" मी या दगडांवरुन आजीबात येणार नाही आधीच सांगुन ठेवतो" आपल्या चिरकलेल्या आवाजात संज्याने डरकाळी फ़ोडली.
" तु पक्का डरपोक रे लेकाचा, इथे काय हिमालय चढतोय का आपण?" रव्याने त्याच्या काळी पाच मधल्या आवाजात संज्याला सुनावले.
" नालायका, हलकटा झालच तर मेंदुलेस माणसा या निसरड्या दगडावरुन डोंगर चढण्याला तु ट्रेकींग म्हणतोस?" संज्या बिथरला.
" मग काय मुंबई पुणे रेल्वेट्रॅकवरुन चालण्याला ट्रेकिंग म्हणतात?"
"ए, बास करा यार! आपण इथे ट्रेकींगला आलोय की भांडायला? तु गप रे संज्या. आणि रव्या तुझे ते ट्रेकींग नक्की कधी चालु होणार रे?" शल्याच्या या वाक्यावर रव्याने कपाळावर हात का मारुन घेतला आणि आम्ही का खुसखुसायला लागलो याचे उत्तर आम्ही परत येईपर्यंत शल्या शोधत राहीला.
खरंतर आमचा गृप या ट्रेकींग वगैरेच्या भानगडीत कधीच पडत नव्हता पण रव्या काहीकाळ का होईना आमच्या गृपचा मेंबर बनला आणि त्याच्याच अग्रहाखातर आजचा हा कार्यक्रम आखला होता. एकतर दिवस असे श्रावणातले मधेच येणार्या सरी मधेच पडणारे उन मस्त माहौल होता. कुठेतरी पिकनिक काढावी असे जवळपास सगळ्यांच्याच मनात होते. त्यात रव्याने शिवतरघळला जाउया का ? असे विचारल्यावर सगळ्यांच्याच मनातली इच्छा पुर्ण होणार असे दिसायला लागले होते. त्यात आमच्या माननीय सदस्या निली आणि तेजु गणपतीसाठी म्हणुन फ़ारच लवकर गावी गेल्याने दोन मेंबर कमीच होते. याबद्दल
" यांच्यात गणपती नागपंचमीच्या दुसर्या दिवशी आणतात आणि दसर्यानंतर विसर्जन करतात" असे संज्याचे प्रांजळ मत होते.
ते असो, पण आता इतक्या उत्साहाने शिवतरघळ पर्यंत आल्यावर रव्याने बाजुला पडणार्या धबधब्याच्या वर एक पाण्याचे प्रचंड मोठे टाके असुन तिथपर्यंत ट्रेक करावा असली काहीतरी अघोरी कल्पना सुचवली. तसाही डोंगरदर्यांतुन भटकण्याचा आमचा अनुभव नसल्यात जमा होता. म्हणजे मुंबईत जाताना सुकेळी खिंडीतुन जाणे तेही गाडीतुन इथपतच. त्यामुळे आम्ही रव्याच्या सुचनेला होकार भरला.
घळीच्या वरच्या डोंगराळ भागात भटकंती करणे आता सोपे झालेय, पण आधी नव्हते. तेंव्हा आपला मार्ग आपणच शोधायचा आणि पुढे सरकायचे असला प्रकार होता. आता ते रव्याकथीत प्रचंड टाके शोधायचे तर धबधब्याच्या वरुनच काठाकाठाने मार्ग काढत जायला लागणार हे नक्की झाले. पण खरी गोची इथेच होती ना ! पाण्यामुळे शेवाळ आलेले दगड पाय टिकु देईनात. आपला रव्या सांगेल तसं पुढे सरकायच असं धोरण आम्ही ठेवलं. इथेच संज्याची कुरबुर चालु झाली होती पण आता जरा मोकळी जागा मिळाल्यावर त्याच्या रागाला तोंड फ़ुटले. त्याची कशीबशी समजुत काढुन आम्ही पुढे कुच करायला सुरुवात केली.
रव्या या असल्या खडकाळ भागाला सरावलेला असल्यामुळे रबरी चेंडूसारखा टणाटण उड्या मारत पुढे सरकत होता. आणि त्याची नक्कल करण्याच्या नादात आमचा पाय नेमका दगडावरच्या गुळगुळीत शेवाळ्यावर पडून आम्ही धडपडत होतो. सरते शेवटी अस्सल मराठी माणसाप्रमाणे आम्हाला पुढे धावता येत नाही हे बघुन रव्याला पुढे जाण्यापासुन रोखले. या सगळ्या धडपडीत एक नवाच शोध लागला पिंट्या कुठे दिसेनासा झाला होता. मग शोधकार्याला सुरुवात.
" आयला, पडला की काय धबधब्याच्या ओढ्यात?" संज्याला नेहमी कुशंकाच येतात.
" गप बे ! पाण्यापासुन चार हात लांब पळतो तो तुला माहीताय ना?" शल्या बोलायचं म्हणुन बोलला.
दहा-पंधरा मिनीटांनी पिंट्याची स्वारी एका आकाशी रंगाच्या तुर्याबरोबर मारामारी करताना दिसली. सगळेच वैतागुन तिथे गेलो.
" टोणग्या हा तुरा काढुन काय मोरपीसासारखा डोक्याला लावणार आहेस का रे ? कृष्ण कन्हैया सारखा?" संज्याचा राग अजुन शांत झाला नव्हताच.
" नाही रे ! हे लिलीचं फ़ुल आहे मला हे रोपटं घरी न्यायचय बागेत लावायला" प्रामाणीक स्वरात पिंट्या उत्तरला.
" अरे फ़ूSSSल, मग ते असं उपटून नाही निघायचं त्याच्या मुळ्या खोल असतात त्याचा पुर्ण कांदा काढून न्यायला लागेल, असा ओढशील तर तुटेल ते फ़ुल." रव्याचे नॉलेज वादातीत होतं. तेवढ्यात पिंट्या एका कोपर्यात सरकला. महासंशयी संज्याच्या नजरेतुन ते सुटंल नाहीच त्याला बाजुला करुन त्याने कोपर्यात नजर टाकली आणि ओरडला
"तरीऽऽच"
अर्थात आमच्या कुतुहलाला आतल्या आत गप्पबसता येईना, आम्हीही सगळे तिकडे डोकावलो तिथे चार-पाच तुटकी फ़ुले पडलेली होती लिलीची.
मग कसा बसा तो लिलीच्या फ़ुलाचा कांदा काढून पिंट्याच्या हातात कोंबल्यावर पुन्हा पुढे वाटचाल कसली वाटघसरच ती, सुरु झाली.
दगडामागुन दगड गेले, डोहा मागुन डोह गेले छान थंडगार पाण्याने भरलेले त्यांच्यात आगदी दिमाखात उड्या घेणारे लहान मोठे धबधबे गेले आगदी आता वर बहुतेक पठार असणार असं वाटायला लागलं आणि रव्या अचानक ओरडला,
" अरे तो तिकडे बघा, चंद्रराव मोर्यांचा वाडा"
" हो का ? खुप मोठी डेअरी आहे का रे त्यांची? " मुळात शल्या वैतागलेला कारण त्याचा दोन दगडांमधे अडकलेला पाय सुटायचं नाव घेत नव्हता. सहाजीकच न बघता तो बोलुन गेला.
एव्हाना सुळसुळीत झालेल्या पाउलवाटेमधुन स्वतःची आदळ आपट करुन घेत संज्या तिथपर्यंत पोहोचला आणि समोर दिसणार्या चंद्ररावमोर्यांच्या वाड्याच्या अवशेषांवर बसकण मारली. पिंट्याने तेवढ्यात आजुबाजुला शोध घेत आणखी एक हळदी रंगाचे लिलीचे फ़ुल शोधुन काढले आणि मग ते उकरुन काढण्यात बर्यापैकी वेळ गेला. हळुहळू आम्हा सगळ्यांनाच या फ़ुलांमधे रस वाटायला लागला होता. अहो, इतक्या वेगवेगळ्या उधळण केलीये निसर्गाने या रानटी फ़ुलांवर की जमिनीतुन जणु वेगवेगळ्या रंगाचे कारंजेच उडतायत असं वाटायला लागतं. जर सगळी एका ठिकाणी असली तर कुणाचीच नजर त्यावरुन हलणार नाही अगदी एखादा अरसीक माणूसही तिथे दोन मिनीटे थांबल्या खेरीज पुढे जाणार नाही. त्यात आजुबाजुला पसरलेल्या मखमली गवतामधे बाकीच्या इटूकल्या पिटूकल्या निळ्या लाल फ़ुलांमधे न उमलता ही फ़ुले पार एकांतात कुठेतरी एखाद्या जाळीखाली वगैरे उगवतात. शिवतरघळला पाण्याच्या आजुबाजुला सर्रास सापडतात. आजुबाजुच्या वेड लावणार्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ पटकन निघुन जातो एखाद्या बंद मुठीतल्या वाळू सारखा.
" अबे, संज्या कुठाय?" शल्याला अचानक आठवण झाली.
मागे फ़िरुन पहातोय तर संज्या मघाशी बसला होता तिथेच अजुनही बसलेला.
" संज्या, इथे काय करतोयस?"
" तुझ्या त्या चंद्रराव मोर्यांची वाट पहातोय, लेका कुठल्या पाण्याच्या कुंडापायी किती ताबडशील रे आम्हाला?" बहुतेक संज्या दमला असावा.
" चल यार पलिकडून जरासे वर जाउन बघुयात नसेल तर नक्की परत फ़िरुया" समजुत काढत रव्या म्हणाला.
पुन्हा एकदा पलिकडचा काठ गाठला एकदाचा. आणि इतकावेळ भरुन आलेल्या पावसाने जोरदार सुरवात केली. आता मात्र ओढ्याच्या काठाकाठाने जाणे शक्य नव्हतेच त्यामुळे मग बाजुच्या झाडाझुडपातुन वाट काढत आमचा प्रवास सुरु झाला. पण हे काही फ़ारसे सोपे काम नाही याचा अनुभव लगेचच आला. कारण वरुन पावसाचा मारा इतका जोरदार होता की पाउल पुढे टाकायचे वांधे. पुन्हा एकदा रव्याचा अनुभव मदतीला आला. आजुबाजुच्या सागाच्या झाडांच्या पानांचा वापर करुन त्याने इतका अप्रतीम अडोसा केला की बस्सSS.
"बस, आणखी थोडावेळ मग पाउस एकदा थांबला की आपण सरळ खाली उतरायला सुरुवात करायची" असले जरा जीव भांड्यात टाकणारे शब्द एकदाचे रव्याने उच्चारले. पण यासाठी त्याला अर्धातास शल्या, संज्या आणि माझी रिले स्वरुपात चालणारी अखंड कटकट ऐकावी लागली.
एकदाचा निघायचा प्लान तर झाला पण आता पाउस थांबायचे नाव घ्यायला तयार नव्हता. दुपारचे तीन वाजले होते तरी संध्याकाळचे सात वाजल्यासारखा काळोख पडला होता. मग पुन्हा एकदा रव्याच्या नावाने शिमगा करण्याचा कार्यक्रम रंगात आला. त्यात झालच तर पावसाच्या नावाने बोटे मोडूनही झाली. आणि एकदाचा पाउस थांबला, आणि आम्ही आडोश्यामागुन बाहेर आलो. आता एकदाचा ओढा ओलांडून खाली उतरायच की मोकळे पुन्हा उनाडायला! पण तसं व्हायच नव्हतं ओढयाजवळ पोहोचल्यावरच लक्षात आलं की पाण्याची पातळी बदललीये. तरी पलीकडे जायला आम्ही पाण्यात उतरलो असु नसु समोरुन एक बंडी धोतरातला म्हातारा खणखणीत आवाजात ओरडला. दचकुन त्याच्याकडे पाहीलं तर तो साधारण चौकार देताना अंपायर जश्या हातांच्या हलचाली करतो तश्या काहीश्या हलचाली करत होता. एकंदर दहा-विस मिनीटे त्या हलचालींचा अर्थ लावण्यात गेल्यावर एकदाचा शोध लागला की हा प्राणी आपल्याला परत जायला सांगतोय, आता का?.......... या प्रश्नाचे उत्तर जास्त शोधायला लागले नाही. अचानक पाण्याची पातळी वाढायला लागली आणि बघता बघता ओढा दुथडी भरुन वहायला लागला. एकंदरीत मघाच्या पावसाने प्रताप गाजवला होता.
" आत्ता काय करायचं?" सगळ्यांच्या मनातला प्रश्न पिंट्याने विचारला उत्तर काय कप्पाळ देणार कोण !
" बघु, पाणि ओसरल्याशिवाय पलिकडे जाता येणार नाही तो पर्यंत इथेच" रव्याने कारण नसताना तोंड उघडले.
" आणि ते नाहीच कमी झालं तर?" आणखी एक भेदरलेला मारा.
" माहीत नाही !"
" आणि रात्रभर नाय उतरलं तरं?"
"मग वस्ती इथेच!"
पिंट्या रव्याची जुगलबंदी एकदम शांततेत बदलली.
मघापासुन ज्या रानाच्या निसर्गाचे कौतुक करत होतो त्याची आता भीती वाटायला लागली. त्यात शल्याने बाउंसर टाकला.
" काय रे? या जंगलात वाघ असतील का रे?"
आयाईSS! नुसत्या कल्पनेनेच काळीज जागा सोडून तोंडावाटे बाहेर यायची तयारी करायला लागले. प्रश्नाचे उत्तर मिळणे शक्यच नव्हते.
" रव्या तु तराफ़ा बनव ना रे लाकडांचा" एक काकुळतीची विनंती.
" टांग तुझ्या नानाची, लेका या असल्या पावसात सुकं लाकुड मिळणार कुठे? मिळालं तर तोडणार कसं? आणि तोडलं तर जोडणार कसं? आणि जोडलाच तुझा तराफ़ा तर लेका या पाण्याच्या झोतात पलिकडे जाशिल कसा?" एका प्रश्नाच्या बदल्यात संज्याने इतके प्रश्न उभे केले.
" लेका इतकं सगळं करायला दोन दिवस जातील तेवढ्यावेळात पाणि उतरुन जाईल आरामात" शल्याने संज्याला दुजोरा दिला.
" आता गप्प वाट बघत बस की लेका!" रव्यानेही दटावले.
" अरे, असे हातावर हात धरुन गप्प बसायचं?" संज्याचे पक्षांतर.
" हो रे, निदान कुठून वाट मिळते का ते तरी बघुया!" शल्याचा पाठींबा कायम.
" मला नाही वाटत वर कुठे जागा मिळेल" रव्याने अंदाज वर्तवला, साधारण त्याचे अंदाज बर्यापैकी बरोबर असतात. एकंदरीत पाण्याचा वेग आणि पातळी बघितल्यावर वर कुठे पात्र अरुंद असण्याची शक्यता कशी नाही हे रव्या सहज पटवुन देउ शकत होता. त्यावरुन एक जोरदार धुमश्चक्री उडाली.
बराचवेळ भांडाभांडी झाल्यावर कदाचीत पाण्याला दया आली असावी एकदाचे कमी झालं ते !
आणि मघाचा कल्पनेतला वाघ खरोखर मागे लागल्यासारखे आम्ही सगळे अलिकडच्या तिरावर सुसाटलो. आणि एकदाचा सुटकेचा निश्वास टाकला.
एव्हाना साडेपाच वाजुन गेले होते. या पाण्याच्या टाक्याच्या शोधात जी पायपिट आणि मनस्ताप झाला होता तो घेउनच आम्ही पुन्हा एकदा घळीत शिरलो. आतले शांत वातावरण आणि समोरची श्री रामदास स्वामींची आणि श्री गणेशाची दासबोध लेखन करणारी मुर्ती बघुन सगळे मनस्ताप आणि थकवा विसरलो. पुन्हा एकदा त्यांना वंदन करुन बाहेर आलो. आणि समोरच्या कोसळणार्या प्रपाताचे तुषार अंगावर झेलत उभे राहीलो.
आता परत निघायलाच हवे होते म्हणुन जड पावलांनी पायर्या उतरायला सुरुवात केली.
गाड्या स्टार्ट करुन परत निघाल्यावर जेंव्हा लागलेल्या पहील्याच टपरीवर शल्याने गाडी थांबवली तेंव्हा सगळ्यांच्याच मनात एकदमच विज चमकली शल्याने शिवतरघळीत गेल्या पासुन आत्तापर्यंत एकही सिगारेट ओढली नव्हती. मनोमन शल्याला मानले आम्ही सगळ्यांनी.
पावसाने पुन्हा सुरवात केली होती पण या वेळी मात्र श्रावणस्पेशल रिमझीम रिमझीम, मघाच्या प्रसंगाच्या आठवणी त्यात हळूहळू झिरपत शांत होत जात होत्या. आणि गाड्या संथपणे रस्ता कापत पुढे सरकत होत्या.
आम्ही ट्रेकींग करतो ( म्हणे ) !
वाचने
4334
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त लिहीलंय.. पण फटू कुटैत
मस्त लिहीलंय..
पण फटू कुटैत फटू?? ;-)
फोटू नाय !
In reply to मस्त लिहीलंय.. पण फटू कुटैत by यकु
यशवंता फोटू नाही काढले आम्हाला कॅमेर्याला हात लाउ देत नाहीत आणि मोबाईलचा वापर फोटो काढायला होतो हे आम्हाला माहीत नाही :)
फोटो नसायचेच रे.. खरा ट्रेकच,
In reply to फोटू नाय ! by चाफा
फोटो नसायचेच रे.. खरा ट्रेकच, पण ललित लेखनासारखं दिसतंय..
पण मी आपलं मुद्दाम फोटो विचारुन रिवाज पूर्ण केला ;-)
मस्त किस्सा रंगवून लिहिला
मस्त किस्सा रंगवून लिहिला आहे.
हा वाचुन मला शाळेतल्या मित्रांसोबत केलेला पहिला वहिला (ट्रेक?) प्रवास आठवला.
आम्हा ८ मित्रांचं टोळकं दहावीच्या बोर्डाच्।इ परिक्षा देउन माथेरानला निघालं होतं. पायथ्यापर्यंत पोहोचलो. मग तीथुन ती खेळण्यातली गाडी पकडायची असं ठरलं होतं. पण काय सगळ्यांच्या मनात आल माहित नाही, गाडीनं न जाता चढुन जाण्याचा निर्णय झाला. १-२ मंडळींनी निषेधाचे सुर काढले. पण आम्ही ते तिथेल्या तिथेच दाबून टाकले.
सुरवात मजेत टिंगलटवाळी करत झाली. एक दोन मेंबर नेहमीची गिर्हाईक असल्याने त्यांचीच जास्त खेचली जात होती. एका मागोमाग एक सगळे एका रेषेत चढत होते. एका मित्राने मोठ्या मिन्नत्वारीने घरुन कॅमेरा मिळवला होता. (अर्धा रोल आधीच घरच्या कसल्याश्या कार्यक्रमाने भरला होता. आणि तो संपवल्या खेरीज धुता येणार नव्हता म्हणुन दिला असेल कदाचीत.)
तर तो गडी उत्साहात सगळ्यात वर गेला आणि वरुन आमचा फोटू काढु लागला. मी सगळ्यात शेवटी होतो. ठेच लागली म्हणुन जरा कवळून थांबलो तितक्यात एकदम धप्पं..धप्पं..धप्पं.. आवाज आला. वर नजर करुन पहिलं तर सगळ्या मित्रांच्या वळकट्या होऊन ते गडगडत खाली येत होते. मी ठणकणार्या पायाची पर्वा न करत एकदम लांब उडी मारली. आणि ती धुडं गटांगळ्या खात माझ्या बाजुने अजुन थोडी खाली जाऊन विसावली.
मागाहुन कळल की फोटोकाढणारा मित्राच्या गळ्यातली कॅमेर्याची आणि वॉटर बॅगची दोरी चुकुन खालच्या मित्राने आधार म्हणुन खेचली आणि मग सगळे गड गडत खाली आले.
फार काही कुणाला लागलं नाही. खरचटण्यावर भागलं.
पण कॅमेरॅच जे व्हायचं तेच झालं. कसाबसा रोल मिळाला आणि नंतर जेव्हा डेव्हलप केला तेव्हा त्यातले काही फोटो बघण्यासारखे होते. चुकुन रोल फिरला होता का माहित नाही पण, मित्राची आई ओणवी होऊन कुणाची तरी ओटी भरतेय आणि त्यात आमची फौज घालीन लोटांगण अश्या अवस्थेत, असले फोटो आले होते.
वळकट्या गड गडल्या..
In reply to मस्त किस्सा रंगवून लिहिला by गणपा
पोटावळूनावळून्धर्धरून्भरभरून हसून घेतलं.
मस्त लेखन! जोपर्यंत कुठल्या
मस्त लेखन!
जोपर्यंत कुठल्या अडचणीत सापडत नाही तोपर्यंत श्रावणधारा, निसर्ग, कोवळे उन, गवताची पाती वगैरे मजा वाटते.;)
रेवती
In reply to मस्त लेखन! जोपर्यंत कुठल्या by रेवती
रेवती, नेमक्या भावना अचुक पकडल्यात :)
फटू नसल्याने जरी आवडत्या
फटू नसल्याने जरी आवडत्या विषयावरील लेख असला, तरी पास दिला आहे.
चाफ्या,
भारी लिहिलंय की!
आम्हाला शिंची ट्रेकिंगची आवडच पूर्ण करता आली नाही. या असल्या लेखनातूनच मजा घेतो झालं....
मस्त! मस्त! मस्त!
:-)
मस्त!
असं म्हणते, कारण आम्ही त्या ट्रेकमध्ये नव्हतो ना! :D दुरून डोंगर साजरे!
अप्रतीम !!
काय चेंगड ट्रेक झालाय.... ह.ह.पु.वा. झाली वाचताना.
(ट्रेकी) अर्धवटराव
मस्त!
लै भारी लिहीले आहे, एकंदरीत मस्तच ट्रेक झाला म्हणायचा :)
- (धडपड्या ट्रेकर ) सोकाजी
मस्त!! निसर्गाची दोन्ही रूपं
मस्त!!
निसर्गाची दोन्ही रूपं तितकीच लोभस असतात.
फरक इतकाच की, रौद्र रूपात निसर्ग असतो तेव्हा आपण आडोश्याला असलो तरच त्यातला लोभसपणा जाणवतो. :) नाहीतर.. अनामिक भिती मनात घर करायला लागते.
मस्त लिहिलंय पण पावसाळ्यात
मस्त लिहिलंय पण पावसाळ्यात रेनकोट घालुन जायचं होतं..भिजला तरी नसतात.
यावरून भर पावसात गडावर भटकंती
In reply to मस्त लिहिलंय पण पावसाळ्यात by शिल्पा ब
यावरून भर पावसात गडावर भटकंती करताना आमचे एक मित्र पूर्ण वेळ रेनकोटवरच होते याची आठवण झाली.
+७५/१०० (१०० पैकी पंचाहत्तर
In reply to यावरून भर पावसात गडावर भटकंती by प्रचेतस
+७५/१०० (१०० पैकी पंचाहत्तर गुण)
२५ मार्क कापण्याचं कारण म्हणजे आमचे हे मित्रवर-य ट्रेकच्या पूर्ण वेळापैकी २५% वेळ एका 'विवक्षित' कामासाठी (थोडे तरी भिजावे लागतेच हो त्यासाठी ;) ) घालवण्यात व्यग्र होते..... ! ;)
बाकी चाफा चा ट्रेक खरंच 'स्टॅमिनाचा कस पाहणारा ट्रेक' झाला म्हणायचा की....... :P
क ह र .......................
In reply to +७५/१०० (१०० पैकी पंचाहत्तर by प्यारे१
क ह र .......................चित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाही
हा हा हाह हाहा...
In reply to +७५/१०० (१०० पैकी पंचाहत्तर by प्यारे१
प्यार्या, कहरच कि रे.... :
भन्नाट.
माझाच अनुभव वाचतोय असे वाटले.
सुंदर वर्णन..
वर्णन फारच सुंदर आहे. आपणही त्या ट्रेक मध्ये आहोत असेच भासत होते. सोबत छायाचित्रे असती तर अधिक मजा आली असती.
बाप्रे!
वरंध्यात कावळ्यापाशी उतरून दरीतून शिवथरपर्यंत पोहोचणे हाच खरा ट्रेक असायचा पूर्वी. वरच्या धबधब्यांपर्यंत पोहोचणे यात ट्रेकिंग झाली?? आजकाल माझेरीकडून रस्ता थेट पायथ्याशी जातो म्हणे..
गोपाळराव
In reply to बाप्रे! by आनंदी गोपाळ
गोपाळ धबधब्याच्या वरच्या बाजुला डोंगरात भटकायला मस्त वाटतं पावसाळ्यात. हे भटकणं म्हणजेच ट्रेक :)
धन्यवाद !
धन्यवाद मित्रमंडळी,
पावसाळ्यात उनाडायचं म्हणजे भिजणं गृहीत धरून चालायचं असतं असा आपला आमचा समज. मग रेनकोट छत्र्या यांना सुटी देणं क्रमप्राप्त आहे. :)
मस्त !
चाफा, मस्त लिहिलंय !
मी सगळ्यात शेवटी होतो. ठेच लागली म्हणुन जरा कवळून थांबलो तितक्यात एकदम धप्पं..धप्पं..धप्पं.. आवाज आला. वर नजर करुन पहिलं तर सगळ्या मित्रांच्या वळकट्या होऊन ते गडगडत खाली येत होते. मी ठणकणार्या पायाची पर्वा न करत एकदम लांब उडी मारली. आणि ती धुडं गटांगळ्या खात माझ्या बाजुने अजुन थोडी खाली जाऊन विसावली.
मागाहुन कळल की फोटोकाढणारा मित्राच्या गळ्यातली कॅमेर्याची आणि वॉटर बॅगची दोरी चुकुन खालच्या मित्राने आधार म्हणुन खेचली आणि मग सगळे गड गडत खाली आले. >>> गणपाभौ, हसुन हसुन पुरेवाट झाली ! :lol: