✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

घृतं पिबेत

र
रामदास यांनी
Fri, 01/20/2012 - 10:51  ·  लेख
लेख
असेही दिवस होते की सांजवात तिळाच्या तेलात भिजायची तर निरांजनातल्या फुलवाती साजुक तूपात भिजायच्या. अंबाडीच्या भाजीवरची लसणाची फोडणी तेलात व्हायची तर कढीला चुर्रकार फोडणी तूपातली मिळायची. जवसाच्या किंवा कारळ्याच्या थोड्याशा कोरड्या चटणीला तेलाची जोड असायची तर लसणीच्या तांबड्या लाल तिखटासोबत तेल बरे की रवाळ तूप हा सांप्रदायीक वाद होता. देव्हार्‍यातला बाळकृष्ण पण लोणी साखरेच्या वाटीवर नजर ठेवूनच आंघोळीला तयार व्हायचा.सोळा सोमवारच्या व्रतानी भोळा शंभो प्रसीद प्रसीद व्हायचा तो लोणकढ्या तुपातल्या चुरम्याच्या लाडवामुळे आणि सत्यनारायणाच्या शिरा दुसर्‍या दिवशी खाल्ला की परब्रह्म जरा जास्तच चांगले प्रकट व्हायचे.बेंबीला चिमटा काढून वर्षभरात अंगारकीचा एखादाच उपास दिवसभर व्हायचा तो संध्याकाळी वाफाळत्या मोदकावर साजुक रवाळ तुपाचा घसघशीत हप्ता मिळावा या आशेवरच. इडलीसोबत पुडीची चटणी तिळाच्या तेलात पावन होऊन यायची आणि उडदाच्या पापडाची लाटी अंगभर तेलात माखून "गिळा आता" म्हणायची. सांगायचं होतं ते असं की ही तेलं तूपं म्हणजे कुकींग मिडीयम नव्हती तर पाककृतीचे अ‍ॅक्टीव्ह कांपोनंट असं त्यांचं स्वयंभू अस्तित्व होतं.त्यांच्या स्वादाचा आपापला महीमा होता. अन्न पूर्णब्रह्म होतेच पण त्यानी कसे प्रकट व्हावे त्याचे काही अलिखीत संकेत होतेच. घरी वापरायचं तूप घरीच कढवलं जायचं आणि तेल आणायला शनीवार वगळता तेलाच्या घाण्या होत्या. लग्न कार्य वगैरे वगळता रोजचं तूप घरीच कढवलं जायचं. लोणी कढवायला घेतलं की वासाची पहीली नोट नको नकोशी आंबुस असायची मात्र सेकंड नोट खमंग तुपाची . तो खमंग दरवळ संध्याकाळपर्यंत घरभर फिरत असायचा. खमंग रवाळ तूप. त्याचे शेवटचे चार थेंब वसूल करण्यासाठी भिंतीला कलतं करून ठेवलेलं पातेलं हातात आलं की बचकभर साखर घालून दत्त दत्त । दत्ताची गाय । गायीचं दूध ।दुधाची साय म्हणत म्हणत बेरी खरवडून पोटात ढकलेपर्यंत चैन पडायची नाही. पोल्सनचा मस्का आणि पाव "नस्ती थेरं" या सदरात मोडायची. पण एकाएकी सगळ्या व्यवस्थेचे सांधे बदलले. माणसं वाढली -भुकेची पोटं वाढली आणि अन्न कमी पडायला लागले. आता निवृत्तीच्या वयात असणार्‍या बर्‍याच जणांच्या बालपणीचे हे चित्र आहे.नंतर वेगाने समाजव्यवस्था एकेका दशकात सांधे बदलत गेली .चिंता -क्लेश-दु:ख -दरीद्र देशांतराला गेलीच नाहीत पण माणसं मात्र जगायला घराच्या बाहेर पडली. अस्तित्व तगवून धरण्याची एक न संपणारी लढाई सुरु झाली. कमाई आणि खर्चाची दोन टोकं जुळवता जुळवता घरातली कर्ती माणसं टेकीला आली . स्वस्त साधन स्त्रोताचे शोध सुरु झाले. माल्थस नावाचा एक शहाणा माणूस कधीतरी म्हणाला होता की भूमीतीय गुणोत्तराने वाढणार्‍या प्रजोत्पादनाला अंकगणितीय श्रेणीनी वाढणारे अन्न पुरेसे पडणार नाही. त्यानी कदाचीत अर्थशास्त्राचा विचार केल असेल पण प्राण्यांच्या जिवंत राहण्याच्या दुर्दम्य नैसर्गीक इच्छाशक्तीचा विचार केला नसावा. आठवड्यातले तेलातुपाचे दिवस कमी झाले . डालडा म्हटल्यावर नाक मुरडणारी माणसं रांगेत उभं राहून डालडा आणायला लागली. तसं आपल्याकडे डालडा काही नविन नव्हतं पण त्याला सैपाकघरात मान्यता नव्हती पण नंतर हळूहळू तेल किंवा तूप म्हणजे वनस्पती तूप मिळणे हेच परमोच्च भाग्याचे लक्षण आहे हे कळल्यावर असल्या शंका मनात येणेच बंद झाले . सैपाकघरात एकदा डालडा आला आणि नंतर कायमचा तेथेच राहीला. याचे श्रेय जाते हिंदुस्थान लिव्हरच्या चिवट मार्केटींगला. सुरुवातीला हातगाडीवर स्टोव्ह आणि कढईचा संसार मांडून एक माणूस डालडात पुर्‍या तळून दाखवायचा आणि जमलेल्या गर्दीला आग्रहानी खायला घालायचा.कै.सुधीर फडक्यांच्या आत्मकथनात याचा उल्लेख वाचलासा वाटतो आहे त्यानंतर डालडात बनवायच्या पाककृतींचं पुस्तकं पण आलं . डालडा म्हणजे काय तर हायड्रोजीनेटेड तेल. तेलापासून बनवलेलं तूप .म्हणून वनस्पती तूप. दिसायला साजुक तूपासारखं . रंगानी आकर्षक आणि चवीनी एकदम बुद्दू. साधारण तेलाच्या रेणू शृंखलेतल्या रिकाम्या शिटा हायड्रोजनच्या रेणूंनी भरून काढल्या की झालं वनस्पती तूप तयार. पॅलॅडीयम नावाच्या एका धातूच्या मदतीने हे स्थित्यंतर सहज शक्य होते कारण आकारमानाच्या नऊशे पट हायड्रोजनचे रेणू वाहून नेण्याची क्षमता या धातूत आहे. हायड्रोजीनेशन केल्यावर तेलाचं जे काही होतं त्याला म्हणायचं वनस्पती तूप . त्यात थोडासा बदल करून -जीवनसत्वाची भर घालून हिंदुस्थान वनस्पती मॅन्युफॅक्चरींग कंपनीने पहील्यांदा डालडा भारतात आणलं. नंतर या कंपनीचं नाव हिंदुस्थान लिव्हर झालं. डालडा ह्या नावाचा मात्र एक वेगळाच किस्सा आहे. सुरुवातीला हे वनस्पती तूप भारतात आयात केलं जायचं डाडा अँड कंपनी मार्फत . लिव्हरला मात्र स्वतःचा मालकी हक्क दाखवायचा होता मग त्यात तडजोड म्हणून एल जोडून डालडा नाव तयार झालं. युनीलिव्हरचा इतिहास मात्र थोडी वेगळी कथा सांगतो . हार्टॉग्ज या कंपनीने १९२६ साली डालडा ह्या नावाची मक्तेदारी घेतली. युनीलिव्हरचा साम्राज्यवाद मोठा की भारतीय प्रजेची भूक (आणि नड )मोठी हे कळायला मार्ग नाही पण डालडा अस्तित्वात आल्यापासून पाच वर्षाच्या आत शिवडीच्या फॅक्टरीत डालडा बनायला सुरुवात झाली. १९३७ साली प्रकाश टंडन नावाच्या एका भारतीयाला बोर्डावर घेऊन लिव्हरनी आपले हेतू स्पष्ट केले आणि त्यानंतर हिंदुस्थान लिव्हरच्या अश्वमेधाचा घोडा अडवायला कुणीच धजावलं नाही. १९६५ -१९७१ ची दोन युध्दं झाली -सत्तर एकाहत्तर बहात्तरचा ची वर्षे लागोपाठ अवर्षणाची गेली आणि डालडा पण काळ्या बाजारात गेलं . लोकसभेत डालडाच्या वाढत्या भावावर आणि दुर्भीक्षावर अनेक चर्चा झडल्या आणि डालडा रेशन कार्डावर मिळायला लागलं. राहणीमान बेचव झालं पण तगून राहण्याची गरज त्यापेक्षा मोठी होती . दादर स्टेशनला उतरल्यावर सामंतांच्या दुकानातल्या काचबंद पेटीतल्या लोण्याच्या प्रचंड आकारमानाच्या गोळ्याकडे बघून सुस्कारा सोडून लोकं पुढे निघून जाताना मी बघीतली आहेत. खानदेश -कोईंबत्तूर -बेळगाव ही लोण्याची घराणी आजही कसाबसा जीव तगवून उभी आहेत. डालडाच्या स्पर्धेत अनेक नविन ब्रँड आले आहेत .पत्र्याच्या डब्यातलं डालडा प्लॅस्टीकच्या पिशवीत मिळायला लागलं. नव्वदीच्या नंतर हेल्थ काँशस पिढी मिळवती झाली आणि नव्या मध्यमवर्गीय कुटुंबात डालडाची गरज संपली. कधी न ऐकलेल्या तेलबियांचं तेल घरात आलं . डालडानी पण डालडा अ‍ॅक्टीव्ह या नावाखाली पुन्हा एकदा सैपाकघर काबीज करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत नव्या सुनांनी आणि नव्या तेलांनी जम बसवला होता. (या नव्या तेलाची जाहीरात करणार्‍या कमनीय बांध्याच्या बाया कदाचीत लिव्हर कंपनीला मिळाल्या नसतील .) काही वर्षापूर्वी लिव्हरनी डालडा ब्रँड विकून टाकला. पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळा डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटींग आयकॉन आहे आणि डालडाच्या रिकाम्या डब्यात रुजलेले तुळशीच्या रोपट्याचे चित्र म्हणजे आपल्या सामाजीक राहणीमानाच्या स्थित्यंतरात कसाबसा जीव धरून राहीलेल्या संस्कृतीचं आयकॉन आहे . चार्वाकानितीत फारसा फरक पडलेला नाही . ॠणं कृत्वा आयुष्याला कायमचं चिकटलं आहे पण घृतं पिबेत कधीच विसरून गेलो आहे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
38324 वाचन

