मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'नीम का पेड' आणि त्याचं शीर्षक गीत - मूँह की बात सुने हर कोई

प्रास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
९०च्या दशकाच्या मध्यात, बहुतेक ९४-९५ च्या सुमारास दूरदर्शनवर रात्री ९ वाजता एक सुंदर मालिका लागायची. तिचं नाव होतं 'नीम का पेड'. तेव्हाही ती मालिका बघत असताना सारखं वाटायचं की आपण काही क्लासिकल किंवा अभिजात बघतोय. कथा एका बुधाई राम नावाच्या गरीब माणसाची होती. हा बुधाई राम खरं तर एक हरकाम्या असतो, गावच्या मुसलमान जमीनदाराकडे. जमीनदाराचं काहीही काम असलं की त्याला याचीच आठवण होत असे. मग ते त्याच्या महत्त्वाची कागदपत्र कुठे नेऊन द्यायचं काम असो किंवा त्याच्या बहिणीच्या सासरी काही भेट-वस्तू द्यायचं काम असो, तो बुधाई रामलाच ते करायला सांगणार आणि वरती गावाबाहेर जिथे कुणाकडे पाठवलं असेल तिथून ताबडतोब परतही यायला सांगणार. मग बुधाई रामही त्याच्या सांगण्याप्रमाणे जराही दम न खाता ते काम करून लगेच परतणार. जमीनदाराचा इतर कुणापेक्षाही जास्त विश्वास बुधाई रामवरच असतो. एक दिवस बुधाईच्या सेवेचं बक्षीस म्हणून जमीनदार त्याला एक निंबाचं रोपट देतो आणि त्याला त्याच्या घराजवळ ते लावायला सांगतो. तो हे ही सांगतो की ते रोप वाढलं आणि त्याचा वृक्ष झाला तर त्या झाडाची सावली इतकी जमीन त्याची. बुधाई आपल्या घरासमोर ते रोप रुजवतो आणि कालांतराने त्याचा वृक्ष बनतो आणि त्याखालच्या सावलीची जमीन त्याची होते असं तो मानतो. बुधाईच्या अगदी साध्या इच्छा-आकांक्षा असतात. आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं आणि आपल्यासारखा हरकाम्या न बनता जीवनात यशस्वी व्हावं. पण दरम्यान जमीनदाराचं त्याच्या मेहुण्याबरोबर (बहिणीचा नवरा) इस्टेटीवरून वाद होतो आणि या वादात निंबाच्या सावलीची जमीन आपली समजणारा बुधाईही ओढला जातो आणि सुरू होतो एका सामान्य माणसाचा आपली जमीन वाचवण्यासाठीचा लढा. त्याचा मुलगा सुखाई त्याच्या इच्छेप्रमाणे शिकून या लढ्यात बुधाईचं अस्त्र बनतो आणि त्यांच्या जमिनीसाठी लढणा-या दोन्ही जमिनदारांना पुरून उरतो. पुढे खासदार बनलेल्या सुखाई रामने आपल्या मेहुण्याविरुद्धच्या इस्टेटीच्या तंट्यात मदत करावी म्हणून जमीनदार ती निंबाच्या झाडाखालची जमीन बुधाईला कायमची बक्षीस म्हणून देऊन टाकतो आणि अखेर बुधाई निंबाच्या झाडाखालच्या जमिनीचा कायदेशीर मालक बनतो. अशी काहीशी कथा असणा-या या मालिकेत नेमकं चांगलं काय होतं ते आत्ता व्यवस्थित कळतंय. पहिलं म्हणजे बुधाई रामचं काम करणारा होता पंकज कपूर. पंकज कपूर हे काम करत होता म्हंटलं तर चुकीचं होईल. तो ती भूमिका जणू जगत होता. एका जवळ जवळ वेठबिगारी करणा-या माणसाला निंबाच्या झाडाने दिलेली एक छोटीशी आशा, पुढे त्या माणसाला त्या झाडाशीच संलग्न करते ते पंकज कपूरने अप्रतिमरीत्या दाखवलं होतं. असं म्हणतात की नाटकातलं एक पात्र हे जबरदस्त ताकदीचं तेव्हाच वाटतं जेव्हा त्याच्या समोर तेवढ्याच ताकदीचं विरोधी पात्र असतं. पंकज कपूरच्या बुधाईसमोर असं जमिनदाराचं पात्र रंगवलेलं एस. एम. झहिर यांनी. त्यांनी जमिनदाराचा आढ्यतखोर स्वभाव, मुरब्बी राजकारणीपणा, मुजोरपणा आणि आधी मेहुण्यासमोर आणि नंतर सुखाईसमोर आलेली अगतिकता खुमासदार रीतीने दाखवली आहे. या दोघांना तश्या भूमिका ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीने निर्माण करून दिल्या ते होते प्रसिद्ध कथाकार, पटकथाकार आणि शायर डॉ. राही मासून रजा. या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं गुरबीर सिंह ग्रेवाल यांनी. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारासचं उत्तर भारतातलं गाव, तिथली जमिनादारीची प्रथा, वेठबिगा-यांचं आयुष्य रजा-ग्रेवाल जोडीने फारच छान निर्माण केलेलं. पण हे सर्व असूनही या मालिकेचा उत्कर्ष बिंदू होता त्याचं शीर्षक गीत. निदा फाजली या जबरदस्त शायरचे चपखल शब्द आणि त्या शब्दांना साजेसा जगजीत सिंहांचा अप्रतिम स्वर. मालिका आणि शीर्षक गीत यांचा समर्पक संबंध असेलच असं आपल्याला नेहमीच दिसत नाही पण जितकी ही मालिका सुंदर होती तितकंच त्याचं हे शीर्षक गीतही. जगजीत सिंहांच नुकतंच झालेलं देहावसान मला या गीताची आठवण करून गेलं. या आणि अशाप्रकारच्या सुंदर गीतांद्वारे ते अजूनही आपल्यात उपस्थित आहेत असंच मला वाटतं. मूँह की बात सुने हर कोई, दिल के दर्द को जाने कौन आवाजों के बाज़ारों में, खामोशी पहचाने कौन !! सदियों-सदियों वही तमाशा, रस्ता-रस्ता लम्बी खोज, लेकिन जब हम मिल जाते हैं, खो जाता हैं जाने कौन !! वो मेरा आईना हैं, मैं उस की परछाई हूँ, मेरे ही घर में रहता हैं, मुझ जैसा ही जाने कौन !! किरन-किरन अलसाता सूरज, पलक-पलक खुलती नींदें, धीमे-धीमे बिखर रहा हैं, ज़र्रा-ज़र्रा जाने कौन !! -निदा फ़ाज़ली

