नको तिथे आळशीपणा आणि काहीसे गांडू नशीब असल्याने आयत्यावेळी कॅमेर्याने मान टाकली, सबब होनाचा फोटो काढता आला नाही. पण हडप्पा कक्ष अप्रतिम आहे-निव्वळ अप्रतिम! "मोहेंजो-दारो येथील नर्तकी - फार तर ४ सेमी उंची असेल." photo65 पशुपती सील हरप्पन स्वयंपाकघरातील भांडी कासव दायमाबाद येथील उत्तरसिंधूकालीन प्रसिद्ध रथ तानसेन " मलिक अंबर दिल्ली झाली. आता आग्रा भेटीबद्दल थोडेसे. आत्तापर्यंत जें पाहिले ते सर्व सुरस होते. आग्र्यात मात्र सुरस आणि चमत्कारिक दोन्हीही पाहायला मिळाले. त्याचं झालं असं, दिल्लीहून रेल्वे करून गेलो आग्र्याला. ताज महाल आणि आग्र्याचा किल्ला दोन्ही पाहिले, तेथील प्रसिद्ध पंछी पेठाचा "अंगुरी पेठा" हा फ्लेवर घेतला आणि यथेच्छ खाल्ला. दुपारी सव्वा १२ ते संध्याकाळी ५ इतकाच वेळ हाताशी होता, मग म्हटले एका ठिकाणी लई वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. पु ना ओकांच्या तेजोमहालय उर्फ ताजमहालात गेलो आधी. भगवद्गीतेचे तत्वज्ञान, काश्मीर प्रश्न, यांप्रमाणेच चर्वितचर्वण करून करून निके सत्व नष्ट झाल्यावर निव्वळ चोथा झालेला विषय म्हणजेच ताजमहाल होय. ताजमहाल हे निव्वळ भोगविलासाचे प्रतीक असो, मूळच्या शिवमंदिरावर बांधलेले थडगे असो अथवा काहीही असो, तो बघितला की भारी "च" वाटते. वैभव, डामडौल, भपका किंवा याहीपेक्षा हौसेची व्याख्या ताज महाल पाहून कळते हे मात्र नक्की. इतक्या वेळेस टीव्हीवर ताज पाहणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात काय फरक आहे? जो फरक द्रौपदीसारख्या सौंदर्यवतीचे चित्र पाहणे आणि तिला प्रत्यक्ष पाहणे यात आहे तोच. तिथल्या उद्यानात जरा बसलो, पुन्हा एकदा "अगर फिरदौस बर्रुये जमीं अस्त" चा आंशिक का होईना अनुभव घेतला आणि परतलो. ताज पाहून मला काय वाटले की हौस असावी तर अशी.हौसेला मोल नसते ही म्हण ताज सारख्या वास्तूंमुळेच आली असावी. म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ वगैरे काही नाही वाटले बघून पण हौस के लिये साला कुछ भी करेगा असे इतक्या कटाक्षाने सांगणार्या वास्तू भारतात तरी फारशा नसाव्यात. त्यातच त्याचे महत्व सामावलेले आहे असे मला वाटते. . तास दीड तासात ताजमहाल पाहून नंतर गेलो आग्र्याच्या किल्ल्यात. आणि मन आपोआपच गेले इ.स.१६६६ च्या मे महिन्यात. किल्ल्यासमोरच श्री शिवाजीमहाराजांचा क्लासिक अश्वारूढ पुतळा आहे तो बघून मराठी मनाला गोड गुदगुल्या झाल्याशिवाय राहत नाहीत. त्याच तंद्रीत मग गेलो पुढे. किल्ला हा वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केला असल्याने बरीच निगा राखलेली आहे. आणि निम्मा भाग लष्कराने व्यापलेला असल्यामुळे बघण्यासारखा भाग थोडाच शिल्लक आहे. कोणत्याही भुईकोट किल्ल्याला असतो/असावा तो खंदक यालाही आहे. जाता जाता वाटेत एक दगडाचा मोठा टब लागतो.तो म्हणे जहान्गीराचा आवडता टब होता.असेलही. त्या काळात २२-२३ कोटी रुपयांचा महसूल असलेल्या साम्राज्याच्या राजाला काय अशक्य होते म्हणा? जहांगीरचा टब मग येतो तो..दिवान-ए-आम. मुघल राजाचा नेहमीचा दरबार जिथे भरायचा ती जागा. जोधा-अकबर मध्ये दाखवल्या प्रमाणे मुघल राजा वरती बसायचा आणि बाकीचे सारे खाली मान खाली घालून उभे राहायचे...रीतच होती तशी दरबाराची..त्याच्या मागून एक जिना आणि तिथून मग पहिल्या मजल्यावर दिवान-ए-खास..मुघल सरदारांची वरिष्ठ सभा. अदमासे २० बाय ४०-५० फूट इतकीच जागा आहे ती. दिवाने खास त्याची माहिती देणारी कोनशीला जी आहे, ती जरा पहा म्हणजे कळेल चमत्कारिकपणा म्हणजे काय ते. पुरातत्व खात्याने जागोजागी डुलक्या घेतल्या आहेत. अज्ञान, आळस, बेपर्वाई, बेफिकिरी, अनास्था, नालायकपणा इत्यादींचा अर्क म्हणजे त्या कोनशिलेत दिलेली माहिती. असे काय आहे त्यात? नीट पहा. इंग्रजीत दुसर्या परिच्छेदात लिहिले आहे ते असे: हीच ती कोनशिला जिने माझा मूड खराब केला. "It was in this Diwan-I_Khas that Shivaji met Aurangzeb in 1666, and tormented by the heat of Agra, fainted and took support of a pillar." या दिवान-ए-खास मध्ये शिवाजीमहाराज औरंगजेबाला १६६६ साली भेटले आणि आग्र्याचा उन्हाळा सहन न झाल्यामुळे त्यांना चक्कर आली आणि त्यांनी एका खांबाचा आधार घेतला. आं???? महाराज काय मजा म्हणून भेटायला गेले होते का औरंगजेबाला? म्हणे उन्हाळा सहन न झाल्यामुळे चक्कर आली. शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची मूळ साधने जी राजपूत पत्रे, ती सर जदुनाथ सरकार यांनी संकलित करून "Shivaji's visit to Aurangzeb at Agra" हे पुस्तक प्रकाशित केले. भारत इतिहास संशोधन मंडळात ते विक्रीला आहे देखील. त्या पुस्तकातून काय माहिती मिळते?