क्र्र्रर्र्र्र दाराचा आवाज करत हळूच दाराच्या आडून एक चेहेरा " आत येवू का बाई ?" असा आवाज देवून गेला .
मान वर न करताच मी " हम्म " उत्तर केल . रोजच्या सवयीप्रमाणेच सारं .
ती स्त्री हळूहळू चालत खुर्ची शेजारी येवून उभी राहिली . मग मात्र माझी नजर सरळ तिच्या चेहेर्यावर गेली.
पस्तिशीतली एक कळकट्ट चेहेर्याची ,लांब सडक केस असणारी ..अगदी उंचपुरी .
शरीराने काहीशी मलूल , अशक्त , पण शांत चेहेर्याची एक विधवा माझ्यासमोर येवून उभी राहिली . हल्कस स्मित
करून मी तिला खुर्चीवर बसायला सांगितल तशी ती साडीचा पदर हाताने पुढे घेत सावरून बसली . विशेष म्हणजे .मला
अश्या मलूल आणि अशक्त चेहेर्यांना बघायची सवयच झाली होती ,पण त्याच प्रकारच्या चेहेर्यासोबत त्यावरचे
प्रश्न , भीती ..गांगरून गेलेली मुद्रा हे सुद्धा अंगवळणी पडल होत .हिच्या चेहेर्यावर मात्र एकही प्रश्न नव्हता ,
दिसत होती ती फक्त काळजी ..चिंता .
चिंता , काळजी , भीती , माहितीचा अभाव आणि त्यामुळे उठणारे असंख्य प्रश्न ..हो ह्या साऱ्यांच निरसन
करण्यासाठीच तर माझ्याकडे यायची अशी मंडळी .मी एक समुपदेशक म्हणून काम करते . एड्स आणि एच .आय.व्ही.
ह्यामुळे ग्रस्त असणार्या लोकांच समुपदेशन .काय वाटत तुम्हाला ? कितपत समजून घेत असतील हि मंडळी ?
मला ...माझ्या समुपदेशनाला ?.
कधी कधी तर एखाद्याची कहाणी इतकी हृदयद्रावक असते कि माझे शब्द ..माझी भाषा ..माझ ज्ञान आत्ता इथे अपूर
पडतंय कि काय अशी शंका मनात येवून जाते .सगळ्याच केसेस तश्या नसतात .कबूल , काहींचा राग येतो ..पण दाखवू
शकत नाही ..काहींच्या मनातले काटे दिसतात पण ते काढू शकत नाही. काहीजण तर का इथे आलेत असही वाटत
, पण कुणालाच फटकारू शकत नाही . माझ कर्तव्य आड येत ..अस म्हणण्यापेक्षा त्यांच्या अडचणीत त्यांना मदत
करण ..शक्य तेवढ अडचणीतून बाहेर काढन हेच माझ काम होत .आणि मी ते आनंदाने करायची.
अशीच केस सध्या समोर होती तिला काय झाल होत हे तिचे केसपेपर सांगत होते . आता ती का आली आहे हे
तिच्याकडून ऐकायचं होत . चेहेरा अतिशय शांत दिसत होता .शक्यतो अस दृश्य पाहायला मिळत नाही .म्हणूनच
आश्चर्य वाटत होत मला .ती एकटक खाली बघत होती ,आणि मी एकटक तिचा चेहेरा वाचायचा प्रयत्न करत होती .
क्षणभर शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात मी तिला " तुझ नाव काय ?" असा प्रश्न टाकला .त्यावर " सगुणा धायगुडे "
. एवढच उत्तर देवून ती पुन्हा शांत बसली .
मग मी तिला तिच्या कुटुंबाबद्दल विचारल .
हळूच मान वरखाली वरखाली करत ती बोलू लागली " बाई , दोन मुल आहेत मला .मुलगा सातवीत आहे यंदा आणि
मुलगी चौथीत . मुल हुशार आणि गुणी आहेत माझी . आठ महिन्यापूर्वी मालक गेलं . ह्यानच ..हेच होत त्यान्लाबि
आन आता मला .त्यांचीच देन हाय ..पण लय चांगल होतं बाई ते .कशाकशाची कमतरता कधीच भासू दिली न्हाय
आम्हाला ”. बास पुन्हा शांत . मग मी पुढचा प्रश्न विचारला ." मग घर कस चालत ? तू काय काम करते ?मुलांचा
शाळेचा खर्च वगैरे? कुणा नातेवाईकाची मदत ?".