वाचने 6291 वाचनखूण प्रतिक्रिया 27

मृत्युन्जय 11/10/2011 - 21:19
क्लास. अतिशय सुंदरे लेख, अतिशय सुंदर परीक्षण. नीम का पेड यशस्वी होण्यात ज्या लोकांचे योगदान होते म्हणून तुम्ही लिहिले आहे त्यात एक तुमचेही नाव जोडुन टाका. कलाकारांइतकीच ती कलाकृती प्रेक्षकांमुळे अजरामर होते आणी तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळे नीम का पेड अजरामर झाली आहे असे वाटावे इतके सुंदर लेखन.

मन१ 11/10/2011 - 21:20
पण सिरियल १९९३ च्या आधीची असावी हो. कारण त्यानंतरच्या सगळ्या मोगली, व्योमकेश बक्षी, तेहकिकात वगैरे मला व्यवस्थ्ति आठवतात. पण रामायण काय किंवा नीम का पेड काय, लहानपणी बघितल्याचं अगदिच धूसर आठवतय. निदा फाजलींबद्द्ल अधिक काय बोलणार प्रेमगीतांपासून दोह्यांच्या तोडीचं लिहिणारा माणूस. राही मासूम रजा हे मला माझ्या आवडत्या "महाभारत" सिरियलचे भारदस्त,प्रभावी पटकथाकार म्हणून ठाउक होते. इथेही नाव बघून बरे वाटले. जगजित! काय बोलणार? ह्या गीताचा माझ्या फेव्हरिट मध्ये समवेश आहेच. एकूनात लेख आवडला.

अर्धवटराव 11/10/2011 - 22:12
फार सुंदर प्रकटन !! मला फार नाहि आठवत आहे हि मालिका :( अर्धवटराव

चिंतामणी 12/10/2011 - 00:31
Hmmmmmmm अजून आठवत आहे रे. आजच्या जमान्यातील (झोपतानासुद्धा अंगावर किलोभर दागीने घालून आणि मेकअपसकट असलेल्या सासवासुना ) मालीका बघणा-यांना या मालीकांचे महत्व समजायचे नाही.
आपले विशेष आभार ... निदा फाजली ह्यांची आठवण निघालीच आहे तर कोणीतरी, त्यांनीच लिहिलेली आणि 'घुटन' चे शीर्षक गीत असलेली रचना पण पाठवा रे .... मला ती फारच आवडलेली होती. रवॉ है कश्ती मगर हर तरफ अंधेरा है .... अशी काहिशी सुरुवात होती ....

In reply to by sagarparadkar

कहीं सफ़र हैं तो कहीं रास्ता हैं मंजिल का .. येह रात-दिन की घुटन क्यूं आजाब है दिल का ? रवॉं हैं कश्ती मगर हर तरफ़ अंधेरा हैं, किसीका दोष नहीं येह कसूर मेरा हैं बुझे हैं मेरे ही हाथों, चिराग साहिल का, कहीं सफ़र हैं तो कहीं रास्ता हैं मंजिल का .. शायर - निदा फ़ाजली गायक - तलत अजिज

प्राजु 12/10/2011 - 08:00
अतिशय सुंदर लेखन. मला ही सिरियल आठवत नाहीये.. पण तुमच्या लेखनावरून उत्तमच असणार असं वाटलं. या गाण्याच्या लिंक बद्दल धन्यवाद.

प्रचेतस 12/10/2011 - 08:21
अतिशय सुंदर लिहिलेय. नीम का पेड अगदी पुसटशी आठवतेय. परत आठवण करून दिल्याबद्दल आभार.

किसन शिंदे 12/10/2011 - 10:20
मलाही पुसटशीच आठवतेय नीम का पेड पण त्याच्याही बरीच आधीची नुक्क्ड मात्र चांगलीच लक्षात आहे.

५० फक्त 12/10/2011 - 10:51
जबरा लिहिलं आहेस रे, माझ्या सोलापुरच्या एका मित्राकडे याचं रेकॉर्डिंग आहे, त्याला विचारतो अजुन आहे का, त्याचे वडिल हे रेकॉर्ड करायचे तेंव्हा.

गवि 12/10/2011 - 11:21
सुंदर. ही सिरियल अलिकडे रिपीट केली गेली होती असं वाटतंय.. कारण हल्लीच बघितल्यासारखं वाटतंय नाव.

अत्रुप्त आत्मा 12/10/2011 - 18:43
प्रास साहेब... वा..फार छान लिहिलयत ... निदा फाजली म्हणजे,अर्थपूर्ण आणी गेय्य गीतकार...त्याच्या प्रत्येक रचनेमधुन जीवनानुभव हा जाणवतोच...असा शायर/गीतकार विरळा,,,वरची रचना असलेला फाजली साहेबांचा अख्खा अल्बम मी कीत्तीतरी वेळा ऐकलाय...पण समाधानच होत नाही,,प्रत्येकवेळी नवीन अनुभुती मिळत असते...वाहव्वा...लेखा बरोबरच गाण दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद... निदांची अजुन एक अशीच रचना अर्थातच जग्गुनी गायलेली इथे लिंकाळुन ठेवत आहे...''बदला ना अपने आप को जो थे वही रहे,हम जीस के भी करीब रहे अजनबी रहे..." http://www.youtube.com/watch?v=qu7a5OdcBpU

वाहीदा 12/10/2011 - 14:12
आजच्या ’क’ सिरीयल्सच्या रटाळ दुनियेत तुम्ही तुमच्या जुन्या आठविणींना सुंदर उजाळा दिलात ’जुने ते सोने का म्हणतात’ ते आता हळूहळू उलगडत चालले आहे. त्या शोभा अन एकता कपूर ला कोणीतरी सांगा रे ’अभिजात कलाकृती’ सिरीयल्स मधून कशी दाखवितात ते ... अजून ही काही जुन्या सुंदर सिरीयल्स - तमस, उडान, हम लोग ,बुनियाद, हैलो जिंदगी, जुनुन, मिट्टी के रंग, गुल-गुलशन -गुल्फ़ाम, मालगुडी डेज, मुल्ला नसिरुद्दीन,सुरभी,वागले की दुनिया, करमचंद , फ़ौजी, चुनौती या अन अश्या असंख्य त्यांच्याबध्दल ही छान से काही लिहावे तुम्ही . मृत्युन्जय शी १००% सहमत ! जगजीतसिंग आता हयात नाहीत हे मनात कुठे तरी खोलवर टोचत रहाणार काही दिवस अन वर्षे तरी ..:-( अन मग काळाच्या ओघात नविन काहीतरी Fad येणार अन मुन्नी, शिला, अन जिलेबी बाईंमुळे सगळं काही हरवणार ...:-(

In reply to by वाहीदा

निनाद मुक्काम … 12/10/2011 - 18:42
@ अन मुन्नी, शिला, अन जिलेबी बाईंमुळे सगळं काही हरवणार .. आपा मला नाही वाटत तसे ८० च्या दशकात असाच एक सोन्याने मढलेला येऊन गेला . त्याने डिस्को कल्चर रुजवले खरे . पण आजही संगीतात मेलोडी जिवंत आहे .राहत अधून मधून मनाला राहत देऊन जातो . प्रास ह्यांना धन्यावाद . एक विनंती अशी की आशयच सुंदर मालिकांचे रसग्रहण करणारी एक लेखमाला काढावी. ( दर्जा कायम ठेवत दर भागागणिक लेखमालेचा दर्जा उचावण्याचे प्रास ह्यांचे कसब समस्त मिपाकर जाणून आहेतच ) आता नेक काम मे देरी नको . ही मालिका आठवत नाही आहे .. ( कदाचित ९२ नंतर ची असावी .तेव्हा आम्ही तारा, सांता बार्बरा अश्या मालिका मोठ्या छत्रीच्या कृपेने पाहण्यात मग्न होतो .आता डर्टी जेव्हा प्रदर्शित होईल.तेव्हा अश्याच जुन्या आठवणीना उजाळा मिळेल.) अशी दर्जेदार मालिका पाहण्याचे भाग्य नव्हते .निदान रसग्रहण तरी वाचायला मिळाले .

In reply to by निनाद मुक्काम …

वाहीदा 14/10/2011 - 00:16
८० च्या दशकात असाच एक सोन्याने मढलेला येऊन गेला . त्याने डिस्को कल्चर रुजवले खरे . पण आजही संगीतात मेलोडी जिवंत आहे .राहत अधून मधून मनाला राहत देऊन जातो . त्यात ही मेलोडी थोडीफार तरी होती पण आता गाण्यात अश्लिलता सिमा ओलांडून वहात आहे त्याची किळस वाटते . आशा करुया जुना चांगला ठेवा परतेल कधी ना कधी...

In reply to by वाहीदा

यात थोडीशी भर घालतो. अमोल पालेकर यांच्या तीन सिरीयल्स मला फार आवडलेल्या आहेत. कच्ची धुप (१९८७) नकाब (१९८८) मृगनयनी (१९९१) नकाब ही तर फक्त १३ भागांची सिरीयल होती. पण तीचे सादरीकरण, अभीनय हे अत्युकृष्ट दर्जाचे होते.

सुनील 12/10/2011 - 14:12
मालिका पाहिल्याचे आठवत नाही पण लिहिलय अतिशय सुंदर.

In reply to by सुनील

गणपा 12/10/2011 - 19:02
मालिका पाहिल्याचे आठवत नाही पण लिहिलय अतिशय सुंदर.
असेच म्हणतो.

अमृत 17/10/2011 - 22:10
प्रास छान लिहिलत... जुन्या मालिकान्मधिल काहि गाणी अजूनहि स्पष्ट आठवतात.. चरित्रहीन मालिकेतिल हे गाणं मला खूप आवडतं.. http://www.youtube.com/watch?v=g-6uyGplLSA

निवांत पोपट 18/10/2011 - 07:58
नितांत सुंदर गाणे!हे गाणे आधी जगजितसिंग ह्यांच्या Insight ह्या अल्बममध्ये होते.सिरीयल्मध्ये ते नंतर आले.निदा फ़ाजली ह्यांचे फ़ुले वेचावीत असे,मोजके,वेचून वापरलेले शब्द आणि जगजितसिंग ह्यांचा आवाज ह्यामूळे हे गाणे फ़ारच वेगळ्या उंचीवर गेले आहे. पण तरीसुध्दा ह्या गाण्याच्या दर्जाच्या श्रेयाचा तिसरा वाटेकरी पण आहे.साउंड रेकॉर्डिस्ट दमण सूद. Insight ची दोन व्हर्जन निघाली होती.त्यापैकी एका व्हर्जनवर साउंड रेकॉर्डिस्ट दमण सूद ह्यांचे नाव होते. दुसऱ्यावर इतर कोणाचे तरी.दोन्ही गाणी एकाच वेळी ऎकली तर बाकी सगळं सारखं असलं तरी फ़रक लगेच लक्षात येतो.दुसरे गाणे किंचित का होईना पण कर्कश वाटते.

पाषाणभेद 18/10/2011 - 08:53
जुन्या जमान्यातल्या सिरीयल्स खरोखर चांगल्या असायच्या. काही कथा तर तिन एपिसोडमध्येच संपायच्या. मराठी वाहिनीवर तर दर एपिसोडमध्ये दर्जेदार कथा सादर केल्या जात असत. खाली काही नॉस्तेल्जीया होण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत. http://oldidiotbox.blogspot.com/ http://www.youtube.com/watch?v=3cMRLArhH70 या अशा प्रकारच्या फिल्म डिव्हीजन्स च्या फिल्म तर आजच्या काळातही योग्य असतांना का बंद झाल्यात कळायला मार्ग नाही. http://abhisays.com/india/list-of-old-doordarshan-tv-shows-and-serials.html मागे (खुप वर्षांपुर्वी!) सोनी टिव्हीवरील 'ये शादी नही हो सकती' ही डोके न लावता पाहण्यासारखी धमाल सिरीयल होती. (तिचे कथानक आठवत नाही. कुणी सांगेल काय एखाद्या ओळीत?)