उफ्फ... ये गालिब!
प्रस्तावना:
मिर्जा गालिब!!
एक उत्तुंग व्यक्तिमत्व, एक न सुटलेले कोडे, एक रम्य गुढ.!!
(चित्र जालावरुन साभार)
बाजी चा-ए-अतफाल है दुनिया मेरे आगे | होता है शब-ओ-रोज तमाशा मेरे आगे || मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पीछे | तू देख के क्या रंग है तेरा मेरे आगे ||अशा या वेड्या शायरच्या अनेक गझला आणि रचना अनेकांनी वाचल्या, संकलीत केल्या. काही जाणकारांनी त्या रचनांचे, गझलांचे अनेक अर्थ मांडले. ज्याला जसा गालिब समजला तसा त्याने मांडला, पण विशेष म्हणजे प्रत्येकाला तो वेगवेगळा भासला. माननीय गुलजारसाहेबांनी तर या वेड्या कवीचा जीवनपटच मांडला, एका मालिकेच्या रुपात. गालिबचा प्रत्येक शेर पार काळजालाच भिडतो. त्याच्या लेखणीत कमालीची जादू आहे. "हाल-ए-दिल" सांगण्याची त्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. छोट्या छोट्या द्विपदींतुन बरचं काही सांगून जातो तो. आता हेच बघा
बेखुदी बेसबब नही 'गालिब' कूछ तो है जिस कि परदादारी हैपरदादारी म्हणजे लपवाछपवी. स्वःताच्याच मनाला सांगतोय, हि बेखुदी विनाकारण नाहीये, काहीतरी लपवाछपवी आहे. म्हणजे तो स्वःताच स्वःतापासून काहीतरी लपवतोय आणि स्वःतालाच असे करतांना "रंगे हाथ" पकडतोय. जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वःतापासूनच लपवत असतो तेव्हा ती गोष्ट एकतर आपल्या जीवाच्या फार जवळ असते किंवा आपण त्यापासून कितीही लांब जात असलो तरीही ते आपल्याला अजिबात जमलेले नसते! किंवा
नादाँ हो जो कहते हो कि क्यो जिते हो 'गालिब' क़िस्मत में है मरने कि तमन्ना कोई दिन औरजगण्यातला फोलपणा कळूनही जगणे अनिवार्य असते. कारणे काहीही असली तरी (आणि अगदी व्यवहार्य नसली तरी) त्या क्षणी त्याला जीवनापेक्षा मृत्यु जास्त जवळचा वाटतो आहे. पण त्याला जगावेच लागेल हे ही समजते आहे. त्यातून मग हे असे विषण्ण करणारे शेर येतात. आणि गालिबच्या वैयक्तिक आयुष्यात असे अनेक क्षण आहेत. त्याला झालेल्या सात मुलांपैकी एकही वाचलेला नाही. त्याच्या सख्ख्या लहान भावाला फार तरुण वयात वेड लागले होते. त्या भावाची आणि त्याच्या मुलांची जबाबदारी गालिबवरच होती. असो. आर्तता हि तर गालिबच्या शायरीची जान. त्याचे कित्येक शेर हे अक्षरशः काळीज पिळवटून टाकतात. उदाहरणच द्यायचे झाले तरः
थी वो एक शख्स के तस्सव्वुर से अब वो रानाँ-ए-खयाल कहाँतस्सव्वुर म्हणजे कल्पनेतील जग, आणि रानाँ-ए-खयाल म्हणजे एखाद्याबद्दलच्या प्रेमाने दाटलेले उद्गार किंवा विचार, आता परत एकदा वाचून पहा त्या ओळी. काय भन्नाट विचार आहे हा. कोण्या एका व्यक्तिच्या अस्तित्वाच्या नुसत्या कल्पनेमुळे जे विचार किंवा ओळी शायरीत उमटत होत्या त्या आता नाही उमटत, हे सांगण्याची पद्धत काय कमाल आहे. तर अशा या उत्तुंग प्रतिभेच्या भन्नाट गझला आणि शायरीने मला पुरते पछाडले. जसा अनेकांसाठी गालिब हा एक प्रेरणास्त्रोत होता/आहे तसाच माझ्यासाठीही. जस-जसा उर्दु लहेजा आणि त्या भाषेचा गोडवा समजायला लागला तस-तसा गालिब अजुन निट लक्षात यायला लागला. मग गालिबचे व्यसनच लागले. मला खुप काही समजायला लागले आहे असा मूर्ख समज माझा अजुन झालेला नाही, हे माझे नशीब! पण त्यातूनच ही कल्पना जन्माला आली. अर्थात ही काही अगदी अभिनव कल्पना आहे असा माझा दावा मुळीच नाही. ह्या प्रकारचे लेखन या आधी कुणीतरी केले असण्याची शक्यता नाकारता येतच नाही. पण तरीही माझ्या किडूक-मिडूक प्रतिभेला झेपेल तसा गालिबच्या काही शेरांची ही अनुभुती मराठीतून व्यक्त करण्याचा हा एक वेडा प्रयत्न. गालिबसमोर तो अगदीच तोकडा वाटण्याचीच शक्यता जास्त आहे, पण.. प्रयत्न करतो कि, काय हरकत आहे? मला ना अनुवाद करायचा आहे, ना भावानुवाद, ही गालिबच्या रचनांची मला झालेली अनुभुती आहे. एखादा शेर नजरेसमोर घेऊन तो शेर अस्तिवात का आला असेल, अशी काय परीस्थिती उद्भवली की तो शेर गालिबच्या अत्यंत संवेदनशील हृदयातून उमटला असेल, असा काहीतरी विचार करुन तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा करण्याचा हा प्रयास आहे. अर्थात याला गालिबच्या जीवनातील प्रसंगांची पार्श्वभूमी असेलच, असे काही नाही. फक्त मी तो शेर प्रातिनिधीक स्वरुपात वापरलेला आहे. नमनालाच १०-१२ घडे संपविल्यावर कां होईना पण, करुया सुरवात? "उफ्फ... ये गालिब!" या मालिकेतील हि पहिली रचना: १. एकही संध्याकाळ मोकळी जात नाही आजकाल स्मरणांचे वादळ घोंगावते एक एक आठवण आदळते शिड तुटलेल्या होडीवर इतःस्तत पसरतात तुकडे गोळा करता करता रात्र सरुन जाते . फक्त प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! उत्तर ना माझ्याकडे ना तिच्याकडे... . तिकडे टेबलावर एकटाच पहुडलेला टेपरेकॉरडर आपले आपल्यासाठीच वाजत राहतो त्याच्याकडे लक्ष गेले तर ऐकू येते . जब की तुझ बिन नही कोई मौजुद फिर ये हंगामा ऐ खुदा क्या है? . उफ्फ... ये गालिब! (क्रमश:)
Book traversal links for उफ्फ... ये गालिब!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुभानल्लाह्!
व्वा...... बरेच दिवसांपासूनची
अप्रतिम कल्पना! आता पुढे काय
उफ्फ... ये गालिब
वा!
अरे वा छानच. पुढचे भाग पटापटा
खास रे मिका..
कविता फारच आवडली.
जबरा... एकदम आवडत्या विषयावर
मस्त्,मस्त्,मस्त
मस्त रे...! गालिब एक जादुच
मिका रॉक्स झकास रे... पुढेचे
खरचं अप्रतिम....खूपच
मस्त रे
मिका
सुभान अल्लाह ! पुढील लेखाची
कठीण ! महा कठीण !!
छानच! परवा हरीहरनची एक गझल
मस्तच लिहिलंय. आवडता विषय
वा वा!! छान!! वाचत
वा वा !!!
बहोत खुब
?? स्वःता / निट / इतःस्तत ??
सायबा
फारच छान. ही लिंक