बंदा आणि खुर्दा - 2 : समर्थ!
(बंदा आणि खुर्दा: 1 - सबनीस!)
(काही माणसं अशीच भेटतात. क्षणीक म्हणा किंवा दूरगामी म्हणा, पण प्रभाव टाकून जातात. त्या माणसांचं जागोजागच्या सामाजिक व्यवहारांमध्ये एखादं छोटंसं योगदान असतं. पण त्यासंदर्भातील बातम्यांपलीकडं त्यांचं व्यक्तिमत्त्व समोर येतंच असं नाही. किंबहुना बातम्यांतील नोंदींपलीकडं ते येत नसतंच. अशीच ही काही माणसं. वेगवेगळ्या संदर्भात प्रत्यक्ष भेटलेली. आजही आपल्या सभोवताली कुठं ना कुठं असणारी. त्यांचं योगदान बंद्या रुपयासारखं आणि तेवढंच असेल, एरवी ही माणसं खुर्द्यातच गणली जातील. पण, ती आहेत, इतकंच या लेखमालेसाठी पुरेसं आहे.)
या माणसाची आणि माझी भेट कशी झाली? सांगणं थोडं मुश्कील आहे. कारण या भेटी अनेक आहेत. प्रत्येक भेट जवळपास पहिलीच असावी, असं वाटत गेलं आहे. म्हणजे, तशा या माणसाच्या वास्तवातल्या भेटी मोजक्याच. आजवर आम्ही एका हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच वेळेला भेटलो आहे. त्यापलीकडच्या आमच्या भेटी त्या माणसाच्या काही वाक्यांतून झाल्या आहेत. ही वाक्यं बोलकी आहेत. म्हणजे, निदान मला तरी तशी वाटतात. इतरही अनेकांना वाटतात, हेही नक्की. वाक्या-वाक्यांतून वेगवेगळ्या विषयांची सैर हा माणूस घडवत आला आहे. त्याअर्थी तो बहुश्रृत आहे. अवघ्या चार-पाच भेटीत काही, माणसाचं व्यक्तिमत्त्व पुरतं कळत नसतं. पण या माणसानं त्याच्या बहुश्रृततेचं पुरेसं दर्शन अशा भेटी नसतानाही घडवलं आहे. या लेखनाचं, म्हटलं तर, हे समर्थन. तर्कदृष्ट्या. भावनिकदृष्ट्या ती या लेखनातील थोडी मूल्यवृद्धी. गुणात्मक नसेल, संख्यात्मक.
---
आपल्या रोजच्या जगण्याची क्षेत्रं कोणती, हा प्रश्न या माणसाला विचारण्यात अर्थ नाही. कारण त्यानं केलेल्या पेरणीतून आजवर जे उगवलेलं आहे त्यात ती क्षेत्रं दिसतात आणि त्यांची मोजणी करण्यात अर्थ नाही.
---
आमच्या भेटींची सुरवात झाली तेव्हा माझ्या लेखी हा गृहस्थ कवितेचा, आणि साहित्याचा, उत्तम आस्वादक आहे अशी प्रतिमा निर्माण झाली होती. एके ठिकाणी तो म्हणून गेला, की एक कविता समजून घेण्यात पन्नास वर्षं गेली. चौऱ्यांशी योनीच्या शापाचं त्यानं त्या एका अनुभवातून वरदान करून टाकलं. तो म्हणाला, "लाखो कविता बाकी आहेत. चौर्यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्यायला मी सिद्ध आहे." हे सांगतानाही एखाद्या समर्थ मुक्तछंदात नेमकं बसावं असं तो लिहून जातो. मृगजळात समाधी! हे असलं काही सुचण्यासाठी या माणसाला एकच कविता समजलेली पुरेशी असावी.
ही प्रतिमा मोडून पडायला कारण झालं. हा माणूस कविता करतोही हे मला माहिती नव्हतं. भेटलोच नव्हतो त्याला, तर कळणारही कसं म्हणा! मग त्याची अशीच एक कविता समोर आली. आपण कविता का लिहितो हे त्यानं अगदी साध्या शब्दांत मांडून टाकलं.
टाळून कधी वे़ळ कधी नुस्तंच आयुष्यानं सोडवून घेतलं स्वत:ला. आईनं अंगावरून सोडवावं बाळाला तसंच. आता वेळी अवेळी अनावर हुक्की आली तर... कविता लिहीतो.आयुष्यानं आपल्यापासून सुटका करून घेतली, तेही आईनं बाळाला अंगावरून सोडवावं तसं... अंगावरून काटा येतो. मग, या सुटकेनंतर जे शिल्लक राहिलं आहे आपल्यात ते हा कवितेतून मांडत जातो. त्याचीच एक कविता आहे.
ज्या वळणावर वळत गेलो व्यापत त्या वळणाला अंधार सरपटत आला. पूर्वेकडे धावत सुटलो.... तर ती आधीच, पश्चीमेला मिळालेली. पृथ्वी अशी गोल आहे आम्ही आता वाचण्याची आशा फोल आहे.नियतीनं, ज्यांचा नियतीवर विश्वास नसेल त्यांच्यासाठी जगण्यानं, केलेली 'आयुष्य' नावाची वळणावळणाची फसवणूक मांडताना त्याला अंधार भेटतो. मग तो माणसासारखा त्या जगण्यापासून धावतो उगवतीच्या दिशेला. ती आधीच मावळतीला मिळाली आहे, कारण पृथ्वी गोल आहे, हे त्याला उमजतं. तो ते आपल्यासमोर ठेवतो. पृथ्वीचा गोलाकार जगण्याच्यासंदर्भात असा फसवा असतो हे भूगोलात कळत नसतंच. त्यासाठी शिक्षणही कामाचं नाही. ते जीवनशिक्षणच असावं लागतं. पुरेपूर जीवनशिक्षण घेतलेला माणूसच हा, हे त्यावेळी पटलं. मग नंतर फक्त त्याची खातरजमा तो करून देत जातो... --- जीवनशिक्षण घेतलेल्या माणसाला व्यक्त होण्यासाठी एकच आकृतीबंध कामाचा नसतो. ते याही माणसाबाबत खरं आहे. तो सांगत जातो तितक्याच समर्थपणे, गद्यातूनही. प्रत्येकाचं एक लहानपण असतं. त्या लहानपणात दडलेल्या अनेक गोष्टी आपल्या भावविश्वात घर करून बसलेल्या असतात. पतंग ही त्यातलीच एक. लहानपणीचं हे पतंग उडवणं मोठेपणीही चुकत नसतं. फक्त मोठेपणीचे पतंग वेगळे असतात. त्याचा खेळ संपल्यानंतरचं जगणं वेगळं असतं. अशाच कुठल्याशा प्रसंगात त्याला काही 'जखमा' झाल्या आहेत. त्याआधी पतंग उडवणं झालं आहे. पतंग खरे होते, मांजा बहुदा चुकार असावा. तो म्हणतो, "संध्याकाळी स्टॉकमधला शेवटचा पतंग कटल्यानंतर हातात मांज्याचा गुंता आणि रिकामी फिरकी घेउन घरी जाताना खरचटलेले गुडखे जास्तच चुरचूरून दुखायला लागतात तसं काहीसं वाटत होतं. डोळ्यांच्या कडा जळजळायला लागतात; ताप आल्यासारखं वाटायला लागतं..." दिवसाचा खेळ संपला आहे. आयुष्य पुढं उभं आहेच. दिवसाचा खेळ संपल्यानंतर जे वाटू लागतं तीच लक्षणं असतात. पतंगाचीच उपमा वापरत तो पुढं सांगतो, "...पण हा खेळ नव्हता. उद्या परत नविन पतंग मिळणार नव्हता." जगण्यातल्या वास्तवाचं भान ते हेच. तो उभा राहतो याच वाक्यांतून. पुढं सांगत राहतो. --- या माणसाला पहिल्यांदा भेटलो ते असंच काही सुहृदांसमवेत. मूर्ती साधारण पावणेसहा फुटांची. डोक्यावर टक्कल. बुल्गानीन किंवा फ्रेंच कट म्हणावी अशी दाढी. त्या दिवशी संध्याकाळी सुमारे चारेक तास आमची मैफल रंगली होती. साहित्य, अर्थकारण, समाजकारण आणि सामाजिक क्षेत्र, राजकारण... सारेच विषय हास्यविनोदात गेलेली ती संध्याकाळ माझ्या लक्षात राहिली ती वेगळ्याच कारणानं. आमची ती पहिली भेट. त्यानं मला एक भेट दिली. 'इलस्ट्रेटेड विकली'चा एक अंक. खुशवंतसिंग संपादक होते तेव्हाचा. भारतातील जातीसमुदायाचं अगदी त्रोटक वर्णन करत, त्याची शक्तीस्थानं दाखवत काढलेला अंक. अंक पूर्णपणे त्याच विषयाला वाहिलेला. साधारण तीसेक वर्षं झाली असावीत त्याला. "तुमच्यासाठी हा अंक. जपून ठेवावासा..." हा काय प्रकार आहे हे मला तरी कळलं नाही त्यावेळी. मग नंतर एकेक गोष्ट उलगडत गेली. हा गृहस्थ अशा अनेक गोष्टींचा संग्राहक आहे. हे असले संग्रह त्यानं आयुष्य ओतून केले आहेत. मी तो अंक जपून ठेवला आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही. --- हे जे अनुभव तो सांगतो, ते जगण्याच्या कोणत्या क्षेत्रातील नाहीत? काही दाखले वेगळ्याच संवादातले देतो. अलीकडचीच गोष्ट आहे. मी त्याच्या ऑफिसातच माझ्या दोघा जिवलगांसह भेटलो. ऑफिसातून बाहेर पडलो. ज्या इमारतीसमोर उभा होतो, तिचं वर्णन सुरू झालं. त्या इमारतीचं कूळ. "हा बाहेरचा इटालियन मार्बल आहे. त्या काळात अशा मार्बलचा वापर केलेल्या इमारती इथं सगळीकडं आहेत. आता त्या मार्बलची रया गेली, कारण त्याची देखभाल झाली नाही..." गाडी इथं थांबत नाही. त्या परिसरातील इमारतींचं आर्किटेक्चर रोमन आहे की मोगल हे समोर येतं. मग अशा एखाद्या इमारतीमध्ये आतमध्ये पूर्ण साग कसा आहे याचं वर्णन येतं. असा सागच असल्यानं एक इमारत कित्येक वर्षांपूर्वी कशी जळून खाक झाली, तिचा बचाव कसा अशक्य झाला हे येतं. आपण ऐकत राहतो. "या चौकातून जाणाऱ्या चारही रस्त्यांवरच्या इमारती एकेका धंद्याच्या आहेत. एका रस्त्यावर तुम्हाला फक्त बँकांच्या मालकीच्या इमारती दिसतील, एका रस्त्यावर फक्त विमा कंपन्यांच्या..." इतिहास सुरू झालेला असतो तो शंभर वर्षांपूर्वी. पण तो काही केवळ इमारतींपुरताच मर्यादित असत नाही. त्यात राष्ट्रीयीकरण येतं. त्या काळी कशा छोट्यामोठ्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या, राष्ट्रीयीकरणानंतर मोठ्या कंपन्या पुढं कशा आल्या... देशाच्या अर्थकारणातील हा टप्पाही त्यानं जवळून पाहिलेला आहेच. पण त्याची मांडणी नेहमीच्या अभिनिवेषांव्यतिरिक्त अशी येत जाते. आपले कान आता मोठे झालेले असतात. सेट झालेल्या फलंदाजाला जसा चेंडू फुटबॉलसारखा दिसतो तसं आपल्याला बरंच काही साठवून घेता येऊ लागतं. चहा पिण्याची हुक्की सगळ्यांनाच असते. म्हणजे, आमचं हे बोलणं सुरू होण्याच्या आधीचीच ती हुक्की होती. त्यामुळं, हा सांगतोय तो प्रसंगही आधीचाच. मला अगम्य अशा शब्दांत तो चहाची ऑर्डर देतो (त्याला अशा पाच-सहा भाषा/परिभाषा येतात). राजीवडी चहा किंवा असा काही तरी शब्द असतो. चहा येतो. त्या चहाचं एक वर्णन होतं. चहा घेता-घेता एकदम आम्ही सामाजिक स्थित्यंतरात शिरतो. "ही सगळी मंडळी राजस्थानातून आलेली... डुंगरपूर वगैरे भागांतून आलेली. त्याचं कारण होतं. इथं या भागात कामाला येणारे कारकून म्हणजे ब्राह्मण. त्या काळात त्यांना पाणीही इतर कोणाकडून चालायचं नाही. मग हे राजस्थानातले भट आले. त्यांनी हे व्यवसाय इथं सुरू केले... आजही ते टिकून आहेत..." चहाचाच एक प्रकार सांगून हा गृहस्थ ते स्थित्यंतर मांडतो. त्या प्रकारच्या चहामधल्या दुधात अंड्याचा पांढरा भाग टाकलेला असतो. तो फक्त मुसलमानांचा चहा (पूर्वी होता, आता इतरांचाही असावा). सामाजिक स्थित्यंतराचा एक पैलू दिसतो. पण आपली भूक वाढलेली असते. तो ती शमवतोही. या मंडळींच्या हाती असलेल्या दुकानांचं एक वाटप असतं. समजा सहा भाऊ आहेत पुढच्या पिढीतले. मग त्यांच्यात वर्षाची वाटणी असते. प्रत्येकानं दोन महिने दुकानाचा कारभार पहायचा. मी विचारतो, बाकीचा काळ? इतर कामं! त्याचं शांत उत्तर येतं. वर्षाकाठी माणसंही एंगेज राहतात, त्यांची जीविका त्यांना मिळत राहते. दुकान कायम राहतं. मग, दुकानाचं हे स्थित्यंतर होतं तेव्हा तुटक्या कपाची आणि ग्लासाची मोजणीही होत असते, हे तो सांगून टाकतो. स्थित्यंतर. कहाणी इथंच थांबत नाही. मग इतर दोन-चार समाजघटकांची जडणघडण, त्यामागची स्थिती, त्याची सध्याची स्थिती हेही सांगून होतं. बोलता-बोलता त्या काळच्या ब्राह्मणांसाठीचं पाणी हा विषय येतो आणि आमचा मोर्चा विहिरींकडं वळतो. आम्ही होतो तिथंच एका विशिष्ट समुदायाची विहीर होती. तिचा इतिहास आमच्यासमोर उभा ठाकतो. अशा विहिरींच्या जगण्यातही एक स्थित्यंतर आलेलं असतं. कित्येक विहिरी आता बुजवल्या गेल्या आहेत. कित्येक खुल्या आहेत, पण देखभालीअभावी एकेकाळी गोड पाणी देणाऱ्या या विहिरी आता फक्त अशा इतिहासाची उजळणी करण्याच्या प्रसंगासाठी राहिलेल्या आहेत... इतिहास चालता-बोलता असतो म्हणजे काय, याचा अनुभव आम्हाला मिळण्याची ती वेळ होती. कारण आम्ही चालतच होतो. --- त्याच्या एका शेराचा उल्लेख करावा लागेल.
येणार आज म्हणूनी, डंका पिटून गेले ते मेघ पावसाळी चोरून अंग गेलेहा शेर ज्यांच्याकडून आपलं काही घेणं आहे अशांविषयी आहे अशी कल्पना फक्त करायची. मग, त्याचाच आणखी एक शेर आपल्याला भेटतो,
कमळात सावल्यांच्या अडकून भृंग झाले कित्येक रामदासी कुळवंत रंक झालेहा शेर शेअरबाजाराला लागू करायचा. बहुदा एक कथा उलगडलेली असते आपल्यासमोर. या माणसाच्या जगण्याचं हे क्षेत्र आहे, असं वाटत असेल तर त्याच्यातला एक पैलू वेगळा दाखवावा लागेल. "कविलोक काहीही म्हणोत, आजही आषाढाच्या काळ्या कुट्ट ढगावर विज लखखली की मला आकाशाच्या गरम परातीवर कल्हईची रेघ ओढल्यासारखं वाटतं" असं म्हणत हा गृहस्थ कल्हईची प्रोसेस आपल्या घरासमोर कशी चालायची हे सांगतो तेव्हा त्याला, खरं तर, कल्हईविषयी काही सांगायचं नसतं. तो तेव्हा धातू या तद्दन मटेरियलिस्ट प्रांतात शिरलेला असतो. हा एक पैलू संपतो ना संपतो तोच तो "मोत्याच्या माथ्यावर फुटका भाग असला तर फाट. मोती चिरल्यासारखी आडवी रेघ दिसली तर ती नर. खोलगटपणा असला तर करवा आणि वेगळ्या रंगाचे ठिपके दिसले तर छाटे. पण आता परीस्थिती अशी आहे की खरे मोती मिळतच नाहीत त्यामुळे या गुणदोषाची यादी फारशी उपयोगाची नाही" असं सांगतो. पुन्हा हे नुसतं सांगणं नसतं, त्याला एक अलंकार चढवताना हा थेट माऊलीला समोर आणतो, "सुढाळ ढाळाचें मोती। अष्टै अंगे लवे ज्योती।। जया होय प्राप्ती। तो चि लाभे।।" ज्ञानेश्वरांपाशी तो थांबणार नाही. तो पुढे तुकोबांचा दाखला देतो. "रत्नांची कुंदले मोतीयाचा तुरा। शिरपेच बरा कलगीवरी।। पाचरत्न मोती माणिक हिरक। अर्पिले सुरेख हार यांचे।। कंठी, भुजबंद,पोंची, कमरबंद। मुद्रिका स्वच्छंद नानापरी।। तुका म्हणे माझ्या इच्छेच्या कारणे । ऐशीम भूषणे ल्याला देव।।" आपण पुढं बोलण्याऐवजी श्रोत्याच्याच भूमिकेत राहणं पसंत करतो. झाकली मूठ, असं मी माझं समाधान करून घेतो. --- सारं काही गंभीरच का? नाही. या ओळी पहा,
झिम्म्ड फुगडी मिठी रांगडी कुठे सांडली बुगडी गं दहीवर आले उंबरठ्याशी रात्र तोकडी पडली गंश्रृंगाररसही आपण हाताळू शकतो हे तो सहजी एखाद्या अशा रचनेतून सांगून जातो. आपण ते सारं शोषण्याचा प्रयत्न करत राहतो. --- परवा या माणसाशी बोलत होतो. सहज विचारलं, "हे तुम्ही केव्हा करता?" माझा सूर, 'कुठून येतं हे सारं'चा होता. त्याचं उत्तर होतं, "येत जातं." "हो. पण कसा करता हा संग्रह?" काही उत्तर मिळालं नाही. मिळालं ते एक निर्व्याज हास्य. त्यात दडलेलं उत्तर होतं बहुदा, 'जगणं शिकवतं हे सगळं... टिपावं लागतं आपलं आपल्यालाच.' मी त्यावर समाधान मानून गप्प झालो, त्या वेळेपुरता. माझा प्रश्न मला कायम छळत राहणार हे मात्र नक्की. कारण हा माणूस म्हणजे मानगुटीवर बसलेलं भूत आहे, एक विलक्षण असं. अलीकडचंच त्याचं एक वाक्य आहे. जुन्या आठवणी जागवतानाचं. "आता हा फोटो माझ्या खाजगी नरकाचा एंट्रीपास"! एक क्षण नाडी थांबू शकते, त्याचा हा लेख नीट वाचला तर... --- इथंच थांबतो. हे लेखन तोकडं वाटतं का? वाटणारच. त्याचं कारणही पुन्हा हाच माणूस! रामदास. द्वारकानाथ बिवलकर!!!
Book traversal links for बंदा आणि खुर्दा - 2 : समर्थ!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दुवा
परत परत वाचण्यासाऱखे...
रामदासकाका आणि श्रामो, केवळ सलाम!
अजून लेख नीट वाचला नाहीये.
+१
+१
धन्यवाद श्रामो.
क्या बात है!!
नीट वाचायला हवंय परत. बाय द
__/\__
अतिशय देखणा लेख
मस्त लेखन. ज्या इमारतीसमोर
सायासावीण ब्रह्म सनातन...
+ १
लेख वाचायला सुरुवात
सुंदर झालंय, खुप खुप आवडलं.
काय बोलू वाचताना एकदम गुंग
साष्टांग!!!
++
+१
ग्रेटच
अरे काय मिपाकरांचा जीव घ्याल
सुंदर लिखाण
रामदासकाका आणि श्रामो
हेच आणी हेच लिहायला आलो होतो.
असेच __/\__
जिंदगी चवीचवीने आस्वाद घेवून
जिंदगी , जिंदादिली का नाम है !
माजी म-हाटी ची भाशात्याच्या
वाह.......
अप्रतिम
श्रामोंच्या लेखणीला नि
एका समर्थ माणसाचं सुंदर वर्णन
_/\_
+१
मस्त!
+१
धन्यवाद
आपण टिपकागद झालं पाहिजे. क्या
विशेष
लेख सुंदर आणी ही
हे सगळं वाचून सौ. रामदास या
सौ. रामदास
+१
+१
मस्त लिखाण
सुरेख
सार्थक झालं
_/\_
आयुष्याशी झट्या घेणे