✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घृतं पिबेत

र
रामदास यांनी
Fri, 01/20/2012 - 10:51  ·  लेख
लेख
असेही दिवस होते की सांजवात तिळाच्या तेलात भिजायची तर निरांजनातल्या फुलवाती साजुक तूपात भिजायच्या. अंबाडीच्या भाजीवरची लसणाची फोडणी तेलात व्हायची तर कढीला चुर्रकार फोडणी तूपातली मिळायची. जवसाच्या किंवा कारळ्याच्या थोड्याशा कोरड्या चटणीला तेलाची जोड असायची तर लसणीच्या तांबड्या लाल तिखटासोबत तेल बरे की रवाळ तूप हा सांप्रदायीक वाद होता. देव्हार्‍यातला बाळकृष्ण पण लोणी साखरेच्या वाटीवर नजर ठेवूनच आंघोळीला तयार व्हायचा.सोळा सोमवारच्या व्रतानी भोळा शंभो प्रसीद प्रसीद व्हायचा तो लोणकढ्या तुपातल्या चुरम्याच्या लाडवामुळे आणि सत्यनारायणाच्या शिरा दुसर्‍या दिवशी खाल्ला की परब्रह्म जरा जास्तच चांगले प्रकट व्हायचे.बेंबीला चिमटा काढून वर्षभरात अंगारकीचा एखादाच उपास दिवसभर व्हायचा तो संध्याकाळी वाफाळत्या मोदकावर साजुक रवाळ तुपाचा घसघशीत हप्ता मिळावा या आशेवरच. इडलीसोबत पुडीची चटणी तिळाच्या तेलात पावन होऊन यायची आणि उडदाच्या पापडाची लाटी अंगभर तेलात माखून "गिळा आता" म्हणायची. सांगायचं होतं ते असं की ही तेलं तूपं म्हणजे कुकींग मिडीयम नव्हती तर पाककृतीचे अ‍ॅक्टीव्ह कांपोनंट असं त्यांचं स्वयंभू अस्तित्व होतं.त्यांच्या स्वादाचा आपापला महीमा होता. अन्न पूर्णब्रह्म होतेच पण त्यानी कसे प्रकट व्हावे त्याचे काही अलिखीत संकेत होतेच. घरी वापरायचं तूप घरीच कढवलं जायचं आणि तेल आणायला शनीवार वगळता तेलाच्या घाण्या होत्या. लग्न कार्य वगैरे वगळता रोजचं तूप घरीच कढवलं जायचं. लोणी कढवायला घेतलं की वासाची पहीली नोट नको नकोशी आंबुस असायची मात्र सेकंड नोट खमंग तुपाची . तो खमंग दरवळ संध्याकाळपर्यंत घरभर फिरत असायचा. खमंग रवाळ तूप. त्याचे शेवटचे चार थेंब वसूल करण्यासाठी भिंतीला कलतं करून ठेवलेलं पातेलं हातात आलं की बचकभर साखर घालून दत्त दत्त । दत्ताची गाय । गायीचं दूध ।दुधाची साय म्हणत म्हणत बेरी खरवडून पोटात ढकलेपर्यंत चैन पडायची नाही. पोल्सनचा मस्का आणि पाव "नस्ती थेरं" या सदरात मोडायची. पण एकाएकी सगळ्या व्यवस्थेचे सांधे बदलले. माणसं वाढली -भुकेची पोटं वाढली आणि अन्न कमी पडायला लागले. आता निवृत्तीच्या वयात असणार्‍या बर्‍याच जणांच्या बालपणीचे हे चित्र आहे.नंतर वेगाने समाजव्यवस्था एकेका दशकात सांधे बदलत गेली .चिंता -क्लेश-दु:ख -दरीद्र देशांतराला गेलीच नाहीत पण माणसं मात्र जगायला घराच्या बाहेर पडली. अस्तित्व तगवून धरण्याची एक न संपणारी लढाई सुरु झाली. कमाई आणि खर्चाची दोन टोकं जुळवता जुळवता घरातली कर्ती माणसं टेकीला आली . स्वस्त साधन स्त्रोताचे शोध सुरु झाले. माल्थस नावाचा एक शहाणा माणूस कधीतरी म्हणाला होता की भूमीतीय गुणोत्तराने वाढणार्‍या प्रजोत्पादनाला अंकगणितीय श्रेणीनी वाढणारे अन्न पुरेसे पडणार नाही. त्यानी कदाचीत अर्थशास्त्राचा विचार केल असेल पण प्राण्यांच्या जिवंत राहण्याच्या दुर्दम्य नैसर्गीक इच्छाशक्तीचा विचार केला नसावा. आठवड्यातले तेलातुपाचे दिवस कमी झाले . डालडा म्हटल्यावर नाक मुरडणारी माणसं रांगेत उभं राहून डालडा आणायला लागली. तसं आपल्याकडे डालडा काही नविन नव्हतं पण त्याला सैपाकघरात मान्यता नव्हती पण नंतर हळूहळू तेल किंवा तूप म्हणजे वनस्पती तूप मिळणे हेच परमोच्च भाग्याचे लक्षण आहे हे कळल्यावर असल्या शंका मनात येणेच बंद झाले . सैपाकघरात एकदा डालडा आला आणि नंतर कायमचा तेथेच राहीला. याचे श्रेय जाते हिंदुस्थान लिव्हरच्या चिवट मार्केटींगला. सुरुवातीला हातगाडीवर स्टोव्ह आणि कढईचा संसार मांडून एक माणूस डालडात पुर्‍या तळून दाखवायचा आणि जमलेल्या गर्दीला आग्रहानी खायला घालायचा.