त्यातील २९ मे रोजीचे पत्र आणि त्याचे विवेचन इतिहासकार ग भा मेहेंदळे यांच्या "Shivaji: His life and times" या पुस्तकातील पान ३२५-३२६ इथे दिलेले आहे. त्यावरून असे कळते की १२ मे १६६६ रोजी महाराजांना औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त दरबारात बोलावणे होते. मिर्झाराजे जयसिंगचा मुलगा रामसिंग त्यांना घेऊन गेला, परंतु जरा लांबच्या रस्त्याने.त्यामुळे दरबारात जाईपर्यंत महाराजांना उशीर झाला. तोपर्यंत दिवाने आम आणि दिवाने खास या दोन्ही ठिकाणचा दरबार संपून घुसलखान्यातील दरबार सुरु झाला होता. म्हणजे शिवाजी आणि औरंगझेब हा सामना दिवाने खास मध्येदेखील झालाच नाही. पुढे मग महाराज तिथे गेले आणि त्यांनी औरंगजेबाला नजराणा अर्पण केला. त्यांना राजा रायसिंग याच्या मागे आणि ताहीर खान नामक ५०० स्वरांवरील अधिकार्याच्या जागी उभे केले गेले . नंतर इतर सरदारांप्रमाणे महाराजांना विड्याचे पान(पानसुपारी) मिळाले. पण जसवंत सिंग आणि इतर काही सरदारांना मात्र खिलत म्हणजे मानाची वस्त्रे दिली गेली. आपल्या दर्जाप्रमाणे वागणूक न देता फालतू लोकांमध्ये उभे केले आणि योग्य ती वागणूक न देता औरंगझेबाने आपला अपमान केला, या जाणीवेने महाराज चिडले आणि औरंगजेबाकडे क्रुद्ध नजरेने पाहू लागले. ते पाहून त्याने रामसिंगला विचारले की काय झालं म्हणून. तेव्हा महाराज म्हणाले: " You have seen, your father has seen, and your emperor has seen what a man I am, and yet you have deliberately kept me standing! I cast off your mansab. If you had wanted me to stand, you should have done so properly." आणि औरंगजेबाकडे पाठ फिरवून बाहेर जाऊ लागले. रामसिंगाने त्यांचा हात धरला परंतु त्यांनी तो झिडकारून टाकला आणि म्हणाले: "The day of my death has arrived. Either you kill me or I kill myself. But I am not going to see the emperor again." हे ऐकल्यावर औरंगजेबाने मुल्तफत खान, अकिल खान आणि मुखलीस खान यांना पाठवले महाराजांची समजूत काढून त्यांना खिलत द्यावी म्हणून. महाराज त्यावर म्हणाले: "The emperor purposely made me stand below Jaswant Singh. I decline his mansab and will not be his servant. Kill me if you like, but I won't wear the khilat i.e. robes of honour". आता यात कुठे आला आग्र्याचा उन्हाळा आणि कसलं काय? औरंगजेबाने आपला अपमान केला म्हणून महाराज चिडले होते सबब ते बाहेर पडले. हा असा इतिहास असताना जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करणाऱ्या पुरातत्व खात्याला काय म्हणावे?? त्या कोनशिलेवरील माहिती वाचून बटाट्याच्या चाळीतील एक किस्सा मात्र आठवला.सांडग्याच्या चाळीत दादा सांडगे हे निव्वळ मुलांच्या मनावर हिंसक परिणाम होऊ नये म्हणून शिवाजी-अफजलखान प्रकरण असे सांगतात: "मावळात भात कशा पद्धतीने पिकवावा यासाठी गोप्रतीपालक शिवाजीजी आणि अफजलजी यांची भेट झाली. शिवाजीजींचे म्हणणे होते की देशी पद्धत चांगली तर अफजलजींचे म्हणणे असे की यावनी पद्धत चांगली. शिवाजीजींनी देशी पद्धतीचे महत्व असे समजावून सांगितले की अफजलजींचे अंत:करण पिळवटून त्यांचे आतडे बाहेर आले. हाही थोर, तोही थोर. दोघांच्या स्मृतीला आपण नम्र वंदन करू." प्रस्तुत प्रकार त्यापैकीच तर नसेल? असा विचार क्षणभर तरी का होईना, मनात आला आणि चिकार हसलो. हाच तो आग्र्याचा चमत्कारिकपणा. याला इलाज काय? ती कोनशीला नीट दुरुस्त करणे आणि जगभरच्या पर्यटकांची दिशाभूल थांबवणे. नाहीतर भारताबाहेरील लोकांना आणि भारतीयांनाही कोण शिवाजी आणि तिथे त्याला चक्कर का आली ते कळणारच नाही. मग काय..परत निघालो, शिवाजी मार्केट मध्ये गेलो आणि एक एकदम बकवास पाणीपुरी खाल्ली, स्टेशन वर गेलो. पाहतो तर रेल्वे लेट होती. मग दुसर्या रेल्वेचे रिजर्व्हेशन केले. वाटेत २ मुली भेटल्यामुळे रिकाम्या गप्पा निवांत मारता आल्या. वापस दिल्लीत पोचलो आणि यात्रा सुफळ संपूर्ण झाली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9018
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

In reply to by कुंदन

बहुत धन्यवाद :) मिपावर हा माझा पहिलाच लेख आहे, तरी स्वत:चे लेखन संपादित करायचा पर्याय कुठे असतो ते कृपया सांगाल का?

In reply to by ५० फक्त

धन्यवाद हर्शल :) चांदणी चौकात पराठे वाली गल्ली आहे तिथे गेलो होतो, लिहीन त्याबद्दल पुन्हा कधीतरी. सूचनेबद्दल आभार.

प्रथम मिपावर स्वागत! तुमचा लेख, अणि त्यात प्रवासवर्णन+थोडी इतिहासावर चर्चा असं छान जमलंय. पुढच्या वेळेला फोटो जरा मोठ्या आकारात द्या. म्हणजे अजून छान वाटेल!

In reply to by बॅटमॅन

काय भारी लिहीलंय बे तू च्यायला (तुमचा लेख वाचताना मी आधी ते तुझ्या*** असंच वाचलं आणि तोंडाचा आ वासला. ;) ) असो. तुम्ही पैसातै आणि पन्नासरावांचे त्यांच्या खर्‍या नावाने केलेले उल्लेख वाचून आम्हाला आमच्या एका रुसुण गेलेल्या जुन्या मित्राची आठवण झाली. हल्ली ते "लेखनाचे पैसे नाही मिळाले तरी चालतील, त्या लेखनाची प्रशंसा नाही केली तरीही चालेल पण त्या लेखनाची टींगळटवाली मात्र करु नका" असे ब्रीदवाक्य असणारी येन्जीवो चालवतात.

In reply to by धन्या

धन्यवाद धनाजीराव :) आपला रुसून गेलेला मित्र कोण बरे? त्यांच्या येनजीओचे ब्रीद खतरी आहे, त्याचा पत्ता मिळेल काय ;)

"गांडू" हा शब्द वापरणे सदर ठिकाणी अपरिहार्यच होते असे वाटले नाही. नसता तरी लेखाने जे पोचवायचे ते पोचवलेच असते. ५. खास नेव्हीचे वेगळे म्युझियम असून मराठा आरमाराशी निगडीत एक जुना नकाशा आहे आणि इ.स.१६७६ साली मराठा नौदलाने ब्रिटीशांचा पराभव केला त्या प्रसंगाचे लहानसे शिल्प आहे. ह्याबद्दल अधिक वाचायला आवडले असते. ताजमहाल्-तेजोमहाल घिसापीटा विषय असल्याने वाइड बॉल म्हणून सोडून देत आहे. पण "हौसेला मोल नाही" हे खरेच. एका कुठल्यातरी इतिहासकाराच्या म्हणण्यानुसार शहाजहानने ताजमहालाच्या बांधणीत इतकी रक्कम उडवली की खुद्द शाही खजिन्यावर त्याचा ताण पडू लागला. प्रशासन डळमळित झाले. महसूल आटू लागला. बरीचशी जनता असंतुष्ट झाली व खुद्द काही सरदार मनाने शहाजहानपासून दूर गेले. ह्यातील काही औरंगजेबाच्या जवळ गेले.(आणि काही "मुराद" च्या. ) ताजमहाल शहाजहानने बांधला असे मानले तर त्याचे इतिहासातील दृश्य परिणाम हेच की औरंगजेबास अधिक समर्थन म्मिळू लागले. इतिहासातील ती महत्वाची घटना ठरली ती अशी. It was in this Diwan-I_Khas that Shivaji met Aurangzeb in 1666, and tormented by the heat of Agra, fainted and took support of a pillar हे चूकच आहे, हे मान्य. तुम्ही दिलेल्या भागाशी याबाबतीत सहमत. पण शिवाजी संतापले, क्रुद्ध होउन बादशहाकडे पाहू लागले; हे म्ह्णजे जरा अतिच वाटते. "महाराज भडकले, (उन्मत्त राजपुत्राने हाताखालच्या कामचुकार अधिकार्‍यावर खेकसावे तसे) बादशाहावर खेकसून्न निघून जाउ लागले." ह्या धर्तीवरची वर्णने म्हणजे आपल्याकडच्या अतिरंजित गौरवीकरणाचाच भाग अधिक वाटतो. शिवाजी महाराज हा एक दिग्गज नेता, धूर्त मुत्सद्दी व उत्कृष्ट सेनानी होताच ह्यात दुमत नाही. पण कुठलाही व्यावहारिक मनुष्यही असे करिलसे वाटात नाही. केल्यास बादशहा इतका काळ हाती आलेल्या उर्मटास जिवंत सोडिलसे वाटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना त्या क्षणी आपण मुघल सरदार(पर्यायाने "एदकनिष्ठ " सरदार, जो बादशाविरुद्ध जाणार नाही) असे नाटक वठवणे भाग होते. त्यांनी ते केले.ते बादशाहासमोर "ताडताड" पाठ दाखवित निघून गेले ह्यात त्यांची थोरवी नसून खरी थोरवी आहे ती:- १.तिथून परत आल्यावर ज्या झपाट्याने त्यांनी गेलेले आख्खे दोन तृतीयांश राज्य परत मिळवले त्यात. २. आल्यानंतर काही वर्षातच अधिकृतपणे मुघल अंमल झुगारुन दिला त्यात. ३. विविध अभेद्य किल्ले कित्येक शतकांनंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उभे केले त्यात. ४.परत आल्यावर राज्य सतत वाढते ठेवले,नवनवीन प्रदेश किमान मनुष्यहानी करुन घेत वाढवत ठेवले त्यात. ५. उत्त्म प्रशासन्,उत्तम महसूल रचना,सैन्यदलाचा कल्पक वापर्,पगारी सरदार ही कल्पना अंमलात आणली ह्यात ६.आरमारी महत्व ओळखून प्रथमच भू-राज्य एका प्रबळ आरमारास(आंग्र्यांच्या आरमारास) जोडून मोठी alliance उभी केली त्यात. खुद्द मुघल दरबारात बादशहाला उद्दम वाटेलसे वागणे स्वतःचा जीव धोक्यात घालणे ठरले असते. याने स्वराज्याचा तोटाच झाला असता. तो त्यांनी करुन घेतला नाही, हे माझे मत. ,मराठी मनांत रुजलेले वर्णन कुठल्याही national hero चे जे अतिरंजित गौरवीकरण केले जाते, तसेच ते आहे. तरीही लेख आवडला.

In reply to by मन१

खास नेव्हीचे वेगळे म्युझियम असून मराठा आरमाराशी निगडीत एक जुना नकाशा आहे आणि इ.स.१६७६ साली मराठा नौदलाने ब्रिटीशांचा पराभव केला त्या प्रसंगाचे लहानसे शिल्प आहे. ह्याबद्दल अधिक वाचायला आवडले असते.
हा बहुतेक खांदेरीचा रणसंग्राम असावा. नक्की तारीख माहीत नाही.
पण शिवाजी संतापले, क्रुद्ध होउन बादशहाकडे पाहू लागले; हे म्ह्णजे जरा अतिच वाटते.
सभासद बखरीत शिवाजी महाराज रागावल्याचा उल्लेख आहे. ...यास रामसिंगं बोलला जे, “महाराज जसवंतसिंग .असें ऐकतांच राजिया क्रोधयुक्त होऊन बोलिला कीं जसवंतसिंगासारीखा उमराव! याच्यापाठी माझ्या लष्करीयांनी पाहिल्या असतील! याचे खालें आपण उभे राहावे म्हणजे काय?ऐसे क्रोधें बोलून रामसिंगाची कटार माजेची घेऊन महाराजा यांस मारितो म्हणवून कटार मागू लागले. मग रामसिंग "धीर धरणे" म्हणून बोलू लागले. शब्दाशब्दी होतांस पादशाहांस कळले. पादशाहा म्हणू लागले "काय जाहाले?"रामसिंग बोलिंला की "जंगली वाघ हयवान, त्यांस गर्मा जाहाला. काही करीणा जाहाला." असे बोलतांच पादाशाहाच्या मनी शंका उत्पन्न जाहाली. काय होईल ते न कळे म्हणून रामसिंगास पादशाहा बोलिला की. "राजियांस घेऊन डेरियास जाणे, उद्यासांद्या सावकाश मुलाकात होईल.".... राजे डेरियांस गेलियावरि रामसिंग व आपण बैसोन बोलिले जें "कोण पादशाहा? मी सिवाजी, मजला जसवंताखालते उभे करावे! करिणा काही पादशाहांस समजत नाही." ऐसे बोलिले अजूनही एका समकालिन साधनांत (बहुधा मनुची किंवा भीमसेन सक्सेना) महाराज रागावल्याचा उल्लेख आहे. त्यात महाराजा म्हणतात की, कृपावंत बादशाहांनी माझे डोके उडवावे पण मी इथे आता राहू शकत नाही. अर्थात त्याचा मूळ संदर्भ माझ्याकडे नाही, मालोजीराव अधिक माहिती देऊ शकतील.

In reply to by प्रचेतस

माझ्या हाताशी सध्या संदर्भ नाहित. तोवर समोरच्या पार्टीचे म्हणणे पूर्ण मान्य करत आहे.

In reply to by प्रचेतस

सभासद बखर तसेच मूळ राजपूत पत्रांमध्ये महाराज रागावल्याचे उल्लेख आहेत. हि पत्रे परकालदास आणि कल्याणदास या दोघा अधिकाऱ्यांनी एकमेकांस लिहिली आहेत साधारण मी ते जुलै १६६६ या कालावधीत. बाकी खान्देरीच्या रणसंग्रामा बद्दल बघून खातरजमा करतो.

In reply to by प्रचेतस

हा बहुतेक खांदेरीचा रणसंग्राम असावा. नक्की तारीख माहीत नाही.
बरोबर ठोका मारला....खान्देरीचाच रणसंग्राम होतं तो... आरमार प्रमुख दौलतखान साहेब आणि मायनाक भंडारी यांनी इंग्रजांचा पराभव केला ते सुद्धा इंग्रजांकडे हंटर आणि रिव्हेंज नावाच्या दोन अत्याधुनिक युद्धनौका असून!!!.... त्यावेळी खांदेरी चे बांधकाम चालू होते (१६७२ पासून चालू - १६७९ आसपास पूर्ण) खांदेरी पूर्ण होणे म्हणजे इंग्रज आणि सिद्दी च्या व्यापाराला आणि समुद्रावरील सत्तेला शह होता ,म्हणून बांधकाम पूर्ण होऊ नये यासाठी इंग्रजांनी आणि सिद्दीने शर्थीचे प्रयत्न मांडले होते. -मालोजीराव

In reply to by मालोजीराव

बरोब्बर, आत्ता आलं लक्षात..बहुतेक हंटर जहाज विरुद्ध मराठा आरमार असे ते शिल्प आहे.

In reply to by मन१

"त्या" शब्दाच्या अपरिहार्यतेबद्दल मी वाद नाही घालणार. पण मुद्दा लक्षात आला आणि तो मान्य आहे. नेमका माझा कॅमेरा तेव्हा मेला आणि मी बरेचसे विसरलो, त्यामुळेच नौदलाबाबत जुजबी माहिती लिहिली :( ताज महाल बद्दल मी असे नाही वाचले, किंबहुना ह्या दृष्टीने मी कुठे त्याबद्दल नाही वाचले. जमल्यास नेट दुवा देऊ शकाल का? आता मी दिलेल्या वर्णनाबद्दल थोडेसे: हे वर्णन मी "Shivaji's visit to Aurangzeb at Agra" या सर जदुनाथ सरकारांनी संपादित केलेल्या पुस्तकातून आहे तसे घेतलेले आहे. मिर्झाराजे जयसिंगाच्या पदरचे २ सचिव एकमेकांना जी पत्रे पाठवत, त्यांचे त्यात भाषांतर आहे. हि पत्रे सरकारांना १९५० च्या सुमारास कधीतरी सापडली. शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची हि सगळ्यात विश्वसनीय साधने आहेत कारण घटना घडल्यावर थोड्याच दिवसात आणि प्रत्यक्षदर्शींच्या आधारे हि पत्रे लिहिली गेली आहेत. त्यामुळे विश्वसनीय पुरावा म्हणून त्या साधनांचे महत्व वादातीत आहे. शिवकालीन इतिहासाभ्यासकांचे मुकुटमणी आणि पुराव्याच्या बाबतीत अतिशय चिकित्सक असणारे श्री. ग.भा.मेहेंदळे यांनीदेखील या साधनांची सत्यता मान्य केलेली आहे. बखरी अतिरंजित म्हणून सोडून दिल्या तरीदेखील "महाराज औरंगजेबाकडे क्रुद्ध होऊन पाहू लागले" हे वर्णन अतिशयोक्ती नाहीये. बाकीच्या साधनांत काहीही असो. मूळ साधनांत मात्र आहे हे असेच आहे. हे झाले अस्सल साधनांबद्दल. आता तुम्ही म्हणता तसे असा राग दर्शविणे महाराजांना फायद्याचे होते की नव्हते? नक्कीच नव्हते. पण मग महाराजांसारखा इतका धूर्त माणूस भर दरबारात असे चमत्कारिक का वागला? त्यांच्या जीवाची हमी जयसिंगाने घेतली असली तरी त्यावर इतक्या निर्धास्तपणे विसंबणे अवघड होते. महाराजांच्या प्रत्येक कृती अथवा प्रतिक्रियेमागे काहीतरी "plan" असेल असे मानणे चूक आहे. त्यामुळे आग्रा दरबारात जे घडले ते म्हणजे महाराजांच्या मूळ स्वभावाचा परिणाम आहे. एका स्वाभिमानी आणि कर्तबगार माणसाचा अपमान केल्यावारची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे ती. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या घटनेत महाराजांचे मोठेपण तसे दिसत नाही. आग्र्यात जे घडले ते प्रथम भावनोद्रेक, आणि नंतर अनेक "जुगाड" अशा क्रमाने घडले. औरंगजेबाने त्यांना जिवंत सोडणे हि त्याची सर्वात मोठी चूक होती. पण ते कसे जिवंत राहिले हा तितकाच थरारक परंतु थोडासा वेगळा विषय आहे.आणि हो,अतिरंजित वर्णनाचा व अवाजवी गौरवीकरणाचा मलादेखील प्रचंड तिटकारा आहे :) लेख आवडल्याबद्दल धन्यवाद :)

In reply to by मन१

मनोबा, तुझी खर्‍या इतिहासाबद्दलची कळकळयुक्त जाणीव भावली. ती गां शब्दाबद्दलची आक्षेप घेणारी ओळ थोडीशी हुच्चचक्रमी वाटली. मला असं विचारायचं आहे की पादशहाच्या दरबारात राजांच्या बाबतीत काहीच घडलं नव्हतं तर राजांना कैदेत पडून, वेषांतर करुन का परत यावं लागलं रे? राजांनी फक्त खिलत नाकारल्याने पादशहाने त्यांना कैद केले हे पटत नाही. कारण शिवाजी राजांच्या वतीने बाल संभाजींनी कुठलं तरी पादशाही फर्मान गुडघे टेकून स्वीकारल्याचं वाचलं आहे, अर्थात ऐतिहासिक कागदपत्रांत नव्हे - कादंबरीत. उलट शिवाजीराजे हे महाराष्ट्रात तोवर पराक्रम गाजवून तिथे गेले होते आणि त्यांच्यासारख्या पुरुषाचे योग्य ते अगत्य व्हावे हे नैसर्गिक आहे. तसे महाराजांनाही वाटणे गैर किंवा असंभवनीय नाही. त्याऐवजी अपमान झाला तर एक वेगळा विचार असणारा महापुरूष त्या अपमानाला विवेकानंच सामोरा जाईल हे जरी पटत असलं तरी महाराष्ट्रात गाजवलेल्या पराक्रमाची आठवण येऊन, समोरासमोर पहिल्यांदाच पाहिलेल्या पादशहासमोर त्याला जाग येण्यासाठी या सिंहाने डरकाळी फोडली नसली तरच नवल.

मिपावर स्वागत आहे. लेखन वरवर चाळले. :) निवांतपणे वाचून प्रतिसाद लिहितो. [लेखनात काही दुवे गंडले होते. योग्य बदल केले आहेत. अजून काही बदल करायचे असल्यास कळवा] -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

योग्य ते बदल केल्याबद्दल धन्यवाद :) अवांतर: स्वत:चे लेखन संपादित करायची सुविधा लेखकांना देखील उपलब्ध असावी अशी एक आपली सूचना. यावर आपले काय म्हणणे आहे?

In reply to by बॅटमॅन

स्वत:चे लेखन संपादित करायची सुविधा लेखकांना देखील उपलब्ध असावी अशी एक आपली सूचना. यावर आपले काय म्हणणे आहे ? मला तर नेहमीच असे वाटते की स्वतःचे लेखन संपादित करण्याची सोय सदस्यांना असावी आणि अशी सोय मिपावर पूर्वी होती. परंतु या सोयीचा योग्य वापर होण्याऐवजी अनेकांनी किरकोळ कारणांमुळे आपले लेखन काढून टाकण्यासाठी या सुविधेचा वापर केला. उत्तम लेखांबरोबर अनेकांनी वेळ काढून लिहिलेले उत्तमोत्तम पतिसादही नष्ट झाले. आणि असा प्रकार अनेकदा घडल्यामुळे व्यवस्थापनाने ही सोय नंतर काढून टाकली. मिपा व्यवस्थापन सदस्यांना सर्व सोयी देण्यासाठी प्रयत्न करत असते, भविष्यात उत्तम पर्यायानंतर अशी सोय नक्कीच येईल याबद्दल माझ्या मनात तरी काही शंका नाही. तरिही आपली सूचना मिपा व्यवस्थापनासमोर ठेवतो. -दिलीप बिरुटे

अरे वा छान लेख आणि प्रतिक्रिया. दिल्ली शहराची मजा न्यारीच. तशीच दिल्ली मेट्रोचीही मजा न्यारी. जरा http://www.youtube.com/watch?v=V9VO5lShb1A या युट्यूबवरील व्हिडिओमध्ये ती बघायला मिळेल.

धन्स धन्स..:) तुम्ही देखील वटवाघूळ का ? आनंद झाला "जातभाई"भेटल्याचा ;) व्हीडिओ पाहिला, खतरी आहे!