परसूंकीच बात है...
लेखनविषय (Tags)
"क्यों मियां, कब देते टीवी? भोत दिनां हो गये ना..."
"परसूं आजाव साब, तबतलक पक्का रेडी करके रैता."
"ऐसा घुमाव नक्को मियां, ये तुम्हारे परसूं का एक कौनसातोबी तारीख बताव"
"पक्का परसूं, साब. परेशान नै हुनाजी"
-किंवा -
"ये परसूंकीच बात है, हिंया सामनेईच ठैरा था जॉर्ज बुश!"
"कुछ तो बी बोलते क्या? उन्हें आके भोत सालां हो गये ना"
"हौला है क्या रे? परसूं बोलेतो अपना हैदराबाद का परसूं रे. नया आया क्यारे हैदराबादमें?"
जुन्या हैदराबादेत 'परसूं' या शब्दाला फार्फार महत्त्व आहे.
परसों म्हणजे परवा. कालच्या काल किंवा उद्याच्या उद्या.
कोणी तुम्हाला परसूंचा वायदा केला तर समजा की अजून दिल्ली भौत दूर है.
कोणी तुम्हाला परसूं घडलेली घटना सांगितली तर समजा की ती आदिकालापासून ते खर्या कालच्या कालपर्यंत साचलेल्या भूतकाळात कुठेतरी जमा झालेली 'गोष्ट' आहे.
आणि तुम्ही स्वतः जर तो शब्द वापरत नसाल तर तुम्ही 'जुने' हैदराबादी नाहीच.
असे का? अगदी परवापर्यंत (म्हणजे हैदराबादी परसूंपर्यंत) हे 'शहर' म्हणजे एक अवाढव्य खेडे होते. माझ्या डोळ्यांदेखत इथं लोक घरासमोरच्या कट्ट्यावर बसून येणार्या-
जाणार्याला 'खैरियत?' असे विचारत असत. कधीकधी तोही कट्ट्यावर बसून हवापाण्याच्या-नातेवाईकांच्या चौकशा करत असे. वाळ्याचे पडदे लावलेल्या डेझर्ट कुलरमधून येणारी थंड हवा खात, जाड भिंतीच्या घरात बसून तासंतास गप्पा मारत असत. दोन मिनिटांसाठी 'ऐसेईच' आलेला माणूस दोन-तीन दिवस राहून जात असे. उन्हाळ्यातल्या रविवारी रस्त्यावर क्रिकेट खेळण्याइतका शुकशुकाट असे. तब्बेतीने शिजणारे पदार्थ तितक्याच निवांतपणे संपवले जात. कोपर्यावरील इराणी हॉटेलात एकदा शिरले की दोन-तीन तास हळूहळू निघून जात. वेळ आपोआप जात नसे, तो घालवण्याचे अनेक उत्तमोत्तम मार्ग हैदराबादने शोधून काढले होते.
अशा वातावरणाची सवय झालेल्या हैदराबादला कोणतीही गोष्ट या क्षणी, आत्ता, आता, आज अशा वर्तमानकालात किंवा उद्यापर्यंतच्या भविष्यात घडेल याची खात्री नव्हती. आणि भूतकाळात झालेली कोणतीही गोष्ट तारीख-वाराने लक्षात ठेवण्याची गरज नव्हती आणि इच्छाही! म्हणूनच हा 'परसूं' - अनंत कालाप्रवाहातील अनिश्चित बिंदू .
हे सारे आठवायचे कारण म्हणजे 'परवा' पेपरमध्ये आलेलं एक स्फुट. गंमत वाटली. एकीकडे हैदराबाद भराभर बदलत आहे, आपली जुनी कात टाकून नव्या वेगानं सळसळत आहे तर दुसरीकडे काही शहरे प्रत्यक्षात त्या निवांतपणाचा अंगिकार करत आहेत. अशाच एखाद्या गावात जाऊन सावकाशीनं जगावे असे मनात येते.
कार स्टेरिओवर लागलेले 'दिल ढुंढता है फिर वही फुर्सत के रात दिन' हे गाणे ऐकून नॉस्टाल्जिक झाल्यावर ग्रीन सिग्नल लागला तरी फर्स्ट गियर लगेच पडत नाही. लगेच मागून हॉर्नचा गोंगाट ऐकू येतो, मुलगी म्हणते,"बाबा, चल नाही तर ट्रॅफिक जाम होईल". मी तिला म्हणतो - "अगं, खरंतर परवापर्यंत इथं सिग्नलच नव्हता. अं... परवा म्हणजे तुझा जन्म व्हायच्या आधी!" - ती जुन्या हैदराबादची नाही, नव्या हैदराबादची आहे.
प्रतिक्रिया
मस्त लेख... अशाच एखाद्या
मस्त लेख
लेख भौत अच्छा लगा!
खूपच छान!
सुरेख स्फुट
यारों
मस्त लेख!!
व्वा...!
मस्त लेखन! लवकर संपल्यासारखे
मस्त...
लै भारी...
मराठीतसुद्धा अगदी असाच 'परवा'
छान
एकदम झकास लेख
हैदराबाद
आयटी सुपरफास्ट ... आळसावलेला
मस्त लेख!