कै.सुधीर फडक्यांच्या आत्मकथनात याचा उल्लेख वाचलासा वाटतो आहे त्यानंतर डालडात बनवायच्या पाककृतींचं पुस्तकं पण आलं . डालडा म्हणजे काय तर हायड्रोजीनेटेड तेल. तेलापासून बनवलेलं तूप .म्हणून वनस्पती तूप. दिसायला साजुक तूपासारखं . रंगानी आकर्षक आणि चवीनी एकदम बुद्दू. साधारण तेलाच्या रेणू शृंखलेतल्या रिकाम्या शिटा हायड्रोजनच्या रेणूंनी भरून काढल्या की झालं वनस्पती तूप तयार. पॅलॅडीयम नावाच्या एका धातूच्या मदतीने हे स्थित्यंतर सहज शक्य होते कारण आकारमानाच्या नऊशे पट हायड्रोजनचे रेणू वाहून नेण्याची क्षमता या धातूत आहे. हायड्रोजीनेशन केल्यावर तेलाचं जे काही होतं त्याला म्हणायचं वनस्पती तूप . त्यात थोडासा बदल करून -जीवनसत्वाची भर घालून हिंदुस्थान वनस्पती मॅन्युफॅक्चरींग कंपनीने पहील्यांदा डालडा भारतात आणलं. नंतर या कंपनीचं नाव हिंदुस्थान लिव्हर झालं. डालडा ह्या नावाचा मात्र एक वेगळाच किस्सा आहे. सुरुवातीला हे वनस्पती तूप भारतात आयात केलं जायचं डाडा अँड कंपनी मार्फत . लिव्हरला मात्र स्वतःचा मालकी हक्क दाखवायचा होता मग त्यात तडजोड म्हणून एल जोडून डालडा नाव तयार झालं. युनीलिव्हरचा इतिहास मात्र थोडी वेगळी कथा सांगतो . हार्टॉग्ज या कंपनीने १९२६ साली डालडा ह्या नावाची मक्तेदारी घेतली. युनीलिव्हरचा साम्राज्यवाद मोठा की भारतीय प्रजेची भूक (आणि नड )मोठी हे कळायला मार्ग नाही पण डालडा अस्तित्वात आल्यापासून पाच वर्षाच्या आत शिवडीच्या फॅक्टरीत डालडा बनायला सुरुवात झाली. १९३७ साली प्रकाश टंडन नावाच्या एका भारतीयाला बोर्डावर घेऊन लिव्हरनी आपले हेतू स्पष्ट केले आणि त्यानंतर हिंदुस्थान लिव्हरच्या अश्वमेधाचा घोडा अडवायला कुणीच धजावलं नाही. १९६५ -१९७१ ची दोन युध्दं झाली -सत्तर एकाहत्तर बहात्तरचा ची वर्षे लागोपाठ अवर्षणाची गेली आणि डालडा पण काळ्या बाजारात गेलं . लोकसभेत डालडाच्या वाढत्या भावावर आणि दुर्भीक्षावर अनेक चर्चा झडल्या आणि डालडा रेशन कार्डावर मिळायला लागलं. राहणीमान बेचव झालं पण तगून राहण्याची गरज त्यापेक्षा मोठी होती . दादर स्टेशनला उतरल्यावर सामंतांच्या दुकानातल्या काचबंद पेटीतल्या लोण्याच्या प्रचंड आकारमानाच्या गोळ्याकडे बघून सुस्कारा सोडून लोकं पुढे निघून जाताना मी बघीतली आहेत. खानदेश -कोईंबत्तूर -बेळगाव ही लोण्याची घराणी आजही कसाबसा जीव तगवून उभी आहेत. डालडाच्या स्पर्धेत अनेक नविन ब्रँड आले आहेत .पत्र्याच्या डब्यातलं डालडा प्लॅस्टीकच्या पिशवीत मिळायला लागलं. नव्वदीच्या नंतर हेल्थ काँशस पिढी मिळवती झाली आणि नव्या मध्यमवर्गीय कुटुंबात डालडाची गरज संपली. कधी न ऐकलेल्या तेलबियांचं तेल घरात आलं . डालडानी पण डालडा अ‍ॅक्टीव्ह या नावाखाली पुन्हा एकदा सैपाकघर काबीज करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत नव्या सुनांनी आणि नव्या तेलांनी जम बसवला होता. (या नव्या तेलाची जाहीरात करणार्‍या कमनीय बांध्याच्या बाया कदाचीत लिव्हर कंपनीला मिळाल्या नसतील .) काही वर्षापूर्वी लिव्हरनी डालडा ब्रँड विकून टाकला. पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळा डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटींग आयकॉन आहे आणि डालडाच्या रिकाम्या डब्यात रुजलेले तुळशीच्या रोपट्याचे चित्र म्हणजे आपल्या सामाजीक राहणीमानाच्या स्थित्यंतरात कसाबसा जीव धरून राहीलेल्या संस्कृतीचं आयकॉन आहे . चार्वाकानितीत फारसा फरक पडलेला नाही . ॠणं कृत्वा आयुष्याला कायमचं चिकटलं आहे पण घृतं पिबेत कधीच विसरून गेलो आहे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
38324 वाचन

