Skip to main content

मुळ्याच्या पानांची भाजी------

लेखक निवेदिता-ताई यांनी गुरुवार, 17/11/2011 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - एका मुळ्याची पाने, हरबरा डाळ अर्धी वाटी, फोडणीचे साहित्य, दोन चमचे तेल, लाल तिखट एक छोटा चमचा, चवीनुसार मिठ. आज सकाळी मंडईत गेले होते, तेथे पांढरेशुभ्र मुळे दिसले, घ्यायचा मोह झालाच, कोशिंबीर होइल एक वेळची, एक मुळा घेतला, तो घेताना भाजीवाला म्हणाला- मागील पाला काढून टाकू का - म्हटले अरे नको (मनात- भाजी करुयात आज मस्त- आणी नवर्याला ओळखायला लावुयात,), घेउन आले मुळा घरी, त्याचा पाला काढून स्वच्छ धुतला, बारीक चिरुन ठेवला, तोपर्यंत हरबरा डाळ भिजत घातली, अर्ध्या तासाने डाळ चांगली भिजल्यावर कढइ मध्ये जिरे-मोहरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी केली, त्यात भिजलेली डाळ घातली चांगली परतुन घेतली, मग चिरुन ठेवलेली मुळ्याची पाने त्यात घातली, तिखट व चवीनुसार मिठ घातले पुन्हा परतले व वाफ येण्यासाठी त्यावर झाकण ठेवले, पाच-सात मिनिटे चांगली वाफ येउ दिली, त्यातील डाळ शिजल्यावर भा़जी झाली समजावे. पाणी अज्जिबात घालू नये. ही भाजी केली , ह्यांच्या ताटात वाढ्ली, म्हटले ओळखा पाहू- कशाची भाजी आहे, नाही ओळखली तर मला आईसक्रिम द्यावे लागेल, बरीच नावे घेतली, पण नाहीच ओळखली..... आणी त्याबद्दल मला आत्ताच आईसक्रिम आणून दिले आहे, ते खात खात हा पदार्थ दिला आहे आपणा सर्वांसाठी---
तयार भाजी ही पहा------

वाचने 10519
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

वन ऑफ माय फेव्हरेट. :) माझे बाबा मस्त बनवतात. पाला भरपुर असेल तर चण्याची डाळ न टाकताच त्या ऐवजी थोडा ओला नारळ टाकतात. बाकी पद्धत तुम्ही दिल्या प्रमाणेच.

In reply to by गणपा

माझे बाबा मस्त बनवतात. तुमचे बाबा ही बल्लवाचार्य ! असो, मला ही भाजी कोवळी पाने असतील तरच आवडते पण त्यात हिंगासह लसूण अन जिर्‍याची फोडणी मस्ट ! अन मग मुगाची डाळ टाकते पण चण्याची डाळ कधीच टाकली नाही आता करुन बघते. लोखंडी कढई तच केलेल्या या भाज्या जास्त छान लागतात.

In reply to by गणपा

माझे बाबा मस्त बनवतात. हम्म. मुलाला छान तयार केले आहे हो. सासरी कुण्णी कुण्णी म्हणून नावे ठेवायला नको. ;) आम्हाला असे अज्जिबात तयार केले नाही. सासरी आबाळ होते ना त्यामुळे.

आता माझी आवडती भाजी. पूर्वी आवडत नसे पण घरात होणारी प्रत्येक भाजी/ कोशिंबीर खावीच लागे त्यामुळे हळूहळू आवडू लागली. कोवळी पाने असली तर ठीक नाहीतर पानांवर चरबट काटे असल्यासारखे वाटते. आम्ही पीठ पेरून करतो. जुनी आठवण जागी झाली. आईस्क्रीमचा फोटूही चालला असता.;)

आम्ही या भाजीत मुगाची डाळ घालतो. आता हरभरा डाळपण घालून बघू. इतकी छान भाजी झाली तरी त्याचे कौतुक तुम्हा-आम्हालाच. पोरटी जाम ढुंकून बघत नाहीत या भाज्यांकडे. :)

ही भाजी बर्‍याचदा खाल्ली आहे, पण हरभरा डाळ न घालता. आई ही भाजी लोखंडी कढईमधे करते, यातून भरपूर लोह मिळते असे ऐकून आहे.

आमच्या घरी पण बनवतात,मुळ्याच्या पानाची भाजी.... पण पा.कृ.जरा वेगळी आहे.....(मेथिच्या भाजी सारखी असावी बहूतेक) अशी बनवायला सांगतो ............(जरा वेगळी वाटली)

मी हरभरा डाळीचे पीठ घालुन करते. छान लागते. आता अशी पण करुन बघते.

मस्तच. दही घालून कोशिंबिरही चांगली लागते.

मला चण्याच्या डाळीची मात्रा जरा जास्तच वाटते आहे. ती जरा (म्हणजे बरीच) कमी असावी असे वाटते. बाकी पाककृती मस्त. पालेभाजी करताना झाकण ठेवू नये. भाजी काळवंडते. मुळ्याच्या भाजीचे तीन भाग होतात. पाने, जाडे देठ आणि मुळं. पाने बारीक चिरून, देठे वाटून आणि मुळांना किसून किंचित मीठ लावून पाणी काढून घ्यायचे. नंतर चिरलेली पाने, वाटलेले देठ, आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, पिळून काढलेले मुळ्याचे पाणी एकत्र करून, चवीनुसार मीठ घालून गव्हाचे पिठ आणि किंचित चण्याचे पिठ घालून 'मुलीके पराठे' करावेत. पाणी पिळून काढलेल्या मुळ्याच्या किसात हिरवी मिरची, कोथिंबीर, दही घालून कोशींबिर करावी. त्याला मोहरीची फोडणी द्यावी. मुळ्यात तंतू जास्त असतात. त्यामुळे तो सारक आहे. पोट साफ होण्यास मदत होते. तंतूमय असल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. इतर पालेभाज्यांच्या समवेत मुळा आठवड्यातून एकदा तरी करावा. लहान मुले मुळा खात नसतील तर त्यांना खाण्याची सवय लावावी. (काही आमिषे दाखवून) अथवा बारीक चिरुन किंवा वाटून व्हेज. कटलेट बनवावीत. टॉमेटो सॉस बरोबर आवडीने खातात. मुळा, पालक, गाजर, किंचित मेथीची पाने इत्यादी भाज्या, भिजवलेली चण्याची डाळ वाटून + उकडलेला बटाटा घालून कटलेट्स बनविता येतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

मूली के पराठ्यांची कृती आवडली. माझ्याकडची जरा किचकट आहे. पिवळी मूगडाळ भिजत घालून भरड वाटून, मुळ्याबरोबर शिजवून मग पराठे वगैरे.

In reply to by प्रभाकर पेठकर

>> पालेभाजी करताना झाकण ठेवू नये. भाजी काळवंडते. पालेभाजि करताना झाकण थेवावे अन्यथा त्यातिल पोशक द्रव्ये वाफेद्वरे उडुन जातात.( इ. ९ वि. शास्त्र)

In reply to by किचेन

पालेभाजि करताना झाकण थेवावे आपली मर्जी. झाकण ठेवण्याने भाजी नुसती काळवंडतच नाही तर उष्णता आत कोंडली गेल्याने प्रमाणा बाहेर शिजून भाजीतील जिवनसत्वे नाश पावतात. पालेभाजी नाजूक असते फार चटकन जास्त शिजू शकते.

In reply to by किचेन

मी पण पालेभाजी करताना पातेल्यावर झाकण ठेवते अन वाफेमुळे भाजी पटकन शिजते. एकदा त्यावर झाकण ठेवले की मग तेथुन अजिबात हलायचे नाही असे अम्मीने शिकविले आहे, कारण वाफेमुळे भाजी पटकन शिजते अन चुलीवरुन लगेच काढायची असते. पण माझी भाजी एवढी काही काळवंडत नाही.

In reply to by वाहीदा

आपण आयटीत असूनही आपल्याला स्वयंपाक करता येतो (ते देखील लहानपणापासून) हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न.

In reply to by वाहीदा

माझी भाजी एवढी काही काळवंडत नाही. चुलीवरून लगेच काढल्यामुळे ती जास्त शिजत नाही परिणामी काळवंडण्यापासून वाचते. पण झाकण ठेवल्याने 'बी' गटातील (जसे बी१, बी६ इ.) जिव॑नसत्वांचा नाश होतो असे वाचले आहे.

निवेदिता-ताई .. एकदम छान रेसीपी दिल्याबद्दल आभारी आहे. युगांडाला असताना पहिल्यांदा मुळ्याच्या पानांची भाजी खाल्ली होती.. खुपच अल्टिमेट टेस्ट होती.. मला कंदमुळे सहसा आवडत नाहीत पण मुळा मात्र खुप आवडला.. परदेशी व्हर्जन मधे तेलाच्या च्या जागी ऑलिव्ह ऑईल वापरले तर चालेल का?

In reply to by परिकथेतील राजकुमार

परदेशी व्हर्जन मधे तेलाच्या च्या जागी ऑलिव्ह ऑईल वापरले तर चालेल का? सर्रास वापरा. साध्या तेलापेक्षा ऑलिव्ह तेलात आरोग्यदायी गुणधर्म आहेत. ऑलिव्ह तेलाच्या वापराने रक्तातील कोळीस्टके (कोलेस्टरॉल) कमी होण्यास मदत होते. परंतु, म्हणून प्रमाणाबाहेर खाऊ नये. ऑलिव्ह तेलाने कोलेस्टरॉल कमी होत असले तरी त्यात उष्मांकाचे (कॅलरीजचे) प्रमाण इतर तेलांइतकेच (९ उष्मांक प्रति ग्रॅम) असते. दिवसाला एक मोठा चमचा (टेबल स्पून) म्हणजे खूप झाले. त्याहून जास्त नको.