Skip to main content

मना घडवी संस्कार !

लेखक यशोधन वर्तक यांनी सोमवार, 27/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कार हा फार ट्रिकी शब्द आहे...कधी त्याला खोल अर्थ असतो आणि कधी ते अळवावरचे पाणी असते. संस्कार हे कोणावर कधीच लादता येत नाहीत किंवा " पास " अथवा " रिजेक्ट " लेबल सारखे चिकटवता नाहीत . संस्कार दिले जातात आणि ते योग्य रीतीने घेतले जातात असा संस्कारांचा वसा पिढी दर पिढी चालू असतो . पण मुळातच ज्या व्यक्तीवर हे संस्कार होतात ती व्यक्ती पुढे जावून याला किती महत्व देते यावरून त्या संस्कारांची व्याख्या नेहमीच बदलत असते ......कालमानानुसार संस्कारबदलत जातात ...शंभरवर्ष पूर्वी केले जाणारे संस्कार कालानुरूप बदलले , तर काही संस्कार सततच्या बदलत्या परिस्थिती देखील काळाच्या कसोटींवर खरे उतरले. माणुसकी, प्रेम ,दया ,भक्ती ,आपुलकी आणि त्याग हे संस्कार कालातीत ठरले आणि ज्या संस्कारांचा उगम दररोजच्या जगण्याच्या प्रक्रियेतून झाला ते संस्कार व्यक्ती आणि समाजानुरूप बनले आणि वेळोवेळी बदलालेही गेले. धार्मिक संस्कारंचे अश्या बाबतीत उदाहरण घेता येईल. त्या मुळे संस्कार देणे ही प्रोसिजर नसून ती अव्याहत पणे घडत राहणारी प्रोसेस आहे. यात आजूबाजूच्या वातावरणाचा खूप प्रभाव पडतो . आपल्या मुलांच्या शाळेत , मित्रांबरोबर , नातेसंबंधातून, आजूबाजूच्या समाजामधून त्यांच्यावर कळत- नकळत बरे वाईट संस्कार होतच असतात. त्यालाच आपण कदाचीत वाईट संगत लागणे म्हणतो . पण घरात होणारे संस्कार त्यांचं काय ? आता हेच बघा ना आजच्या जगात आपल्या वाढलेल्या अपेक्षा ,लोभ यातून आपणच .... "कोणत्याही मार्गाने मार्क्स मिळवणे आणि पुढे जावून कोणत्याही मार्गाने पैसा मिळवणे अश्या पद्धतीचे संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर करतो आहोत. मग पुढची पिढी बिघडली अशी ओरड करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला उरला आहेच कुठे ? किती घरांमधून मुलांपुढे "अंबानी" किंवा " मल्या " ऐवजी " डॉ. अभय बंग ,बाबा आमटे किंवा अण्णा हजारे यांना आदर्श मानायचे संस्कार दिले जातात ? मुलांवर होणाऱ्या संस्काराची चर्चा करीत असताना आपणच आपल्या वागण्या बोलण्यातून त्यांच्या पुढे कोठले आणि कसले आदर्श ठेवत आहोत याचा विचार करण्याची खरं तर वेळ आली आहे. कोवळ्या वयातील मुलांचे मन म्हणजे जणू ओळी मातीच असते आणि या मातीचा आकार आपण देवू तसा घडतो . त्या मुळे पैशाकरता काही "वेगळे मार्ग " न अवलंबता फक्त गरजे पुरताच पैसा कमावणे ......आपल्या भोवतालच्या लोकांशी आपुलककीने वागणे .....मृगजळाच्या मागे न धावता ....छोट्या छोट्या गोष्टींमधून सुख मिळवणे , आणि मुख्य म्हणजे मानवता हीच जात आणि मानवता हाच धर्म पाळणे असे कालानुरूप संस्कार आपल्या पुढच्या पिढीला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करायला हवा. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार ...विठ्ठला तू वेडा कुंभार. यशोधन वर्तक
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8003
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

पुन्हा एकदा तुम्ही तुमचे लेखन वाचायची संधी आम्हाला दिलीत त्याबद्दल तुमचे खास आभार.

किती घरांमधून मुलांपुढे "अंबानी" किंवा " मल्या " ऐवजी " डॉ. अभय बंग ,बाबा आमटे किंवा अण्णा हजारे यांना आदर्श मानायचे संस्कार दिले जातात ? ही तुलना कशासाठी? अभयबंग चांगले आणि अंबानी वाईट अशी काही विभागणी कशी करता येईल. अंबानी हे कित्येक कुटुंबात मानाचे स्थान मिळवून आहेत. शून्यातून उद्योग सामर्थ्य निर्माण करणे त्यातून लाखो कुटुंबाना रोजगार देणे ही कामे वाईट आहेत असे का तुम्हाला म्हणायचे आहे. अंबानीनी कापड उद्योगाला बरेच बदलवले आहे. लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरीबी चांगली हा विचार सोडून द्या. या विचारामुळेच मराठी माणूस उद्योजक व्हायला घाबरतो. बाबा आमटे काय किंवा अंबाणी काय हे आपापल्या ठीकाणी आदर्शच आहेत. आन इसंस्कार संस्कार म्हणजे काय? ते एका विचारसरणी सापेक्ष आहेत. मांसाहारी समाजात कुर्बानी ही इश्वाराला दिलेली भेट समजली जाते. तर शाकाहारी समाजात ती हत्या ठरते. तसे पाहिले तर ऑनर किलींग , सती , विधवेचे केशवपन हे देखील एका अर्थाने उदात्त संस्कारांचे भाग होते. हे म्हणजे मटण तर खावेसे वाटते पण हत्येचे पाप नको असे होते. स्त्रीदेहाचे प्रदर्शन नको, स्त्रीयांचे शोषण नको असे बोलत असतानाच तमाशा ही लोककला टिकली पाहिजे यावर विचार झालाच पाहिजे यासारखा दुटप्पी पणा झाला कुण्या एकाचेच संस्कार हे चांगले आणि दुसर्‍याचे वाईट हा विचारच कोता आहे. संस्कार म्हणजे सर्वमान्य समाजाला सामाजीक आरोग्यासाठी योग्य वाटत असलेल्या गोष्टींची एक गुंफण आहे. त्यात लॉजीक बगैरे काहीही नाही. त्याग वगैरेच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याग हा दुसर्‍याकडून अपेक्षीत असतो. करीयरला लाथ मारून आई वडीलांसाठी त्याग केलेला तरूण वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी आपण केलेल्या तथाकथीत त्यागाला स्वतःचा शेपुटघालुपणा असे मनात म्हणत असतो.

In reply to by दादा कोंडके

दादा कोंडके साहेब , माझा साने गुरुजींच्या शिकवणीवर कधीच विश्वास नव्हता . इथे माझ्या आदर्शांचा विचारच नाही पण माझ्या मुलांच्या समोर जे आदर्श उभे राहत आहेत त्याची भीती वाटते. श्रीमंतीची आस धरणे चुकीचे नाही परंतु त्या श्रीमंतान मधून आपला आदर्श कोणता हे निवडण्याची प्रगल्भता आपल्या मुलात यावी हाच प्रयत्न आहे.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ , माझ्या प्रश्नाचे तुम्हीच किती सोपे उत्तर दिले आहे. संस्कार म्हणजे सर्वमान्य समाजाला सामाजीक आरोग्यासाठी योग्य वाटत असलेल्या गोष्टींची एक गुंफण आहे. त्यात लॉजीक बगैरे काहीही नाही. अंबानी आणि मल्ल्या हे चांगले किंवा वाईट इतका वैयात्तिक कोता विचार मी केलेला नाही. एका बाजूने अंबानी खूप चांगले असतील किंबहुना कापड उद्योगाला त्यांच्या मुले खूप बरकत आली असेल पण त्याकरिता त्यांनी जे मार्ग अवलंबले त्याचा ही विचार करावा हा माझा उद्देश आहे . " लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरीबी चांगली " याचा तर संबंधाच नाही कारण मी येथे आदि गोदरेज किंवा टाटा घराण्याचे नाव घेतले नाही पैशाने ते मल्ल्या पेक्षा कितीतरी श्रीमंत आहेत किंवा अंबानी कुटुंबापेक्षा त्यांची श्रीमंती कमी असेल परंतु त्यांनी समाजाकरिता जे कार्य केले आहे त्याच्या तुलनेत अंबानी किंवा मल्ल्या हि खूपच खुजी माणसे आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे अभय आणि राणी बंग यांना पैसा मिळवता आला नाही म्हणून ते समाज सेवेला लागले नाहीत . दोघेही एम.डी. ला गोल्ड मेडल मिळवणारे डॉक्टर आहेत त्याच बरोबर अमेरिकेतील विख्यात कॉलेज मधील परीक्षा चांगल्या श्रेणीने उत्तीर्ण झालेले होते. समाजकार्य हा त्यांनी उचललेला वसा आहे. पूर्वीच्या काळी एक म्हण होती की माझ्या चाळीत क्रांतिकारक उपजूदे परंतु शेजाऱ्याच्या घरात... माझा मुलगा मात्र सरकारी नोकरच चांगला . इथे मी संस्कार याचा अर्थ कोणतीही पर्टिक्युलर गोष्ट नजरेसमोर ठेवली नाही. माझ्या दृष्टीने सांगायचा तर माझ्या मुलाला परीक्षेत किती मार्क मिळतात या पेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे ते मला जास्त महत्वाचे वाटते. याचा अर्थ परीक्षेत त्याने कमी मार्क मिळवावेत असा होत नाही परंतु ते मार्क मिळवण्याच्या बदल्यात त्याचातील माणुसकी कमी होत असेल तर ते मला मंजूर नाही.

त्या मुळे पैशाकरता काही "वेगळे मार्ग " न अवलंबता फक्त गरजे पुरताच पैसा कमावणे ..>> गरजे पुरता म्हणजे नेमका किती? गरज कोण ठरवणार? "वेगळे मार्ग" न अवलंबता पैसा कमावता येत नाही हे कसे काय? सगळेच पैसेवाले चोर वा भ्रष्ट असतात, लबाडीने पैसा कमवत असतात असे म्हणायचे आहे का? धनवान माणसे सज्जन नसतातच का? आई वडील आपल्या मुलांना मल्ल्या वा अंबानी व्हा असे सांगताना मी तरी ऐकले नाहीत. तुम्हाला नितीची शिकवण अभिप्रेत आहे की साम्यवादाची?

सर्वसाक्षी भाऊ , हल्ली मुलांना कोणी व्हा हे सांगायची वेळच येत नाही .....तेच आपल्याला सांगत असतात . त्यातील योग्य निवड करायचे मार्गदर्शन हाच शुद्ध हेतू . दुसरं काही नाही. ( ते मार्गदर्शनही मागत नाहीत परंतु पालक म्हणून आपल्यालाच ते देणे भाग आहे :-) कळावे लोभ असावा आपला यशोधन.

संस्कार. ही सापेक्ष गोष्ट आहे. धार्मीक वागणे देव मानणे पूजणे म्हणजे संस्कार असे मानले आणि सर्वानीच जर देवपूजेचा व्यवसाय सुरू केला तर समाजाचा गाडा चालेल का? "साधी रहाणी आणि उच्चा विचारसरणी " या कल्पने बब्द्दल बोलताना एकदा शंतनुराव किर्लोस्कर म्हणाले होते की प्रत्येकाने साधी रहाणी आत्मसाअत करायची म्हंटले तर समाजातील समतोल ढासळेल. विचारसरणी उच्च असायला हरकत नाही. पण साधी रहाणीच जगायची ठरवले तर एखाद्या विणकराने विणलेला शालू विकलाच जाणार नाही. त्याला रोजगारच मिळणार नाही. त्या विनकराचे कसब मरून जाईल. ते टिकवण्यासाठी ज्याला शक्य असेल त्याने तो शालू विकत घेवून वापरायला हवा. त्यामुळे विणकराला तसेच इतराना प्रोसाहीत करायला हवे. अर्थशास्त्राचा गाडा तरच चालू शकेल. भारतीय बाजारात पुर्वीपासून शेअरचा व्यवसाय होता अंबानी नी तो व्यवसाय सर्वसामान्यापर्यन्त नेला. मुलांवर होणाऱ्या संस्काराची चर्चा करीत असताना आपणच आपल्या वागण्या बोलण्यातून त्यांच्या पुढे कोठले आणि कसले आदर्श ठेवत आहोत याचा विचार करण्याची खरं तर वेळ आली आहे. खरे पहाता संस्कार आपल्याला भोगवाद आणि विवेकी भोगवाद यांमधे निवड कशी करायची हे शिकवणारे असावेत आपण मुलांवर संस्कार करीतच असतो पण त्याचवेळेस टीव्ही वर भोगवादी चे दर्शन सदोदीत घडत असआहे.त्यावर आपण किती अंकुश ठेवु शकतो?