Skip to main content

पिल्ले ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 13/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक फोन आला. तुमच्या अंगणातील झाडाखाली कुत्रीने पिल्ले टाकली आहेत .. काल संध्याकाळी मी दादाच्या घरी गेलो होतो. घरातून निघताना काम्पौंडचा दरवाजा आतून कडी लावून बंद केला होता. मग कुत्री आत घुसली कशी .? कोणी गेट उघडले ..? का उघडले ..? उघडले तर बंद का नाही केले ..? अशा अनेक प्रश्नांनी मन भरून गेले . आता त्या कुत्रीला नि त्या पिल्लांना बाहेर काढणार तरी कसे ..? माझी रात्र खराब होऊन गेली. गेल्या दोन चार दिवसा पासून कुत्री गेट जवळच झोपत होती. तेथेच रेंगाळत होती. पण ती गर्भार आहे ह्याची मला तरी सुतराम कल्पना नव्हती .आणि असे कधी दिसले, वाटलेही नव्हते . दुसर्या दिवशी दुपारीच आम्ही निघणार होतो . सकाळी परत फोन आला. कुत्रीने ओट्यावर घाण करून ठेवली आहे .. साफ कसे करायचे ते मी बघते. असा शेजारचा फोन .. घाण केली म्हणजे काय केले ..? मला संदर्भ लागत नव्हता. दुपार ..! आम्ही निघालो. गाडी पकडली नि जवळ जवळ संध्याकाळी सहाच्या दरम्यान घरी पोहचलो . हलकेच गेट उघडले कुत्री कोठे बसली असेल. ? अंगावर तर येणार नाही ..? चावणार तर नाही ...? आम्ही पूर्ण सावध होतो. आम्ही अंगणात प्रवेश केला. पारिजातकाच्या झाडाखाली कुत्री अंगाचे मुटकुळे करून पिल्लाना कुशीत घेऊन झोपली होती . गेटच्या आवजाने ती सावध झाली असावी. तिने हलकेच डोळे किलकिले करून आमच्या कडे बघून घेतले. नि शांतपणे डोळे मिटून घेतले . काय करावे कळत नव्हते . लेकुरवाळ्या नि कालच जन्म दिलेल्या पिल्लांच्या आईला बाहेर काढणे मनाला पटत नव्हते. तिची केविलवाणी नजर आमचा जीव खालीवर करीत होती . तशी ती रोज बघण्यातली होती. दोन वर्षापासून आम्ही तिला लांबून बघत होतो. अंगणात घुसली तर तिला हाकलून देत होतो. तिला आम्ही कधी भाकर तुकडा दिला पण नव्हता. कुत्री भटक्या ग्यांग मधीलच होती . पण ती आज असहाय होऊन आमच्या अंगणात शिरली होती . पिल्ले जन्माला घातली होती .आम्ही घरी असतो तर तिला आत येऊ दिले नसते .आणि हे अगदी खरे होते . पण आमच्या अपरोक्ष घटना घडून गेली होती . आम्ही हलकेच ओटा नि अंगण साफ केले. कारण अंगणात तिने खूप माती माती केली होती नि ओट्यावर घाण करून ठेवली होती . .अंगण साफ करताना तिने हू का चू देखील केले नाही. ती शांतपणे पडून होती . नवल वाटले. .. मग बायकोने दूध नि पाव एका भांड्यात कुस्करून तिच्या पुढ्यात काही अंतरावर ठेवला बायकोला भीती वाटत होती कुत्री अंगावर आली तर काय घ्या ..? कुत्री गप्प पडून होती.मधूनच डोळे किलकिले करून बघत होती खाण्यासाठी धडपडत होती परंतु उठण्याचे त्राण देखील नव्हते तिच्यात ती शक्तिहीन झाली होती . शेवटी धाडस करून पाव नि दूध मीच तिच्या जवळ सरकवले. डोक्यात मात्र विचारचक्र चालू होतेच तिला बाहेर कसे काढावे ..? काय निर्णय घ्यावा काहीच कळत नव्हते. शेवटी निर्णय तिच्या बाजूने झाला राहुद्या काही दिवस . पिल्ले थोडी मोठी झाली की ती त्यांना कोठेतरी घेऊन जाईल. नि आपली सुटका होईल. मग मी धीर करून कुत्रीजवळ गेलो .ती शांत होती.