मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी आणि आमची गाडी

चाफा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"आहो, आज चार दिवस झाले, निदान आजतरी गाडी बाहेर काढाल की नाही?" एव्हाना चैत्राचा पारा थर्मामीटर फोडायच्या प्रयत्नात होता. हा असा त्रागा गेले पंधरा दिवस माझ्या मागे चालू होता. म्हणजे गाडी घेतली त्या दिवसापासून. तो कुठला अशुभदिन होता कुणास ठाऊक हिच्या आग्रहाला बळी पडून मी नवीकोरी इंडीका घरी आणली. गाडी घरी आणली खरी पण इथे ड्रायव्हिंग येत कुणाला होतं! ड्रायव्हर ठेवणं हे माझ्या आवाक्याबाहेरचं आणि एकदा गाडी घरी सोडायला म्हणून आलेल्या मित्राला रोज रोज कसला हैराण करणार? मग गाडी तशीच पार्किंग मध्ये पडून होती. आता दारात सडत पडलेल्या गाडीचे हप्ते भरत बसण्यापेक्षा ती चालवायला शिकणे केव्हाही फायद्याचे होतं. त्यात चैत्राचा आज भडका उडालेला हिला इंडीका चालवणे म्हणजे सायकल चालवण्याइतकं सोपं वाटतं. अरे इथे स्कूटर चालवताना शेवटचा गियर टाकताना माझी मारामार असते वळताना इंडिकेटर बरोबरच हात दाखवत आणि शक्य असेल तर तोंडाने शुक शुक करत गाडी चालवणारा माणूस मी, तिला तर स्टेपनीसकट तीन चाकं असतात इथे आख्खी चार चाकांची असली भलीमोठी गाडी चालवायची तर मनाची तयारी करायला नको? गेले पंधरा दिवस मी तेच करतोय पण हिला उगीच वाटतं मी घरात झोपा काढतोय म्हणून. पण आताचं या तिच्या भडक्यामुळे मला गाडी शिकणे एकदम गरजेचं वाटायला लागलं. कारण आता आणखी खारट आणि तिखट जेवण जेवणे मला शक्य नव्हते. जुने आजार पुन्हा बळावायची शक्यता होती आणि तसाही हॉलमधला सोफा मला झोपायला बराच कमी पडतो. गाडी शिकायची म्हणजे एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलचे दरवाजे ठोकायला हवे होते, ताबडतोब एका ड्रायव्हिंग स्कूलमध्ये नाव नोंदवून टाकले. आता दुसर्‍या दिवशी सकाळपासून माझे तिथले धडे चालू होणार होते. सकाळी सकाळी मस्तपैकी तयार होऊन बाहेर पडताना चैत्राने मनापासून मला ओवाळले. मला उगीचच कुठेतरी धारातीर्थी पडायला निघाल्यासारखे वाटायला लागले. एक अनामिक हुरहुर लागली होती अशी मला शाळेच्या पाहिल्या दिवशीही वाटली नसेल. गेल्या गेल्या समोरच्या 'चालक शिकत आहे' अश्या पाट्या असलेल्या गाड्या बघून मला उत्साहाचे उधाण आले पण पाहिल्याच दिवशी रस्त्यावरचे नियम आणि गाडीची माहिती इतकंच पदरात पडलं वर " उद्या हे सगळे नीट लक्षात ठेवून या " अशी प्रशिक्षकाची धमकी कम विनंती बरोबर होतीच. घरी आल्या आल्या चैत्राची फर्माइश, "चला शिकलात ना गाडी, आता पहिल्यांदा गणपतीच्या मंदिरात जाऊन नमस्कार करून येऊयात" आयला गाडी शिकणे म्हणजे काय मॅगी बनवणे आहे? बस पॅकेट खोलो और दो मिनटमे तैयार!, पण चैत्राला या गोष्टी बिलकुल समजून घेता येत नाहीत. थोडा थोडका नव्हे एक आठवडा उलटला पण आमची गाडी काही रस्त्यावर यायचे नाव काढेना. आता माझी प्रगती बंद गाडीच्या व्हील समोर बसून डाव्या हाताने गियर बदलण्याची सवय करणे आणि पायांना क्लच, ब्रेक, अ‍ॅक्सिलेटर यांच्या गुंतवळ्यात आपले पाय गाठ बसण्यापासून वाचवणे इतकीच होती. एक हात आणि दोन्ही पाय आपापल्या कामात गर्क असताना उरलेल्या एका हाताला काम कमी पडत असावं म्हणून त्या हाताने ड्रायव्हिंग व्हिल सांभाळण्याचे काम करायला लागत होतं, आणि हा सगळा द्रविडी प्राणायाम बंद गाडीत करताना पाहून सोसायटीतले लोक माझ्याकडे जरा चमत्कारिक नजरेने पाहतात असं माझे निरीक्षण एव्हाना झालं होतं, म्हणून हा कार्यक्रम मी घरात सुरू केला. खुर्चीसमोर टेबल ठेवून त्यावर ताट ठेवायचे, डाव्या हाताला माझी छत्री, पायाखाली चैत्राच्या शिलाई मशीनचा पॅडलस्विच हा अ‍ॅक्सिलेटर आणि जुन्या सायकलची दोन पॅडल क्लच आणि ब्रेक म्हणून. आणखी एक आठवडा गेल्यावर माझी आणखी प्रगती झाली म्हणजे मी प्रशिक्षकाच्या शेजारी राहून गियर बदलायला लागलो होतो. आता आत्मविश्वास जरा जीव धरायला लागला होता. अखेर प्रशिक्षकाला शेजारी बसवून गाडी थोडीफार चालवण्या पर्यंत मजल गेली. रोजची चैत्राचा तगादा चालू होताच. ...... एक दिवशी मनाचा हिय्या करून माझी गाडी बाहेर काढायचे ठरवले. चैत्रा एकदम खूश दहा मिनिटात बातमी आख्ख्या सोसायटीत पसरली. दुपारी रहदारी जरा कमी असते म्हणून तोच मुहूर्त निवडला होता. गोल्डमेडल मिरवावं इतक्या आनंदाने गाडीची चावी हातात मिरवत एकदाचा खाली उतरलो, माझ्या पाठोपाठ चैत्रा, बाहेर गाडीजवळ येऊन दरवाजा उघडेपर्यंत चैत्राने वर पाहतं हात हालवायला सुरुवात केली. आता ही कुणाला टाटा करते ? म्हणून मी वर पाहिलं, आई गंऽऽ गंऽऽ !.......... सगळी सोसायटी बाहेर गॅलरीत उभे राहून आमच्याकडे पाहतं होती. ओठाला कोरड पडणे, पोटात गोळा येणे, धाबे दणाणणे हे आणि असले सगळे लहानपणी शाळेत शिकलेले वाक्प्रचार एकदम अनुभवातच आले. आता या टेहळणी पथकासमोरून गाडी बाहेर काढायची म्हणजे उद्याच्या चर्चेला एक नवा विषय पुरवण्यासारखं होतं. कोरड्या पडलेल्या ओठावरून जीभ फिरवतं एकदाचा गाडीत दाखल झालो, पलीकडच्या दरवाज्याने चैत्रा आत येऊन मी तिच्यासाठी दरवाजा उघडून धरला नाही म्हणून कुरकुरत होती पण माझ्या छातीच्या धडधडीमधुन मला ते ऐकू येत नव्हते. कशीबशी थरथर लपवत मी किल्ली फिरवून इंजिन चालू केलं,पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आला गाडी बाहेर काढायची म्हणजे मागे घ्यायला हवी होती म्हणजे रिव्हर्स गियर, तो मला एका हाताने टाकता येईना, इथे चैत्रा आख्ख्या सोसायटीला हात हालवून टाटा करत होती, तीच संधी साधून मनातल्या मनात देवाचे नाव घेत मी दोन्ही हातांनी मिळून रिव्हर्स गियर टाकला. एकदाची गाडी बाहेर काढली. दुपारची वेळ, रहदारी कमी त्यामुळे सोसायटी ते हाय-वे फारसा काही उपद्व्याप न करता मी जाऊ शकलो पण जशी गाडी हाय-वे ला लागली तशी माझ्या मागे पनवती लागली. एकतर कासवछाप गतीने गाडी चालत असल्याने मागून येणारे गाडीवाले शक्य तितके शिव्या देत होते, म्हणून गाडी अगदी `सर पे कफ़न बाध के' स्टाइल चालवायला सुरुवात केली तर पाहिल्याच ट्रकला ओव्हरटेक करताना गाडीचा मागचा भाग थोडक्यात बचावला, हो, नेहमी स्कूटर चालवायची सवय, मागे इतकी मोठी गाडी शिल्लक राहते हे लक्षात राहिलंच नाही मग त्या ट्रकवाल्या कडून आपल्या अपशब्दांच्या माहितीत भर घालत पुढे निघालो. जोपर्यंत एकाच बाजूने गाड्या जात होत्या तोपर्यंत ठीक होतं पण आता समोरून ट्रक, टॅंकर असले महाभाग युद्धात हत्ती चालून यावे तसे चाल करून यायला लागले आणि थोड्यावेळातच माझी अवस्था चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी झाली. गाडी पुन्हा मागे वळवायचा प्रयत्न केला तर समोर पोलीस कर कटेवर ठेउनीया उभा ठाकला. मी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाण्याचा प्रयत्न करतोय हे बहुदा त्याला रुचलं नसावं, त्याच्या नावाने दोनशे रुपयांचा प्रसाद चढवून एकदाचा परतीच्या प्रवासाला लागलो. एव्हाना गाडीतल्या ए.सी. ची हवा गरम व्हायला लागली असावी कारण मी पार पाया पासून ते कळसा पर्यंत घामाने भिजलो. एव्हढ्यात शेजारून एका दुचाकीवरून दोन सुंदर अशी प्रेक्षणीय स्थळं गेली जाता जाता त्यांनी माझ्याकडे इतक्या दयाद्र वगैरे नजरेने पाहिलं की मलाच मी आपले स्थायुरुप सोडून द्रवरूपात परिवर्तित होत असल्याचा भास झाला. निदान उरलेली लाज तरी राखावी म्हणून गाडीच्या अ‍ॅक्सिलेटरवरचा पाय जरा जोऽऽरात दाबला. थोडावेळ अशीच हरणाच्या गतीने धाव घेतल्यावर मला एकंदरीत बरं वाटायला लागलं, पण हायSS त्या नादात समोरच्या फुटपाथ जवळच्या पाणीपुरीच्या ठेल्याकडे दुर्लक्ष झालंच, हातातले सुकाणू शक्य तितक्या वेगात उलट्या दिशेला फिरवताना तेहतीस कोटीमधले अर्धे तरी देव मला आठवले. एखादा हूड मुलगा सरळ मार्गाला लागावा तसा मी पुन्हा कासवछापवर आलो. आता हाय-वे संपून सोसायटीच्या रस्त्याला गाडी लागली त्यामुळे छातीतून कंठापर्यंत आलेले काळीज जरा आपल्या जागी परत जायची तयारी करायला लागले आणि तेवढ्यात इतकावेळ गप्प बसलेली चैत्रा जोऽऽरात किंचाळली "आहो, कुत्रा" आता या शब्दांचे अर्थ कळेपर्यंत गाडी त्या कुत्र्याच्या भेटीला धावली आता पुन्हा एकदा सुकाणू गरगरा फिरवण्यासाठी जोर लावला, गाडी वळली खरी पण आता तिने समोरच्या भल्यामोठ्या झाडाकडे मोहरा वळवला अशावेळी शक्य होती तीच हालचाल मी केली दोन्ही पाय शक्य तेवढे ताणत ब्रेक लावला, जाग आली तेंव्हा आजूबाजूच्या पसरलेल्या तीव्र वासाने "मै कहा हूं" असला काही प्रश्न न पडता आपण हॉस्पिटलात आहोत हे आपसूकच कळले. आणि इथे कसा आलो त्याची अंधुक आठवण मनात होतीच आता करकच्चुन दाबलेल्या दोन्ही पायांपैकी एक पाय अ‍ॅक्सिलरेटरवर आणी दुसरा चैत्राच्या पायावर दाबल्यावर दुसरे काय होणार होते? आता दोन महिन्यांनी माझ्या हाताचे प्लॅस्टर निघालेय, मोडलेला घोटा पुन्हा दुरुस्त झालाय, आणि चैत्रा?? तिच्या पडलेल्या पुढच्या चार दातांच्या जागी नकली दातांची स्थापना झालीये. पण एक बरं झालंय की त्या नकली दातांच्या प्रदर्शनात ती इतकी गुंग झाली आहे की आता गॅरेजला सडत पडलेल्या माझ्या गाडीची तिला मुळीच आठवण येत नाही. हे एक बाकी तिच्या बाबतीत बरं आहे एखादी नवीन वस्तू मग ते दात का असेनात त्यांचे तिला फार कौतुक, त्यामुळे माझ्या मोडक्या हातासकट मी आणि गॅरेजमध्ये पडलेली गाडी दोघेही सुखी आहोत.

वाचने 9479 वाचनखूण प्रतिक्रिया 35

"गाडी शिकणे म्हणजे काय मॅगी बनवणे आहे?" - आवडले.. !!! "खुर्चीसमोर टेबल ठेवून त्यावर ताट ठेवायचे, डाव्या हाताला माझी छत्री, पायाखाली चैत्राच्या शिलाई मशीनचा पॅडलस्विच हा अ‍ॅक्सिलेटर आणि जुन्या सायकलची दोन पॅडल क्लच आणि ब्रेक म्हणून." ए हे हे हे हे .. हे तर.. जाम आवडले..!!!!!! लई भारी राव..! बरे झाले सांगितले ते ..!!! घरातल्या घरात ते काय म्हणतात... हं.. आठवले.... "सिम्युलेटर" तय्यार..!! ते सुद्धा फुकटात..!!! ;-) "चिमणराव आणि गुंड्याभाऊ " ही लहानपणी पाहिलेली मालिका आठ्वली.. :-) छान आहे "पण जर वरील ले़ख खरोखरीच घडला असेल तर... प्रक्रुती सांभाळून असा...!!!"..! :-) __________________ साधा माणूस http://saadhamaanus.blogspot.com/

पैसा 29/12/2011 - 20:17
लेख आवडला. बायकांच्या ड्रायव्हिंगला हसणार्‍यांची शिकताना काय अवस्था होते हे पाहून जाम हसले. कथानायकाला इन्स्ट्रक्टरने धपाटे मारले नाहीत म्हणजे त्याचं नशीब आहे. धपाटे आणि शिव्या दिल्याशिवाय कोणाला गाडी चालवायला येत नाही असं माझ्या नवर्‍याचा इन्स्ट्रक्टर म्हणाला, ते ऐकून मी घाबरून ड्रायव्हिंग शिकायचा विचार सोडून दिला!

सॅमचीआई 29/12/2011 - 21:08
पैसा यान्च्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मी सुद्धा बायकांच्या ड्रायव्हिंगला हसणार्‍यांची शिकताना काय अवस्था होते हे पाहून जाम हसले.पण लेखनशैली आवडली.

मन१ 29/12/2011 - 22:28
मस्त "चाफास्टाइल" लेख.

फार छान विनोदी लेखन. कल्पनाशक्ती दांडगी आहे. अभिनंदन. हे एक बाकी तिच्या बाबतीत बरं आहे एखादी नवीन वस्तू मग ते दात का असेनात त्यांचे तिला फार कौतुक ह्यावरून जालावरच वाचलेला एक विनोद आठवला, किडनी ट्रान्सप्लाण्ट करून नविन किडनी मिळवलेली बाई आपल्या नवर्‍याला म्हणते आहे, 'don't you notice any difference?, I got a new kidney.'

गवि 30/12/2011 - 10:00
:) मस्त.. हलकंफुलकं.. :) बर्‍याच वर्षांपूर्वी जोशात डीलरच्या ड्रायव्हरकरवी कार आणवून पार्किंगमधे लावली होती आणि नंतर अनेक दिवस पार्किंगमधून फक्त दहा फूट मागे आणि दहा फूट पुढे इतकीच हालचाल करत होतो ते दिवस आठवले. :) पण इंडिकाच्या ब्रेकऐवजी पलीकडे बसलेल्या बायकोच्या पायावर पाय म्हणजे तुमच्या लवचिकपणाची दादच द्यायला हवी.. ;)

In reply to by गवि

इंडिकाच्या ब्रेकऐवजी पलीकडे बसलेल्या बायकोच्या पायावर पाय म्हणजे तुमच्या लवचिकपणाची दादच द्यायला हवी.. लेख फारच बारकाईने वाचला आहे......

५० फक्त 30/12/2011 - 10:23
भले बहाद्दर आणि ड्र्रायव्हरकी म्हणजे प्रत्यक्ष भगवान कृष्णाचा उपधंदा ओ, तो सहजासहजी करता येणं शक्य नसतंच, भावी ड्रायव्हरांसाठी एक अनाहुन सल्ला - कार घेणार असला तरी जीप टाइपची गाडी शिका शिकताना, शक्यतो सुमो किंवा ट्रॅक्स वगैरे, नंतर अजिबात लफडे होत नाहीत.

In reply to by ५० फक्त

अश्फाक 30/12/2011 - 18:58
अहो सर त्याचे नुकसान ही असतात हो. मी स्वत शिकताना जीप वर शिकलो , आजही गियए टाकतांना तसेच हाताच्या तळव्याने टाकतो , ३ र्या गियर मधे ६० + स्पीड देतो आणी बरेच काही जे आताच्या नाजुक , सोफ्टवेअर बेस गाड्यांना मानवत नाही :):)

In reply to by अश्फाक

५० फक्त 30/12/2011 - 19:09
अरे म्हणुनच मी सुमो किंवा ट्रॅक्स म्हणलंय, जीप बाय महिंद्रा हा वेगळा वंश आहे, ज्याला गाडी चालवायची भिती वाटत असेल अन रस्त्यावर समोरच्याला भिती दाखवता येत नसेल त्यानं या वंशाच्या वाटेला जाउ नये. कमांडर टु एसयुव्हि ५०० व्ह्याया बोलेरो अँड स्कॉर्पिओ अँड थर ..... महिंद्राला सलाम....

सोत्रि 30/12/2011 - 10:34
खुपच छान !
कारण आता आणखी खारट आणि तिखट जेवण जेवणे मला शक्य नव्हते. मलाच मी आपले स्थायुरुप सोडून द्रवरूपात परिवर्तित होत असल्याचा भास झाला
लै म्हणजे लैच भारी :) - ('चाफा'पंखा) सोकाजी

रानी १३ 30/12/2011 - 12:16
मजा आली वाचताना..............:) आम्ही गाडी शिकली आहे.......पण भितीमुळे चालवु नाही शकलो ...:(

चाफा 30/12/2011 - 14:56
धन्यवाद दोस्त कंपनी @ जमिर -- ही काल्पनीक कथा आहे :) @ पाषाणभेद - त्यामुळेच गाडीचा व्यवहार होणं शक्य नाही ( ती सुस्थितीत आहे :) ) @ गवि -- एकदा गाडी वेडीवाकडी चालवून पहा की, पायच काय आख्खी बायको अंगावर कोसळते :)

धमाल मुलगा 30/12/2011 - 15:26
बर्‍याच दिवसांनी लेखणीला चांगली धार लाऊन आलायस की मर्दा :) सही मजा आली वाचायला. :) बाकी, शैलीबद्दल आम्ही पामरांनी काय बोलावं? :)

किचेन 03/01/2012 - 15:12
हसून हसून पुरेवाट...(सन्माननीय पराशेठ कडून लोळणारा चेहरा उधार घेऊन इथे लावलाय असे समजावे) मी गाडी शिकतानाची आठवण झाली. १७व वर्ष संपायला २ म्हणे कमी होते.१८ व लागल्या लागल्या परवाना काढायचा होता.एक क्लास लावला.मारुती ८०० शिकायची होती...पण माझी उंची फक्त ५'००! स्टेरिंग व्हील समोर बसाल कि समोरच काही दिसेनाच.पहिल्या दिवशी माझी शिक्षिकेने तिच्या ब्रेक आणि अक्सिलेतारणे (त्या गाडीला शेजारच्या सितवारही ब्रेक आणि कल्च होते) गाडी व्यवस्थित घरापर्यंत आणली.दुसर्या दिवशीपासून बसायला एक उशी आणि टेकायला एक उशी,आणि माझी मान शहमृगासारखी! अशी बसल्यावरही १५ मी. गाडी फक्त सुरु होऊन कल्च सोडला कि जोजात उडून बंद पडली.कसे बसे शिकायचे १५ दिवस पार पडले.गाडी मी साफैदारपणे चालवू शकत होते. आता तीर्थरूपांनी माझी परीक्षा घ्यायचं ठरवलं.परीक्षेची वेळ सकाळी ७:०० ,ठिकाण भोई आळी! मला ऐकूनच भोवळ आली.कारण भोई आली म्हण्जे या वेळेला खराखुरा मच्छी बाजार असतो.एक अरुंद बोळ, दोन्ही बाजूला मासेवाले, आणि गीर्यायिक यामधून एका वेळेला एकच चारचाकी जाऊ शकते.दुसर्या बाजूनी दुचाकी आली तरीही जायला जागा उरत नाही.त्यात कल्च जोरात सोडला आणि गाडी उडून बंद पडली कि बाबा डोक्यात जोरात तापली द्यायचे.शेवटी मला उतरवल...आणि दाखवलं गाडी कशी चालवायची! नंतर जेव्हा भाऊ पाचगणीत होस्टेल ला गेला तेव्हा माझी मजा होती.तेव्हा कात्रजचा जुना घाट संपला कि गाडी माझ्या हातात यायची...मग त्याच्या होस्तेल्पर्यंत...एकदम १०० किलोमीटर. पण १० वर्षानंतर आजही जर मला बोई आळीत नेल तर गाडी चालवता येणार नाही हे नक्की!

In reply to by किचेन

अन्या दातार 03/01/2012 - 15:29
पहिले हहपुवा व कंसातील सोडल्यास एक अक्षर नीट कळले नाही. बै, तुम्ही पुन्हा एकदा शाळेत जाऊन बसा बघू. सध्या शाळांमधून कॅम्प्युटरपण शिकवतात म्हणे. संध्याकाळी टायपिंगचाही क्लास लावा (शक्यतो तुम्हाला जो क्लास बंद पाडायचाय असाच हुडका) --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सुखी शाळकर्‍याची अवघड वाटचाल

In reply to by मी-सौरभ

५० फक्त 03/01/2012 - 22:27
त्यांच्या लिहिण्याच्या उत्साहाचं सिक्रेट माहित आहे का तुम्हाला ? नाही ना मग मला तरी कुठं माहित आहे, काय ओ तुमच्या लिहिण्याच्या उत्साहाचं सिक्रेट ?