Skip to main content

खदान !!

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 31/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रसौजन्य : गवी पुर्वप्रकाशित डिसक्लेमर : पोस्टमार्टेम रिपोर्ट व कथानायकाशी असलेली ओळख यावर आधारित,थोडासा,कल्पना-विस्तार केला आहे. अर्थात, कथानायकाने घेतलेल्या निर्णयाशी लेखक प्रचंड असहमत आहे. प्रचंड धाप लागलेल्या अवस्थेत, तो रडत-खडत, कसाबसा, पाण्याबाहेर आला, अंगातील कपडे शरीराला घट्ट चिकटले होते. चालताना सैल होणार्‍या पॅन्टच्या बॉटममधुन पाणी गळत होते, मुरुममिश्रीत मातीत वाहणार्‍या पाण्यामुळे त्याच्या बुटांचा " छपाक-छपाक " असा आवाज येत होता. रात्री अडीच चा सुमार, काळी-कूट्ट अमावस्येची रात्र, वरुन येणारी पावसाच्या सरीला बेभान वाहणार्‍या वार्‍याची साथ मिळाल्याने पडणार्‍या पाण्याचा थेंब न थेंब त्वचेला चटका देत होता ! विमानतळाला जोडणारा रस्ता असुन देखील त्या रस्त्यावर चिटपाखरु ही नव्हते ! असे ही त्या पावसाळी काळोखात कोण बाहेर पडले असते म्हणा ? . खदानीतल्या पाण्याला, पावसाच्या पाण्याने तडतडाट लावला होता. गारवठलेल्या अवस्थेत तो कठड्यावर येवुन बसला पण त्याचे विचार मात्र संपले नव्हते. विजांचा गडगडाटाने तो थोडा भानावर आल्यासारखा झाला, पण मन मात्र अजुन ही त्या खदानीच्या खोल पाण्यात अडकले होते. त्या दिडशे फुट खोल खदानीत आजवर ईतके देह बुडतील याची कल्पना कोणे एके-काळी त्या खदानीतुन दगड उपसणार्‍या अगरवाल बंधुना असती तर त्यांनी त्या खदानीचे बांधकाम बंद केले असते. त्यालाही बुडण्याची खात्री होती, म्हणुनच त्याने तिच्या हातात हात घालुन खदानीत उडी घेतली होती, पण हाय रे किस्मत ! पोहण्याच्या कलेने आणि मृत्युच्या भितीने त्याला त्याच्या निश्चयापासुन परावृत्त्त केले होते. तिच्या हातातला हात सोडुन तो काठाच्या दिशेने वर येत होता खरा ! पण तिला वाचविण्याच्या नादात पुन्हा खाली गेला, पण ती काही दिसली नाही. पाण्याखाली तरी माणुस किती वेळ तग धरुन रहाणार ? काठ धरावाच लागला आणि तिच्या विचारांत हरवला. नाही....नाही..... ती मला अशी सोडु शकत नाही !! तिने गेली पाच वर्षे मला साथ दिली आहे !! ..वायुवेगाने तो उठला आणि पुन्हा खदानीत सुर मारली ...शेवाळ !! शेवाळ !! शेवाळ....खडक !! खडक !! खडक...... मासे !! मासे !! मासे .....ती मात्र कुठेच नाही..... पुन्हा धाप लागली....सराईत पणे पाण्याच्या वर आला !! त्या बाजुला बघु..... एक मोठ्ठा श्वास घेतला...पुन्ही खाली गेला...सगळा गाळच गाळ !! पाय फसतो की काय ? ...पुन्हा पाण्याच्या वर ...तरंगल्याने जिवात जीव आला ....आता बस झाले.. आता ती काही सापडत नाही...ती गेली ! ती गेली ! ती गेली !....काठ ! काठ ! काठ ! त्याच्या केसांमधुन, पापण्यावंरुन खाली घरंगळणारं पाणी त्याच्या अश्रुंत मिसळुन जात होते, तो असाच रडायचा. अजिबात हुंदके, उसासे न देता ! बहिणी च्या लग्नात ही असाच रडत होता. तेव्हा हिनेच तर त्याला सावरले होते. पुढे त्याच लग्नाच्या वरातीत हा करवला आणि ती करवली बेंधुद होवुन नाचली होती. ती पहिली-वहिली भेट, आज सहा वषांनी अशी संपेल असे तेव्हा त्याला स्वप्नात ही वाटले नव्हते. तेव्हाच काय ? पण अगदी अर्ध्या तासापुर्वी भावनेच्या भरात आत्महत्येचा निर्णय घेण्यापुर्वी ही वाटले नव्हते ? ....... का ? का ? का ? का असे माझ्याच बरोबर व्हावे ....... का लग्नाला विरोध व्हावा ? गेली तीन वर्षे लग्नासाठी माझे सर्वस्व पणाला लावुन मी तिच्या खांद्याला खांदा लावुन लढलो ? माझ्या भावाने हिच्या बहिणीशी काडीमोड केला यात माझी काय चुक ? आणि तिची ही काय चुक ?...का ? का ? का ? .....आज ती ही मला सोडुन गेली ...ते ही माझ्यामुळे !! विचार ...विचार...विचार ! पश्चाताप...पश्चाताप...पश्चाताप ! किती तरी वेळ ! आणि अचानक .....त्याला तोच नाजुक, गोड आवाज आला " योगेSSश ! ए योगेSSश !!.. डोळ्यांतील वाहणार्‍या अश्रुंमुळे धुसर झालेल्या नजरेतुन, समोर पाण्यातुन अलगद वर येणारी एक आ़कृती दिसली. चटकन त्याने डोळे पुसले. हळुवार, मंद पावले टाकीत, ती आकृती, त्याच्या दिशेने पाण्यावर चालत येत होती...पुन्हा आवाज आला " योगेSSश ! एS योगेSSश ! माझ्या राजा !! माझ्या सोSSनुल्या !! " आवाज देवुन ती आकृती थबकली. त्या आकृतीने हात पसरले. " ये रे माझ्या सोSSनुल्या !! " बस्स ...आता थांबायच नाही ..योगेश तिच्या दिशेने चालु लागला तस-तशी ती आकृती स्पष्ट होवु लागली. ती तिच होती ..माझी राणी.....माझी प्रियतमा...माझी रागिणी... काहीतरी लक्षात आल्याने तो थबकला. तो खुद्द पाण्यावर चालत होता...." ये रे माझ्या सोSSनुल्या !! ...पुन्हा तिचा आवाज....ओढ !! ओढ !! ओढ !! विलक्षण ओढ !! तिच्या पर्यंत पोचला शेवटी !! तिने त्याचा हात हातात घेतला...तोच तो नाजुक स्पर्श ...तिने तिचे ओठ त्याच्या कपाळावर टेकवले...तो बेंधुंद झाला...इशार्‍यातच तिने त्याला मागे वळुन बघायला सांगीतले...... तो चमकला !!!....त्याचा निष्प्राण झालेला देह काठावर स्थिरावला होता ..तिचा मात्र .....खदानीच्या तळाशी , समाधानाचे हास्य चेहर्‍यावर ठेवुन, निरागसपणे पहुडला होता ...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3470
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

In reply to by विनीत संखे

>>>>छान प्रयत्न. कसला 'प्रयत्न' म्हणताय मालक? डिसक्लेमर : पोस्टमार्टेम रिपोर्ट व कथानायकाशी असलेली ओळख यावर आधारित,थोडासा,कल्पना-विस्तार केला आहे. अर्थात, कथानायकाने घेतलेल्या निर्णयाशी लेखक प्रचंड असहमत आहे. यावरुन मूळ घटना खरी असल्याचे समजत आहे असे वाटते.

In reply to by विनीत संखे

मालक, मी मूळ घटना खरी आहे असे म्हणतोय. दोघेही त्या खाणीत साठलेल्या पाण्यात बुडून मेले आहेत. बाकी, तुम्ही म्हणता त्या अर्थी मी आत्मा मानत नाही. प्रयत्न कसला ते मात्र अजूनही समजले नाही .

बरेच दिवसानी सुहासच्या खास शैलीत वाचायला मिळालं. काय एकेक अनुभव तुझ्या डोक्यात जमा आहेत रे बाबा! ते चित्र पाहून दडपून जायला झालं, त्यात प्रसंग वाचताना अंगावर काटा आला.

@रात्री अडीच चा सुमार, काळी-कूट्ट अमावस्येची रात्र, वरुन येणारी पावसाच्या सरीला बेभान वाहणार्‍या वार्‍याची साथ मिळाल्याने पडणार्‍या पाण्याचा थेंब न थेंब त्वचेला चटका देत होता ! चाबूक