Skip to main content

पिल्ले ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 24/02/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/20678 ८ फेब. १२ ला कुत्रीने पिल्लांना जन्म दिला होता. आम्ही घरी नव्हतो. आल्यावर हे सर्व दिसले जाणवले.वैतागून गेलो. पण पिल्लांना नि पिल्लांच्या आईला बाहेर कसे काढणार . .? मनात थोडा थोडा करुणेचा प्रकाश झिरपत होता . आम्ही विचार करून तिला अंगणातच राहू देणे मंजूर केले .मग तिला रोज काहीना काही खायला पण देत होतोच. ती खातपण होती. आम्ही दिसताच शेपूट हलवीत होती. तिच्या आर्जवीपणाचा राग येत होता . मग आम्ही आमच्याच मनाला गोंजारून समजावीत होतो आजकाल उष्मा वाढला होता. ती झाडाखालची माती उकरून थंडावा शोधीत होती दुपारी ती खिडकी खाली जेथे पाणी नळातून झिरपलेले असायचे तेथे झोपत होती. आम्ही झाडाजवळ पाणी मात्र घालीत नव्हतो.पिल्लाना त्रास होऊ नये असेच वाटत होते . हळूहळू पिल्ले अंगाने भरत होती . शुभ्र पांढरी . मातकट रंगाची . काळे ठिपके असलेली गोजिरवाणी वाटत होती पण ती अजूनही चालू शकत नव्हती. मध्येच कचरा साफ करणारे कामगार दिसत . मी सहज एकाला म्हणालो – “मित्रा माझ्याकडे कुत्रीने सहा पिल्ले दिलेली आहेत .त्यांचा काहीतरी बंदोवस्त करायला हवा. काय करता येईल..? म्हणाला -साहेब पिल्ले लहान आहेत .कोठे टाकणार ..? खालीपिली मरून जातील. कशाला पापाचा धनी होऊ. ..? त्याचेही खरे होते.पापाचे धनी होण्यास कोणीच तयार होत नव्हता पिल्लांच्या आईला खायला प्यायला मिळत होतेच. आजकाल ती बाहेर फिरून येत होती. गेट जवळ येऊन उभी राहत होती. आम्हीपण तिला गेट उघडून आत घेत होतो. मग ती पिल्लाना कुशीत घेऊन डोळे मिटून पडून राही. मधूनच ती माती उकरून सर्वत्र माती माती धूळ करीत होती . आम्ही नेटाने माती गोळा करून परत मातीत माती पसरत होतो. आज २३ तारीख . आम्ही सकाळी थोडेसे बाहेर गेलो .वाचनालयात गेलो. पुस्तके बदलली. घरी आलो . झाडाखाली पिल्ले होतीच पिल्लांची आईपण होती. आम्हाला बघताच तिने शेपूट हलवली. तिला भूक लागली असेल म्हणून तिला पोळी दिली. पण कमाल म्हणजे तिने पोळीला तोंड लावले नाही. ती गप्प होती. आम्ही परत बाहेर गेलो. ब्यांकेत काही काम होते .तेथून मित्राच्या घरी गेलो. गप्पात बराचसा वेळ पसार झाला . घरी परतलो . गेट उघडले. सहज नेहमी प्रमाणे झाडाकडे नजर गेली. नि धस्स झाले. तेथे दोन पिल्लेच होती . तेवढ्या समोरचा मुलगा म्हणाला - काका -चार पिल्ले कुत्रीने तोंडात धरून दुसरीकडे नेलीत . म्हणालो -अरे दार तर बंद होते ..? म्हणाला -तिने जबड्यात धरून गेटवरून उडी मारली मग आम्ही दरवाजा थोडासा उघडाच ठेवला. पिल्लांची आई परत आली. मग एक एक पिल्लू जबड्यात धरून ती निघून गेली . आम्ही झाडाखाली बघितले. पोळीचा तुकडा पाव तसेच पडले होते . आज तिने तोंड नव्हते लावले का बरे ..? मला तर काहीच समजत नव्हते. अधून मधून माझी नजर उगाचच पारिजातकाच्या झाडाखाली जात असते शुभ्र फुलांची लाल देठ असलेली फुले मातीवर सांडलेली असतात वेळ दुपारची. झाडाखाली सावली झिरपत असते नि अजूनही तेथे पोळी ,पावाचे तुकडे पडलेले असतात …!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2146
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मी दोन्ही भाग वाचले. पहिल्या भागा नंतर काही परत लिहिले गेले आहे का म्हणजे रिपिटेशन. छान आहे. शेवट जर खटकला. त्या जाण्याचे गूढ जरा सांगितले असतेत तर अजून मजा आली असती.

पहिला भाग वाचला नव्हता .. खुप छान आनंदी भाग होता.. दूसरा भाग पण सुंदर ... माणसाचे मन असेच असते .. कधी कुठे कोणासाठी कासाविस होऊन जाईन सांगता येणार नाही.

In reply to by गणेशा

माणसाचे मन असेच असते .. कधी कुठे कोणासाठी कासाविस होऊन जाईन सांगता येणार नाही. वाक्य फारच आवडले !!!

कुत्री, मांजरी ते राहात असलेल्या जागेची, स्वतःची स्वच्छता फार साभांळतात. मांजर तर आपल्या पिल्लांच्या आरोग्यासाठी, रोगजंतूंचे संक्रमण होऊ नये म्हणून सात वेळा जागा बदलते. ह्या काळात पिल्ले शारीरिक रित्या सक्षम होतात आणि नंतर स्वतःची स्वच्छता स्वतःच करू शकतात. जंतु संसर्ग होऊ नये म्हणून हे प्राणी 'वापरलेली' जागा सोडून नव्या स्वच्छ जागेत स्थलांतर करतात.

डोळे उघडल्यावर पिलं इकडे तिकडे धावतील म्हणून त्याना वाचवण्यासाठी ती कुत्री कुठेतरी घेऊन गेली असेल. मांजरी किंवा कुत्री जेव्हा अशी पिलांची जागा बदलायचं ठरवते, तेव्हा जागा नीट बदलेपर्यंत अस्वस्थ होते आणि काही खात-पीत नाही.

कुत्रा हा प्राणी पण आपल्या पिल्लांना तोंडात पकडून दुसरी कडे नेतो? मार्जार कुळातील प्राणी फक्त असे करतात असे ऐकून आहे...

होय, कुत्रीसुद्धा तोंडात पिल्लाची मान अलगद पकडून सुरक्षित ठिकाणी हलवितांना मी पाहिले आहे. बाकी लेख ह्रद्य.

जनावरे नेहमी जागा बदलत राहातात. आपल्या सारखे नाही. बहूतेक वेळेला मी पाहिले आहे दर थोडे दिवसानी ते जागा बदलून दुसरीकडे जातात. एखाद वेळेस ते सिक्युरीटी रिझन्स साठी जात असतील. एका जागी घरटून करुन राहायची सवय माणसाची.

>> एका जागी घरटून करुन राहायची सवय माणसाची. त्यालाच आपण समाज म्हणतो. माझेही मन कासाविस झाले वाचुन.