आठवणीतले गाव -नगर..!!
दो बोटी चिरा गल्ली म्हणजे ऐस- पैस रोडच होता . तिथेच आमचे घर होते. भाड्याचे.
मी सांगतोय ती नगरची आठवण आहे.
घरात खुपसा अंधार होता. पण तेथे एक छान होते.घरात वीज होती. बटन दाबले की भळकण प्रकाश सांडायचा
बटन खाली-वर करणे नि त्या प्रकाशाची गंमत बघणे.
आमचा छान खेळच होऊन गेला होता.
असे करण्यात खूप मजा वाटत होती
लहान होतो. शिशु वर्गात.
बाबांनी छान अंकलिपी आणली होती. त्यात मस्त चित्रे होती.
हत्ती ,घोडा,कोंबडा ,कावळा .काय नि काय
त्यांचा गुळगुळीतपणा मी गालावरून फिरवायचो आणि असे सारखे सारखे करण्यात किती मजा यायची
मग ही मजा मी पुन्हा पुन्हा घ्यायचो .
पुस्तके वाचण्यासाठी असतात हे माहीतच नव्हते.
ती बघण्यासाठी असतात .
त्यांचा वास छातीत भरून घ्यायचा म्हणजे किती मस्त वाटायचे. हे सर्व मला सुख देत होते.
अंकलिपीत अ, ब ,क ,ड, आहे
१,२,३,४, आहेत
मला काही घेणे-देणे नव्हते.
अंकलिपी जवळ हवी.नि त्यातली चित्रे बघायला हवीत .एवढेच सुख मला खूप होते.
बाबांच्या सरकारी कागदावर त्यांच्या सारखे गिचमिड काढणे मला छान जमू लागले होते
आणि असे फराटे मारून मी बरेचशे बाबांचे कागद खराब करीत होतो.
कधी कधी मार पण खात होतो
आणि मला असे करण्यात खूप आनंद वाटत होता .
खूप मजा येत होती
दो बोटी चिरा गल्ली खूप मस्त होती . दुपारी चारच्या दरम्यान नगरपालिकेच्या पाण्याची गाडी गल्लीतून जात असे.
गाडीच्या मागे जाळीदार पाईप असे त्यातून रस्त्यावर पाण्याचा फवारा फिरे नि एक छान सुगंध मातीचा येत असे.
तेव्हा खूप छान वाटत असे.
संध्याकाळच्या कोवळ्या सावल्या गोळा होत असत. हवेत छान गारवा असे.
नि पाखरांची भिरी आभाळात दिसे .
आमची संध्याकाळ लडिवाळ होऊन जाई.
आई देवाजवळ निरांजन लावे.
त्या प्रकाशात आईचा चेहरा किती प्रसन्न दिसे.
कधी नगरची आठवण आली की मला अशी आई आठवून जाते.
नि काळीज गलबलून जाते.
आई शेगडीवर कधी आंबेमोहर भात लावी नि त्या भाताचा सुगंध घरभर दरवळे.
तूप मेतकुट भात असा छान बेत असे. .
त्या काळी नगरला टांगे होते. टांग्याचे घोडे अगदी उमदे वाटायचे .काळे- ढवळे .मस्त घोडे .
टांग्याची आठवण काढतोय पण टांग्यात कधी बसल्याचे आठवत नाही.
कदाचित टांग्याची आठवण हरवून गेली असेल .
कधी कधी रोडवर घोड्याची मस्त लिद दिसे. हिरवी गार .बघायला खूप छान वाटे.
अजून एक आठवण म्हणजे घोड्यासाठी गल्लीच्या टोकाला पाणी पिण्यासाठी हौद बांधलेले असत
कधी कधी टांगेवाले घोड्याना पाणी पाजताना दिसत.
घोडे पाणी पिताना आम्ही त्यांच्याकडे बघत बसत असू
कधीकधी आम्ही रेल्वे स्टेशनवर जात असू .तेथील बाकावर बसून गाडी आली की तिची गम्मत बघत बसत असू .
रेल्वे स्टेशनवर एक निराळेच चैतन्य असे . चाय वाल्याचा आवाज .वडेवाल्याचा आवाज .
त्या आवाजालां एक निराळाच नाद ,लय नि चंव होती .
त्या बाकाच्या मागे एक गुलमोहराचे झाड होते .
त्याची लाल फुले छान वाटत . .
गाडी गेली की सगळा शुकशुकाट होत असे.
गाडीचा काळा काळा धूर आभाळात रेंगाळत असे.
तो जाम्भळा रेशीम धुराचा गुंतवळा बघणे खूप आनंद असे .
त्या दगडी कोळशाचा खरपूस वास मस्त वाटे
कधी कधी घरी जात असताना स्टेशन जवळच्या चाळीसमोर दगडी कोळशाच्या शेगड्या पेटलेल्या दिसायच्या नि त्याचा वास आसमंतात रेंगाळत असायचा.
अजूनही कधी कधी त्या आठवणीचा गंध मला येत असतो.
कधीतरी आम्ही हरणे पाटलांच्या शेतात हुरडा खाण्यासाठी गेल्याचे आठवते.
नगरकडे हुरडा पार्टी म्हणजे मोठी मौज असे
ज्वारीचे कणसे शेकोटीत घालून भाजायचे नंतर त्याची दाणे हाताच्या तळव्याने चोळून अलग करून लसणाच्या चटणी बरोबर खाण्याची जी मौज असे त्याचे वर्णन काय करावे. ..?
त्या हुरडयाची आठवण आली की अजूनही तोंडाला पाणी सुटते.
नि किती काळ गेलाय हुरडा कधी मिळालाच नाही.
हरणे पाटील तसे नगरपासून थोडेशे दूर छोट्या खेड्यात राहत होते.
हरणे पाटील ह्यांचे आम्ही हरणे पाटील असे नाव का ठेवले त्याची मजेशीर आठवण आमच्या खिशात आहे .
हरणे पाटील अतिशय शांत वाटत .
नि त्यांच्या घरी एक हरीण पाळलेले होते.
आम्हाला कधी त्या हरिणाची आठवण आली तर आम्ही पाटलांच्या घरी चल म्हणत असू.
कधी दादा कोठे कोठे म्हणायचा .
तर मग मी म्हणायचो हरणे पाटीलकडे नि त्यांचे नाव पडले हरणे पाटील....!!
एकदा असेच श्रावणात त्यांच्या घरी गेलो.
मोठ्या प्रेमाने त्यांनी स्वागत केले.
झाडाखाली तीन -चार खाटा ठेवल्या होत्या .
त्यावर सतरंज्या टाकल्या होत्या .आम्ही सर्व त्या खाटांवर बसलो होतो.
सकाळची वेळ होती .
आजूबाजूला ४-५ बकर्या बे बे करीत झाडपाला खात होत्या. खूप छान वाटत होते.
थोड्या वेळात एका ट्रे मध्ये ५-६ साबुदाण्याच्या खिचडीने भरलेल्या डिश कोणीतरी घेऊन आले.
खिचडी म्हणजे अगदी आमचा जिवकी-प्राण
सगळ्याना खिचडी दिली .
आम्ही चमच्याने खिचडी तोंडात टाकली नि एकदम त्यातली सगळी मजा गेली.
ती खिचडी साखर टाकून केलेली.
गोड शिर्यासारखी...!
आणि आम्हीतर तिखटाचे मारे.
मी तर खिचडी बाजूला ठेवली.
आईने डोळे वटारले .....,
पण ती गोड खिचडी खाणार कोण ....?
श्रावणात कधी कधी मला त्या खिचडीची आठवण येते. नि आईचे डोळे वटारणे
मला आठवतेय नगरपासून जवळच रामेश्वर होते. खूप खोल दरी. खाली पायर्या उतरून जावे लागे.
दरीच्या तळाशी एकदम भयानक वाटे. सर्वत्र भीतीचा गच्च काळोख पसरलाय असे वाटे . .
दरीच्या कोपर्याला वरून पाणी कोसळत असे.
त्या कोसळणार्या पाण्याला जो दगड मारेल नि त्या धबधब्याला ज्याचा दगड लागेल तो ह्या जगाचा राजा होईल अशी एक आख्याईका होती.
सीतेला जेव्हा तहान लागली होती तेव्हा रामाने बाण मारून हा पाण्याचा धबधबा निर्माण केला होता.
हा धबधबा कधी आटत नाही.
नगर जिल्हा म्हणजे दुष्काळाचा गाव नि तेथे हा धबधबा म्हणजे खरोखरच नियतीचे वरदान .
मग आम्ही सर्वांनी दगड मारून ह्या जगाचा राजा होण्याचे प्रयत्न केले.
माझा दगड पाच फूटपण गेला नाही.
मला छान आठवतेय आई सायकल शिकत होती . मी आणि आई गावाच्या बाहेर गेलो होतो.
सर्वत्र शुकशुकाट होता.
आणि एकदम धस्स झाले एका गाईच्या वासराला ३-४ कुत्र्याने फाडून ठेवले होते. वासरू जमिनीवर मरून पडले होते.
हे दृश्य अजूनही कधीतरी माझ्या स्वप्नात येते नि मला घाम फुटून जातो .
नगरची आठवण आली की मला हे सगळे दिसायला लागते.
नि रामेश्वर किती लांब असेल असे वाटू लागते....
हुरडयाची चव आठवून जाते
नि आभाळात वेलांटी घेत जाणारा तो दगडी कोळशाचा जांभळा धूर मला दिसू लागतो ..
दुपारी पाण्याचे फवारे मारीत जाणारी गाडी दिसू लागते
नि एक थंड थंड आठवण मन चिंब करून जाते . ..!!
Book traversal links for आठवणीतले गाव -नगर..!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
व्वा व्वा मस्त लिहिलत हो
तुमच्या आठवणींमध्ये नगर खूपच
येऊ द्यात ...
दो बोटी चिरा गल्ली नसून मशीद आहे...
हिरण्य हुरडा!
व्वा मस्त...
झकास !
मस्त.
मस्त आठवणी आहेत. आम्ही
आठवणी आवडल्या, पण मुळ कुळ
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून