Skip to main content

भीती

भीती

Published on शनीवार, 03/12/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
बंदिस्त पिंज-यात वाघ दुखा:त दिवस कंठीत होता . किती काळ झाला आपल्याला इथे येऊन ? आलो तेव्हा पानगळीचे दिवस होते . त्यानंतर दोनदा पाऊस येऊन गेला , आता तर पुन्हा पावसाचे दिवस येण्याची लक्षणं दिसताहेत . बाप रे ! बराच काळ झाल की आपल्याला . किती सुंदर दिसायचं आपलं रान पावसाच्या दिवसात , हिरवगार ! अन इथे ! इथल्या वृक्षांना रानातल्या वृक्षांची सर कुठून येणार ? त्यांचे बुंधे किती डेरेदार ? किती तरी पक्षी त्यांच्या आंगाखांद्यावर खेळायचे ? अन ती खोडकर माकडं ! किती किती गंम्मत होती त्या रानात . त्या अवखळ खारी , ते पक्ष्यांचे थवे , रातकिड्यांचा आवाज , तो काजव्यांचा लखलखाट , खळखळणारी नदी , हिरवेगार पहाड ! एक एक गोष्टं किती सुंदर ! अन आपला रुबाब तर काय वर्णावा ? सगळे नतमस्तक होत होते आदर अन भयाने . आता कुठून येणार परतून ते दिवस ? इथे तर एका कुत्र्याहूनही वाईट परिस्थिती आहे आपली , त्यांना तरी मोकळीक आहे बाहेर वाट्टेल तसं भटकायला , अन आपण मात्र इथे पिंज-यात कोंडलेले . काय गोड पाणी होतं रानातल्या नदीचं ! इथल्या टाक्यातलं पाणी हत् ! अन खायला तरी काय ? शिळं पाकं ! कोणीतरी मारलेलं , कापलेलं ! कळतं तरी का त्यांना काही शिकारीतल ? कोणत्या प्राण्याची निवड करावी खाण्या साठी हे सुध्दा कळत नाही . ना चव ना ढव ! किती दिवस झालेत आपल्याला मनासारखं पोटभर खाउन ? अगदी लख्ख आठवतं ते सुंदर हरीण नुकताच वयात आलेलं , गोंधळलेलं , आपल्या तावडीत सापडलच होतं , अगदी तोंडाशी आलेली शिकार ! पण तेव्हाच काय घात झाला कुणास ठाऊक ? जागे झालो तर पिंज-यातच तेव्हापासून आपण इथेच . ही काय जागा आहे राहण्याची ? भटकण्याची गोष्टं सोडा , पाय मोकळे करण्यासाठी सुध्दा धड जागा नाही इथे . अगदी मरून जावसं वाटतं , दिवस भर गोंगाट नुसता , झोपू पण देत नाही . कितीतरी दिवसांपासून रात्री कसली ठकठक सुरु आहे समोर कुणास ठाऊक ? समोरच्या वाटे पलीकडे कसलासा जाळ्यांचा पिंजरा उभारताहेत ? हं आणणार असतील कोणत्या तरी प्राण्याला . सुचतं तरी काय दुसरं ह्यांना ? जाऊ दे आज तरी ते ठकठक करणारे अजूनतरी आलेले दिसत नाहीत , दिवसा कुठे झोपू देतात ? रात्रीचं जागरण कधीच बंद झालय . इथे आल्या पासून सगळ्या सवयीच पार बदलून गेल्या आपल्या ! पडावं आता थोडावेळ तरी शांत पणे . अं हं ! कुणाचा आवाज हा ? थोडा वेळ्ही शांत पणे पडु देत नाहीत , हत् ! कोण आहे ह्या वेळी ? हा तर हरणांचा गंध ! कुठून ? खूप सारी हरणं असली पाहिजेत , वासावरूनच कळतंय . कुठे ? अरे समोर जाळीच्या पिंज-या मागून कुणाचे डोळे चमकताहेत ? हरणाचेच की ? कसा विसरील मी ? तीच तर माझी सगळ्यात आवडती शिकार होती त्या दिवसात . अरे तेच हरीण आवाज देताय की मला , जाळीवर पाय टाकून उभं आहे तेच ! हो तेच ! अगदी तेच हरीण ! आपलं शेवटच . हे इथं कसं ? काय करतंय इथं ? तू इथे कसा ? वाघाने हरीणाला विचारले . ओळखलंस मला ? हरीणाने विचारले . ओळखलं ओळखलं ! कसा विसरणार तुला मी ? वाघ म्हणाला . अन मी पण तुला ? हरीण म्हणाले . खरंच की ! वाघ म्हणाला . तू इथे कसा रे ? वाघाने परत विचारले . तुझा कदाचित विश्वास नाही बसणार पण मी आता तुझाच विचार करत होतो . माझा