Skip to main content

धुडकी, धुडकी, धुडकी लागे...

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 22/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
धडकी भरली ना शीर्षक वाचून? हे गाणं आहे 'मेरे ब्रदर की दुल्हन' या अविस्मरणीय चित्रपटातलं. परवा टीव्हीवर हा चित्रपट बघण्याचा योग आला. करण्यासारखे इतर काहीच नव्हते. ते तसेही कधीच नसते. म्हणजे वाटतं खूप, हे करावं, ते करावं, असं केलं तर खूप मजा येईल, तसं केलं तर जिंदगी बदल जायेगी वगैरे वगैरे पण ऐनवेळेस अस्मादिकांचा अवसानघातकी आळस आमच्या आवेशावर अगदी अलगदपणे ओकतो आणि मग आमचा अमूल्य वेळ आम्ही सोफ्यावर लोळत घालवतो. असाच मी आळसावत पडलो होतो आणि टीव्हीवर 'मेरे ब्रदर की दुल्हन' नुकताच सुरु होत असलेला पाहिला. हिट चित्रपट म्हणून बघायला सुरुवात केली. कत्रिनाचा आमच्या धुंद, स्वप्नील डोळ्यांमध्ये चढलेला कैफ हे देखील कारण होतेच. चित्रपट सुरु होतो इम्रान खानचा लंडनस्थित भाऊ त्याला स्वतःसाठी (म्हणजे लंडनस्थित भावासाठी) बायको शोधण्याची कामगिरी सोपवतो या प्रसंगापासून. म्हणजे साधारण अशा अर्थाची चित्रपटाची सुरुवात आहे. हा भाऊ म्हणजे 'तेरे बिन लादेन' मधला अली जाफर. हाच चित्रपटाचा दिग्दर्शकदेखील आहे. तर हा 'भाईसाहब' लंडनमध्ये काहीतरी खूप मोठं काम करत असतो. रोजचे कपडे बदलावेत त्याप्रमाणे आपल्या गर्लफ्रेण्ड्स बदलणे हे त्याचा मोठ्ठ्या कामांपैकी एक काम असते. शेवटी आपला भाऊच आपल्यासाठी एक चांगली बायको शोधू शकेल असा त्याला साक्षात्कार होतो आणि ही अवघड कामगिरी तो आपल्या भावावर सोपवतो. इकडे इम्रान सिनेमा क्षेत्रात वगैरे काहीतरी काम करत असतो. आता एवढं जोखमीचं काम अंगावर येऊन पडल्यावर याला काही सुचतयं का? हा हात धूवून भाईसाहबसाठी बायको शोधण्याच्या कामात स्वत:ला अगदी झोकून देतो. मग इम्रानला आणि याच्या टोळभैरव मित्रांना एक आयडिया सुचते. ते सिनेमाच्या पोस्टरसारखे एक पोस्टर तयार करून पेपरमध्ये छापून आणतात. मित्रांना नेहमीप्रमाणेच स्वतःचं आयुष्य, काही कामधंदे नसतातच; त्यामुळे ते २४ तास आपल्या जीवश्च कंठश्च मित्राच्या सेवेत स्वतःला वाहून घेतात. मग काय, खूप प्रपोजल्स येतात. प्रत्येक ठिकाणी इम्रान आणि त्याचे आई-वडील मुलगी बघायला जातात. मुली अत्यंत बाष्कळ प्रश्न विचारतात. एक मुलगी त्याला 'तुझी शिवून देऊ का?' असं विचारते. तो घाबरतो. च्यायला, हा काय प्रकार आहे? कधी फाटली? मग तो विचारतो 'काय'? ती म्हणते 'शर्ट'. तो प्रश्नार्थक चेहर्‍याने बघतो. ती एक्स्प्लेन करते की तिला शिवण्याचा छंद आहे. अशा उच्च दर्जाचे विनोद पाहून मन थक्क होत होते. नंतर कंवलजीत इम्रानला फोन करून घरी येण्याची विनंती करतो. स्वत: लग्नाळू असल्याप्रमाणे तो आणि त्याचे आई-वडील जातात. तिथे कत्रिना कैफला बघून इम्रानला झीट येते. 'तुम?' 'तुम?' असा शंभरदा बघितलेला प्रसंग घडतो आणि मग इम्रानच्या पँटवर अवघड ठिकाणी चहा सांडतो. आलोकनाथछाप गिळगिळीत हसत कंवलजीत कत्रिनाला त्याला आत घेऊन जायला सांगतो. कत्रिना त्याला डाग धुवायला मदत करते आणि मग पुसण्यासाठी नॅपकीन देते. तो मनात 'दाग अच्छे हैं' असे म्हणतही असेल कदाचित. अर्थात, पँट धुतल्याने ती मोक्याच्या ठिकाणी ओली होते हा गडगडाटी हसायला लावणारा विनोद आपल्याला गडबडा लोळायला लावतो. मग दोघे टेरेसवर येतात आणि गेस व्हॉट? कत्रिना इम्रानला एकदम सिगारेट मागते. 'चल निकाल' आता बोला. एका तरूण आणि सुंदर मुलीने एका तरुण आणि उपाशी मुलाला (त्याने तिच्याकडे आल्यानंतर काही खाण्याच्या आतच हा प्रसंग घडतो) 'चल निकाल' असे म्हटले तर त्याची काय अवस्था होईल? डोळ्यासमोर काजवे चमकतील? माझ्यासारख्यांना आजोबा-पणजोबा आठवतील; वरण-भात आठवेल; गौरी-गणपती आठवतील; 'आमची माती आमची माणसं' आठवेल; पन्हं आणि कोकम सरबत आठवेल...इम्रान निमूटपणे सिगारेट काढून देतो. ती आई-बाप, भाऊ, आणि बघायला आलेले पाहुणे अंगणात बसलेले असतांना निवांत सिगारेट ओढते. सिगारेट ओढल्यानंतर येणारा तोंडाचा वास, हाताचा वास कसा घालवायचा या प्रश्नामुळे कित्येकांची सिगारेट सुटली आहे. जगात हाच एक प्रश्न अजून अनुत्तरित आहे. असं जर काही संशोधन झालं आणि असं जर काही रामबाण प्रोडक्ट बाजारात आलं तर 'अ‍ॅपल'च्या आयफोन्सपेक्षा जास्त नफा कमावून ती कंपनी शतकानुशतके बिनबोभाट बिझनेस करेल यात शंका नाही. माझा एक मित्र घरी जातांना सिगारेट ओढतो आणि संशय येऊ नये म्हणून दोन्ही हात (स्वत:च्या) काखेत आणि दिवसभर पायात आणि बुटात घालून घामेजलेल्या सॉक्समध्ये येथेच्छ फिरवतो. यामुळे संशयास्पद वास येत नाही असं त्याचं म्हणणं आहे. हॉल्स, कश्मीरी सौंफ, मेंटॉस हे सगळे संशयित म्हणून आधीच ख्यातकीर्त आहेत. असं करतांना घाण वाटत नाही का या माझ्या प्रश्नावर त्याचं उत्तर होतं की काख आपलीच, पाय आपलेच, बूटही आपलेच आणि सॉक्सही आपलेच; मग त्यात घाण काय वाटायचं? आपल्या सकाळच्या काही सवयींच्या बाबतीत आपले निर्ढावलेपण कदाचित याच स्थितप्रज्ञ वृत्तीतून आले असावे. असो. तर अशी ही बिनधास्त कत्रिना सिगारेट ओढून निवांत खाली येते. इथे फ्लॅशबॅक सुरु होतो. एक सहल. कत्रिना कैफ मुलींच्या गाडीच्या डिझेलच्या टाकीत साखर टाकते. का? तर मुलींना मुलांच्या बसमध्ये बसता यावे म्हणून. मग जोरदार आरोळी ठोकून ती मुलांच्या बसमध्ये शिरते. घटाघट बिअरचा कॅन रीता केल्यावर 'भारतरत्न' पुरस्काराप्रमाणे ती मुलांना बिअर कॅन्स देते. मुलं पागल होतात. नंतर तंबूत एक मुलगा तिला 'स्पर्श' करतो. ती लगेच भडकून बाहेर येते. 'मैं नये खयालों की हूं इसका मतलब ये नही के मैं किसीके साथ भी सो सकती हूं...' वगैरे फंडे मारून ती बाहेर येऊन बसते. मग इम्रान तिला चहा देतो. ती शांत होते. नंतर (की आधी?) ती 'धुडकी धुडकी धुडकी लागे' हे गाणं मोठ्या झोकात म्हणते. तिला गाता येतं, तिला गिटार वाजवता येते, सिगारेटी फुंकता येतात, दारू ढोसता येते, भांडणं करता येतात, अगदी कमी कपडे घालून नाचता येतं...असं तिला सगळं काही येत असतं. मग गाणं म्हणत असतांना तिला पोलीस पकडून घेऊन जातात. भगतसिंग जसे हसत-हसत फाशीच्या तख्तापर्यंत गेले असतील तशी ही बया हसत-हसत चेकाळलेल्या पोरांना अभिवादन करत पोलीसांसोबत हातकड्या घालून जाते. पुन्हा वर्तमानात. इम्रानला ही पोरगी आपल्या भावासाठी पसंत पडते. दारू ढोसून टुन्न होणारी, सिगारेटी फुंकणारी, मनमुराद त्वचादर्शन घडवणारी, अटक होण्यात आनंद मानणारी ही सर्वगुणसंपन्न मुलगी त्याला आपली वहिनी म्हणून अगदी योग्य वाटते. कारण? 'तुम मुझे बहुत ऑनेस्ट लगती हो.' आम्ही खल्लास. उद्या कोणी रात्री खून करून सकाळी हजर झाला आणि कुणालातरी म्हटला: "साहेब, तुमच्या बायकोचं आणि माझं झेंगाट होतं. मी तिला माझ्यासोबत पळून जाण्यासाठी खूप समजावून सांगीतलं; ती म्हणायची की तुमची आबाळ होईल. माझी सटकली. काल रात्री तिचा मुडदा पाडला. आपण जे करतो ते प्रामाणिकपणे कबूल करतो. कहा-सुना माफ करना, दिल भी अपना साफ करना. जेलमधून आलो की बसू आँटीच्या बारमध्ये...काय?" तर साहेबांनी गलबलून त्याला उराशी कवटाळावं. कढत आसवांची दोन टीपं त्याच्या खांद्यावर पडावीत आणि मग साहेबांनीच त्या पश्चात्तापदग्ध सोन्यासारख्या लख्ख माणसाला चहा करून पाजावा. "भीम्या, तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस नाही पाहिला. (तुझे उपकार मी कसे फेडू?)" अशातली बात झाली ही. असो. मग व्हिडीओ-चॅटींगद्वारे भाईसाहब आपली होणारी बायको बघतात. त्यांना ती आवडते. मग सगाईचा दिवस येतो. इतके दिवस इम्रान आणि कत्रिना (म्हणजे होणारे दीर-वहिनी) मनसोक्त भटकतात. त्यांना कुणीच काही म्हणत नाही. कत्रिनाचं इम्रानला कडकडून भेटणं, अगदी दोघांच्या बॉड्या एक होतील की काय असं भेटणं, कपडे बदलवून त्याला दाखवणं वगैरे जोमात सुरु असतं. कुणालाच काहीच आक्षेप नसतो. रात्री-अपरात्री स्विमींग पूलवर बसून गप्पा ठोकणं, दारू ढोसणं हा कार्यक्रम मस्त सुरु असतो. त्याला ही काही प्रॉब्लेम नसतो. कसा असणार? ती जे काही करते त्यात ऑनेष्टी असते ना!! कोई कर भी क्या सकता हैं? आता इतकं एकमेकांच्यात घुसळल्यावर दुसरं होणार काय हो? मग जसाजसा लग्नाचा दिवस जवळ येतो तसातसा दोघांना साक्षात्कार होतो की दोघांच्या नुसत्या बॉड्याच नाही तर दिल पण एकमेकांच्या घुसळलेत. आता आली का पंचाईत? आता काय करावं? इम्रानला एक आयडिया सुचते. तो भावाला खूप भांग पाजून त्याच्याकडून त्याच्या आधीच्या गर्लफ्रेंण्डवर त्याचं खूप प्रेम आहे असं वदवून घेतो आणि तिला लंडनवरून ताबडतोब बोलवून घेतो. ती झटक्यात आग्र्याला येते. तिला बघून भाईसाहेबांची तंतरते. मग तो इम्रानकडे येतो. इम्रान म्हणजे आयडियाजची खाणच असतो. इम्रानला पुन्हा एक आयडिया सुचते. तो भाईसाहबला त्याच्या गर्लफ्रेंण्डसोबत पळून जायला सांगतो. शेवटी तो पळून जातो आणि खानदान की इज्जत रखने के लिए इम्रान कत्रिनाशी लग्न करतो आणि हा विनोदपट एकदाचा संपतो!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14306
प्रतिक्रिया 59

प्रतिक्रिया

भन्नाट वर्णन. असले चित्रपट बघण्यासाठी मी दोन-तीनशे रुपये खर्चून कोणत्याही मल्टिप्लेक्समध्ये जात नाही, याचा आनंद/ अभिमान आहे....

चित्रपट टुकार पेक्षा देखील खालच्या दर्जाचा आहे, असे ऐकले होते, त्याचे कारण कळले!

हसुन हसुन पुरेवाट झाली! धम्माल चित्रपट परी़क्षण लिहावे तर ते समीरसूरांनी!

आमचा दंडवत घ्या हो. कसलं भारी लिहीलय! ह.ह.पु. :lol: :) :lol: - (तरीही कतरीनाचा कैफ चढणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

ह्येच म्हणतो :) :)

काही कोलेजामध्ये raging म्हणून 'जानी दुश्मन' हा चित्रपट दाखवण्याची प्रथा आहे असे ऐकले. हा चित्रपट देखील उपयोगी ठरू शकतो वरिष्ट लोकांना !

In reply to by sagarpdy

पटतंय पण साली कैथ्रीना मध्ये येतंय! तिला बघून पोर अस राग्गिंग रोज व्हाव असा नवस करतील देवाला.(काय कपडे घातलेत राव तिने!)

हा भाऊ म्हणजे 'तेरे बिन लादेन' मधला अली जाफर. हाच चित्रपटाचा दिग्दर्शकदेखील आहे.
अली अब्बास झफर (दिग्दर्शक) आणि अभिनेता अली झफर वेगवेगळे आहेत! :-) बाकि परिक्षण अफलातून !!
अटक होण्यात आनंद मानणारी ही सर्वगुणसंपन्न मुलगी त्याला आपली वहिनी म्हणून अगदी योग्य वाटते. कारण? 'तुम मुझे बहुत ऑनेस्ट लगती हो.'
=)) =))

In reply to by दिपक

दिपक, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. विकीपेडियावर मात्र दोघांची एकच लिंक आहे आणि अर्थात ती चुकीची आहे. अजून एक, ते गाणं 'धुनकी धुनकी धुनकी लागे' असं असावं असं वाटतयं. अर्थात, त्याने काही फरक पडत नाही म्हणा. धुडकी असो किंवा धुनकी, शेवटी धू धू धुण्यासारखाच पिक्चर आहे. :-) --समीर

__/\__ समीरशेठ आम्ही उगा तुमचे फॅन नाही बघा. जबर्‍यादस्त लिहीले आहे. हे असे चित्रपट काढणारे काय दारु ढोसून चित्रपट काढतात का काय असे वाटते. का आजकाल हे प्रेक्षकांना गृहीत धरुनच चित्रपट निर्मितीला सुरुवात करतात ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

पराशेठ, हे बघूनच आजकालची पोरं काहीतरी थेरं करतात असं वाटायला लागलयं मला. अरे काय ते कपडे, काय ती बिलगाबिलगी, काय ते दारू ढोसणं, काय ते विड्या फुंकणं....आणि काय तो मठ्ठपणा...लैच गचाळ!! आजकालच्या पोरांना वाटतं हेच आयुष्य आहे...मग वागतात तशीच.... --समीर

In reply to by समीरसूर

आजकालच्या पोरांना वाटतं हेच आयुष्य आहे...मग वागतात तशीच....
आणि मग शिणिमावाले म्हणतात 'समाजात जे चालले आहे त्याचेच प्रतिबिंब आमच्या चित्रपटात पडते' ;) मुळात तरुणाईचा सिनेमा म्हणजे बिकनी घातलेल्या, दारू - सिगरेटींचा आंनंद घेणार्‍या मुली, जाता येता फ*, तेरे माँ की इ. इ. चा मुक्तपणे वापर करणारी मुले, सकाळी कॉलेज कॅंटीन मध्ये आणि रात्री फक्त डिस्को मध्ये नाचणारा ग्रुप हेच असते का ? कोण ठरवते म्हणे हे ? हिरो हिरवणीच्या मागे लागला रे लागला की त्याला ती पटतेच पटते. ती आधी एंगेज असणे, हा हिरो तिला वेड** वाटणे, लाळघोट्या वाटणे असे काही काही घडत नाही. बरं हा जो को उपटसुंभ आपल्या मागे लागला आहे तो कालेजात जातो का ? अर्थार्जनासाठी काय करतो ? असले प्रश्न त्या हिरवणीला देखील पडत नाहीत. अवघड आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आणि मग शिणिमावाले म्हणतात 'समाजात जे चालले आहे त्याचेच प्रतिबिंब आमच्या चित्रपटात पडते'
खरयं! सुक्काळीच्या शिणिमावाल्यांना 'काहीबाही' विकायला 'काहीबाही' कारण लागतचं. - (समाजावर आपले प्रतिबिंब पडावे अशी इच्छा असलेला) सोकाजी ;)

हा हा हा भन्नाट लिहिलय. परवा सकाळी सोनीमॅक्स वर लागला होता आणि संध्याकाळी सोनी चॅनलवर. पण एका शहाण्या मित्राने आधीच सावधान केल्याने बघण्याच्या फंदात पडलो नाही. (अर्थात त्याला हे शहापण पदरच्या दमड्या खर्चुन मिळाल होतं म्हणा.)

सोत्रिंप्रमाणेच आमचेही दंडवत. तुमच्या सर्व धाग्यातल्या हा आमचा सर्वात फेवरिट झाला आजपासून. जितके चित्रपट भिकार येतील तितकी भारी परिक्षणं येतील, असा काही फॉर्म्युला असेल तर अधिकाधिक भिकार पिक्चर आलेले चालतील. धागा अर्थातच बुकमार्क केलाय. आम्हाला हा चित्रपट बघण्यास दोस्तांकडून वारंवार आग्रह होउनही स्वतःच्या दृढ्निश्चयाचा(की वाङनिश्चयाचे? ;-) ) अभिमान आहे. असाच एक भन्नाट लेख कोलबेरकडून आला होता मिपावर: - जोधा अकब्र संदर्भात http://www.misalpav.com/node/1148. आणि भडकमकर मास्तरांनी लिहिलेलं डीडीएलजे च्या शेवटचं अमरिष पुरीच्या मनातलं स्वगत तर ब्येष्टच. जर पोट फुटून खाली पडायची भीती असेल तर लेख वाचू नये.--वैधानिक इशारा. http://www.misalpav.com/node/1844

मी सुद्धा पहिला हा चित्रपट ...."एकदम बकवास" .... पण त्या चित्रपटापेक्षा तुमचे विश्लेषण ....लयच भारी ..... तिन मख्ख कलाकार एकत्र आले की बघा अशी महान "कलाकृती" बनते ..... ;) :) १) ती कतरिना तिला अक्टिंग चा ...ओ का ठो येत नाही .... (बिचारी...खूप प्रयत्न करतेय पण यश येत नाहीये पण तिचे चित्रपट कसे चालतात देव जाणो :) २) तो इम्रान काय करतो नक्की ?? म्हणजे हसतो का रडतो ? :-) ३) आता राहिला तो अली जफर....जाऊदेत याला माफ करूया ....(नाहीतरी आपण पाकिस्तानिना माफच करत आलोय ) :)

In reply to by गौरी१२

>>तिचे चित्रपट कसे चालतात देव जाणो Smile कपड्यांना अलविदा केल्यावर म्हशिसारखा बघणाऱ्या बिपाशाचेही चित्रपट चालतात.कैथ्रीना त्यामानाने चांगली दिसते! >>तो इम्रान काय करतो नक्की ? सदा न कदा काहीतरी किसतो ते कमी नाहीये का? वरील दोन गोष्टींमुळे चित्रपट काही लोकांसाठी खूपच प्रेक्षणीय झालाय!

In reply to by किचेन

कैथ्रीना त्यामानाने चांगली दिसते! नुसते सुंदर दिसून चालत नाही .... अभिनय सुद्धा यायला हवा ....किती सिनेमे केले असतील त्या कतरिना ने ?? २५ एक तरी केले असतील पण तीच हिंदी ऐकलंत ?? काय बोलते ती हिंग्लिश ??(एकही dialogue तिचा पूर्ण हिंदी नसतो ...त्यात ३-४ इंग्रजी शब्द असतातच ) :) मला तर तिचे dialogue कान लाऊन ऐकले तरी समजत नाही ...कशातच सुधारणा नाही ... ना अभिनयात ना भाषेत .....नुसते थोबाड चांगले असून काय उपयोग ?? ......आपण त्यांचा अभिनय बघायला जातो. (निदान मी तरी ) सुंदर चेहरे बघायचे असतील तर..... हिंदी चित्रपट कशाला ?? त्या सेरीअल मधल्या मुली (हिंदी / मराठी ) किती सुंदर दिसतात ... (आपल्या मराठीत किती सुंदर चित्रपट बनवतात आजकाल ... ...मराठीत एवढे चांगले कलाकार आहेत....सुंदर नसतील दिसायला हिंदीलोकांचा मानाने पण किती सुंदर स्टोरी असते त्या चित्रपटांना .... ) :)

In reply to by गौरी१२

नुसते सुंदर दिसून चालत नाही .... अभिनय सुद्धा यायला हवा ....किती सिनेमे केले असतील त्या कतरिना ने ?? २५ एक तरी केले असतील पण तीच हिंदी ऐकलंत ?? काय बोलते ती हिंग्लिश ??(एकही dialogue तिचा पूर्ण हिंदी नसतो ...त्यात ३-४ इंग्रजी शब्द असतातच ) मला तर तिचे dialogue कान लाऊन ऐकले तरी समजत नाही ...कशातच सुधारणा नाही ... ना अभिनयात ना भाषेत .....नुसते थोबाड चांगले असून काय उपयोग ?? ...... चालेल.. . कतरिना.. आहा.. ती डोळ्यासमोर उभी राहिली की अभिनय, हिंदी, सुधारणा या लेव्हलपर्यंत विचारक्षमता टिकली तर ना हे प्रश्न संभवतात...? ओठ वेळावून तिने इंग्लिश सोडा, स्वाहिली भाषेत जरी काही म्हटलं तरी ...................... ...असू दे कशीपण कतरिना.. चालेल..

In reply to by गवि

काय पण ते बाकी कतरिना वर प्रेम उतू जातेय ........अरे बाबा .... हात टेकले तुम्हा लोकांचा त्या कतरिना प्रेमापुढे ..... हि भुरळ थोड्यादिवासांची आहे :) ( मला तर ती अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही ..... तिचा पेक्षा ललिता पवार तरी बरी होती दिसायला ;) :P )

In reply to by गौरी१२

गौराक्का, ललिता पवारांचा उल्लेख इथे याबाबतीत खटकला. जाहिर निषेध. गेलेल्या माणसाबाबत काहीच बोलू नये म्हणतात. ललिता पवारांचा डोळा एका अपघाताने तिरका झाल्याचा उल्लेख वाचला आहे. नाहीतर त्या नायिका/ सहनायिका म्हणून काम करीत होत्या. नंतरही त्या तिरकसपणाचा त्यांनी चांगलाच उपयोग करुन घेतला आहे हे सगळ्यांना मान्य असावे. बाकी कतरिना आवडू नावडू शकणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला ती आवडत नाही म्हणून इतरांना आवडू नये असे थोडीच आहे? भुरळ आहे ते तुम्ही का सांगताय? तुम्ही देखील चित्रपटात काम करु शकता. आमच्याकडून बंधन नाही तसे करण्याबाबत. ;)

एकदम नव्या खयालांचाच चित्रपट वाटतोय. मज्या केलीत राव (मोफत बघीतला ते).

ओ राव.... आजच येक जर्मन युन माझ्या म्होरच्या खुर्चीवरची जागा बळकावुन बसलाय ना.... तुम्ही त्याचा जीवच घेणार हुता बरं.... ३-४ येळा माज्याकडं पाहु लागलं त्ये बेणं....खुळ्याच्या इसपितळातुन भाइर निगाल्यागत हसत हुतो मी अन त्ये हिकडं ध्यान द्यु लागलं..... ज्याम ** पिच्चर हाये म्हंजे.... पाहायलाच लागणार आता.... (** = जे वाट्टेल ते भरुन घ्या तिथं )

In reply to by वपाडाव

एकडाव बघाच तुम्ही वपाडाव! लै मज्जा ईल तुमास्नी. मला तर लै आच्चर्य याचं वाटत हुतं का मायला ह्या कार्टीला कुनीबी युन चिपकत व्हतं; ही पोरगी बी कुनाला बी जाऊन येड्यागत बिलगत हुती; आगदी अंग घासू घासू बिलगत व्हती मंग येक पोरगं युन बिलगलं तर हिनं येवडी बोंबाबोंब काऊन केली आसंन? थंड घेऊन त्याला सांगाता आलं न्हाई की भावा, जास लाडात यु नगंस; जास आगाऊपना करशीन त तुझ्या टिर्‍या फोकानं बडवीन्...तिचा तो अवतार पाहूनच ते बेनं सुसाट सुटलं असतं न्हवं?? पन प्रेक्षकांच्या डोस्क्यात कसं घुसलं अन ठसलं असतं की ही पोरगी लै आगाऊ हाये पन लै पवित्र बी हाये...म्हनून हे सर्व नाटक केलं तिनं... :-)

एकदम दणदणीत लेख. लै लै आवडला. समीरसुर ह्यांचे परिक्षण नेहमीच वाचावेच ह्या कॅटेगिरीतले असते असे नमुद करतो. - छोटा डॉन

कतरिनाचे चित्रपट 'फक्त बघण्या'चा प्रयत्न करायचा... अ‍ॅक्टींग वगैरे येते का असले प्रश्न कशाला ? ;) समीरसूरचे परिक्षण भन्नाट नेहमीप्रमाणे.

In reply to by प्यारे१

कतरिनाचे चित्रपट 'फक्त बघण्या'चा प्रयत्न करायचा
+१ - (कतरीनाचे चित्रपट 'फक्त बघणारा') सोकाजी

दोस्तलोकांची स्वतःची कामंधामं सोडून हिरो/हिरोईन ची सेवा, पोट्यापाण्याचे उद्योग सोडून सगळं करणारी हिरो-हिरोईन्स, इतरवेळी न दिसणारे पण हटकून लग्नात गोळा होणारे नातेवाईक, मशी डायलॉग्ज हे सगळं गृहीत धरूनच सिनेमे बघतो आता. शेवटचा हिंदी चित्रपट चार वर्षापुर्वी बघितला होता टिव्हीवर. ;)

सहहीच, मजा आली. हे धुडकी धुडकी आहे होय, मी धूळ्की धूळकी म्हणत होते आत्तापर्यंत. मातीत खेळताना म्हणायच गाणं-बिणं असावं असा समज होता.

मराठी चित्रपटासाठी प्रचंड अपेक्षा आणि हिदि चित्रपटा साठि मवाळ धोरण(नुसते हिरोईनचे दिसणे) असे का?

In reply to by मराठी_माणूस

प्रश्न प्रचंड आवडला. प्रश्नाला अनुमोदन. एक उत्तर असे की मराठी माणसे ही अव्वल दर्जाची भिकार** असतात. आपल्याच गोष्टींना नावे ठेवण्यात आपल्याला धन्यता वाटते. मागे कुणीतरी मराठी हॉटेलात भाकरीचे दहा की वीस रुपये होतात म्हणून आपण जात नाही असे सांगितले होते. पंजाबी रोटीला वीस रुपये देताना आपण रडत नाही मात्र बाजरीच्या भाकरीला देताना जीवावर येते. एकूणच मराठी माणसाचे "आपले ते कार्टे आणि इतरांचा तो बाब्या" अशी उलटी गत असते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मराठी माणसे ही अव्वल दर्जाची भिकार** असतात.@ ........ या वाक्याला टाळ्या शिट्या ........तरीही मला अभिमान आहे मराठी असल्याचा ;)

In reply to by गौरी१२

अभिमान आपल्याला पण आहे की मराठी असल्याचा. आणि वर मी आपल्याच माणसांना शिव्या घालून माझाच मुद्दा सिद्ध केला आहे ना :-)

In reply to by पुष्करिणी

ते गाणे पहिल्यांदा ऐकले तेंव्हा मलादेखील हाच प्रश्न पडला होता. मग गुगलबाबाला साकडे घातले आणि धुनकीचा हा अर्थ आम्हाला ज्ञात झाला. Dhunki means TRANCE of love... Kind of Magical Spell

In reply to by यशोधरा

यशोधरा, हा शब्द 'धुनकी' आहे. मी वर एका प्रतिसादात अशी शक्यता व्यक्त केली आहे. पण मला तो 'धुडकी'च ऐकू येत होता. शिवाय या पंजाबी शब्दांनी इतका उच्छाद मांडलाय हिंदी गाण्यांत की विचारू नका. काही काही गाणी तर कळतच नाहीत. फक्त चाली लक्षात राहतात आणि १-२ महिन्यांनंतर गाणी स्मृतिपटलावरून पूर्णपणे पुसली जातात. बल्ले, शावा, गल, तैनु, मैनु...गोंधळच गोंधळ. 'बँड बाजा बारात' मधले एक छान गाणे आहे, "दम दम दम मस्त हैं, ये कैसी जस्त है....." हे गाणं इतकं अगम्य आहे की काहीच कळत नाही. या पहिल्या ओळीतला 'जस्त' काय भानगड आहे? झिंक का? पण झिंक त्या गाण्यात टाकले तर काही अर्थच लागत नाही. म्हणजे "खूप छान आहे हे सगळं, जसं पाण्यात झिंक विरघळं, तुम्ही वाजवा झ्याक संबळं अन हे बघून सोडीअम जळं..." असं काही आहे अशी शंका येते... :-) --समीर

In reply to by समीरसूर

>"खूप छान आहे हे सगळं, जसं पाण्यात झिंक विरघळं, तुम्ही वाजवा झ्याक संबळं अन हे बघून सोडीअम जळं..." निशब्द :) तुमच्या प्रतिभेला सलाम!

In reply to by समीरसूर

आली बघा. "खूप छान आहे हे सगळं, जसं पाण्यात झिंक विरघळं, तुम्ही वाजवा झ्याक संबळं अन हे बघून सोडीअम जळं." ढगाला लागली कळ च्या मीटरमध्ये अगदी परफेक्ट बसतंय हे बघा!

In reply to by समीरसूर

>>'बँड बाजा बारात' मधले एक छान गाणे आहे, "दम दम दम मस्त हैं, ये कैसी जस्त है....." हे गाणं इतकं अगम्य आहे की काहीच कळत नाही. जस्त चा अर्थ लागत नाही, मग "कैसी ये दस्त है" असावे. प्यार का बुखार असतो तशी ही नवीन कन्सेप्ट असावी :-) असो, लेख झकास. मस्त मज्जा आली.

In reply to by समीरसूर

जस्त = Quest असा शोध आम्हाला काही दिवसांपूर्वीच लागला आहे ;) अधिक माहिती व गाण्याच्या संपूर्ण इंग्रजी अर्थासाठी इथे वाचा. च्यायला आजकाल हिंदी चित्रपटातली गाणी इंग्रजी भाषांतराच्या आधारे समजून घ्यायची वेळ आली आहे. अकाशातल्या बापा ह्यांना (पक्षी :- इंडस्ट्रीवाल्यांना) माफ कर.

जब्रा. चित्रपट पाहाता आले नाही तरी चालतील पण अशी खुसखुशीत परिक्षणे आपलं आयुष्यमान वाढवतील यात काही वाद नाही. अजून येऊ द्या. :) -दिलीप बिरुटे

शिणुमा नव्हे! लेख!! काय मस्त लिहिलंय! लिहायला अशी धुन लागायची तर प्रेरणा पण अशीच दिव्य हवी!!

खो खो हसवलेत समीरसाहेब.. तुमचे लिखाण वाचायला फार म्हणजे फार धमाल येते... चित्रपटांचे असले खल्लास वस्त्रहरण करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही.. :)

समीरसूर, काय पण खतरा लिवलंय राव !? पिक्चर कॉमेडी नसला (आव आणला होता त्यांनी तसा) पण परीक्षण तुफ्फान हीट आहे राव.. कपडे फाडलेत पिक्चरचे पुरते.. आणि काय एक से बढकर एक प्रतिक्रिया.. व्वाह.. मजा आ गया..:-)