ब्रजवासी जगन्नाथ
खरं तर जगात जितकी म्हणून ठिकाणं आहेत ती सगळी त्रिलोकपति भगवंतांचीच आहेत आणि आपल्या परमात्मस्वरूपात तेच सर्वत्र विराजमान असतात. असं असलं तरीही त्यांना जितकी ब्रजभूमी प्रिय आहे तितकी बाकी कोणतीही जागा नाही. ते स्वतः जगभरात त्यांच्या निरनिराळ्या रुपात उपस्थित असतात पण त्यांच्या अशाच एका ब्रजभूमीपासून दूर असलेल्या विग्रहरुपामध्ये ब्रजवासाची तीव्र इच्छा जागृत झाल्यास ती काही आश्चर्याची बाब म्हणताच येणार नाही.
सुमारे दोनशे वर्षांपूर्वी यमुनानदीकाठच्या ब्रजवासाची - ब्रजभूमीमध्ये निवास करण्याची इच्छा झाली पुरीच्या जगन्नाथांना! तसं म्हण्टलं तर श्रीक्षेत्र पुरी धामातलं भगवंतांचं अस्तित्व हे ऐश्वर्य भावामधलं आहे. इथला इष्टदेव जगन्नाथ आहे - सर्व जगाचा नाथ आहे. हा जगाचा नियंता असला तरी इथे भक्तांच्या आधीन आहे. इथे त्यांना भक्तांच्या इच्छेप्रमाणेच वागावं लागतं. असं नाही की एरवी त्यांना कधी ब्रजवासाची आठवण होत नाही पण वर्षातून एकदाच होणार्या रथयात्रा महोत्सवातील प्रतिकात्मक ब्रजगमनातूनच त्यांना आपली इच्छापूर्ती करून घ्यावी लागते. जगन्नाथ मंदिर ही द्वारका आणि गुंडेचा मंदिर हे ब्रज. राधाराणी आणि गोपिकांनी कुरुक्षेत्रावर सूर्यग्रहणाच्या वेळी आपल्या मनाच्या रथातून जसं कृष्णाला खेचून ब्रजभूमीला नेलं त्याचं प्रतिकात्मक अनुकरण म्हणजेच ही रथयात्रा. आता याने थोडीच जगन्नाथांची ब्रजवासाची इच्छा पूर्ण होणार आहे? त्यांना आठवत होतं यमुनेचं काळं-सावळं आणि गंभीर पात्र, तिचा तो संथ प्रवाह, तिच्या दोन्ही अंगांवरची वनं, त्या वनातले सदाहरीत वृक्ष-लता, तिथे चरणार्या नंदराजांच्या गायी, भगवंतांचे गोपसखा आणि गोपी. रथयात्रेत या सगळ्याची प्राप्ती कसली? पण असं असूनही त्या मूर्तीरुपातल्या भगवंतांना भक्तांच्या इच्छेविरुद्ध वागायचं सामर्थ्य कुठे असणार? तेव्हा जर ब्रजवासासाठी जायचं असेल तर नेण्यासाठी त्यांना कुणा भक्ताचीच योजना करावी लागणार होती हे निश्चित होतं.
याच वेळी वृंदावनात हरिदास नावाचे साधुबाबा यमुनातटावर श्रीकृष्णाची उपासना करत होते. दिवस - रात्र ते भगवंतांच्या चिंतनात राहून त्यांचे भजन करता करता त्यांच्या विरहात भावविव्हल व्हायचे आणि त्यांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागायच्या. भगवंतांनी आपली ब्रजवासाची इच्छा पूर्ण करण्याच्या कामी या हरिदास बाबांची योजना केली.
