माहित नाही जे लिहितोय ते पूर्ण करू शकेन का नाही.. कारण ज्याचा निर्धार करून लिहावं लागतं त्याच्या शेवटाची खात्री नसते असा माझा अनुभव आहे. शिवाय हि गोष्ट सुमारे मी सातवीत असल्यापासूनची; म्हणजेच आजपासून पंधरा वर्षांपेक्षा जास्तच जुनी. मी आमच्या गावाच्या 'पूर्ण प्राथमिक' शाळेत शिकत असतानाची. काकाने पुण्यात पहिला ब्लॉक घेतला होता तेव्हा. नवी सोसायटी, नवी कपल्स, नवीनच पिल्लं सगळे असे मस्त कोवळे. त्यात 'पुण्याचं' आकर्षण, तिथल्या पोरांचं, पोरींचं दिसणं आणि असणं सगळंच छान, जवळ ओढून घेणारं. आणि त्यात गुलाबी वय; नुकतीच सोनेरी फुटायला लागली होती, असं. तिथे रंगणारे खेळ- डबडा ऐस पैस, शिवणापाणी सगळच अजूनही मंतरलेलं वाटतं मला. पुढच्या वर्षी आठवीला मला पुण्यात काकाकडे शिकायला आणणार आहेत याची जाणीव असल्यामुळे अजूनच सगळं भारी वाटायचं तेव्हा. पुण्यात बिबवेवाडीला येण्यासाठी नुसती मरमर व्हायची माझी. पहिल्यांदीच एखाद्या मुलीला 'मैत्रीण' म्हणू शकायचो एवढं मोकळं वातावरण मिळालेलं, म्हणून मजा यायची तिथे. गावात कोणाही मुलीबरोबर बोलायचं जरी असलं तरी आधी तिला राखी बांधायचे सोपस्कार करावे लागत असत. त्यात आमच्या गावात इनमिन तीन घरच फक्त ब्राम्हणांची, त्यातल्या त्यात शेती असलेल्या ब्राम्हणांची त्यामुळे सतत एक 'जमाना' छाप दबाव असायचाच.
होता होता सातवी संपली आणि आठवीसाठी भावे स्कूल मध्ये तुकडी 'आय' मध्ये प्रवेश झाला आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात जास्त आयुष्य शिकवणारी वर्ष सुरु झाली. काकाकडे राहत होतो त्यामुळे हीच गोष्ट सांगताना हजार फाटे पडू शकतात आणि प्रत्येक फाटयाची एक गोष्ट होवू शकते. घराची गरिबी, काकाचा वरचष्मा, काकू, भावे हायस्कूल आणि या सगळ्यांना तोंड देता देता तोंडाला फेस आलेला मी. या सगळ्या स्वतंत्र 'प्रकरणाच्या' गोष्टी आहेत. मला आज बोलायचंय ते या सगळ्या रुक्ष वहिवाटीत मला जे एक मृगजळ दिसलं आणि जे फक्त दिसतंच राहिलं, कधीच हातात आलं नाही त्याच्याबद्दल.
गोष्ट घडली ती अशी... तेव्हा सोसायटीमध्ये एक नवीनच ट्रेंड आलं होतं , जोड्या लावायचं. माझीही जोडी एका मुलीशी लागली होती तिचं नाव ज्योती. याला कारण येवढंच कि आम्ही दोघेही ग्रामीण ढंगात बोलायचो. ज्योती दिसायला कट्टा होती हे मला नंतर लक्षात आलं. त्यावेळेस जरा विचित्र वाटायचं हे सगळं. राग यायचा. एकदा नेत्रयुद्ध खेळताना मी तिच्याशी हरलो आणि पोरांना उत आला. इतकं चिडवलं कि मी तिथून जवळजवळ पळून आलो. त्यांचं चिडवणं नाही तर मला कॉर्नर करणं फार म्हणजे फारच लागलं...आधीच घराच्या आठवणीतून थोडासा सावरत होतो, एकदम खपली काढली गेली आणि आई ची आठवण येवून उन्मळलो. सोसायटीच्या पार्किंग मध्ये एकटाच फुगून बसलो होतो. विकेंड असल्यामुळे काका काकू दोघेही गावाकडे होते. कल्प कल्प चाललं होतं डोक्यात आणि 'ती' आली….
तिचे शब्द आता आठवत नाहीत पण तो आश्वासक चेहरा तसाच आहे अजून आठवणीत. अतिशय मायेने गालावरून फिरवलेला हात, दिलेला धीर, तिची सलगी या सगळ्याने माझ्या अचानक सगळ्या व्याख्या बदलल्या. तिचा तो गालभर स्पर्श, डोळ्यातले ओले भाव, आपलेपणा हे सगळंच माझ्यासाठी नवीन होतं. कोणीही मुलगी इतकी आश्वासक, आत्मविश्वास असलेली असू शकते जी अधिकाराने चार गोष्टी आपल्या मित्राला सांगू शकते हे मला गावठ्याला जरा बुंगाट झाले. पुढचे सात दिवस गालाला हात लावला कि कानाच्या पाळ्या गरम व्हायच्या. जेवण जैनसे झाले, भणाणल्यागत होऊ लागले, आईची आठवण येईनाशी झाली, काकूही गोड वगैरे दिसायला लागली. नक्की काय होतंय हे कळायच्या आतच भावे मध्ये ज्ञान फुकट मिळू लागले होते.
या सगळ्या काळात माझी आय तुकडी बदलून आता मी 'क' तुकडीत आलो होतो. आणि मित्रांच्या मते मी आता 'लव्ह' मध्ये होतो. त्यांची मीमांसा आणि माझी लक्षणे फिट्ट बसत गेली आणि माझ्या मनाने घेतले कि मी जबरजस्त प्रेमात आहे. या सगळ्या काळात आमचे संध्याकाळचे खेळ चालूच होते फक्त आता मी पाणी प्यायला जे तळमजल्यावर ज्योतीच्या घरी जात होतो ते आग्रहाने तिसर्या मजल्यावर 'तिच्या' घरी जात होतो. तिची प्रत्येक हालचाल, भाव नजरेने साठवून घेत होतो. रात्री जे दिवसभरात 'तिचे' साठवलं आहे त्याचा रवंथ करत होतो.
ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. मी आठवीत तर ती दहावीत होती. पण मला या कशाशीही देणेघेणेच न्हवते. ती अहिल्यादेवीत सायकल वरून जायची. तिचं सायकलवर बसणं, ताठ बसून पायडल मारणं हे सगळं मेमरीत फ्रेश आहे. म्हणून मग मीही बाबांच्या मागे लागून एक सायकल घेतली, कप्तान ! मग तिच्या जाण्याच्या वेळेत आमच्या शाळेची वेळ पुढेमागे करणे, तिला शाळेपर्यंत सोडायला जावून भावे मध्ये गोसावीचा कोंबडा होणे वगैरे प्रकार यथासांग करता करता एक वर्ष सारून(सरून) गेलं. आमची आख्खी शाळा रेणुका स्वरूप सुटायच्या वेळेस चेकाळून टिळक रोड वर केसांचे कोंबडे करून वाट पाहत असायची त्यावेळेस मी जीवाचा भाता करून शनिवार पेठेत अहिल्यादेवीत जावून तिला गाठायचो. तीही दररोज अप्पा बळवंत चौकात माझं काय काम असतं असं विचारून माझा भंग करायची नाही. मग दर शनिवारी दुपारी अशोकाची softy खावून घरी जाणे इत्यादी प्रकार भारीच गुदगुल्या करून जायचे.
यावेळेत आम्हाला एकमेकांचा सहवास छान वाटायचा. घरचेही एकमेकांना ओळखत असल्याने जाणेयेणे होत असायचे. सगळ्या प्रकारात मीच झेंडा घेवून वावरत होतो कि येड्या आपलं खरं प्रेम वग्रे. ती तशीच होती जशी आधी होती तशी, समजून घेणारी, आश्वासक आणि प्रगल्भ. आणि होता होता काकाचा तो निर्णय झालाच. मी आणि माझे चुलत भाऊ बहीणही मुळापासून हादरले. आमचा विश्वासच होत न्हवता....
क्रमशः
याद्या
2806
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली शाळा केलिये... वाचताना
या सगळ्या काळात माझी ' आय '
वाचत
शालेय आठवणीँत छान रमला आहात
ह्म्म्म्म्म
ह्म्म्म्म्म
छान. सुरवात छान केली आहे.
हे साम्य बघता गोष्टी
In reply to छान. सुरवात छान केली आहे. by चिंतामणी
भातुकलीच्या खेळामधली राजा
In reply to छान. सुरवात छान केली आहे. by चिंतामणी
अजूनही
शाळा आवडली!
प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे