Skip to main content

डॉक्टर 'क्ष'

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 24/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, प्रत्येकजण आयुष्यात उतारचढ, आनंद, दु:ख आपापल्या परीने अनुभवत असतो. पण काही उतारचढ असे असतात की माणसाचा कस लागतो, सत्वपरीक्षा घेतो काळ. असे अनुभव न यावेत तेच बरे. नाहीतर सामान्य विचारसरणीचा माणूस गवताच्या वाळलेल्या पात्याप्रमाणे हरवून जातो त्या वादळात. ही कहाणी आहे डॉक्टर 'क्ष' यांची. माझ्या जन्मापासून ते आतापर्यंत हेच माझे फॅमिली डॉक्टर. सत्तरच्या दशकात डॉक्टरांनी 'प्रॅक्टीस' सुरु केली. त्यावेळी डॉक्टर म्हणजे फारच प्रतिष्ठित आणु दुर्मीळ कौशल्य असलेले व्यक्ती. डॉक्टरांचा जम बसला, पुण्यात त्यांची प्रॅक्टीस चांगली सुरु झाली. परदेशी जाण्याची संधी मिळत असतानाही त्यांनी भारतातच रहायचे ठरवले. क्लिनिक दिवसरात्र चालु लागले. रात्र असो वा दिवस, डॉक्टरांनी कधीही रोग्यांची चिकित्सा करण्यास ना म्हंटले नाही. त्यांची बायको या बाबतीत त्यांच्यावर फारच चिडत असे. कुणी रात्री अपरात्री दरवाजा वाजवला की बाई डॉक्टर गावाला गेलेत असं सांगत. डॉक्टर प्रामाणिक रित्या पैसा कमवून धनाढ्य झाले. रहाता बंगला, अँबेसेडर कार, बुलेट (फटफटी म्हणत असत लोक तेव्हा) छान सजवलेलं क्लिनिक, बक्कळ पैसा असा डॉक्टरंचा थाट होता. पण तरीही ते कधी उतले मातले नाहीत. चेहर्‍यावर कायम स्मितहास्य. अगदी आपलेपणाने ते पेशंट्सची विचारपूस करत. त्यांनी हलक्या हाताने टोचलेलं ईंजेक्शन कधी कुणाला टोचले नाही. त्यांच्या चेहर्‍यावरचं तेज, गप्पांमधे गुंतवून ठेवून औषध पाजण्याची कला काही औरच होती. दिवसांमागून दिवस पालटले. आता डॉक्टरांनी सर्जरीची प्रॅक्टीसही सुरु केली होती. पण साडेसातीच्या फेर्‍यातुन कोण सुटलं आहे. एका मोठ्या हस्तीच्या ऑपरेशन नंतरच्या मृत्युनंतर त्या ऑपरेशन मधे सहभागी असलेल्या डॉक्टरांच्या पॅनलवर कोर्टात केस लागली. डॉ़टर 'क्ष' ही त्या पॅनलमधे होते. वर्तमानपत्रत बातम्या, कोर्टात येणं जाणं सुरु झालं आणि एक दिवस कोर्टाने त्या सर्व डॉक्टरांचे लायसेंस निकाल लागेपर्यंत रद्दबातल करण्याचे आदेश दिले. प्रॅक्टीस थांबली, वकीलांच्या फी वर पैसे खर्च होतच होते. खर्‍या जोडीदाराची परीक्षा ही गरीबीच्या दिवसात होते हे सिद्ध करण्यासाठी डॉक्टरांच्या बायकोने त्यांच्यापासून घतस्फोट घेतला, मुलांसहीत ती डॉक्टरांना त्या भोवर्‍यात टाकून निघुन गेली. उरले सुरले पैसेही संपले, घर दार गाडी बंगला सगळं खर्च झालं. अशा वेळी खरी गरज असते ती फक्त पाठीवर मायेचा हात ठेवणार्‍या आपल्या माणसांची. डॉक्टरांकडे होतं ते म्हणजे कर्ज, समाजाने केलेली उपेक्षा आणि एक खंबीर मन. डॉ़क्टरांनी कोर्टाच्या आदेशाविरुद्ध पुन्हा एक छोटेसे क्लिनिक सुरु केले, पण स्वतःचे नाव कुठेही वापरले नाही. त्यांच्यावर विश्वास असणारे आणि दुसर्‍या डॉक्टरकडे गुण न येणारे पेशंट्स पुन्हा त्यांच्याकडे उपचारासाठी येऊ लागले. बर्‍याच लोकांनी डॉक्टरांना उसने पैसे दिले. ५-१० रुपये फी आकारुन त्यांनी त्याच भाड्याच्या क्लिनिकमधे प्रॅक्टीस सुरु केली. रात्री क्लिनिक्मधेच झोपयचे, कुकरच्या शिट्याही तिथुनच ऐकायला येत. अकाली वार्धक्य आलेल्या व्यक्तीप्रमाणे ते दिसत. चेहरा नि:तेज दिसायचा, पण चेहर्‍यावरचं स्मितहास्य आणि मधाळ बोलणं काही सुटलं नव्हतं. तब्बल १२ वर्षांच्या वनवासानंतर डॉ़क्टर केस जिंकले. कोर्टाने त्यांच्या बाजुने निकाल दिला. मागच्या वेळी गेलो तर डॉक्टर मिश्कीलपणे म्हणाले फी ५० रुपये केली आहे बरकां. :)' चेहर्‍यावरचं तेज पुन्हा वाढायला लागलं होतं. क्लिनिकच्या दारात बुलेट पुन्हा उभी होती.. हो तीच बुलेट.. दुप्पट पैसे देऊन घेतली आहे असे ते म्हणाले, आता अँबेसेडर कधी येतेय त्याची वाट पहातोय. :) त्यांची बायको परत आली की नाही हे अजुन कळाले नाही. पण डॉक्टर मात्र आता स्वतःच आयुष्य पेशंट्सच्या सेवेत आनंदाने घालवताहेत हे पाहुन खरचं आनंद वाटतो. डिस्क्लेमरः या कहाणीत कोर्टाच्या आणि निकालाच्या नक्की डिटेल्स माहित नाहीत, त्यामुळे डॉक्टरांनी केलं ते चुक की बरोबर हे मला माहित नाही पण त्यांनी कुणाचं काही वाईट केलं नाही एवढंच मी पाहिलय. या कथेतुन मी मला जो बोध घ्यायचा तो घेतला एवढेच म्हणतो. आपला, मराठमोळा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3546
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

In reply to by मी ऋचा

प्रेरक गोष्ट. प्रयत्न करत रहावेत. ही कथा बायकोला वाचायला द्यावी म्हणतोय. *पण बायकोच अजून मिळाली नसल्याने सध्या हे काम पुढे ढकलतोय : )*

लायसन्स नसलेले किंवा बनावट पदव्या असलेले लोक डॉक्टरी करतात असं ऐकिवात आहे, इथे तर एक अनुभवी डॉक्टर आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाला करून देत आहे, यात काही अनैतिक आहे असं मला वाटत नाही. डॉक्टरांच्या जिद्दीला सलाम. १९७० च्या आसपास त्यानी प्रॅक्टिस सुरू केली म्हणजे आता त्यांचं वय निदान ६५ तरी असणार. हे खरं तर सेवानिवृत्तीचं वय, पण अजून त्याना काम करावं लागतय, हे नशीब. त्यांचं राहिलेलं आयुष्य शांततेत जाऊ दे ही शुभेच्छा! ममोंचं लिखाण नेहमीप्रमाणेच सरस!

In reply to by पैसा

पण कित्येक नैतिक गोष्टी कायदेशीर नसतात. आणि कित्येकदा कायदेशीर गोष्टी नैतिक नसतात ह्यामुळेच कुठलीही घटना पाहताना दोन भिन्न मते तयार होतात.

प्रकटाआ.

सरकारी कर्मचारी लाचखोरीच्या आरोपाखाली जरी पकडला गेला तरी अर्धा पगार चालु रहातो. केसचा निकाल त्याच्या बाजुने लागला तर वेतन वाढ, भत्ते, प्रमोशन सर्व काही मिळते. तेही निकाल लागेलर्यंत काहीही काम न करता. डॉक्टर जर निर्दोश सुटले असतील तर त्यांना त्यांचे १२च्या कमाई एवढे पैसे व्याजासहीत सरकारकडुन मिळायला हवेत. तेही एकरकमी. तसेच, त्यांचे उत्यन्नाचे साधन हीराउन घेतल्यामुळे त्यांच्या क्वालिफिकेशनच्या सरकारी अधीकार्‍याएवढी पेंशनही जन्मभर मिळायला हवी.

वास्तवदर्शी लेख आवडला. 'पण साडेसातीच्या फेर्‍यातुन कोण सुटलं आहे.' - हे वाक्य विवाद्य ठरू शकते.

In reply to by विसुनाना

आयुष्यातील बॅड पॅच अशा अर्थाने साडेसाती शब्द वापरतात. त्या अर्थाने विवाद्य काय नाय! बाकी लेख उत्तम. ममोची व्यक्ती चित्रे भावून जातात.

कोणताही वेडावाकडा मार्ग न पत्करल्याबद्दल त्यांच करावं तेव्हडं कौतूक कमीच आहे. हॅट्स ऑफ.

डॉक्टरांच प्रेरणादायी व्यक्तीमत्व दाखवण्यात तुमच्या लिखानाचाही हातभार आहे.

कोर्टाच्या निर्णयात दिरंगाई झाली ह्यांचा प्रतिकूल परिणाम डॉक्टर च नाही तर त्यांचे कुटुंब व त्यांच्या पेशंट वर पडला. देशात फास्ट ट्रेक कोर्ट ही काळाची गरज बनली आहे. डॉक्टरांच्या जिद्दीला सलाम.

उगीचच सोसावं लागलं या डॉक्टरकाकांना. निर्णय लागला. डाग पुसला गेला पण मधल्यामधे आयुष्य गेलं. निदान उमेदीचा काळ खच्ची झाला. तरीही त्यांनी दाखवलेल्या स्पिरिटला दाद..

डॉक्टरांची जिद्द आवडली. माणसं संकटाच्या प्रसंगातूनही सहीसलामत उभे राहतात तेव्हा सालं मला त्यांच्या खंबीरपणाचं कौतुक वाटतं. जसं काहीच घडलं नाही. कमाल वाटते मला. आयुष्यात असेही प्रसंग येऊ शकतात तेव्हा अधिक खंबीरपणे संकटाला सामोरं जायचं. हा धडा मात्र डॉक्टरांनी दिला असेच म्हणावे लागेल. ग्रेट. मराठमोळा, चांगला अनुभव मांडला आहे. धन्स. -दिलीप बिरुटे

छान लिहिलं आहे. डॉक्टर काका सुटले छान झालं. खूप साध्या शब्दात मनाला भिडणारे लिखाण केले आहे. निळ्या, निरभ्र आकाशात एकाएकी वादळाचे ढग जमतात,विजांचा कडकडाट होउन भयंकर प्रलयंकारी पाऊस पडू लागतो आणि जग जळून किंवा बुडून जाते की काय असे वाटू लागते. पुढे काय होणार हे ठाउक नसते. अशा वेळी हॅम्लेटप्रमाणे जगावे की मरावे असा मनाला संदेह पडतो. या अनिश्चिततेमध्ये आणि या संदेहामध्ये जीवनामधले नाट्य असते. - प्रल्हाद केशव अत्रे