तिच्या चेहेर्यावरचे सगळे रंग पटापट अगदी पाण्यावर तरंगल्यासारखे वरती दिसू लागले .काहीशी हसली अन पुन्हा बोलू
लागली .
" बाई मी चवथी नापास . एका अगरबत्तीच्या फ्याक्टरीत काम करते . घरी दिव्याच्या वाती बनवायला आणते .पोरभी
मदत करतात . भागवतो आम्ही आमच ..हुईल तसं ..जमल तसं. माझ टरकावर डायव्हर व्हूत ..महिनोन महिनं
घरी यायचं नाहीत . फिर्तीवरच असायचं . कवा गाडी गावच्या भागात आली कि मंग ..गाडी तिकडच लावून ..रातच्याला
घरी यायचं अन मंग पुन्हा पहाटेला उजाडायच्या आतच निघून जायचं .दर फेरीला पोरांसाठी खायला ..खेळणी कपडा
लत्ता ..माझ्यासाठी काय बी आणायचं .कवा ऐकल बी नसल नाव असल्या वस्तू आणायचं . लय जीव होता
आमच्यावर तेंचा . अन नातेवाईक ? जिवंत असताना कधी इच्चारपूस केली न्हाय ..ते मेल्यावर कशाला येतील .?"
काहीसा रागातच तिने वाक्याचा शेवट केला . मी तिच्या चेहेर्यावर पुन्हा काही दिसतंय का पाहू लागले .सवयच जडली
होती मला ..काही जन बोलायचेच नाहीत ..मग चेहेर्यावरून अंदाज काढून प्रश्न विचारायला लागायचे . बोलत कराव
लागायचं . पण हीच अस नव्हत ..बोलत होती ..विचारेल तेवढ सांगत होती ..कदाचित अजून म्हणावं तसं मोकळ होता
येत नव्हत तिला .
कदाचित माझ्यावर विश्वास ठेवू कि नको अस झाल असावं तिला .कदाचित ..कशी सुरुवात करू ?
हाही प्रश्न असावा . माहित नाही पण निर्विकार चेहेरा ,त्यामुळे अंदाज बांधनही अक्षरशा कठीण जात होत .मग मी
मुद्द्यावरच बोलायचं ठरवल . जागेवरून उठून तिच्या जवळ जावून उभी राहिले . तिच्या खांद्यावर हात ठेवताच ती
दचकली .
" अग घाबरू नकोस ..मला नीट सगळ सांगशील का? अगदी सुरुवातीपासून ..तू खंबीर आहेस.. धीराची
वाटतेस , माझ्यावर विश्वास ठेव आणि सगळ काही सांग . तरच मला तुझी मदत करता येईल ”.
तिच्या चेहेर्यावरती दचकून आलेले भाव क्षणात उतरले . दिलासा आल्यासारखा तिने मोठा श्वास सोडला ..वाहत्या
झर्याला मोकळेपणाने वाहताना खूप खळखळाट करत वाहावस वाटत ..तशीच ती काहीशी रील्याक्स झाली .
खुर्चीवर नीट स्वतहाला मागे सारून बसली .आणि तिने सुरुवात केली .
" बाई , शिकलेली न्हाई मी ..पण आयुष्याची काही गणित सोडवताना आपला हिसाब थोडा तरी पक्का होवून जातो
ह्यावर माझा विश्वास हाय , मग त्यासाठी पुस्तकातल शिक्षण उपयोगी पडतच अस न्हाई .आमी गरीब माणस.
मालक भी दहावी पास होतें .आधी सातवी परेन्तच शिक्षण होत . गावालाच मोल मजुरी करायचे . मग ट्रक वर किन्नर
म्हणून नोकरी लागली .घरापासून ..पोरांपासून लांब जायला लागले . गाडी शिकून घेतली पण दहावी परेंत शिक्षण
आसल तरच ते फोटूपास का काय म्हणत्यात ते मिळणार म्हणाल .
हुशार होतें . भाईर्ण च मग फार्म भरला आणि दहावीची परीक्षा दिली . हुन्नरी हुते . पास भी झाले अन ती फोटुपास
(लायसन्स )भी मिळवला ."मी पोरास्नी कौतूकान सांगायची ..बापान एवढ्या वरसान शाळा केली अन पास हून
दाखिवल . गावात भी लोक लय मान द्याचे . लय सुख होत बघा माझ्या घरात . पण कुणाला बगवल नाय काय जान
..माझ्या संसाराची रांगोळी माझ्या समोर पुसली बाई ...माझ्या घराची होळी झाली .
ते कधी कधी दोन दोन महीन यायचं नाहीत . लय आठवण यायची .डोळ्यातली आस्व डोळ्यातच सुकवून मी कामात
गढून घ्यायची .पोर भी वाट बघायची .पण आपल्यासाठीच घर ..संसार बायको , पोरं ..सगळ्या सुखपासन लांब राहिलेत .
आपल्यासाठीच जीवाच रान ..कष्ट करून कमावतायत, बास एवढ एकच मनात यायचं . लय कष्ट करायचे .कवा खाडा
नाय का कवा आजारपण न्हाय . भेटायला आल कि मात्र सगळी पेटी आमच्यासाठी आणलेल्या वस्तूंनी
भरून असायची .
बाई माझी त्यांच्याबद्दल काय भी तक्रार न्हाय . माणूस हाय ..त्यांचा पाय घसरला ..पण का?
ह्या गरिबीमुळ शिक्षण घेता न्हाय आलं .संसाराचा गाडा लय लवकर गळ्यात पडला .
पोर भी लवकर झाली . घर भागवायच मजी मजुरीपरीस थोड चांगल काम ,,अन आमच्यासाठी चांगल काम म्हणजे
हेच डायव्हर ..किन्नर असलच. त्यात फिरतीची नोकरी ...कुठ्भी राहा कसभी रहा .. त्यामुळ सोबत राहाण कठीणच
होत ..
गरज शेवटी गरज असती . बायीला आपल्या भावनांना आवर घालण एकवेळ जमत पण पुरूषाच नसल होत तसं
...म्हणून पुरुष अश्या गोष्टीला लगीच बळी पडतो . मीबी हाच विचार केला . गेल्यावर्षी मालक घरी आल ते कायमचच .
अंगापिंडान दणकट असणारा माणूस ..एकदमच जीव गेल्यासारखा ...टीबी पेशंट सारखा दिसू लागला . मला काळजी
वाटू लागली .परत जाणार न्हाई .आता मला काम होत न्हाई .पाठीचा कणा जास्त वेळ बसू देत न्हाई अस म्हनाय
लागलं. डोळ खोल ..सगळी हाडं वर आली होती .
गावातल्या दवाखान्यात न्हेल तर त्यान जिल्ह्याच्या इस्पितळात न्ह्यायला सांगितल .तिकड गेलो अन भरमसाठ
चाचण्या कराय लावल्या . गाठीचा पैसा मोडून त्येभी केलं .
त्या चाचण्यांनी मात्र माझ काळीज अस हालवल कि आजतागायत तो दिस मला अजून जश्याचा तसा समोर दिसतो .
तिथलं डक्टर लय चांगल हुत ,मला लय धीर दिला .
माझी चाचणी करून घ्याला लावली . आणि मग पुढ्च समद तुमच्या पुढ्च हाय बाई .
मालकांची परिस्थिती लय खालावली होती .शेवटच्या घटका जवळ वाटायला लागल्या होत्या . वजन इतक कमी झाल
होत कि मी एकटीच उचलून खाटवन खाली घ्यायची ..वर ठेवायची .
खर सांगू बाई , मला लगीन झालेलं ते नव दिस आठवायचं .माझ आजारपण मी विसरून गेली होती .
दिसरात्र त्यांची सेवा केली .कुन्नाकुन्नाला कळू दिल न्हाई कि ह्यास्नी काय झाल व्हत म्हणून . मला ह्या रोगाबद्दल
जास्त काय म्हायीत नव्हत पण लय लाजीरवाणा हाय एवढच कळल व्हुत .
बाई मला त्यांचा राग न्हाय आला .कबूल हाय माझ्यासंग त्यांनी परतारना केली ..पण माझ्यासाठी आमच्या
पोरांसाठी त्यांनी केलेलं कष्ट मला ह्या परतारनेपेक्शापण लय मोलाचं वाटत .
एकनिष्ठ फक्त शरीरानच रहायचं आन मनात दुसर्याच ईच्चार खेळवायचं हे माझ्या मनाला न्हाई पटत .
त्यांनी काही क्षणभराच्या सुखासाठी तोल ढासळला व्हता स्वतःचा ..पण त्या क्षणभरा नंतरचा सगळाच काळ
आमच्याच विचारात काढला होता .ह्यात मला तिळमात्र शंका न्हाय बाई .शेवटच्या दिवसात मालक सारख म्हणायचं
.." सगुणे तुला माझा राग येत न्हाय का गं?..माझ्यामूळ सगळ्या संसाराची धूळधाण झाली ..आज माझ्यामूळ ह्या
रोगान तुला भी झपाटल . पोर उघड्यावर पडणार आपली ..." लय रडायचं . पोराला पंधराविपरेंत शिकवायचं आन
पोरीच चांगल्या घरी लगीन करून देवू म्हणायचं . सगळीच सपनं डोळ्यात तशीच ठेवून निघून गेल . .
मी सगळ केल त्यान्चं ..शेवट परेंत मी त्यांची काळजी घेतली .पोरास्नी कळून दिल न्हाई ..नातेवैकास्नी , गावात्ल्यास्नी
सगळ्यासनीच सांगितल टीबी झाला व्हुता म्हणून .पण आता ,
आता लय अवघड झालय बाई ..त्याचं करायला ..त्याचं लपवायला मी होती ..पण माझ कस लपिवणार मी ..माझ्या
पोरास्नी वाळीत टाकतील हि लोकं .जगाच्या पसार्यात किडा मुंगी बनून माझी पोर राहू नयेत ..त्यास्नी मानाच जीन
मिळाव. एवढच वाटत मला . पोरक्या पोरांच्या मुखात हल्ली अन्नाचा घास भरवायला भी भ्या वाटत ..मांडीवर
घेतानाभी जीव कासावीस होतो .
बापाच्या जाण्यान छत्र गेल्यासारखं वाटतय त्यास्नी ..आन आता आईच मरण बघून तर माझी सोन्यासारखी पोर
..कोलमडून पडतील ..
बाई तुम्हास्नी वाटत असल मी मरणाला घाबरलीय म्हणून ..पण तस न्हाई , मरान काय आज न्हाय तर उद्या
आलच असत ..ह्या रोगान न्हाय तर दुसरा कंचा तरी चिकटला असता .
मला भ्या वाटतय माझ्या पोरास्नी कुनिभी टोच्या मारल , लचक तोडल .पदरात पोरगी हाय माझ्या
..गल्लीगल्लीतल्या कुत्र्याबोक्यापास्न सुद्धा सांभाळावी लागतीय आता पोरीची जात ..
मग माझ्या माघारी ..माझ्या माघारी "..
तिचे शब्द खुंटले डोळ्यातन वाहणारा अश्रूंचा प्रत्येक थेंब आक्रोश करत होता .
माझ मन अतिशय हळव्या परीस्थितीला तोंड देत होत .सगळच शांत झाल होत . मला तिची चिंता ..
तीच मन कसल्या काळजीत पडलय हे कळल होत . ज्या गोष्टींसाठी खर तर डॉक्टर समुपदेशनाचा मार्ग सुचवतात
..त्या कुठल्याच गोष्टींची सगुणाला गरज नव्हती ..शिक्षण कमी असूनही तिची वैचारिक पातळी अतिशय उंचावलेली
वाटली .
तिला वाटणारी काळजी साहजिकच कुठल्याही आईला वाटणारी होती . एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती अशी कि
, आई हि मरणाच्या दारात जरी उभी असेल तरी तिला स्वतः पेक्षा जास्त काळजी तिच्या बाळाची असते ..ती
विसरून जाते कि काहीच घटका आपण बाळाला सोबत करणार आहोत .तीच मातृत्व मात्र ह्या गोष्टी जुमानत
नाही ते सदैव तिच्या शरीराचा नाश झाला तरी सतत बाळाच्या सोबतच असत . सगुणाला , तिला झालेल्या रोगाच
गांभीर्य ..तिच्या मुलांची नंतर होणार्या फरफटीपेक्षा अजिबात महत्वाच वाटत नव्हतं .
तिच्या शेवटच्या वाक्यानं माझ्याही मनात प्रश्न निर्माण केला होता .. माघारी? हिच्या माघारी? काय आणि कसं
होणार हिच्या मुलांच?.