💬 प्रतिसाद (94)

प्रतिक्रिया

कांकांनी इतक सुंदर लिहलयं की

मदनबाण
Fri, 01/20/2012 - 16:18 नवीन
कांकांनी इतक सुंदर लिहलयं की प्रतिसाद काय लिहावा तेच सुचेनास झालं आहे. :)
  • Log in or register to post comments

एकदम मस्त

विशाखा राऊत
Fri, 01/20/2012 - 21:48 नवीन
काका लेख एकदम मस्त रवाळ आहे ... दिवाळीच्या अगोदर घरी येणारा डालडा आठवला
  • Log in or register to post comments

सुरेख!

स्वाती२
Fri, 01/20/2012 - 18:34 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

डालडा सारख्या लेखाने पण

विकास
Fri, 01/20/2012 - 19:54 नवीन
डालडा सारख्या लेखाने पण nostalgia येऊ शकतो हे हा लेख वाचताना अनुभवले! मध्यंतरी एकदा येथे (बॉस्टन भागात) एका भारतीय किराणामालाच्या दुकानात मला डालडा दिसला आणि असाच nostalgia आला होता आणि अजूनही (health consciousness च्या काळात) त्याला गिर्‍हाईक आहे हे बघून काहीसे आश्चर्य वाटले होते. रेशनच्या दुकानात डालडाला पाम तेलाचे (कधी कधी सुटे) मिळण्याचे alternative आल्याचे आठवले. तसेच त्याच काळात हळू हळू रेशनकार्ड हे मध्यमवर्गीयांसाठी एक नागरीकत्वाचा दाखला इतकाच राहून त्याचा वापर घरातील हा घरातील कामवाल्या बाईंना रेशन साठी म्हणून होऊ लागल्याचे देखील आठवले. बाकी अजून एक गोष्ट आठवली ती म्हणजे ८३-८४ च्या सुमारास डालडामधे प्राण्यांची (विशेष करून गाईची) चरबी मिश्रणासाठी वापरली जाते असे काहीसे बाहेर आले आणि त्याविरोधात बघता बघता संसदेत आवाज उठू लागला. अर्थात तो आवाज तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या विरोधात देखील होऊ लागला होता. इतका की त्याचा परीणाम हा ८४ च्या मध्यावर्ती निवडणूकात होणार असे वाटू लागले होते. पण इंदिराजींची हत्या झाली आणि लोकांश्रूंच्या महापूरात विरोधकांबरोबरच डालडा देखील वाहून गेला.
  • Log in or register to post comments

शीर साष्टांग दंडवत.

गणपा
Fri, 01/20/2012 - 19:56 नवीन
शीर साष्टांग दंडवत. म्या पामराने रामदास काकांच्या लिखाणा बद्दल काय बोलावे.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखन

तिमा
Fri, 01/20/2012 - 20:04 नवीन
रामदासजी, लेखन आणि कालप्रवास खूपच आवडला. दिवाळीच्या वेळेस, डालडाचा रंगीत डबाही मिळायचा असे आठवते. डालडाचा एक वेगळाच उपयोग आम्ही लॅबमधे करतो. डालडाचा बाथ, जास्त तापमानाला एखादे डिस्टिलेशन करायचे असेल तर सोईचा पडतो.
  • Log in or register to post comments

वा: !

मराठे
Fri, 01/20/2012 - 20:07 नवीन
वा: ! -------/\-------- यापेक्षा वेगळी काय प्रतिक्रीया देणार?
  • Log in or register to post comments

वा वा वा! शुक्रवार सकाळ सार्थकी लागली!!

चतुरंग
Fri, 01/20/2012 - 21:16 नवीन
वाक्यावाक्यागणिक साजूक तुपात तळलेल्या मोतीचुराचा घास घ्यावा तसे झाले! वाचून डोळ्यांना सुद्धा तुपाळ ओषटपण आलंय! :) डालडाचे डबे हे मध्यमवर्गीय घराचे व्यवच्छेदक लक्षण होते! आता त्याची जागा सर्व प्रकारच्या तेलांनी घेतली. उगाचच्या उगाच कॉलेस्टेरॉल कोलेस्टेरॉल म्हणून बोंबा मारत साजूक तूप घरातून हद्दपार करणार्‍या मार्केटिंग वाल्यांचा मला निषेध करावासा वाटतो! गॅसच्या जवळ भिंतीला टेकवून ठेवलेले पातेले, त्यातले चार थेंब ओघळून आलेले तूप संध्याकाळी आई चांदीच्या तामलीत काढायची आणि मग साखर घालून बेरी खरवडायला माझ्या ताब्यात द्यायची! यंव रे पठ्ठे. तोंपासू!! पण या तुपाच्या बाबतील माझं नशीब आजही जोरावर आहे! आजही आमची आनपूर्णा घरीच लोणी कढवते आणि साजूक तूप करते! गरमागरम वरणभात, तीळ लावलेली बाजरीची उनून भाकरी, वाफाळते मोदक, अवीट गुळाची पोळी, अलवार पुरणपोळी, साजूक साटोरी, खमंग थालीपीठ या सगळ्या मांदियाळीला तुपात माखून खाल्ले नाही तर पाप लागते!! कनवाळू काकवी आणि हापूसचा साखरांबा हे तुपासोबतच खायचे असतात. हे सगळे मी आजही करु शकतो. याचा मला आनंद आहे!(हॅट्स ऑफ टु हर!) (तुपाशीच खाणारा)रंगा
  • Log in or register to post comments

रेवती आज्जी

मी-सौरभ
Wed, 01/25/2012 - 18:43 नवीन
हाबिणंदन!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

ए काय रे!माझ्या नवर्‍यालाही

रेवती
Wed, 01/25/2012 - 21:34 नवीन
ए काय रे! माझ्या नवर्‍यालाही कळत नाही कुठं काय लिहावं. आमच्या मुलाला लहानपणी इतक्या अ‍ॅलर्ज्या होत्या की पथ्य पाळण्यासाठी घरीच स्वयंपाक करावा लागत असे म्हणून......बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

टिप्पीकल रामदान

प्राजु
Fri, 01/20/2012 - 21:32 नवीन
टिप्पीकल रामदान स्टाईल!!! मस्त!! तूपाइतकाच स्निग्ध, रवाळ, खमंग आणि डालडा इतकाच ओशट... सुंदर लेख!!
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंय, आवडलं. आणि हो

५० फक्त
Fri, 01/20/2012 - 22:09 नवीन
मस्त लिहिलंय, आवडलं. आणि हो चतुरंगाना + १०० , अजुन माझ्या पण घरात तुपाचंच साम्राज्य आहे.
  • Log in or register to post comments