बिलकुल गुरगुरली नाही. आता तिने दूध नि पाव फस्त केला होता. नि ती पिल्लाना चाटून स्वच्छ करीत होती. नक्कीच तिला आमच्या विषयी विश्वास वाटत होता. रात्री आम्ही शांत झोपलो. तिला बाहेर काढले नाही ह्याचे काहीसे समाधान वाटत होते. एवढ्या रात्री ती कोठे जाणार होती. .? रात्री कधीतरी पिल्लांचा बारीकसा आवाज येत राहिला. कुत्री मात्र शांत होती.गप्प होती. दुसर्या दिवशी अंगण स्वच्छ केले. कुत्री किलकिले डोळे करून शांतपणे बघत होती. काही हालचाल करीत नव्हती. तिची सहा पिल्ले तिला लुचत होती. सकाळचे कोवळे कोवळे उन्ह पडले होती. पारिजातकाच्या फुलांचा सडा कुत्रीच्या आणि तिच्या पिल्ला भोवती सांडला होता आणि ती निवांत डुलक्या घेत होती. तिच्या डुलकित शांतपणा होता ह्या दृश्याने आमच्याही मनाला विलक्षण प्रसन्नता लाभली. दुपार झाली. बारा वाजून गेले. तिला परत दूध नि पाव दिला. तिने शांतपणे सगळे पोटात ढकलले. तिने एकदा सुद्धा गुरगुर केली नाही. जशी काय ती आमच्या खूप परिचयाची होती.तिच्या नजरेत तसा भाव वाटत होता. मध्येच मी ब्यांकेत जाऊन आलो. जसा मी आलो तशी ती बाहेर जाऊन आली. मी येताच हलकेच अगदी आपलेपणाने अगदी हक्काने आत आली.नि संथ पावले ढकलीत पिल्लांकडे गेली.परत शरीराचे मुटकुळे करून पिल्लाना कुशीत घेऊन डोळे मिटून बसली . मी त्या पिल्लांकडे बघून घेतले. शुभ्र पांढरे नि काळे ठिपके असलेले पिल्लू दिसले. त्यांची गुलाबी पावले नजरेस पडली . मी पिल्लांकडे बघत होतो नि ती शांतपणे मला बघत होती. आमच्या नजरेतील आपलेपणा तिने ओळखला होता. तिला अभय मिळाले होते बिन ओळखीचे आम्ही आम्हाला समजत असलो तरी तिला आमचा सहवास सुखाचा वाटत असावा. ती एकदम निर्धास्त झाली होती. तिला खाण्यासाठी आता बाहेर जाण्याची जरुरी वाटत नव्हती. तिला वेळच्यावेळी खाणे मिळत होते. प्रत्येकाचे कसे नशीब असते बघा. काय योग होता तिच्या नशिबात ..? मी स्वता प्राणी प्रेमात कधीच पडलो नव्हतो. प्राणी, पक्षी मला आवडत जरी असले तरी त्यांच्यात गुंतून पडणे म्हणजे स्वतावर बंधन घालून घेतल्यासारखेच वाटत होते. मग आपल्याला कोठे बाहेर जायचे म्हणजे त्यांची सोय लावणे खूप कठीण वाटायचे. मी प्राण्याच्या अगदी विरोधात होतो. तरीही अशा पद्धतीने प्राण्याचा सांभाळ करण्याचा योग आला होता. घरी असतो तर तिला माझ्या घरी आश्रय मिळणे शक्य नव्हते. परंतु ती माझ्या गैरहजेरीत आली. नि चिकटून बसली ..हा कुठला योग होता...? चार -पाच दिवसात काय काय होते असा विचार आम्ही करून काही दिवस गप्प राहावे असे ठरवून ठेवले आहे बघुया ..? तिच्या नि आमच्या नशिबात काय योग आहेत ते ....?? ------------------------------------------------------------------------------------ दुसरा दिवस. आमच्या घरी येणारी माणसे बिचकत येत होती.किंवा येण्याचे टाळीत होती . गेट न उघडता बाहेरूनच निरोप देत होती.मग आम्हीपण त्याना येण्याचा आग्रह करीत नव्हतो. आमच्या दृष्टीने आमच्या अंगणातील कुत्री आमच्यापण मुळीच परिचयाची नव्हती. तिला आम्ही कधी यु.ss .युss करीत तिचे कधी लाड्पण केले नव्हते. श्वान दयेबद्दल जो तो आमचे कौतुक मात्र करीत होता परंतु आम्हाला त्याचे काहीच वाटत नव्हते हे सर्व सहजगत्या घडले होते . घडत होते घरी येणाऱ्या पाहुण्याकडे कुत्री मुळीच डोके वर उचलून बघत नव्हती . तिला पूर्ण ठाऊक झाले होते की ती येथे पूर्णपणे सुरक्षित आहे .. तिची पिल्ले सुरक्षित आहेत. शेजारपाजारची काही मित्र मंडळी तिला काही काही खावयास देत होतीच . तिचे नशीब तिच्यावर प्रसन्न होते. आम्ही घरी असतो तर ती मुळीच आतमध्ये येऊ शकली नसती . मग तिने कोठेतरी पिल्ले टाकली असती . नि तिला खूप त्रास झाला असता. आतां ती एकदम बिनधास्त झाली होती. ती अधून मधून पिल्लांना चाटून पुसून स्वच्छ करीत होती . रात्र . आम्ही झोपी गेलो. मला गार झोप लागली. कधीतरी मध्येच मला बायकोने उठवण्याचा प्रयत्न केला . म्हणाली -गेट कोणीतरी ढकलल्यासारखा आवाज येतोय .बघता का ..? मी तर वैतागून गेलो. गाढ झोपेत होतो. मी लक्षच दिले नाही . मग तीच उठली .दरवाजा किलकिला केला. गेटच्या बाहेर आमच्याच अंगणातली कुत्री आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत होती. तिला आतमध्ये मात्र येता येत नव्हते. आतमध्ये येता येत नव्हते तर ती बाहेर गेली कशी ..? बाहेर जशी गेली तशी मग आतमध्ये का नाही आली...? का तिचा अभिमन्यू झाला होता..? जसे अभिमन्युला चक्रव्ह्यूवात कसे शिरायचे माहित होते परंतु बाहेर कसे निघायचे माहित नव्हते . तशी तिची अवस्था झाली होती का ..? मग बायकोनेच गेट उघडले नि ती चटकन आत आली. सकाळी सकाळी मला तिने हे सर्व सांगितले. नि मी थक्क झालो . कशाला गेली होती बाहेर ..? तिला कंटाळा आला होता का ..? का ती अन्नशोध मोहिमेवर गेली होती . आणि परत येऊन ती गेट वाजवीत होती. . बायकोने तिच्या लेकरासाठीच तिला आतमध्ये घेतले. सकाळी मी जागा झालो. छान कोवळी उन्हे पसरली होती .हवेत छान गारवा होताच तिची पोरे तिला लुचत होती . ढुशा मारीत होती. ती ध्यान लावल्यासारखी शांत तृप्त दिसत होती . ती ज्या झाडाखाली झोपली होती .त्या बाजूने अडीच फुटावर विटाचा सिमेंटने बांधून जो कट्टा बांधलेला होता. माती बाहेर येऊ नये म्हणून. काल खूपशी माती आवरली होती तरी झाडाच्या पासून कट्याजवळ जी थोडीफार माती होती ती मी हलकेच झाडून साफ करू लागलो.जरा सावध होतो.तिने एकदा डोळे किलकिले करून बघून घेतले नि मग डोळ्यात धूळ जावू नये म्हणून डोळे बंद करून घेतले. कोवळे उन सांडलेले होतेच .हवेत प्रसन्न असा गारवा होता . झाड-पानातून उन्ह गळत होते .कुत्री छान झोपली होती . पिल्ले तिच्याशी झटत होते.तिच्या अंगावर चढत होते. मधूनच की.ss.. कीss असा चित्कार करीत होते .चला मनात आले एखादा फोटो काढून बघुया. मी हलकेच क्यामेरा हातात घेतला .दुरूनच फोटो घेतला एक ..दोन ..तीन मला वाटते माझा क्यामेरा मला झूम करता येत नसावा . फोटो बरे आले परंतु ठळक नाही आले . घरात येऊन फोटो बघितले . मला बरे वाटले . काल पासून तिने एक काम केले होते . माती मुळीच उकरली नव्हती.तिच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छच होता. मग कोणी मित्र सहज म्हणाला काळजी करू नको.जेथे पिल्ले आहेत त्याच्या जवळपास कुत्री काही घाण करणार नाही आणि हे अगदी पटले होते .तिने विष्टा वगैरे टाकली नव्हती . बघूया पुढे काय होतेय ते ...? कारण मी ह्या बाबत बराचसा नव्हे पूर्ण अनभिज्ञ होतो ... आणि आहे !!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2426
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

अनवधानाने का होइना पण कुत्री विषयी तुमच्या मनात दया भाव जागला हे वाचुन आनन्द झाला. असाच काहीसा प्रकार आमच्या शेजारील प्ल्वाटमधे घडतोय.

सध्या याच मनस्थितीतून जात आहे. घरी खिडकीत केलेल्या बागेत एका जुन्या बादलीत माती टाकून हळदीचे गड्डे लावले होते. काही दिवसांनी कोंब फुटायच्या ऐवजी एक अंडे दिसले. त्या धक्क्यातून सावरायच्या आत दुसर्‍या दिवशी दुसरे अंडे दिसले आणि नंतर कबुतराचे दर्शन झाले. घरी हलकल्लोळ - कोंब आला तर त्या उग्र वासाने पिल्लांचे कसे होणार याचा. :-) रोज ऑफिस मधून आल्यानंतर अपडेट मिळत होते. त्याला (की 'ती'ला..?) काय खायला घातले, पाणी कसे पिले. वरती वाळत घातलेल्या कपड्यांचा कबुतराने सावलीसाठी कसा उपयोग केला, खिडकीजवळ गेल्यानंतर कबुतर बसलेल्या अवस्थेतच आपल्याला घाबरवण्यासाठी फुगते, व जवळजवळ मूळ आकाराच्या दीडपट होते.. आणि विशेष म्हणजे हे सगळे कॅमेर्‍यात साठवण्याची धडपड. मागच्या आठवड्यात पिल्ले बाहेर आली. पिसांशिवायचे ते डोळे पण न उघडलेले दोन गुलाबी गोळे. तो क्षण शब्दात व्यक्त करणे खूप अवघड आहे. आता जवळ गेल्यानंतरही कबुतर फुगत नाही आणि "एका पक्षी आपल्यावर विश्वास ठेवतोय" या भावनेने नकळत कुठेतरी आनंद होतो. :-)

एकदम डोळ्यासमोर चित्रपटच साकारत आहे असे वाटले. मजा आली एकदम.

त्यांचा फोटु जर अपलोड केला असता तर आंम्हालासुद्धा तुमच्या नवीन पाहुणीला आणि तिच्या इटुकल्या पिल्लांना पाहण्याचा आनंद घेता आला असता. :)

असे अचानक येऊन राहिलेले मुके प्राणी कधी घराचा भाग होऊन जातात आणि कधी अपल्या मनात घर करून रहातात कळतच नाही. असा एखादा मुका सोबती अचानक सोडून गेला तर मात्र गेल्यावर खूप त्रास देतो... पण ते दु:ख नको म्हणून कोणी प्राणी जवळ येऊ द्यायचा नाही असा निश्चय केला तरी टिकत नाही आणि मग ती माया आणि ते दु:ख परत परत नव्याने भेटत रहातं.

माझ्या माहेरी कुत्रांची एक पिढी आमच्या बरोबरच वाढत असायची वाढत असायची.कुत्रीला पिल्ले मोठी झाली कि त्यातली एक कुत्री ठेऊन बाकीची पिल्ले इतरांना देऊन टाकायचो.पिल्ले जरा मोठी झाली कि पिल्लांची आई त्यांची शिकवणी घायची.साधारण वीस एक दिवसांनतर ती सगळी पिल्ले घराच्या सगळ्या भिंतीना नाक लावून ओळीत काहीतरी हुंगत असायची.आमच्या राणीचं बाळंतपण आणि पिल्लांची होणारी वाढ मी १० च्या वर वेळा पहिली आहे.पण ती पिल्ले काय हुंगायची ते मला कधी कळल नाही.

In reply to by किचेन

पण ती पिल्ले काय हुंगायची ते मला कधी कळलं नाही.
अशी आउट साइड ऑफ स्टंप बॉलिंग करु नका... लोक सरळ-सरळ कव्हर ड्राइव्ह मारतील... अन मान वळेपर्यंत चौका गेलेला असतो... समजावुन सांगा रे कुणी ड्राइव्ह कसा मारायचा ते... ते खापर मी माझ्या माथी फोडुन घेणार नै... वाटल्यास माझ्या स्वाक्षरीवरुन काही बोध घ्या...