Skip to main content

लहानपणीच्या गोष्टी

लेखक तिमा यांनी गुरुवार, 19/01/2012 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रकला हा माझ्या आवडीचा विषय कधीच नव्हता. शाळेमधे परसेंटेज व नंबर खाली यायचा तो याच विषयामुळे. त्यातून मोठ्या बहिणी त्याच शाळेत असल्यामुळे तर मला चांगलीच बोलणी बसायची. त्या दोघींची चित्रकला अप्रतिम होती, अगदी बोर्डावर त्यांची चित्रे लावली जात. मला मात्र माणसाची फिगर अजिबातच जमत नसे. तशी इतरांची सुंदर्, सुंदर चित्रे बघायला मला खूपच आवडत. पण मला येत नसलेली कला, अशी मारुन मुटकून कशी येणार हे समजत नसे. वर्गात ३/१० मार्क मिळवणारा मी घरुन काढून आणलेल्या चित्रांना मात्र ९/१० मिळवत असे. पण ते मार्कस देताना चित्रकला शिक्षक, छदमीपणे हंसून, बहिणीने काढलेलं ओळखताय हं गाढवा! असे म्हणून कान पिरगळीत किंवा चिमटा काढीत. पुढे मॅट्रिकला ड्रॉईंग सुटले याचा कोण आनंद झाला होता. वरील प्रस्तावना लिहिण्याचे कारण , लहानपणीच, चित्रकला अजिबात येत नसताना मला, भिंतीवर पडलेल्या डागांमधे, ढगांमधे, झाडाच्या सावल्यांमधे अनेक चेहेरे, आकृत्या दिसतात याचा शोध लागला. गंमत म्हणजे, चित्रकला येणार्‍या, माझ्या बहिणींना मी ते चेहेरे दाखवायचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांनी मला वेड्यात काढले. आपल्याला इतके स्पष्टपणे दिसणारे चेहेरे, प्राण्यांची तोंडे वा आकार इतरांना कसे दिसत नाहीत याचे मला फार आश्चर्य वाटे. वर्गातल्या अनेक मुलांनीही मला वेड्यात काढले आणि चिडवायला सुरवात केली. पण माझी त्या अव्यक्तातून आकार शोधण्याची संवय काही सुटली नाही. जरा मोठा झाल्यावर एकदा, असाच छताकडे पहात उताणा लोळत पडलो होतो. थोडीशी ओल आलेल्या छतामधे मला एकदम गॉगल घातलेला राजेंद्रकुमार दिसला. आणखी थोडावेळ निरीक्षण केल्यावर शेजारच्या 'रे' काकू दिसू लागल्या. आई कामात होती तरी मी तिला घाईघाईने बोलावून आणले. माझा नवीन 'शोध' बघायचा पेशन्स तिच्याकडे होता. आधी तिला काहीच दिसत नव्हते. मग माझ्या हट्टाखातर तिने जमिनीवर झोपून वर बघितले. आणि काय आश्चर्य! तिला ते दोन्ही चेहेरे दिसले अन ती हंसायला लागली. मी तिला परत परत विचारले की मला बरं वाटावं म्हणून तर तू दिसतंय असं म्हणत नाहीस ना ? त्यावर तिने, "नाही रे , खरंच मलाही दिसताहेत ते चेहेरे" असे म्हणून माझी खात्री पटवली. मला अत्यानंद झाला होता! मला कोणीतरी साक्षीदार मिळाला होता. पुढे मोठा झाल्यावर माझ्या, काही मॉडर्न आर्ट काढणार्‍या मित्रांकडे मी हे शेअर केले तेंव्हा त्यांनाही सगळीकडे असे आकार दिसतात हे कळले. त्यामुळे या जगांत असे दिसणारा मी एकटाच नाही हे कळल्यामुळे आनंद झाला. पुढे, मला चित्रांची प्रदर्शने पहायची आवड निर्माण झाली. मोठ्या मोठ्या चित्रकारांची प्रदर्शने पहाताना मला याचा फारच उपयोग झाला. तर अशा या नैसर्गिक आकारांमधे मला जी विविध चित्रकला दिसते तशी तुम्हालाही दिसते का ?

वाचने 4684
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

माझा आणि चित्रकलेचा सुद्धा ३६ आकडा. त्यात ते संकल्पचित्र वगैरे कसतरी काढायचो, पण च्यामारी स्मरणचित्र म्हणलं की धडकी भरायची. त्यातल्या माणसांचं शरीर समोरून दिसतात तशी पण पाय मात्र ९० अंशात वळलेले बघून मास्तुरे खवळायचा. मॉडर्न आर्ट आणि छायाचित्रकला याबद्दल माझी टोकाची मतं आहेत.

मला तरी असं काहीच दिसत नाही किंवा कधी बघायचा प्रयत्न केला नाही.... आम्ही काही सहजागत्या न दिसणार्‍या गोष्टी शोधक नजरेने शोधतो पण त्याचा उल्लेख ईथे नको ;)

In reply to by मी-सौरभ

आम्ही काही सहजागत्या न दिसणार्‍या गोष्टी शोधक नजरेने शोधतो पण त्याचा उल्लेख ईथे नको
सहमत.

तर अशा या नैसर्गिक आकारांमधे मला जी विविध चित्रकला दिसते तशी तुम्हालाही दिसते का ?
मला ढगांचे वेगवेगळे आकार आणि त्यातुन निर्माण होणारी चित्रे खुप आवडायची.. आवडतात. आता नुकतेच, मावळतीला आलेल्या सुर्याच्या तेथे ढगांचीच नाव बनुन एक नावाडी त्यात होता असे चित्र दिसले होते .. आनंद झाला होताच (आणि ही चित्रे बाकी कोणाला दाखविल्यावर कळत होती , त्यामुळे आनंदास भागिदार ही होते) हा मातर काही आकार असे असायचे की ह्याचा हा भाग काड्।अला तर हा आकार असा होयील तसा होयील असे म्हणालो तरी पुढच्याला तो कळत नसे.

सुरेख, छोटेखानी प्रकटन. ढगांमधून असे विविध आकार पाहिले होते, अद्यापही पाहतो!

असे विविध आकार नेहमीच दिसतात. त्यासाठी तंद्री लावून बसण्याची सवय असावी लागते. हे आकार सिमेंटचा गिलावा, सांडलेले पाणी, ढग किंवा इतरत्र दिसत असतात. नववीत असताना चित्रकलेच्या परीक्षेला बसलो होतो. शिक्षकांनी सराव म्हणून असे आकार शोधायला सांगितले आणि बरेच दिवस हे खूळ चालू होते! (आता नाही :) ) अवांतर: सध्या अशा परीक्षा असतात का? त्यांचे संकेत स्थळ इथे आहे!

>>माणसाची फिगर अजिबातच जमत नसे हॅ हॅ हॅ.. जी गोष्ट नसतेच ती कशी जमेल.. :) असो, एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. ईतरांपेक्षा वेगळा विचार करणारेच काहीतरी वेगळे करून दाखवतात.. नवे शोध, नव्या कलांचा जन्म होतो. न्युटनने "सफरचंद खालीच का पडते" असा वेगळा विचार केला नसता तर आजचे चित्र काहीतरी वेगळेच असले असते कदाचित. :) तुम्हाला दिसत असलेल्या आकारांचे तुम्ही फोटु घेऊन तुम्हाला जे दिसत ते ईतरांना दाखवायला हवं. कलाकार लोकंही असे 'एक्स्पेरीमेंट्स करतच असतात'

मला तर हल्ली मराठी संस्थळावर लिहिलेल्या अक्षरांच्या जुळणीमधुन अर्थपुर्ण शब्द शोधायचा छंद लागला आहे.

हो दिसायचेत ना. अजूनही टक लावून बघीतले तर बर्‍याचदा दिसतात. मला आकाशात बाणांची टोकं शोधायची सवय होती. रस्त्यावरून सायकलने जातांना मध्येच पडलेल्या २ ठिपक्यांमधून सायकल काढायचा अट्टाहास असायचा. सायकल्वरून फिरतांना हळू आवाजात गाणी म्हणत जायची सवय होती, अजूनही बाईकवर जातांना कधी कधी अचानक गुणगुणायला लागतो. :) राघव

जरुर दिसतात आकार.. ढगात, भिंतीच्या पोपड्यांत, दगडांत, डोंगरात आकार दिसतात. आकारच कशाला? रेल्वेच्या खडखडाटात किंवा बसच्या घ्रूं घ्रूं आवाजात गाणी ऐकू येतात, ताल आणि वाद्यमेळासह.. डांबर, पेट्रोल, औषधे यांच्या वासात आठवणी सापडतात.. आणि काय काय सांगावं.. मस्त लेख..

In reply to by गवि

ढग, झाडांची खोडं, दगड, ओल आलेल्या भिंती, पाण्याची डबकी, रस्त्यावरचे खड्डे, जेवताना तोडलेला पोळीचा तुकडा आणि सावल्या यात चित्रं शोधून त्यांच्या गोष्टी तयार करणे; रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज, वडिलांची राजदूत, पिठाच्या गिरणीचा पट्टा, सातभाई मळ्यातले हातमाग, स्टेशनवरून सुटलेल्या आगगाडीचा आवाज आणि आजी धान्य पाखडायला बसली की सुपाचा आवाज यातून संगीत शोधणे; थुजाची पानं कुस्करून त्यांच्या वासात बेमौसम कैरीचा वास शोधणे, अंगणात सडा टाकला की मातीच्या वासात पाऊस शोधणे. याच माझ्याही बालपणीच्या आठवणी आहेत.

In reply to by गवि

गवि आणि ननि, दोघांच्याही मस्त अ‍ॅडिशन्स! मला पण सगळीकडे भलतेच आकार दिसतात, फक्त भुतं नाही दिसली अजून कधी!

तुम्ही लिहीलेलं वाचून काल सांजच्याला एक नारळ फोडला (तुम्ही हे लिहीलं म्हणून नाही.. असाच बरेच दिवस पडून होता म्हणून फोडून खाऊन टाकला.. ;-) ) तर त्या नारळाची शेंडी आणि त्यावर असलेले दोन डोळे पायरेटस् ऑफ कॅरिबियन मधल्या सोंडवाल्या कॅप्टन सारखे दिसत होते.. वर अनेकांनी म्हटलंय तसं मला पण ढग, कपड्यांच्या घड्‍या यात चित्रे दिसतात. विजय तेंडुलकरांनी कुठल्यातरी पुस्तकात कळतेपणी पहिल्यांदाच पाहिलेल्या स्तनाचा आकार 'य' या अक्षरासारखा दिसला असे लिहीलेले आहे... मला ॐ पाहिला की त्यातून डोक्यावर हॅट घातलेला माणूस धूम ठोकून पळत आहे असे दिसते..

आई चित्रं काढायची मग मी शेजारी ब्रश आणि पाठकोरे कागद घेऊन रेघोट्या मारत बसायचा. आकारच आकार आणि चित्रंच चित्रं. जुन्या वाड्यात राहायचो त्यामुळे ओल आलेल्या भिंती आणि गिलावा केलेल्या जागा हे पोत्याने, त्यातले आकार शोधणे सहजच व्हायचे, छताच्या भोकांतून आणि दारा खिडक्यातून आलेल्या कवडश्यांमधे दिसणार्‍या धुळीच्या कणांनी तर कित्येक तास रंजक आठवणी पुरवल्या आहेत. वाड्याला दोन गच्च्या होत्या त्यामुळे ढगांचे रंग आणि आकार भरपूर दिसायचे. वार्‍याने हालणार्‍या ढगांमधे सफरचंद, ज्वालामुखी, माकड, कोंबडा असे शोध लावायला फार आवडायचे. सायकलच्या ओल्या टायरने कोरड्या रस्त्यावर वेगेवेगेळ्या नक्षी उमटवत जाणे, दिसेल त्या वाहनाच्या नंबरांची बेरीच एक आकडी संख्या येईपर्यंत करणे (यात नऊ मिळवले नाही तरी चालतात बेरीज बदलत नाही वगैरे शोध तेव्हाच लागले ;) ), रस्त्यावर सांडलेल्या तेलाच्या तवंगात सप्तरंग बघत बसणे, चिखलात काड्यांनी रेघोट्या ओढून चित्रे करणे, वरण्-भात किंवा आमटी-भात संपता संपता पानात रेघा ओढून चित्रे करणे (बाबा जाम रागवायचे पानात रेघा काढू नका म्हणून पण नजर चुकवून मी सुरुच!) दळणाच्या गिरणीचा सट्सट वाजणारा पट्टा, कांडप मशीनचे दणक्-दुणुक आवाज, बागडपट्टीतले सटडक्-फटडक असे हातमागाचे आवाज, बंगार्$$$अलेया म्हणत जाणारा भंगारवाला, कलै$$$$$ म्हणून कल्हई काढणारा, धारवाल्याच्या फिरत्या चाकाजवळ सर्रर्रर्रर्रर्रर्र अशा उडणार्‍या ठिणग्या अशा एक ना अनेक आठव्णींनी मनात फेर धरला! -रंगा