माझ्याकडे येणाऱ्या सगळ्याच एड्स आणि एच .आय. व्ही . बाधित लोकाना मला धीर द्यावा लागायचा ..जगण्यासाठी
संघर्ष करण्याच तातपुरत का होईना पण बळ आणावं लागायचं .पुढे कश्या आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ,
काय करायचं ,काय टाळायचं आणि का? ह्याच महत्व पटवून द्यावं लागायचं . महत्वाच म्हणजे आलेल्या
परिस्थितीला कस हाताळायच .ती परिस्थिती स्वीकारून तिला जमेल तेवढ तोंड देत जगण्याचा प्रयत्न कसा करायचा
ह्याच गोष्टींवर जास्त चर्चा व्हायची .
पण सगुणा !..सगुणाच्या बाबतीत ह्याची गरजच वाटली नाही . खूपच उलगडलेली वाटली . जगण्याची
उम्मेद तर तिच्यात होतीच ..तिला मुलांसाठी जगायचं होत .संघर्षाची तयारीही तिच्यात होती कारण तिला आपल्या
मुलांच्या भवितव्याबद्दल चिंता होती . माझ्यासमोर एक एड्स बाधित महिला नव्हे ..तर एक आई बसली होती .
जिला आपल्या बाळांच्या जगण्याची काळजी होती .त्यांच जगन आनंदी आणि आयुष्य साध सुधच का होईना पण
मानाच ...हक्काच त्यांना लाभाव अशी साधीशी इच्छा बाळगणारी आई .काय चुकत होत तीचं ?
तिच्या नवऱ्याच्या एका चुकीची शिक्षा आज अक्ख कुटुंब भोगत होत ..आणि तरीही ह्या स्त्रीला त्याच्याबद्दल अजूनही
जिव्हाळाच वाटत होता .एकेरी साधी हाकही नाही?..अजूनही मालक अशीच संबोधण वापरतेय हि ...खूपच वेगळी
वाटली नाहीतर शक्यतो ज्याच्यामुळे ह्या रोगाची लागण झाली त्याला शिव्याशाप देणारीच माणसच पाहिली होती मी
..म्हणून तर सगुणा जास्त लक्षात राहिली .
तीच मन मोकळ झाल होत पण तिचे प्रश्न ..तिची काळजी ..आता माझ्यासमोरचे प्रश्न बनून गेले होते .
पाठीवर आधार दर्शक हात ठेवण्या व्यतिरिक्त तिच्या बाबतीत मी तेव्हा काहीच करू शकले नव्हते .खूप अनुत्तरीत
झाले होते मी .
डोळे पुसत पुसत सगुणा सावरून म्हणाली .." बाई आज लय दिसांनी मी कुनासंग तरी यवढ बोलले ..ह्या सार्या गोष्टी
कुनाबी जवळ बोलण्यासारख्या न्हायीत .मनात साठून साठून आता ह्याच मला गिळतायत का काय अस वाटाय लागल
व्हुत . आज लय हालक झाल माझ मन . तुमी माझ्यासंग आपुलकीन बोलला मला लय बर वाटलं .जवळची माणस
..नात्यातली मानस ..लय भ्या वाटत हो त्यांच . नगु कुणी ..त्यापरास लांबच्या एखाद्याची विश्वासाची हाक भी
लय आधार देवून जाती बगा " मी येईन पुन्यांदा तुम्हास्नी भेटाय ..मला बोलू वाटल कि ...आता येवू मी
बाई ?". पुन्हा माझ्या तोंडून नकळत फक्त " हम्म " एवढच गेल .ती उठली आणि दाराजवळ जावून , पुन्हा एकदा
मागे वळून बघितल . दाराचा कर्रर्र आवाज करत दार लोटून ती निघून गेली .
माझ पाहिलं सेशन संपल होत .पुढच्या सेशनची गरज होती का तिला ? .........
????????????????????????????????????????????????????????????????????????????
| लेखनविषय: |
|---|
याद्या
4400
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
चटका....
हा ही लेख छान जमलायं
:-(
सुन्न!!!
सुरेख कथा
---^---छान जमलय... पु.ले.शु.
.................
....
सुंदर कथा. न जाणो समाजात अशा
वा!पुजा ताई छान !! जरा वेग्ळ
भिन्न
+१
In reply to भिन्न by नगरीनिरंजन
वेगळा विषय मांडलाय, छान.
मस्त लिहीले आहेस असे कसे
सुन्न झालो
अतिशय धीराच्या स्त्रीबद्दल
तुमचा लेख वाचताना माझ्या
धन्यवाद....
चच्च...
लेख आवडला.