💬 प्रतिसाद (94)

प्रतिक्रिया

तुमचंही असंच साजूक तुपातल

स्पा
Fri, 01/20/2012 - 11:00 नवीन
तुमचंही असंच साजूक तुपातल लेखन....आपल्याला जाम आवडत ब्वा.. हा लेखहि सुंदर
  • Log in or register to post comments

तुपासारखाच्च स्निग्ध लेख

मृगनयनी
Fri, 01/20/2012 - 11:14 नवीन
तुपासारखाच्च स्निग्ध लेख आहे... रामदास'जी..... :) पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळा डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटींग आयकॉन आहे सहमत. :) आमच्या पुण्यातल्या जुन्या वाड्यात एका अरुन्द कट्ट्यावर या डालड्याच्या जुन्या डब्यांमध्ये आम्ही विविध प्रकारचे वृक्ष (पक्षी : रोपं) लावत असू... व वृक्षारोपणाचा आनन्द लुटत असू... अर्थात हे वृक्ष त्यान्च्या बालपणीच एखाद्या चिऊ किन्वा काऊचे किन्वा साळुन्कीचे भक्ष्य बनले जायचे... पण तेव्हा आम्हाला वाटायचं... की डालड्याचा डबा हा मूलतः तुपाचा असल्यामुळे वृक्षाच्या मूळापर्यन्त पाणी पोचण्यास प्रॉब्लेम येत असावा. त्यामुळे वृक्ष वाढत नसावेत.... ;) आम्हाला त्यावेळी मातीच्या कुन्ड्या वापरण्यास मनाई होती....हाहा... वेरी फनी... तसेच "डब्बा ऐसपैस" खेळताना पण या डब्ब्यान्चा मस्त वापर केल्या जायचा.... ... बालपणीचा काळ सुखाचा..... :) धन्यवाद... रामदास काका... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

डालड्याच्या डब्याचे "ऑफ

गवि
Fri, 01/20/2012 - 11:22 नवीन
डालड्याच्या डब्याचे "ऑफ लेबल" वापर आठवू जाता सुतळीबाँबच्या स्फोटात अशा डब्यांचे बळी देऊन त्यांना छिन्नविच्छिन्न पोचे आलेले "डबडे" बनवले जायचे ते आठवलं. शिवाय डबा ऐसपैस आणि स्टंप म्हणून एकावर एक उभे करणे हेही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मस्त ! माहीतीपुर्ण लिखाण

पियुशा
Fri, 01/20/2012 - 11:43 नवीन
मस्त ! माहीतीपुर्ण लिखाण :) आवडेश :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+१

अनुराग
Fri, 01/20/2012 - 18:41 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अहाहा.. रामदासकाका.. लाजवाब..

गवि
Fri, 01/20/2012 - 11:00 नवीन
अहाहा.. रामदासकाका.. लाजवाब.. धातूपासून तुपापर्यंत कोणत्याही विषयावर तुम्ही जे काही खास शैलीत लिहीता ते म्हणजे एकदम मेजवानीच.. अगदी घरगुती साजुक तुपातला बेसनलाडू खाल्ल्याचा आनंद मिळाला लेख वाचून..
  • Log in or register to post comments

लेखणही अगदी रवाळ, सुंदर.

प्रचेतस
Fri, 01/20/2012 - 11:01 नवीन
लेखणही अगदी रवाळ, सुंदर.
  • Log in or register to post comments

अहाहा. . सुंदर लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/20/2012 - 11:11 नवीन
पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळा डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटींग आयकॉन आहे आणि डालडाच्या रिकाम्या डब्यात रुजलेले तुळशीच्या रोपट्याचे चित्र म्हणजे आपल्या सामाजीक राहणीमानाच्या स्थित्यंतरात कसाबसा जीव धरून राहीलेल्या संस्कृतीचं आयकॉन आहे . क्या बात है. सॅल्यूट सर.........!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हेच

तुषार काळभोर
Fri, 01/20/2012 - 19:36 नवीन
म्हणतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर लेख

पैसा
Fri, 01/20/2012 - 11:13 नवीन
तेव्हा त्या डालडाच्या रिकाम्या पिवळ्या डब्यांचा पण अनेक प्रकारे उपयोग व्हायचा! जरा बरी परिस्थिती आल्यावर आमच्यासारख्या मध्यमवर्गीयानी डालडा खाऊन घशाला त्रास होतो, वगैरे म्हणत डालडा वापरायचं सोडून दिलं. आता आता कोलेस्टेरॉल वाढेल या भीतीने तूप आणि खमंग वास येणारं गोडेतेल पण वापरायचं कमी झालं. पण त्याबरोबर आयुष्यातला स्निग्ध भागही कमी व्हायला लागलाय. :(
  • Log in or register to post comments

टमरेल

प्रकाश घाटपांडे
Fri, 01/20/2012 - 14:06 नवीन
तेव्हा त्या डालडाच्या रिकाम्या पिवळ्या डब्यांचा पण अनेक प्रकारे उपयोग व्हायचा!
त्यापैकी टमरेल म्हणुन असलेला वापर बहुजन हिताय बहुजन सुखाय असा होता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लेखक न वाचता धागा उघडला होता.

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 01/20/2012 - 11:16 नवीन
लेखक न वाचता धागा उघडला होता. पहिल्या २ वाक्यात अंदाज आला. मग खाली जाऊन बघितले तर अंदाज १००% बरोब्बर निघाला :-) मस्त लेख काका. डालडा म्हटले की मला बटाट्याची चाळ आठवते. त्यात काही संदर्भ असावेत, त्यातील चित्रात डालड्याच्या डब्ब्यात तुळस दाखवली आहे असे अंधुक आठवते.
  • Log in or register to post comments

असा मी असामी

रामदास
Fri, 01/20/2012 - 21:22 नवीन
या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या आतल्या बाजूस तुम्ही म्हणता तसे चित्र आहे. त्या चित्रात प्रभाकर कंदील वापरा असे लिहीलेली पिशवी हातात घेतलेला एक माणूस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मस्त

नगरीनिरंजन
Fri, 01/20/2012 - 11:17 नवीन
अष्टपैलू लेख. साजूक नॉस्टॅल्जिया, एका बदलत्या कालखंडाचा वेध, शास्त्रीय व इतिहासाची माहिती, अचूक निरीक्षण, मार्मिक टिप्पण्या...काय नाही या लेखात? लेख आवडला असे दरवेळी सांगण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments

+१ असेच म्हणतो.

मितभाषी
Fri, 01/20/2012 - 11:25 नवीन
आताच लोकप्रभामधेही हा लेख वाचला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

+ २

मेघवेडा
Fri, 01/20/2012 - 17:21 नवीन
तंतोतंत. शेवटचे वाक्य अतिशय चपखल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

च्यायला साधे लेखन सुद्धा पुनः

मृत्युन्जय
Fri, 01/20/2012 - 11:18 नवीन
च्यायला साधे लेखन सुद्धा पुनः पुनः वाचावे असे का वाटते? वास्तविक विषय अगदी साधा "डालडा" किंवा बदलते राहणीमान. भाषा साधी सरळ, टोन नॉस्टेल्जिक. मग असे रामदास काकांच्या लिखाणान नक्की काय असते बरे की माणूसा गुंगुन पडतो? ज्या दिवशी हे समजेल तेव्हा आम्हाला पण थोडेफार वाचनीय लिहिता येइल बहुधा. :)
  • Log in or register to post comments

+१

मराठमोळा
Fri, 01/20/2012 - 11:32 नवीन
मृत्युंजयाच्या वाक्या वाक्याशी सहमत आहे. रामदास काकांचे लेख म्हणजे एक मेजवानीच असते.. त्यांचे लेख एकदा वाचून समाधान होत नाहीच. लेखनाबद्दल काय बोलावे, ईतके सुखद लिखाण की काही लिहायला-बोलायला शब्दच अपुरे पडतात.. ...._/\_ ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

+१००

मन१
Fri, 01/20/2012 - 11:53 नवीन
तुपाळ, तुपकट, स्नेहन करणारे लेखाअवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

+१०००

अर्धवटराव
Fri, 01/20/2012 - 23:32 नवीन
लाजवाब. (आजभी ममता कि कसौटी पे खरा) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

पामच्या झाडाचं चित्र असलेला

मनिष
Fri, 01/20/2012 - 11:23 नवीन
पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळा डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटींग आयकॉन आहे आणि डालडाच्या रिकाम्या डब्यात रुजलेले तुळशीच्या रोपट्याचे चित्र म्हणजे आपल्या सामाजीक राहणीमानाच्या स्थित्यंतरात कसाबसा जीव धरून राहीलेल्या संस्कृतीचं आयकॉन आहे .
क्या बात है!! रामदासकाकांचे लेखन म्हणजे साजूक तुपासारखंच खमंग आणि पौष्टीक! :-)
  • Log in or register to post comments

पामच्या झाडाचं चित्र असलेला

अन्या दातार
Fri, 01/20/2012 - 11:32 नवीन
पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळा डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटींग आयकॉन आहे आणि डालडाच्या रिकाम्या डब्यात रुजलेले तुळशीच्या रोपट्याचे चित्र म्हणजे आपल्या सामाजीक राहणीमानाच्या स्थित्यंतरात कसाबसा जीव धरून राहीलेल्या संस्कृतीचं आयकॉन आहे . चार्वाकानितीत फारसा फरक पडलेला नाही . ॠणं कृत्वा आयुष्याला कायमचं चिकटलं आहे पण घृतं पिबेत कधीच विसरून गेलो आहे
मान गये जनाब!!!! स्थित्यंतर टिपण्याची तुमची हातोटी खरंच वाखाणण्याजोगी आहे. __/\__ __/\__ __/\__
  • Log in or register to post comments

टमरेल

विनायक प्रभू
Fri, 01/20/2012 - 11:34 नवीन
मस्त लेख. डालडा चा डबा आणि टमरेल कसे काय राहीले बॉ?
  • Log in or register to post comments

अतिशय उत्तम लेख. वाचतच

इरसाल
Fri, 01/20/2012 - 11:41 नवीन
अतिशय उत्तम लेख. वाचतच रहावासा वाट णारा. हे घ्या. आन्जा साभार. Image removed.
  • Log in or register to post comments

हे

रामदास
Fri, 01/20/2012 - 21:19 नवीन
चित्र बरगडी असलेल्या डब्यांचे आहे. आधीच्या डब्याला अशा बरगड्या (रिब्ज) नव्हत्या. त्यामुळे पॅकींगची स्ट्रेंग्थ कमी असायची.पोचे लवकर पडायचे . थोडा जास्त थावचा पत्रा वापरला की अशा रिब्ज पाडता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

कदाचित हा तर नाही

इरसाल
Wed, 01/25/2012 - 13:15 नवीन
काका तुम्हाला हा म्हणायचाय काय ? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

बहुधा नाही

प्रदीप
Wed, 01/25/2012 - 20:40 नवीन
हे डबे नवीन दिसतात. जुने डालडाचे रिबलेस डब्बे मातकट पिवळ्या रंगाचे होते, त्यावरील झाडही दाट हिरव्या रंगाचे होते. मुळात लोगो असा झाडाच्या बुंध्याकडे लिहीलेला नव्हता. आणि ते लाल रंगातील 'नवीन' असे काही दिसते आहे, ते तर अजिबात नव्हते. थोडक्यात डबा असा चीयरफुल दिसत नसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

मस्त

sneharani
Fri, 01/20/2012 - 11:51 नवीन
मस्त लेख!! :)
  • Log in or register to post comments

दिवस परत आले

विसुनाना
Fri, 01/20/2012 - 12:08 नवीन
डालडाच्या इतिहासाचा ललित लेखाजोखा आवडला. *** 'डालडा' ला जनमान्यता (नाईलाजाने) मिळाली तरी साजूक तुपाची प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही. मारवाडी लोक सर्वच पदार्थांत डालडा वापरतात असा आमचा समज होता - "पछे डालडा खायो कोनी?" असे खोचकपणे विचारून आम्ही आमच्या मारवाडी मित्रांची टर उडवत असू. 'आम्ही डालडा वापरतो' असे उघडपणे कोणीही मान्य करत नसे. पण घरातल्या फडताळाच्या फळीवर उभे असलेले हिरव्या रंगाचे आणि पिवळ्या मोठ्या झाकणचे लांबट फुग्याच्या आकाराचे प्लास्टिक डबे गुपित उघडे करत. ते डबे तिखट, खडे मीठ भरून ठेवण्याच्या कामी येत. मात्र 'खुसखुशीत अनारसे करण्यासाठी साजूक तुपापेक्षा डालडा जास्त चांगला' ,'थोडे तूप आणि डालडा यांच्या मिश्रणाने शाबुदाण्याची खिचडी बनवली तर जास्त खमंग लागते' असे अनुभवाचे बोल स्वयंपाकघरांतून ऐकू येत. आठवड्याला एकदा साजूक तूप कढताना खमंग वास घरात दरवळत असेच. वरणभातावर कोणी डालडा घेतला किंवा रवा डालड्यात भाजून शिरा केला असे चित्र नव्हते. *** मराठी समाजात आता मात्र साजूक तुपाचे आणि राईस ब्रान, सनफ्लॉवर रिफाईन्ड तेलांचे साम्राज्य आहे. याला आयटी इंडस्ट्रीचा हातभार आहे हे नाकारता येणार नाही. शिवाय डालडातील हायड्रोजनेटेड फॅट्समुळे हृद्रोग होतो हा समज सर्वत्र पसरला आहे. आता डा(ल)डा ला टाटा.
  • Log in or register to post comments

जवसाच्या किंवा कारळ्याच्या

सुहास..
Fri, 01/20/2012 - 12:15 नवीन
जवसाच्या किंवा कारळ्याच्या थोड्याशा कोरड्या चटणीला तेलाची जोड असायची तर लसणीच्या तांबड्या लाल तिखटासोबत तेल बरे की रवाळ तूप हा सांप्रदायीक वाद होता. >>>>>>> हे असले (अस्सल) काही बोलुन, आठवणींच्या जात्यात, आय टी लाईफ , पार दळून काढल्याबद्दल रामदास काकांचा निषेध !! ;) जबराट लेख ओ काका
  • Log in or register to post comments

' तो कवी डालडा विकतो '

खेडूत
Fri, 01/20/2012 - 12:22 नवीन
मस्त! खूप दिवसांनी ' तो कवी डालडा विकतो ' आठवले.. :) आता वर्षभर अशीच साजूक मेजवानी मिळेल अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments

अहाहा..

स्वाती दिनेश
Fri, 01/20/2012 - 12:46 नवीन
सुंदर , साजूक तुपात भिजलेल्या अनेक आठवणींनी माखलेला लेख! (स्मरणरंजनात मग्न)स्वाती
  • Log in or register to post comments

पुढच्या 'आठवणीतल्या ब्रँड'ची

किसन शिंदे
Fri, 01/20/2012 - 12:50 नवीन
पुढच्या 'आठवणीतल्या ब्रँड'ची आत्तापासूनच उत्सुकता लागलीय..
  • Log in or register to post comments

मस्तच.

अभिज्ञ
Fri, 01/20/2012 - 12:52 नवीन
अतिशय साजुक व रवाळ लेख. मध्यंतरी कुठल्याश्या लेखात "आजकाल आईसक्रीम देखील "डालडा" तुपानेच बनवतात" असे वाचल्याचे स्मरते. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

'साजूक तुपाच्या खालोखाल'

प्यारे१
Fri, 01/20/2012 - 12:57 नवीन
'साजूक तुपाच्या खालोखाल' (सौजन्य- माझ्या मावशीचे मिस्टर) असलेल्या वनस्पति तुपाची (च्यायला डाल्डाच म्हणायचं राव -टूथपेस्ट म्हणजे कोलगेट अथवा फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स तस्सं) आठवण करुन दिल्याबद्दल... धन्स.
  • Log in or register to post comments

डालडाच्या डब्याची रंगसंगती

गवि
Fri, 01/20/2012 - 13:17 नवीन
डालडाच्या डब्याची रंगसंगती साधून "ऊमदा" नावाचं एक व.तूप आलं होतं. ते कोणाला आठवतंय का? या नावावरुन ते तूप आहे की शक्तिवर्धक औषध, हेच कळत नाही. डालडाचा उल्लेख चिंवि जोशींच्या चिमणराव मोटार घेतात त्या कथेत आला आहे. त्यांची मोटार घसरुन घाटात कोसळते आणि लोळागोळा होते.. मोरु आणि चिमणराव दु:खाने ते पहात असताना मोरुची कॉलेजमैत्रीण (कल्पना शहा किंवा तत्सम बहुधा) तिच्या अलिशान गाडीतून तिथे येते. तिच्या फॅमिलीसमोर शायनिंग मारायला मोरु त्या नष्ट झालेल्या कारविषयी म्हणतो , "जाऊ द्या अप्पा, असले डाल्डाचे डबे पुष्कळ आहेत आपल्याकडे." हा उल्लेख पुलंच्या चाळीच्याही बराच आधीचा असावा. पण पुलंनी त्यात तुळस लावून एक सुंदर रचना साधली.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आठवते आहे

विशाखा राऊत
Fri, 01/20/2012 - 17:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

उमदा

रामदास
Fri, 01/20/2012 - 21:16 नवीन
हा ब्रँड उमरेड अ‍ॅग्रो लिमीटेडचा ब्रँड होता. उमरेड नागपूर जवळचे एक गाव आहे .नागपूरचा एक तालुका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मस्तच

मूकवाचक
Fri, 01/20/2012 - 13:11 नवीन
मस्त लेख.
  • Log in or register to post comments

मस्त लेख

चैतन्य दीक्षित
Fri, 01/20/2012 - 13:41 नवीन
खूप आवडला लेख. असेच अजून वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

गेले ते दिन गेले..

चिगो
Fri, 01/20/2012 - 14:24 नवीन
असेही दिवस होते की सांजवात तिळाच्या तेलात भिजायची तर निरांजनातल्या फुलवाती साजुक तूपात भिजायच्या. अंबाडीच्या भाजीवरची लसणाची फोडणी तेलात व्हायची तर कढीला चुर्रकार फोडणी तूपातली मिळायची. जवसाच्या किंवा कारळ्याच्या थोड्याशा कोरड्या चटणीला तेलाची जोड असायची तर लसणीच्या तांबड्या लाल तिखटासोबत तेल बरे की रवाळ तूप हा सांप्रदायीक वाद होता. देव्हार्‍यातला बाळकृष्ण पण लोणी साखरेच्या वाटीवर नजर ठेवूनच आंघोळीला तयार व्हायचा.सोळा सोमवारच्या व्रतानी भोळा शंभो प्रसीद प्रसीद व्हायचा तो लोणकढ्या तुपातल्या चुरम्याच्या लाडवामुळे आणि सत्यनारायणाच्या शिरा दुसर्‍या दिवशी खाल्ला की परब्रह्म जरा जास्तच चांगले प्रकट व्हायचे
देवाच्या कृपेने हे दिवस पहायला मिळालेयत. गावी घरी गायी-म्हशी असल्याने असेल, आमच्या घरात डालडाचे साम्राज्य आले नाही.. मात्र मोठ्या सणांच्या वेळी, समारंभांमध्ये त्याचा वापर असायचा.. आता तर डालड्यात "ट्रान्स फॅट्स" असतात हा शोध/समज पसरल्यापासून त्याची मक्तेदारी संपलीय.. रामदासकाका, तुमच्या पहील्याच पॅराने नॉस्टॅल्जियाचा सॉलिड झटका आलाय.. :-( लेख प्रचंड आवडल्या गेलेला आहे..
  • Log in or register to post comments

रामदासजी -सुरेख.भाषाशैली

प्रकाश१११
Fri, 01/20/2012 - 14:28 नवीन
रामदासजी -सुरेख.भाषाशैली उत्तमः तो खमंग दरवळ संध्याकाळपर्यंत घरभर फिरत असायचा. खमंग रवाळ तूप. त्याचे शेवटचे चार थेंब वसूल करण्यासाठी भिंतीला कलतं करून ठेवलेलं पातेलं हातात आलं की बचकभर साखर घालून दत्त दत्त । दत्ताची गाय । गायीचं दूध ।दुधाची साय म्हणत म्हणत बेरी खरवडून पोटात ढकलेपर्यंत चैन पडायची नाही. अतिसुंदर आहे ..
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/20/2012 - 14:41 नवीन
रामदास काका हे मिपावरचे मोठ्ठे फाउंड आहेत असे मी आधीच म्हणलो होतो. (ही जुनी आठवण कशी वाटली काका ? ) ;)
  • Log in or register to post comments

फाउंड नाही रे

चतुरंग
Fri, 01/20/2012 - 20:57 नवीन
फाइंड फाइंड! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हायला !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/26/2012 - 14:52 नवीन
फाइंड फाइंड!
चक्क चक्क रंगाकाकांचा अभ्यास कमी पडला ? डान्याचा लेख वाचला नाहीये का ? ;) फाउंडच बरोब्बर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

रामदास काका, तुमच्या लेखनाचा

इष्टुर फाकडा
Fri, 01/20/2012 - 15:10 नवीन
रामदास काका, तुमच्या लेखनाचा हेवा वाटतो ! आमचे विचारही परिच्छेद पाडून मुद्देसूद येत नाहीत ते तसे शब्दातून उतरायची आशाच सोडा. तुमचे हे अक्षरघृत पिऊन तुपाची उणीव भासेना झाली आहे. :)
  • Log in or register to post comments

डालडाचे डबे

स्मिता.
Fri, 01/20/2012 - 15:14 नवीन
आमच्या पिढीत डालडा 'घश्याला त्रासदायक' म्हणून आधीच घराबाहेर गेला होता पण जुने डबे मात्र लहानपणी घरात पाहिले आहेत. त्यात काहीतरी डाळी, खडा मीठ, वगैरे भरून ठेवलेले असे. आता ते डबेही घरात उरले नाहीत. काकांच्या लेखामुळे लहानपणीच्या स्वयंपाकघराची आठवण झाली. बाकी लेख अगदी झकास हे वेगळे सांगायची गरज नाही.
  • Log in or register to post comments

मस्तं !

प्राजक्ता पवार
Fri, 01/20/2012 - 15:19 नवीन
लेख आवडला :)
  • Log in or register to post comments

येथे पाहीजे जातीचे..

असुर
Fri, 01/20/2012 - 16:03 नवीन
__/\__ फारच सुरेख. सगळी स्थित्यंतरं काळाच्या पट्टीवर ठेवून नंतर अलगद त्यांच्या कड्या जोडून त्याचाच लेखनहार करावा ही करामत रामदासकाकांचीच. कुणा येर्‍यागबाळ्याचे हे कामच नाही. --असुर
  • Log in or register to post comments

कमाल आहात काकाश्री.

झकासराव
Fri, 01/20/2012 - 16:16 नवीन
कमाल आहात काकाश्री. _/\_ आमच्याकडे त्या डालड्याच्या डब्यापासुन मोठे पत्र्याचे डबे बनवुन देणारे कारागीर येत असत. ते कारागीर आले की मग आम्ही पोरं खुप उत्सुकतेने त्यांच काम पहात असायचो. डालड्याचे डबे कापुन त्याच पत्र्यापासुन बनवलेले मोठे पत्र्याचे डबे हे त्या काळच्या महाग असल्याने एखाद दुसर्‍या असलेल्या अ‍ॅल्युमिनियम च्या धान्य / पिठ ठेवण्याच्या ५ किलो १० किलो डब्याच्या मांडीला मांडी लावुन घरी असायचे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा