Skip to main content

सुकट-मसाला

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 12/12/2011 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी सुकट (सुकी-करंदी) डोके काढून, पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवावी. (खारटपणा कमी होईल) भिजवून ठेवलेली सुकट पाणी निथळून, हाताने दाबून किचन /पेपर टॉवेल वर पसरवावी. २ मोठे कांदे बारीक चिरून. १ टोमॅटो बारीक चिरून किंवा ३-४ आमसुले किंवा १ टेस्पून चिंचेचा कोळ. दीड टेस्पून आले+लसुण+ हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून हळद २-३ टीस्पून लाल-तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त) १-१/२ टीस्पून धणेपूड १-१/२ टीस्पून गरम-मसाला मीठ चवीप्रमाणे सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथंबीर तेल . पाकृ: प्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालणे. मीठ घालून कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतणे. . त्यात आले+लसुण+ हिरवी मिरची पेस्ट घालून त्यांचा कच्चा वास जाईपर्यंत चांगले परतणे. . आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालणे व तो मऊसर शिजेपर्यंत परतणे. . त्यात हळद, लाल-तिखट, धणेपूड व गरम-मसाला घालून सर्व एकत्र करावे. . त्यात सुकट घालावी आणी सगळं एकत्र करावे. मध्यम आचेवर झाकून शिजवावी. . तयार झाली की त्यावर कोथंबीर घालून गरमा-गरम तांदळाच्या किंवा कुठल्याही भाकरीबरोबर खायला सुरुवात करावी :) . असेच सुके बोंबील, सुका जवळा घालून बनवता येतं.

वाचने 11904
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

छान रेसिपी आणि फोटो पण मस्त!!!

मस्तं पाककृती. अभिनंदन. ह्यात आमसुलं घातल्यास जास्त चांगली चव येते असा अनुभव आहे. तसेच, ह्यात बटाट्याच्या मोठ्या फोडी घातल्या तर पुरवठ्याला चांगले होते.

In reply to by प्रभाकर पेठकर

तसेच, ह्यात बटाट्याच्या मोठ्या फोडी घातल्या तर पुरवठ्याला चांगले होते.
+१ सहमत. पावसाळ्यात जेव्हा ताजे मासे कमी येतात तेव्हा या सुकवलेल्या मास्यांचाच आधार असतो. :)

मस्त पदार्थ, अभिनंदन! हे आणि पटणीची भाकरी, क्या बात है!!!! करंदीपेक्षा सुका जवळा ही माझी वैयक्तिक आवड (कच कमी लागते)! आंबटपणासाठी सोलं जास्त चांगली लागतात या पदार्थात, पेठकरकाकांशी सहमत! पुरवठ्याच्या बटाटा अ‍ॅडिशनबद्दल माहिती नाही कारण उन्हाळ्याच्या अखेरीला ढीगभर जवळा, करंदी आणि बोंबील घेऊन ठेवायची आमच्या घरात प्रथा आहे! बाबा म्हणत, "खा तिच्यामायला!!!" :)

ही पाकृ बघून ५० फक्त यांना खूपच आनंद झाला असेल. अगदी तो तरी नाही तरी त्याच्यासारखाच दुसरा दिसला आहे आता.

+१ टु वल्ली, बाकी मांसाहार आणि मत्स्याहार करत नसल्याने, चवीबद्द्ल लिहायचा अधिकार नाही, बाकी गरम तेलात बारीक चिरुन टाकलेला कांदा गुलाबि डावाने गुलाबी होईपर्यंत भाजणे हा प्रकार फार रोमँटिक वाटला,

मस्त :) :)

जबर सानिका.एकदम मस्त. फार म्हणजे फारच आवडले, सहीच.......... हिला आम्ही अंबाडी सुकट म्हणतो.बटाट्याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे टाकून जाम भारी लागते.बरोबर तांदळाची भाकर . गणपा, प्रपेकाका नि पिडाकाकांशी प्रचंड आणि भयानकरित्या सहमत.(हा नवीन शब्दप्रयोग ) घरात आता फक्त सुकी वाकटी आणि सुके बोंबील पडलेले आहेत.काय करावे बरे................ वाकटीचे कालवण कि बोंबील, वांगे, बटाटे टाकून खिचडी कि बोंबलाचे कालवण ("घराला आणि गोठ्याला कोणते छप्पर वापरावे हेच काळात नाही बघ" च्या चालीवर)