विचार ! हरीण आश्चर्यचकीत झाले , खरंच विश्वास नाही बसत , मला तर वाटलं की तू मला विसरूनही गेला असशील . शक्य तरी आहे का तुला विसरणं ? तू माझी शेवटची शिकार होतास अगदी तोंडाशी आलेली ,वाघ म्हणाला , तेव्हाच तू मला खाउन टाकलं असतंस ना तर फार बरं झालं असतं रे , हरीण म्हणाले . का रे ? असं का म्हणतोस ? वाघाने विचारले . ह्या सगळ्यातून तर सुटलो असतो ना ! हरीण म्हणाले . हू ! वाघाने उसासा सोडला , असं जगण्या पेक्षा मरण बरंच की ! एका अर्थानी बरोबरच आहे तुझं म्हणणं , पण तू इथे कसा पोहचलास ? वाघाने विचारले . तुझ्या सारखाच , जसा तू आलास तसाच मी ही आलो , अजून कसा येणार इथे ? हरीण म्हणाले . हो ते ही खरंच , स्वत:हून इथे कोण येणार ? पण तू तर पळून गेला होतास ना मला चांगलं आठवतंय ? मी जेव्हा खाली पडलो तेव्हा तर तू माझा नजरेआडही झाला होतास . वाघ म्हणाला . तोच तर मूर्खपणा झाला ना माझा , हरीण म्हणाले . काय झालं रे नंतर ? तूच सांग , मला तर काहीही आठवत नाही , वाघ म्हणाला . अरे मी तर जीव घेऊन पळत होतो वाटत होतं संपला आपला कारभार ! बघ तुझे पंजे ही पोहोचले होते माझ्याजवळ , बघ अजूनही आहेत ओरखडे तुझ्या नखांचे , हरीण म्हणाले . अरे रे ! च च ! जाऊ दे . वाघ म्हणाला . हो ! आता काय त्याचं ? हरीण म्हणाले . तुला आठवतंय आपण पळत असताना मागून मोठ्ठा आवाज आलेला ? हो . मग मागे कंबरेला बोचलं काही तरी , वाघ म्हणाला . मग तू कोसळलास , हरीण म्हणाले . हो रे , मग मला एकदम गुंगी यायला लागली , बोचल्यां नंतर फार धावूही शकलो नाही मी , झापड येत होती डोळ्यावर एकदा पडल्या नंतरच तर काहीही आठवत नाही मला , वाघ म्हणाला . मला ही खूप दूर गेल्यावर कळलं ते , हरीण म्हणाले . मी टेकडीवर पोहचल्यावर कळलं की आता काही धोका नाही म्हणून . मग मी मागे वळून खाली बघितलं तर चार माणसं तुला कशानी तरी बांधत होती , मी म्हटले चला ह्यांच्या मुळेच जीव वाचला आपला , किती चांगलं वाटत होतं मला तेव्हा त्यांच्या बद्दल , पण ! पण काय ? पुढे काय झालं ? वाघ म्हणाला . कसचं काय रे ! एकाचं लक्ष माझ्याकडे गेलं , अन संपलं सगळं ! हरीण म्हणाले . का काय झालं ? वाघाने विचारले . तेच रे , त्यांच्यातील एकाने त्याचा हात पुढे केला त्याच्या हातात काही तरी होतं काय ते मला दिसलं नाही पण तसाच मोठ्ठा आवाज झाला अन माझ्याही अंगात काहीतरी रुतलं , मग मला पण तुझ्या सारखी गुंगी आली , हरीण म्हणाले . तू इथे कधी आलास ? मला तर ह्या आधी कधीही दिसला नाहीस ? वाघानी विचारले . कसा दिसणार ? तुला तुझ्या पिंज-यातून कितीसं दिसतं ? हरीण म्हणाले . हो तेही खरचं की ! वाघ खिन्न होऊन म्हणाला , तुम्हाला मोकळं फिरू देतात का ? नाही रे , हरीण म्हणाले , पण आमचा पिंजरा तुमच्या दगडमातीच्या पिंज-या पेक्षा बराच मोठा असतो ? जाळीचा , त्यात थोडं फार फिरता येतं पण त्यात आपल्या रानातल्या फिरण्या सारखी मजा कुठे असणार ? हो ते ही खरंच ! पण तुला कसं कळलं माझ्याबद्दल ? तू कुठे होतास आजवर ? वाघ म्हणाला . अरे आत्ता पर्यंत आम्ही सगळे पलिकडच्या भागात होतो कोप-यात , आता इथे आणलं आम्हाला . तिथे आता पुष्कळसे दगड मातीचे पिंजरे बनवत आहेत , अगदी तुझ्या पिंज-या सारखेच , हरीण म्हणाले . मग मला आता तिथे नेणार की काय ? वाघ म्हणाला . मला कसं ठाऊक असणार ? पण एक मात्र बरं झालं आपली त्यामुळे भेट तरी होऊ शकली , हरीण म्हणाले . किती तरी दिवसांपासून तुला भेटायची इच्छा होती , तिथे फक्त तुझा आवाजच ऐकू यायचा मला , मी ओळखलं तुला तुझ्या आवाजावरून , तुझा आवाज मी कसा विसरील ? आपल्या वनातले सगळे आवाज अगदी मनात बसलेले आहेत . हो रे किती किती छान होतं ना आपलं वन , अगदी एकेका प्राण्याची आठवण येते , वाघ म्हणाला . हो ना मलाही येते , पण काय करणार ? हरीण उदास झाले , आता तर तिथे काहीही नाही . काय ? वाघ म्हणाला , सगळ्याना पकडलं का त्यांनी ? नाही रे आता तर तिथे आपलं जंगलच नाही , हरीण म्हणाले . म्हणजे ? वाघ म्हणाला . माणसांनी ते सगळच्या सगळं जंगल कापून टाकलंय , हरीण म्हणाले . मग आता तिथे काय आहे ? वाघ म्हणाला . आता तिथे मोठ्ठ गाव आहे आपल्या रानातल्या गावांसारखं लहान नाही , खूप खूप मोठ्ठ गाव , दगडमातीच्या मोठ्ठ्या मोठ्ठ्या वाटा , दगड मातीचीच उंचच उंच घरं अगदी पहाडां पेक्षा उंच ! आपल्या रानतल्या घरां सारखी नाही , काही घरं तर खुप खुप मोठ्ठी आहेत , त्यातुन खुप मोठ्ठा आवज येत असतो , आणि सतत खुप धूर ही येत असतो असं म्हणतात , आणि आपल्या नदीचं पाणी अडवलयं त्यांनी दगड मातीनी , हरीणानी सांगितले . कशाला ? वाघाने विचारले . आता ते मला कसं ठाउक असणार ? हरीण म्हणाले . हो ते ही खरंच म्हणा ! आणि आपल्या रानातली माणसं , ती कशी आहेत ? वाघाने विचारले आता त्यांच्या पैकी कुणीही तिथं नाही , निघुन गेलेत सगळे , हरीणाने सांगीतले . अरे रे ! पण हे सगळं तुला कसं ठाऊक ? वाघाने विचारले . हरीण म्हणाले , मागच्याच थंडीत अजूनही काही हरणं आली ना इथे आपल्या रानातली , त्यांनीच सांगितलं . अरे रे ! किती वाईट झालं ना ? वाघ म्हणाला . हं ! काय करणार ? हरीणाने उसासा सोडला . माणुस किती वाईट अन क्रूर आहे ना ? वाघ म्हणाला . हू ! हरीणाने उसासा सोडला , पण सगळेच सारखे नसतात रे , हरीण म्हणाले . हू ! वाघ म्हणाला . आपल्या जंगलातली माणसं कुठे इतकी वाईट होती सांग ? हरीण म्हणाले . हो ते ही खरंच , वाघ म्हणाला . कधीतरी त्यांनी उगाच आपल्याला त्रास दिला का ? हरीण म्हणाले . नाही कधीच नाही , वाघ म्हणाला . कधी तू त्यांच्या गावात शिरलास तर ते प्रतिकार करायचे , हरीणांनाही मारून खायचे कधी कधी , पण तेही कधी तरी आणि फक्त चवीसाठी आणि फक्त भुके पुरतं , तेवढं तर चालायचंच जंगलात पण मुद्दाम म्हणून असं पकडून , कोंडून त्रास दिलाय का त्यांनी कधी तरी ? हरीण पुढे म्हणाले , जेव्हा ते काही वाजवायचे , नाचायचे ते किती किती ऐकावसं अन बघावसं वाटायचं , ते स्वर ऐकून आम्ही तर थबकून जायचो अन कान टवकारून ऐकत राहायचो , हरीण म्हणाले . मलाही ते खूप आवडायचं रे , वाघ म्हणाला . किती किती एकरूप झालो होतो रे आपण ! नदी , पहाड , जंगल , प्राणी आणि माणूस , सगळं किती सुंदर होतं ! हरीण म्हणाले . हो , गेलं ते सगळं ? वाघाने उसासा सोडला . अरे एक तर तुला सांगायचं विसरूनच गेलो मी ! हरीण म्हणाले . काय ? वाघाने विचारले . अरे आपल्या रानातल्या माणसांचे बच्चे दिसले होते मला इथं , हरीण म्हणाले . इथं ! इतक्या दूर ? इथे कसे काय पोहचले ते ? वाघाने विचारले . अरे आत्ताच सांगितलं नाही का आता सगळं जंगल नष्टं झालंय म्हणून , आता रानातली गावंही राहिली नाहीत ती देखील संपलीत ना सगळ्यांसोबत ? आपल्या रानातल्या माणसांचीही अगदी आपल्या सारखी अवस्था झाली आहे . जंगल कापल्या गेलं आता ते तिथे कसे राहणार ? काय खाणार ? तेही निघून गेले तिथून . निघून कशाला पळ्वूनच लावलं म्हणे ह्यांनी त्यांना ! हरीण म्हणाले . हं ! वाघ म्हणाला . आता त्यांना आसरा कुठे आहे ? वाट चुकून आले असतील ते बच्चे कदाचित . मी तर त्यांना त्यांच्या गंध आणि उच्चारावरूनच ओळखलं , मी तर सतत त्यांच्या पुढेपुढेच करत होतो , उपाशी दिसत होती ते , हरीण म्हणाले . अरे रे ! वाघाचा चेहरा उतरला होता . कुठे गेले ते मग ? ऐक , तेच तर सांगतोय , हरीण म्हणाले , त्यांनी इथल्या एकाच्या हातातून काहीतरी ओढलं आणि पळू लागले . मग ? वाघांनी विचारले . किती आरडाओरडा झाला म्हणून सांगू ? पकडलं सगळ्यांनी त्यांना अन खूप मारलं , रक्ताळून गेले होते बिचारे , हरीण म्हणाले . अरे रे ! आपल्या जातीतल्यां सोबतही हे असे वागतात ? मग काय झालं ? वाघाने विचारले . पकडून घेऊन गेले त्यांना , हरीण म्हणाले . कुठे ? वाघानी विचारले . कुठे म्हणजे ? कुणालाही पकडून हे कुठे टाकतात ? हरीणाने प्रतिप्रश्न केला , कदाचित त्यांनाही आपल्या सारखं पिंज-यातच टाकलं असेल कुठेतरी . हं ! वाघ म्हणाला , अजून येतंच काय ह्यांना ? अन पिंज-यांची काय कमी आहे ह्यांच्या कडे ? आपण तरी काय करू शकतो , हरीण खिन्न होउन म्हणाले . हू ! वाघ म्हणाला . तू किती उतरलास रे ! पूर्वीची रया काही राहिली नाही तुझी , हरीण म्हणाले . कशी राहणार तूच सांग ? वाघ म्हणाला . ते ही खरंच म्हणा , पण जंगलात काय रुबाब होता तुझा , हरीण म्हणाले . आता तर तुझ्या डरकाळीत पहिले सारखा दरारा राहिला नाही , हरीण म्हणाले . जाऊ दे रे , पहिले सारखं काय राहिलंय तूच सांग ? पहिले कुणाची तरी छाती होती का माझ्यापुढे यायची , तो सिंह तरी माझ्या मधे यायचा का कधी ? पण इथे ! इथे मात्र कुणीही येऊन खडा मारून जातो , मी असा बंदिस्त काय करणार ? आजकाल तर डरकाळी फोडायची इच्छाही होत नाही पहिले सारखी . कधी चिडून एखादवेळा गुरगुरलो तर ही माणसं घाबरून मागे सरकतात पण मग थोडया वेळानी खदाखदा हसायला लागतात , इतकं वाईट वाटतं म्हणून सांगू ? असं वाटतं की ह्या अपमाना पेक्षा मरण बरं , वाघ म्हणाला . हू ! आता हरीणाने उसासा सोडला . पण काय रे ? वाघाने हसून हरणाला विचारले , जंगलात असताना किती घाबरायचास मला , आता भीती नाही वाटत का माझी ? खरं सांगू ? हरीण म्हणाले , आता मला तुझी इतकी भीती नाही वाटत . तू तर बोलून चालून वाघ आहेस , जसं मी पाला , गवत खातो तसं तू मला खाशील हे तर चालायचच रानात , ते तर आपण बदलू शकत नाही , पण तू खाशील तर फक्त भुके पुरता , पण कमजोर म्हणून उगाच त्रास तर देणार नाहीस ? हरीणाने वाघाला विचारले . खरं आहे तुझं म्हणणं , वाघ उत्तरला . ते जाऊ दे एक विचार कर , हरीण पुढे म्हणाले , आपण तर वेगळ्या जातीचे आपल्याशी हे कसे वागतात ते एकवेळ सोडुन देउ , पण हे आपल्या जातीतल्यांशीच कसे वागतात बघ ना ? इतका दुष्टपणा कोणत्यातरी जनावरात आढळतो का सांग ? नाही रे , वाघ म्हणाला . म्हणूनच मला फार भीती वाटते रे ह्यांची , हरीण म्हणाले . हूं ! खरं सांगू ? वाघ म्हणाला . बोल , हरीण म्हणाले . मला पण , वाघ म्हणाला . बाप रे ! तुला पण ? मग तर संपलंच की सगळं ! हरीण उदास झाले . ( समाप्त )
लेखनप्रकार

याद्या 2755
प्रतिक्रिया 11

प्राण्यांच्या दृष्टीने सर्वाधिक अपमानास्पद आणि घाणेरडी शिवी असेल तर ती म्हणजे 'माणूस'.

साधे सरळ व सुंदर मनोज्ञ भावविश्व उभे केलेत मालक. झकास. मीच लिहिलेली एक गोष्ट ह्यावरून आठवली.:- http://www.misalpav.com/node/3244 (किंवा तीच थोडी नीटनेटकी बांधून व्यवस्थित http://www.manogat.com/node/18817 इथे लिहिलीय)

In reply to by मन१

तुमची कथा वाचली , नेट वर वचलेली सर्वात सुंदर कथा म्हणायला हरकत नाही . सगळ्या वाचकांनीही ती अवश्य वाचावी . पु.ले. शु .

जयनीतः साधी, सरळ कथा आवडली. (उत्तम 'बोधकथा' असं म्हणावसं वाटतं, पण आपण मनुष्यांनी 'बोध' घेतला तरच खरं. नाहीतर कथा वाचली, अन् पुढचा पिंजरा बांधायला निघालो, असं व्हायचं.)

>>>>आपण तर वेगळ्या जातीचे आपल्याशी हे कसे वागतात ते एकवेळ सोडुन देउ , पण हे आपल्या जातीतल्यांशीच कसे वागतात बघ ना ? इतका दुष्टपणा कोणत्यातरी जनावरात आढळतो का सांग ? माणुस हे एकटं जनावर आहे जे कपडे घालतं. असे कुठेतरी वाचल्याचे सहज आठवले.

सर्व वाचकांना मनपूर्वक धन्यवाद .