एके दिवशी नेहमी प्रमाणे हरिदास बाबाजी भगवंतांच्या भजनात दंग असताना श्री भगवान त्यांच्यासमोर प्रकट झाले. भगवंतांना पहाताच हरिदास बाबाजींचं भानच हरपलं. भगवंतांच्या चरणकमळांपासून त्यांच्या मुखारविंदापर्यंत त्यांचं अवलोकन करता करताच ते निश्चेष्ट झाले. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आपल्या हस्तस्पर्शाने सचेत केलं आणि म्हणाले, " वत्सा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझ्या जवळ राहून तुझ्या प्रेमळ सेवेचा आस्वाद घेण्याची माझी नितान्त इच्छा आहे. तेव्हा लगेच श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी इथे जा. या वर्षीच्या आषाढात तिथल्या जगन्नाथाची मूर्ती बदलणार आहेत. नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यावर जुनी मूर्ती तू तुझ्याबरोबर इथे घेऊन ये आणि तुझ्या या स्थानावरच तिची स्थापना कर. त्या मूर्तीमध्ये राहूनच मी तुझी सेवा ग्रहण करेन."
इतकं बोलून भगवंत अन्तर्धान पावले आणि त्या बरोबरच हरिदासबाबांची स्थिती विचित्र झाली. त्यांनी श्रीकृष्णदर्शनाची गोडी एकदा चाखलेली असल्याने त्यांना इतर कोणत्याही लौकिक गोष्टींमध्ये रस वाटेनासा झाला. भगवंतांच्या पुनर्दर्शनासाठी त्यांचा जीव कासावीस होऊ लागला. पण मग भगवंतांच्या आज्ञेची आठवण झाल्यावर त्यांच्या चित्तवृत्ती काही प्रमाणात नियंत्रणात आल्या. त्यांनी तत्काळ श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरीच्या दिशेने प्रस्थान केलं.
आता त्या काळात वृन्दावनापासून जगन्नाथपुरीसाठी ना गाड्या होत्या ना रेल्वे, मग हरिदास बाबाजी आणि त्यांच्याबरोबर काही शिष्य पायीपायीच जगन्नाथपुरीच्या दिशेने रवाना झाले. वाटेत मोठ्या प्रमाणात डोंगर - दर्या, नदी - नाले पार करत रस्ताभर श्रीकृष्णनामसंकिर्तन करत करत ते पुरीमध्ये पोहोचेपर्यंत आषाढ महिना उजाडला. हरिदास बाबाजींनी पाहिलं की पुरी धामात धूमधडाक्याने महा-महोत्सवाची तयारी सुरू आहे. शेकडो-हजारो तीर्थयात्री दाखल झालेले आहेत आणि अगदी चार दिवसातच जवळ जवळ छत्तीस वर्षांनंतर येणारा आषाढाचा अधिक मास सुरू होणार आहे. याच दिवशी जगन्नाथाची जुनी मूर्ती बदलून नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना होण्याचा महोत्सव होणार आहे. मूर्तीवर महाभिषेक होणार असल्याने अख्ख्या पुरी क्षेत्रामध्ये उत्साहाला उधाण आलेलं आहे.
अशा प्रसंगी हरिदास बाबाजी सरळ जगन्नाथांच्या पंडांकडे - पुजार्यांकडे गेले आणि त्यांनी त्यांच्याजवळ जगन्नाथाची जुनी मूर्ती देण्याची विनंती केली. तेव्हा पंडांनी त्यांना सांगितलं की असा मूर्ती देण्याचा अधिकार आम्हाला नाही तेव्हा तुम्ही पुरीच्या राजालाच भेटा. हरिदास बाबाजी तसेच पुरीच्या राजाकडे गेले आणि त्याला तीच विनंती केली, त्यावर राजा त्यांना म्हणाला, " बाबाजी, जगन्नाथाची जुनी मूर्ती वृन्दावनात आणण्याची प्रत्यक्ष जगन्नाथाची आज्ञा तुम्हाला मिळाली आहे हे खरं जरी मानलं तरी ती मूर्ती तुम्हालाच द्यावी अशी मला कुठे आज्ञा मिळाली आहे? तसा संकेत न मिळाल्यामुळे मी काही मूर्ती तुम्हाला देऊ शकणार नाही. परंपरेप्रमाणे मूर्तींना मंदिराच्या आवारातील वैकुण्ठक्षेत्रामध्ये समाधिस्थ करण्यात येईल."
कसं आहे, हा पुरीधामातला जगन्नाथ प्रत्यक्ष दारुब्रह्म आहे. तो तिथे स्वेच्छेने अवतरीत होत असताना सतत कुणा संबंधित व्यक्तीच्या स्वप्नात येऊन त्याला आज्ञा - संकेत देत असतो की नव्या मूर्तींसाठी लागणार्या लाकडाच्या बुंध्यासाठी निंबाचे झाड कुठल्या दिशेला सापडेल, त्या झाडावर कोणती लक्षणं दिसतील वगैरे वगैरे. हीच तिथली परंपरा आहे. मग इतक्या आज्ञा देऊन अवतरीत होणार्या जगन्नाथांनी जुनी मूर्ती हरिदास बाबाजींना देण्यासाठी पुरीच्या राजाला आधीच न सांगितल्यामुळे बाबाजींना हा नकार मिळाला. परंपरेप्रमाणे मूर्तींना समाधि मिळणार हे समजताच बाबाजींनी शांतपणे घोषणा केली की आता राजाने माझ्याही देहाला अशीच सागरामध्ये जलसमाधि द्यावी आणि ते प्राणार्पण करण्यासाठी पुरीच्या समुद्रकिनार्यावर अन्न-पाणी सोडून भगवंतांचे ध्यान करू लागले.
त्या रात्री भगवंत राजाच्या स्वप्नामध्ये आले आणि त्याला गंभीर आवाजात म्हणाले," अरे, तो महात्मा माझ्या आज्ञेने वृदावनमधून इथे मूर्तीसाठी आला आणि त्यालाच तू नकार देऊन परत पाठवलंस? त्या जुन्या मूर्तीच्या माध्यमातून प्रत्यक्ष ब्रजभूमीमध्ये निवास करण्याची माझी इच्छा आहे तेव्हा मूर्ती ब्रजमध्येच जाईल. आता जा. हरिदास बाबाजींची क्षमा माग आणि माझ्या आज्ञेचं पालन कर."
अर्ध्या रात्री राजाची झोपच उडाली आणि त्याने आपले सैनिक हरिदास बाबाजींचा शोध घेण्यासाठी पाठवले. जेव्हा सैनिकांनी बाबाजींच्या सागरतटावरील जागेची माहिती राजाला पुरवली तेव्हा तो जातीने त्यांच्याकडे गेला. त्यांच्या पाया पडून त्यांची क्षमायाचना केली आणि भगवंतांच्या आज्ञापूर्तीचे वचन त्यांना दिले.
यथावकाश अधिक मास आषाढाच्या पहिल्या दिवशी महाभिषेकानंतर राजाने सुदर्शनजींसह जगन्नाथजी, बलदेवजी आणि सुभद्रादेवींच्या जुन्या मूर्ती एका मोठ्या सुशोभित रथात स्थापित केल्या. तो रथ आणि त्यांच्याबरोबर धन-धान्य, सेना वगैरे हरिदास बाबाजींना सुपूर्त करून त्यांना निरोप दिला. हरिदास बाबाजींनी रस्ताभर किर्तन करत करत अनेक महिन्यांच्या प्रवासानंतर वाजत गाजत मूर्तींसह वृन्दावनात प्रवेश केला. जिथे ते स्वतः श्रीकृष्णाची उपासना करत होते तिथेच त्यांनी त्यांची प्रतिष्ठापना केली आणि त्यांच्यासाठी एक सुंदर मंदिरही बांधले.
आजही या मूर्ती वृन्दावनात यमुनातटावर त्याच ठिकाणी विद्यमान आहेत. तशीच त्यांच्या मंदिरासमोरून यमुना वाहतेय मात्र आता तिथे यमुनेवर पक्का घाट बांधलेला आहे जो जगन्नाथ घाट म्हणूनच ओळखला जातो. अशाप्रकारे एका भक्ताद्वारेच भगवान जगन्नाथांनी आपल्या ब्रजवासाची इच्छा पूर्ण करून घेतली.
वृन्दावनच्या जगन्नाथ घाटावरील श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रांचे मूळ विग्रह
याद्या
2923
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
छान माहिती..
वा !
छान माहिती.
श्री. विटेकर महोदय, आपल्या
In reply to छान माहिती. by विटेकर
धन्यवाद.!!!!!!! मिपावरील
श्री. देविदास
In reply to धन्यवाद.!!!!!!! मिपावरील by देविदस्खोत
छान वाटलं !!
धन्यवाद हरीकथादासजी,