Skip to main content

बकलावा (तुर्कीची स्वीट डिश)

लेखक Mrunalini यांनी शुक्रवार, 18/11/2011 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः फिलो शीट्स - बाजारात तयार मिळतात. २ पॅकेट ऑलिव्ह ऑइल - १ वाटी काजु - १ वाटी आक्रोड - १ वाटी बदाम - १ वाटी पिस्ता - १ वाटी दालचिनी पावडर - १ चमचा वेलची पावडर - १ चमचा साखर - २ वाटी मध - १/२ वाटी स्टार फुल - ३ लवंग - १०-१२ केक करायचे एक भांडे कृती: १. काजु, आक्रोड, बदाम व पिस्ता हे सगळे एकत्र करावे. त्यात ४ चमचे साखर, दालचिनी पावडर व वेलची पावडर टाकुन मिक्सर मधे एकदा फिरवुन घ्यावे. त्याची खुप बारीक पावडर करु नये. २. केक करायच्या भांड्यामधे खाली ऑलिव्ह ऑइल लावावे. ३. त्यात १ शीट टाकावी. भांड्याच्या आकाराप्रमाणे बाकीची शीट कापुन घ्यावी. त्याला वरतुन परत ऑलिव्ह ऑइल लावावे. ४. अशा प्रकारे ४ शीट्स लावुन घ्याव्यात. ५. त्यावर अर्धी सुक्यामेव्याची भरड टाकुन सपाट करुन घ्यावे. ६. त्यावर परत ४ शीट्सचे थर लावावा. प्रत्येक शीट्स नंतर ऑलिव्ह ऑइल लावावे. ७. त्यावर उरलेली भरड टाकुन वरती परत ४ शीट्सचा थर लावावा व ऑलिव्ह ऑइल लावावे. ८. सगळ्यात शेवटा ह्याचे सुरीने चोकोनी तुकडे करावेत. प्रत्येक चोकोनात मधे १-१ लवंग लावावी. ९. आता हे भांडे ओव्हन मधे १५० degree celcius वर १ तास ठेवावे. त्याचा वरतुन ब्राउन रंग झाला पाहिजे. १०. ह्या १ तासात पाक करावा. त्यासाठी एका भांड्यामधे २ वाटी पाणी, साखर व मध एकत्र करावे. त्याचा १ तारी पाक करुन घ्यावा. हा पाक होत असतानाच त्यात स्टार फुल टाकावे. ११. १ तासानी ओव्हन मधुन बकलावा बाहेर काढावा. त्यावर पाक ओतावा व झाकुन ठेवावे. १२. २ तासात सर्व पाक त्यामधे मुरेल. बकलावा खायला तयार आहे. baklava1 baklava2

वाचने 13254
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

चाखता येत नाही म्हणुन सध्या फक्त लुक्स ला मार्क देतोय. १०/१०. घरपोच पार्सल दिल्यास चवीचे मार्क पण अपडेटल्या जातील. _ /१० ;)

मला फार आवडतो बकलावा! पण त्या फायलो शिट्स फार नाजूकपणे हताळाव्या लागतात बाई! तू धन्य आहेस!

बकलावा एकदा खाल्ला आणि खाणे थांबेचना. डेंजरस पदार्थ! पाककृती व फोटो आवडले. पण तेवढा तो 'शीट' शब्द बदला बुवा! ताव, पापुद्रे काहीही चालेल.केक करायच्या भांड्यामधे खाली ऑलिव्ह ऑइल लावावे. त्यात १ शीट टाकावी. एवढे वाचूनच काही जणांना ढवळून येईल. ;-)

In reply to by सन्जोप राव

पण तेवढा तो 'शीट' शब्द बदला बुवा शीट आणि शिट हे दोन शब्द उच्चारानुसार वेगवेगळे अर्थ असणारे आहेत

बकलाव्याचा रंग, सजावट वगैरे अत्युत्कृष्ट! चवही मस्तच असणार! परिपूर्ण पाककॄती! पैकीच्या पैकी गुण!

जबर्‍याच दिसतय हे प्रकरण. चला आता फिलो शीट्स शोधणे आले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पराशेठ, काय्काय शोधून ठेवलंत आजपर्यंत? एक गोदाम नक्कीच भरलं असेल ;-)

या पदार्थात वापरलेल्या शीट्स कसल्या कसतात? घरी बनविता येतात का? भारतात मिळतात का?

एक तर तुर्की डीश्..त्यामुळे आधी मला वाटले तो प्रत्यक्ष कृतीचा विषय चुकुन पाककृतीत पडला की काय :-) छान आला आहे फोटो!!

In reply to by प्यारे१

तुम्ही तिला पोसणार असाल तर आमची काही हरकत नाही. रात्रीच्या निवार्‍याची सोय करू आम्ही तिच्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

रात्रीच्या निवार्‍याची सोय करू आम्ही तिच्या. होय तर, कित्ती कित्ती उदार मन हे तुझं!

In reply to by परिकथेतील राजकुमार

बेक्कार हसतोय रे.... च्यायला आयजीच्या जीवावर बायजी उदार म्हणायची :lol: :) :lol: - (अतीउदार अंत:करणाचा) सोकाजी

In reply to by परिकथेतील राजकुमार

उत्तराला विलंब झाल्याबद्दल माफी....! दिवसभर आमच्याबरोबर 'कार्य-क्रम' झाल्यावर बिचारीला तुमच्याकडं निवार्‍याला पाठवायला आमची ना नाही! ;) तुमच्याकडं शांत झोपेल ती.... घ्यायचे दोन दोन पेग आणि झोपायचे. कसे???? ;)

:D सगळ्यांचे धन्यवाद. :) फिलो शीट्स आपल्याकडे मिळतात की नाही माहित नाही. बहुतेक सुपर मार्केट्स मधे मिळत असतील. पण ह्या करण्यासाठी आधी मैदा १ कप, लिंबुचा रस ३ चमचे, ४ चमचे ऑलिव्ह ऑइल व पाणी टाकुन कणिक मळुन घ्यावी. ती १ तास झाकुन ठेवावी. १ तासानी त्याचे पातळ पोळी लाटुन घ्यावी. पोळी पारदर्शक होइ पर्यंत लाटावी. ह्यालाच फिलो शीट्स म्हणतात. ह्या फिलो शीट्स नेहमी ओल्या कपड्यानी झाकुन ठेवाव्यात.

हा पदार्थ आधी कधी खाल्ला नाहिये. पण फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. हिवाळ्यात करून बघायला हरकत नाही. मस्तच!

बकलावा!! स्ल॑~~~~~~र्ल्प!! मी शक्यतोवर ह्या पदार्थाच्या वाटेला जात नाही. जोवर मी पहिला बकलावा हातात घेत नाही तोवरच पण नंतर मला ताटलीतले सगळे बकलावा संपेपर्यंत थांबता येत नाही! ;) (बकलावाप्रेमी) रंगलावा

थोडासा गंडलाय का? ऑलिव्ह ऑईल वापरतात की पातळ बटर? बटरमुळे पापूद्रे थोडेसे एकत्र राहतात. इथे फारच सुट्टे आणि कोरडे वाटत आहेत (कि तुम्ही क्यालरीजचा विचार करून सबस्टिट्युट केलय? ;-) )

अत्त्त्तिशय गोड आणि उष्मांकाने परिपुर्ण पदार्थ. मधुमेहामुळे मी तो पाहतो अनेकदा पण वर्षाकाठी एखाद तुकडा चाखतो. हाय रे दैवा! इथे गल्फात त्यात ऑलिव्ह तेला ऐवजी शुद्ध तुपाचा वापर करतात त्यामुळे तो अजूनच प्राणघातक बनतो.

Mrunalini .. एकदम छान रेसीपी दिल्याबद्दल आभारी आहे. यु.एस ला असताना पहिल्यांदा बकलावा खाल्ला होता.. खुपच अल्टिमेट टेस्ट होती.. मला गोड सहसा आवडत नाही पण बकलावा मात्र खुप आवडला.. देशी व्हर्जन मधे ऑलिव्ह ऑईल च्या जागी तुप वापरले तर चालेल का?

हो... तुप पण चालेल. पण ह्यात आपण प्रत्येक लेयरला तुप लावतो. त्यामुळे भरपुर तुप लावले जाणार. जर तुम्हाला तुपाचा वास आवडत असेल, तर नक्कीच लावु शकता. मला एवढा तुपाचा वास आवडत नाही, त्यामुळे मी ऑलिव्ह ऑइल वापरले.