Skip to main content

ते दिवस सुंदर होते ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 31/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात कधीतरी छान दिवस येतात . खूप मनासारख्या घटणा घडत राहतात. कुणाचेतरी आशीर्वाद आपल्यामागे असतात . आणि हे खूप खरे असते. मला अचानकपणे छान नोकरी मिळाली.मिळेल की नाही असे वाटत असताना मिळाली.कुणाचा वशिला नव्हता. डोक्यावर कुणाचा हात नव्हता. तशी ह्या महानगरात कुणाची तशी ओळख नव्हती.गावाच्या मुलाची जशी परिस्थिती तशी माझी होती पण वरच्याचा हात होता. त्याने बोट पकडले होते. आणि मी त्याच्या आधाराने वाट तुडवीत होतो. . मुंबईत छोटासां फ्ल्याट होता काकाचा. ते निवृत्त झाले होते.नि. जरा निवांत जगावे म्हणून ते गावी आले होते. निसर्गात ते मनापासून रमत होते.गावाकडची थंड हवा त्याना हवी होती. मुंबईची हवा त्याना मानवत नव्हती . तशात त्याना पोर-बाळ पण नव्हते त्यांचा मुंबईत छोटासां फ्ल्याट होता. टू रूम किचनचा. आणि काका मला त्या घरात रहा म्हणाले . त्या फ्ल्याटमध्ये मी रहात होतो अधून मधून आई गावी जाऊन होती. मी अगदी मस्त जीवन जगत होतो.मला सगळे काही येत होते उत्तम जेवण बनवायचो. पोळ्या तशा छान जमत नव्हत्या. पण व्यवस्थित तेल मीठ टाकून पोळ्या करीत होतो. डाळ जरा झणझणीत . सोबत मिरची,मुळा ,फरसाण असा मस्त बेत असे.सोबत तयार पापड लिज्जत .. !! फ्रेश. मस्त खायचे प्यायचे .कामावर जायचे.नि मनसोक्त जगायचे. हाच माझा दिनक्रम होता. मुंबईत नुकतीच मी पाव भाजी खाल्ली होती. नि पाव भाजीच्या प्रेमात पडलो होतो व्हि.टी ला क्याननची मस्त पावभाजी तीन रुपयात मिळत होती. ती बर्याच वेळा चापित होतो . मुंबईचे दिवस मस्त जात होते. व्ही.टी.ला छान वाचनालय होते. वीस रुपये अनामत रक्कम भरून दोन पुस्तक वाचावयास फुकट मिळत होती. लायब्ररीचे नाव होते – द पीपल्स फ्री रीडिंग रूम अँड लायब्ररी .लायब्ररी खूप मस्त होती.ग्रंथपाल कोणी पारशी बाबा होते झकास माणूस. वाचकांवर खूप विश्वास ठेवून असलेले . कधी कधी दोन काय पण तीन पुस्तकेपण द्यायचे .पुस्तके भरपूर होती. इंग्रजी ,मराठी ,हिंदी. कोणतेही पुस्तके घ्या. ग्रंथपाल अगदी लगेच द्यायचे . मध्येच एखादी छान कथा वाचावयास मिळे.रेड पीस ऑफ क्यालीको. ही छान कथा वाचावयास मिळाली. साधी सोपी.परंतु निराळी अशी कथा. मोरावियाचे फिटीश कथा संग्रह वाचावयास मिळाले मोराविया कोण काही कल्पना नव्हती.पुस्तक वाचले.मला तर प्रचंड आवडून गेले. मराठीतील अनुवादित -ते झुंजार प्रवासी, जीवन त्यान कळले हो ,रान नि ईतर बरीच अशी न बघितलेली पुस्तके व कधी हाताशी न लागतील अशी पुस्तके वाचावयास मिळाली. कपाट उघडा नि पुस्तके चाळीत बसा. वेळ पण छान निघून जात असे . एखादे छान पुस्तक मिळाले की तो दिवस अगदी आपला आपला होऊन जात होता . पुस्तके वाचणे , सिनेमा बघणे, चित्र प्रदर्शन बघणे. चित्रातले काही कळत नव्हते परंतु जहांगीर आर्ट ग्यालरीत गेले की उगाचच मन श्रीमंत होऊन जात असे. हे अगदी खरे आहे. कोणी नवीन नवीन चित्रकार असत.कधीतरी ते बसलेले असत.कधीतरी त्यांच्याशी बोलणे होत असे. तेव्हा खूप बरे वाटून जाई . बी.प्रभाची टीव्हीवर मुलाखात बघितली होती.फार आवडली होती.त्यांनी काढलेल्या कोळीणीची पेंटिंग अप्रतिम वाटली होती . नि ती भरपूर गाजली होती . वडाच्या झाडे बघत बसावी अशी काढली होती.प्रचंड मोठे खोड नि अतिशय बारीक फांद्या . वा ...अप्रतिमच ...!! चित्रकाराने काढलेली चित्रे म्हणजे जशी आहेत तशी नाही काढायची. त्याना भासतात तशी .. ती मन भारून टाकीत.. सिनेमा बघणे हाही एक छान छंद होता.आणि छान छान चित्रपट बघणे हे माझे प्याशन होते. उत्तम दिग्दर्शक.उत्तम फोटोग्राफर ,उत्तम कलाकार .वासू भट्टाचार्याचे सिनेमे बघणे. वासू चटर्जी नव्यानेच आवडून गेले होते.गुलझारच्या आंधीने खूप मोहित केले होते. अमोलचा घरोंदा आवडून गेला होता. श्याम बेनेगलचा मंथन ,आक्रोश ,अंकुर खूप छान वाटत होते. ब्रूस लीचा एंटर द द्र्यागन सिनेमाने अंगात एक विलक्षण ताकद भरली होती. सिनेमा बघून आल्यावरती रस्त्याने चालताना अंगात विलक्षण तरतरी येत होती.निदान तशी भावना होत होती. दिवस स्वप्नाचे होते. नोकरी चालू होती. आयुष्य स्वप्नासारखे वाटत होते. थोडाफार व्यायाम , थोडीशी योगासने सकाळी सकाळी फिरणे. ह्या फिरण्याचा असा फायदा होत होता की आपले विचार सतत होकारात्मक होतात एवढे नक्की. घरापासून ऑफिस तसे अर्ध्यातासावर लोकलला गर्दी बर्यापैकी असली तरी छान घुसावयास मिळे. रविवारी बर्याच वेळा खिडकीजवळ बसून प्रवास केलाय. छान पुस्तक ,कधी मासिक वाचीत प्रवास करताना प्रवास कधी संपलाय हे कळत देखील नव्हते. दिवस जात होते.ते थांबतात कोठे...? कधी कधी मीपण गावी जात होतो. आजकाल आई आणि मी दोघेच मुंबईला राहत होतो .कधीतरी बहिणी येत होत्यां. तेवढाच आईला विरंगुळा .... आता आईला माझ्या लग्नाचे वेध लागले होते लग्नाचा आता माझा नंबर होता. घरातील दोघा बहिणींची लग्ने झाली होती . मनासारखी मुलगी मिळणे .एकमेकाची पसंती असणे .हा खरोखरच नशिबाचा भाग असतो फारशा मुली नाही बघितल्या.एक दोन मुली बघितल्या.काही कारणाने नाही जमले. काकापण मुली बघत होतेच.त्यांना फारशी दगदग झेपत नव्हती. काका नि माझ्या वयात खूप अंतर होते.काका मला पित्यासमान.मामा माझ्यापेक्षा थोडाच मोठा .फार अंतर नाही. मित्रासारखा.शेवटी मामाने पुढाकार घेतला. मुलगी बघितली.त्याला पसंत पडली होती.त्यानेही माझ्याबद्दल माहिती दिली होती नाशिकची. मामाच्या चांगल्या परिचयातली. मामाच्या घरापासून जवळ राहणारी. मामाची नि मुलीच्या वडिलांची छान ओळख होती. येत्या रविवारी येणार होती. मला बघायला... दाखवायला ...! रविवार . सकाळी उठलो. नाही म्हटले तरी थोडीशी नव्हे बरीचशी उस्तुकता होती .वेळ जात नव्हता.मनात धांदल उडाली होतीच. सकाळचे दहा वाजून गेले होते.येतात की नाही कुणास ठाऊक. ..? मी पायात चप्पल सरकवली. आईला म्हणालो -जरा वाचनालयात जाऊन येतो. आई काय बोलणार. ..? मी बाहेर पडलो. तेव्हा आमचा मुक्काम घाटकोपरला होता. वाचनालय घाटकोपर [पश्चिम] ला . मी रस्त्याच्या छोट्या गल्लीच्या वळणावर आलो. एक म्हातारेसे गृहस्त.काळी टोपी घातलेले. काळा कोट .धोतर सोबत एक वयस्कर बाई. अम्बाड्यावर वेणी माळलेली नि सोबत एक जाडसर मुलगी.अगदी गोरी.एकंदर नाशिककडची वाटावी अशी मंडळी वाटली.कारण घाटकोपरला अशा सकाळी सकाळी मराठी परिवार कोण असणार..? मला मुलगी पसंत नव्हती. एकदम जाड .!. अर्थात हे मी काहीसे दुरून बघितले होते.प्रथम मनावर जो परिणाम झाला .तो छान नव्हता झाला . कुणास ठाऊक कोठली मुलगी होती...? मन तर नाराज झाले होते. मी तसाच वाचनालयात गेलो. बराच रेंगाळलो. घराकडे निघालो.मन विलक्षण हुरहुरत होते . बेल दाबली. बहिणीनेच दरवाजा उघडला. मग मिस्कील हसून हलकेच म्हणाली -मुलगी आली आहे. ...!!! माझ्या शरीरातून एक थंड सणक तळपायापासून मस्तका पर्यत गेली. मला मुलगी पसंत नव्हतीच. म्हणजे मघाशी बघितली जर ती असेल तर [???].पण तीच मुलगी असावी असे पक्के वाटून गेले. मी मधल्या खोलीत जाताना माझी सहज हॉलकडे नजर गेली. आणि नशीब मला दिसलेली मुलगी ती नव्हती. बसलेली मुलगी छान होती गोरी नव्हती काळी नव्हती मधला असा रंग होता असा रंग असा रंग डंख मागून पसार झाला . मग मघाशी दिसलेली ती मुलगी कोण ...? वो कौन थी ...? कोण कुणास ठाऊक...? पण ती मुलगी ही मुलगी नव्हती. मुलीचे वडील नुकतेच निवृत्त झाले होते. मला मुलगी पसंत होती.एका क्षणात माझा निर्णय झाला होता. तेव्हा नुकताच टेप रेकोर्डर घेतला होता. गप्पा मारता मारता श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा. हे अप्रतिम गाणे लावले.नि सगळा माहोलच श्रावण होऊन गेला. आईने छान पोहे केले होते. मग बर्याच गप्पा झाल्या. माहिती विचारणे झाली. ती मंडळी निघाली. वडील म्हणाले -तुमचा काय तो निर्णय कळवा ..? आई माझ्याकडे बघून हसून हो म्हणाली. माझा निर्णय झाला होता.मन आनंदाने भरून गेले होते. आनंदाच्या संवेदना घरात पसरल्या होत्या. आईला त्या जाणवल्या होत्या. आईला पण मुलगी पसंत होती. चला आमची पसंती होती. पण मुलीची पसंतीपण महत्वाची वाटत होती. एवढ्या दूरवर म्हणजे मुलीला मुंबईस द्यावी की नाही असाही पालक विचार करणारी होतीच. मनात नाही नाही त्या शंका येत होत्याच . मन गोतें खात होते . मी सर्व नशिबावर सोडले होते. मी तर वाट बघत होतो. ..बघूया काय होते ते ...?? [परत कधीतरी ]
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2686
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आता तुम्हीपण घडून गेलेल्या गोष्टी सांगताना आमची उत्सुकता ताणून धरता आणि वर लेखाच्या शेवटी [परत कधीतरी ] असं लिहिता, ये कुछ अच्छी बात नही हैं। पुलेप्र

छान लिहिलंय .... हि कोणत्या सालातली गोष्ट आहे ? पूर्वीची लोक चित्रपट/ सिनेमा जास्त पाहायचे नाही ?? अगदी झाडून सगळेच .... (माझ्या बाबांवरून सांगतेय..) (तेव्हा सिनेमाच्या तिकिटाचा काय रेट होता ?)

मालक, जसं आठौतं तसं लिहिता का? एकसलग लिहित र्‍हावा.... वाचनिय आहे पण लैच विस्कळित वाटतंय...

आवडल्या. किंचितशी वामनसुतांची आठवण झाली. गोरी नव्हती काळी नव्हती मधला असा रंग होता असा रंग असा रंग डंख मागून पसार झाला .... क्या बात है!! :-)

छान!! पण का कोण जाणे शेवट कळून गेला असे वाटले! पुढील भागासाठी शुभेच्छा !!