मस्त

धनंजय
Fri, 01/20/2012 - 22:41 नवीन
स्मृतींबाबत या अशा प्रकारचे लेखन आवडते. रामदास यांचे लेखन आवडते. स्मृतींना उजाळा देते, पुन्हा तो काळ अनुभवता येतो. पण उगाच लाडात येऊन गोग्गोड होत नाही.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख

रामपुरी
Fri, 01/20/2012 - 23:24 नवीन
आजीची आठवण करून दिलीत. हल्ली बायकोच्या राज्यातून मुगाचे लाडू, मुगाची खीर, पापड्याच्या लाट्या, कुरडयांसाठीचा ओला चीक, साबुदाण्याची खीर, तांदळाचे पापड, लाह्याचे पीठाचे गूळ दूध तूप घालून केलेले लाडू, चिरमुर्‍याचे लाडू असे असंख्य पदार्थ हद्दपार झालेले आहेत. आजी आणि आई बरोबरच असे पदार्थ कायमचे लुप्त झाले आहेत. अजूनतरी 'तूप' या यादीत आलेले नाही हेच सुदैव. या प्रतिसादाकरीता स्त्री मुक्ती (पक्षी: फक्त स्वयंपाकघरातून मुक्ती) आघाडीचा रोष पत्करण्याची आपली तयारी आहे. :)
  • Log in or register to post comments

मस्त प्रतिसाद!

रेवती
Sat, 01/21/2012 - 00:34 नवीन
मस्त प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

" ९१ " नंतर जन्माला आलेले गेले डब्याच्या भावात

रघु सावंत
Fri, 01/20/2012 - 23:36 नवीन
सर माझी प्रतिक्रीया तुम्हाला माहित आहेच. तुमचा लेख वारंवार वाचताना ,आई ने तुरीची डाळ भरुन ठेवलेला डबा बराच काळ लक्षात राहील्याचे, आत्ता आठवले . बाकी काही म्हणा ९१ नंतर जन्माला आलेले गेले डब्याच्या भावात. त्यांना डाडा काय आणी डालडा काय हाय काय नाय काय तुमच्या पुढच्या लेखा करिता आम्ही चातक झालो आहोत. इति रघू सावंत
  • Log in or register to post comments

धन्य आहात. तुम्हाला दंडवतच

रेवती
Sat, 01/21/2012 - 00:33 नवीन
धन्य आहात. तुम्हाला दंडवतच घालायला पाहिजे. डालडाच्या रिकाम्या डब्यांमध्ये वाळवणाचे पदार्थ (उपासाच्या साबूदाण्याचा पापड्या आणि बटाट्यचा वाळवलेला कीस) भरून ठेवलेले आठवतात. लेखन आवडले हे वे. सां. न. ल.
  • Log in or register to post comments

ग्रेट

दिपक
Sat, 01/21/2012 - 09:53 नवीन
__/\__ दंडवत घालतो काका. काय बोलणार शब्दच नाहियेत. लेख परत परत वाचतोय प्रत्येक वाक्याची गोडी चाखत.
  • Log in or register to post comments

तुमचे लिखाण खरोखरच फार सुंदर

अप्पा जोगळेकर
Sat, 01/21/2012 - 14:15 नवीन
तुमचे लिखाण खरोखरच फार सुंदर असते.
  • Log in or register to post comments

रामदास काका ंच्या कीबोर्ड

विजुभाऊ
Sat, 01/21/2012 - 16:09 नवीन
रामदास काका ंच्या कीबोर्ड मधून नक्की काय काय निघेल ते सांगता येत नाही. लेख झकास आहे आम्ही डालडाचे डबे झाळून त्याला दोन्ही बाजूने कड्या लावून ते डबे पोहाणॅ शिकताना फ्लोट म्हणून वापरायचो
  • Log in or register to post comments

आम्ही डालडाचे डबे झाळून

गणपा
Fri, 01/27/2012 - 13:13 नवीन
आम्ही डालडाचे डबे झाळून त्याला दोन्ही बाजूने कड्या लावून ते डबे पोहाणॅ शिकताना फ्लोट म्हणून वापरायचो
हे असे ? ;) https://www.youtube.com/watch?v=6Dkw1QRHGKI&feature=youtu.be (५ ते ११ सेकंदाला 'त्याचं' दर्शन होईल. :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

स्पीचलेस !!

सूड
Sun, 01/22/2012 - 01:28 नवीन
स्पीचलेस !!
  • Log in or register to post comments

सुंदर लेख

प्रदीप
Sun, 01/22/2012 - 10:17 नवीन
काळाबरोबर लुप्त झालेल्या घरगुती रवाळ तूप, त्याची जागा घेणारे डालडा, ह्यांच्या आठवणी काढणारा हा लेखही एका जुन्या, व मला हव्याहव्याश्या वाटणार्‍या, स्टकॅटो वाक्यांतून मार्मिक निरीक्षणे नोंदवणार्‍या व्यंकटेश माडगूळकरांच्या शैलीतला. बाकी, नगरीनिरंजन ह्यांच्याशी संपूर्ण सहमत-- आठवणी, माहिती, अर्थशात्रीय संदर्भ, तसेच पाककृतींविषयी , समाजाच्या अपरिहार्य स्थित्यंतराविषयी नेमकी टिपण्णी करत जाणारा व पुढील ह्याच विषवावरील लेखांची उत्सुकतेने वाट पहावयास लावणारा हा अष्टपैलू लेख आहे.
  • Log in or register to post comments

व्वा !

शाहरुख
Sun, 01/22/2012 - 12:17 नवीन
बाकी, नगरीनिरंजन ह्यांच्याशी संपूर्ण सहमत-- आठवणी, माहिती, अर्थशात्रीय संदर्भ, तसेच पाककृतींविषयी , समाजाच्या अपरिहार्य स्थित्यंतराविषयी नेमकी टिपण्णी करत जाणारा व पुढील ह्याच विषवावरील लेखांची उत्सुकतेने वाट पहावयास लावणारा हा अष्टपैलू लेख आहे.
+१ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

हा लेख निवांत क्षणी वाचायचा,

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/25/2012 - 07:37 नवीन
हा लेख निवांत क्षणी वाचायचा, कितीही काळ गेला तरी हरकत नाही, या हट्टाने बाजूला ठवला होता. माझ्या हट्टाचं चीज झालं! आता हे मनात घोळवत ठेवतो. जास्त लिहित नाही. मात्र, विसुनाना, चतुरंग आणि प्रदीप यांचे प्रतिसाद आवडले हे आवर्जून नमूद करतो.
  • Log in or register to post comments

चीज झालं?

तुषार काळभोर
गुरुवार, 01/26/2012 - 07:39 नवीन
>>>>माझ्या हट्टाचं चीज झालं! डालडा झाला असेल... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

लेख सुरेखच !!!आईच्या राज्यात

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 01/26/2012 - 14:42 नवीन
लेख सुरेखच !!! आईच्या राज्यात डालडा होता, बहुदा पुर्या तळायला वापरला जायचा (हल्ली पुर्या तेलात तळतात). शिरा, साबुदाण्याची खिचडी तत्सम पदार्थ मात्र घरात कढवलेल्या तुपातच होत असत. आमच्या मुंबईत गो़कुळ सारखे उत्तम दुध मिळत असल्याने मी ही तुप कढवीत असे. ज्या दिवशी ताक घुसळले जायचे त्या दिवशी हमखास घरच्या लोण्यातली पावभाजी मी करत असे. दुध तापविणे, साय काढणे, विरजण लावणे, ताक करणे, तुप कढविणे कितितरी कामे माझ्या आयुश्यातुन कमी झालित आणी विरजण, ताक, दही, लोणी हे शब्द जाउन लबान, योगर्ट आणी अनसॉल्टेड बटर हे शब्द माझ्या आयुश्यात आलेत. :( देवांची रोज पुजा होत नसली तरी मात्र सकाळी तुपाचा दिवा मी लावते. एकदम वर्षाच्या तुपात भिजविलेल्या वाती आई मला करुन देते. त्या दोन वाती निरांजनात अजुन तुप न घालताच मी लावते. कारण घर बन्द करुन मी लगेच ओफिस्ला जात असल्याने मला दिवा जास्त वेळ तेवता नको असतो. सन्ध्याकाळी मात्र रोज खाण्यासाठी वापरत असलेल्या तेलाचाच दिवा लावला जातो आणी वर हात जोडुन "तिळाचे तेल कापसाची वात देवा तुम्हाला सांजवात म्हटले जाते." ;)
  • Log in or register to post comments

रामदास भरून पावले आज!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 01/26/2012 - 14:43 नवीन
रामदास भरून पावले आज!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

पापलेट/मासा पा़कृ वर

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 01/26/2012 - 14:45 नवीन
पापलेट/मासा पा़कृ वर प्रतिसाद बघ म्हणजे तु भरुन पावशिल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

खरंच रे बाबा !!

रामदास
गुरुवार, 01/26/2012 - 18:04 नवीन
एक तर कितीतरी महीन्यानी सून नजरेस पडली . (रोज सांजवात लावते हे वाचल्यावर तर मी आता डोळे मिटायला पण तयार आहे .)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सुनबाई, सांजवात बंद कर गो!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 01/26/2012 - 18:06 नवीन
सुनबाई, सांजवात बंद कर गो! म्हातारा चालला लगेच! अजून हवा आहे तो आम्हाला! नातवंडांना गोष्टी सांगून झोपवणार कोण? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

बिप्स काहिहि अभद्र बोलुस नकोस

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 01/26/2012 - 18:11 नवीन
बिप्स काहिहि अभद्र बोलुस नकोस माझ्या सासर्यांना...गाठ माझ्याशी आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

उलट मी त्यांच्याबाजूने

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 01/26/2012 - 18:17 नवीन
उलट मी त्यांच्याबाजूने बोलतोय. तुला सावध करतोय. असो. तुमच्या घरातल्या भानगडी! आम्ही नाही मधे पडत! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

भानगडी काय ..कहिहि =)) अच्र्त

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 01/26/2012 - 18:26 नवीन
भानगडी काय ..कहिहि =)) अच्र्त बव्ल्त
  • Log in or register to post comments

सुरेख!!!

मोहनराव
गुरुवार, 01/26/2012 - 19:06 नवीन
सुरेख!!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

मैत्र
Fri, 01/27/2012 - 00:46 नवीन
च्यायला साधे लेखन सुद्धा पुनः पुनः वाचावे असे का वाटते? वास्तविक विषय अगदी साधा "डालडा" किंवा बदलते राहणीमान. भाषा साधी सरळ, टोन नॉस्टेल्जिक. मग असे रामदास काकांच्या लिखाणान नक्की काय असते बरे की माणूसा गुंगुन पडतो? ज्या दिवशी हे समजेल तेव्हा आम्हाला पण थोडेफार वाचनीय लिहिता येइल बहुधा.
अशा किती प्रतिसादांना सहमत म्हणावं आणि काय कौतुक करावं. दंडवत खरेच. रामदास काका -- योगायोगाने युनिलिव्हर च्या हेडक्वार्टर च्या शहरात त्यापासून अगदी थोड्या अंतरावर राहत असताना हा लेख वाचायला मिळाला .. सगळ्या नॉस्टॅल्जिया बरोबरच याची पण अंमळ गंमत वाटली.. नेहमी प्रमाणे शेवटच्या चेंडूवरचा षटकार मात्र सगळ्यात जास्त मनात रेंगाळतो आहे -- "ॠणं कृत्वा आयुष्याला कायमचं चिकटलं आहे पण घृतं पिबेत कधीच विसरून गेलो आहे""
  • Log in or register to post comments

__/\__

मोदक
Sat, 01/28/2012 - 00:15 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

मंत्र मुग्ध

निनाद मुक्काम …
Sat, 01/28/2012 - 00:22 नवीन
नॉस्टॅल्जिया,ह्या विषयाला वाहिलेली लेखमाला सुरु करावी अशी काकांना नम्र विनंती
  • Log in or register to post comments

+१

प्रसाद गोडबोले
Tue, 02/19/2013 - 19:19 नवीन
ह्या एका लेखात १५-२० वर्षे मागे भुतकाळात घेवुन जायची ताकद आहे . सुपर नॉस्टॅल्जिक !! अप्रतिम लेखन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

धन्यवाद !

हारुन शेख
Tue, 02/19/2013 - 23:02 नवीन
आयुष्य एखादया मिरवणुकीसारखे आहे ( life is a fiesta ). त्याचा आनंद तुम्ही दोन प्रकारे घेऊ शकता. एक मिरवणुकीत सामील होऊन किंवा दुसरे कडेला उभे राहुन मिरवणुकीची गंमत बघुन. पहिल्यात प्रत्यक्ष मिरवणुकीत सामील झाल्याचा उत्कट आनंद आहे. तर दुसरयात संपूर्ण मिरवणूक डोळे भरून पाहिल्याचे समाधान. रामदासकाका तुमच्या या लेखातुन जगण्यातली तुमची उत्कटता आणि समाधान दोन्हींचा प्रत्यय मिळतोय. खूप आवडला लेख.
  • Log in or register to post comments

मस्त..

उपास
Wed, 02/20/2013 - 03:48 नवीन
नेहमीप्रमाणेच उच्च.. हळवं करुनच सोडता रामदासकाका.. डालडा हा शब्द दोन्ही कडून वाचला तरी सारखाच असं समजावून सांगितल आजीन तो माझ्या भाषाविषयक कुतुहलाचा पहिला धडा असावा.. वाळ्वणं साठवायला, पोहायला दोरी बांधून, रोपटी लावायला, चाळीत टम्रेल म्हणून असे अनंत उपयोग तेव्हा निगुतीने राहाणार्या मध्यमवर्गीय घरात हमखास दिसायचे. ह्या पत्र्याच्या डालडाच्य डब्याचं गोल झाकण, कधी घट्ट लागलं असेल तर आतील पदार्थ न सांडता ते उचकटून उघडण्यातही मजा असायची. आणि हो कल्याणजी आनंदजी सारखे संगितकार हे त्यांच्या लहानपणी डालडाच्या डब्यावरच ताल धरुन शिकलेत असं प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकल्याचं स्मरतय :) तस्मात, बडवण्यासाठी डालडा चा डबा वापरला जायचाच ;)
  • Log in or register to post comments

स्वयंभू अस्तित्व.....

NAKSHATRA
Sat, 01/23/2021 - 08:56 नवीन
रामदास काका ग्रेट, खूप आवडला लेख. दादर स्टेशनला उतरल्यावर सामंतांच्या दुकानातल्या काचबंद पेटीतल्या लोण्याच्या प्रचंड आकारमानाच्या गोळ्याकडे बघून सुस्कारा सोडून लोकं पुढे निघून जाताना मी बघीतली आहेत. देव्हार्‍यातला बाळकृष्ण पण लोणी साखरेच्या वाटीवर नजर ठेवूनच आंघोळीला तयार व्हायचा.सोळा सोमवारच्या व्रतानी भोळा शंभो प्रसीद प्रसीद व्हायचा तो लोणकढ्या तुपातल्या चुरम्याच्या लाडवामुळे आणि सत्यनारायणाच्या शिरा दुसर्‍या दिवशी खाल्ला की परब्रह्म जरा जास्तच चांगले प्रकट व्हायचे.बेंबीला चिमटा काढून वर्षभरात अंगारकीचा एखादाच उपास दिवसभर व्हायचा तो संध्याकाळी वाफाळत्या मोदकावर साजुक रवाळ तुपाचा घसघशीत हप्ता मिळावा या आशेवरच. इडलीसोबत पुडीची चटणी तिळाच्या तेलात पावन होऊन यायची आणि उडदाच्या पापडाची लाटी अंगभर तेलात माखून "गिळा आता" म्हणायची. डालडानी पण डालडा अ‍ॅक्टीव्ह या नावाखाली पुन्हा एकदा सैपाकघर काबीज करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत नव्या सुनांनी आणि नव्या तेलांनी जम बसवला होता. (या नव्या तेलाची जाहीरात करणार्‍या कमनीय बांध्याच्या बाया कदाचीत लिव्हर कंपनीला मिळाल्या नसतील .) जबरदस्त लेखन
  • Log in or register to post comments

जबरदस्त !

अहिरावण
Sat, 10/14/2023 - 19:55 नवीन
जबरदस्त !
  • Log in or register to post comments

ओहो!

Bhakti
Sun, 10/15/2023 - 10:53 नवीन
ओहो! अप्रतिम! स्निग्धता भरून पावलेला धागा आहे.
माल्थस नावाचा एक शहाणा माणूस कधीतरी म्हणाला होता की भूमीतीय गुणोत्तराने वाढणार्‍या प्रजोत्पादनाला अंकगणितीय श्रेणीनी वाढणारे अन्न पुरेसे पडणार नाही.
माल्थस.. स्वामिनाथन यांच्या विषयी वाचताना यांचे नाव वाचले , विशेष यांचा सिद्धांत समजत नव्हता, तुम्ही लिहिलेल्या दोन ओळीत समजला. हे स्थित्यंतर ओलिव्ह तेलापर्यंत पोहचले आहे पण घरी कढवलेले साजूक तूप आणि तो घरभर पसरलेला दरवळ यांची जागा कोणीही भरू शकत नाही...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा