Skip to main content

'ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र?

लेखक दिपोटी यांनी शनिवार, 08/10/2011 03:09 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या 'सकाळ' मध्ये कामिल पारखे यांच्या या लेखात 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने सन्मानित होण्यात मराठी साहित्यिक मागे पडतो या वस्तुस्थितीबद्दल थोडे विचार व थोडासा उहापोह चांगल्या रीतीने मांडण्यात आला आहे. http://www.esakal.com/esakal/20111007/5255712661125493679.htm हाच विचार पुढे नेऊन 'या वस्तुस्थितीमागील कारणे' या विषयावर थोडी विस्तृत चर्चा व्हावी, काथ्याकूट व्हावा म्हणून हा धागा काढला आहे. 'सकाळ'मधील लेखाच्या लेखकाने मांडलेले मुद्दे योग्य आहेत. जर भारतातील अनेक भाषांपैकी मराठी (व बंगाली) भाषांतील साहित्य अधिक अभिजात, समृध्द व दर्जेदार मानले जाते तर याचे प्रतिबिंब 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने सन्मानित झालेल्या-होणार्‍या साहित्यिकांच्या यादीत का बरे दिसत नाही? बंगाली साहित्यिकांच्याबाबतीत हे चित्र कसे काय आहे? विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या 'आणि मी' या अत्यंत वाचनीय अशा लेखसंग्रहातील 'सन्मान, सम्मान इ.' या अत्यंत वाचनीय लेखात अशा पारितोषिक-पुरस्कार-सन्मानांसाठी प्रतिभा, दर्जेदार साहित्यनिर्मिती, या व अशा इतर आवश्यक निकषांबरोबरच 'पडद्यामागील हालचाली' हा निकष सुध्दा - अर्थात काही पुरस्कारांच्याबाबतीत - लागू पडतो असे लिहिल्याचे आठवते. माझ्या वैयक्तिक मते तर विजय तेंडुलकर, पुल देशपांडे, जयवंत दळवी, चिंत्र्यं खानोलकर ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र आहेत / होती ('ज्ञानपीठ' पुरस्कार मरणोत्तर दिला जातो की नाही याबद्दल माहिती नाही). आपले काय मत आहे?

वाचने 27433
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

''कालाय तस्मय नमः'' मी तर भगत साहेबांना कधी हा पुरस्कार मिळतोय ह्याची वाट पाहत आहे . हे आडनाव आपल्या मराठीत सुद्धा आहे .त्यामुळे तेवढेच समाधान

In reply to by निनाद मुक्काम …

चेतन भगत सारख्या सुमार दर्जाच्या तद्दन फिल्मी वाटाव्या अशा कथा लिहिणार्‍या माणसाला जर ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा आपण करत असाल तर आपला ती$$$$$$$व्र निषेध..............

डॉक्टरांशी सहमत.
आपण intense lobbying होत असल्याचे सुध्दा मान्य करता. असे lobbying होत असेल व त्यामुळे मराठीच नव्हे तर इतर भाषिक साहित्यिकांवर देखील हा अन्यायच आहे.
Lobbying मध्ये काही गैर आहे असे वाटत नाही. सर्व प्रकारच्या नोबेल पुरस्कारासाठीही lobbying होते.प्रश्न एवढाच की ज्याला ज्ञानपीठ दिले जाते ती व्यक्ती लायक आहे की नाही. समजा आपण निवड समीतीत आहोत आणि आपल्याकडे चार भाषांतील लेखकांची यादी आली तर कोणाची निवड करु ? १)ज्याच्या लेखनात्/काव्यात विविधता/कल्पकता/नाविन्य आहे. २) ज्याचे लेखन समाजाच्या विविध थरांत वाचले गेले आहे. ३)ज्याचे पुस्तक्/पुस्तके विद्यापीठांत संदर्भग्रंथ म्हणून वापरली जातात. ४)भारताबाहेरही त्याच्या लिखाणाची चर्चा होते. ५) ज्याचे थोडेफार लिखाण ईतर भारतिय भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. सध्या किती मराठी लेखक्/कवींची नावे अशी घेता येतील? कोणी सांगु शकेल का? हे सर्व असेल तर lobbying करणे ही पुढची गोष्ट. समजा ह्या चार लेखकांतून दोन पात्र ठरले तर कोणाची निवड करायची?समितीवर एकाहून अधिक सदस्य असल्याने एका अमुक भाषेला डावलले जात असेल असे वाटत नाही.सध्याची निवड समिती बघितलीत तर त्यात एकही कन्नड सदस्य नाही.

In reply to by चिरोटा

Lobbying मध्ये काही गैर आहे असे वाटत नाही. सर्व प्रकारच्या नोबेल पुरस्कारासाठीही lobbying होते.
जेव्हा आपण एखादी सिस्टीम सुधारण्याचा वा आदर्श बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यातील गैर बाबी काढून टाकणे हा उद्देश असतो. आता नोबेल वा इतर कोणत्याही पुरस्कारासाठी lobbying होते ही वस्तुस्थिती असली तरी ही वस्तुस्थिती अशा lobbying चे इतरत्र समर्थन करण्यासाठी वापरता येत नाही ... जो गलत है सो गलत है ... कारण शेवटी ही वस्तुस्थिती ही केवळ एखाद्या आदर्श सिस्टीम मधील विसंगती (नाईलाज / तडजोड / fault) म्हणून मानावी-स्वीकारावी लागेल व जेव्हा व जेवढे जमेल तेव्हा व तेवढ्या स्वरुपात ही विसंगती काढून टाकण्याचाच प्रयत्न झाला पाहिजे. असे पुरस्कार विजेते ठरवताना गुणवत्ता हा केवळ एकच निकष मानला पाहिजे. याबरोबरच 'पडद्यामागील हालचाली करण्याची क्षमता' हादेखील निकष असेल, तर गुणवत्तेचा निकष पिछाडीस पडण्याचा धोका संभवतो. उदाहरणार्थ, पंजाबी भाषेतील एखाद्या लेखकाने साहित्याला उत्तम योगदान दिले असेल पण त्याच्याकडे lobbying करण्याची इच्छा वा क्षमता वा दोन्ही नसेल तर त्याचा त्याला हा पुरस्कार मिळण्याच्या शक्यतेवर अजिबात - अगदी थोड्या अंशाने सुध्दा - परिणाम होता कामा नये. अगदी याच कारणामुळे 'ज्ञानपीठ' पुरस्काराच्या पात्रतेसाठी (आपल्याच वरील एका प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे) कोणत्याही भारतीय भाषेवर असलेले ३ वर्षांचे बंधन सुध्दा कृत्रिम व म्हणून अर्थहीन वाटते. गुणवत्ता - व केवळ गुणवत्ता - हा एकच निकष मानला तर एखाद्या भाषेतील दहा साहित्यिक इतर भाषांतील साहित्यिकांच्या तुलनेत उजवे ठरले तर त्या सर्वांना सलग दहा वर्षात हा पुरस्कार देणे यात तात्विक दृष्ट्या काहीही गैर नाही आहे.

In reply to by दिपोटी

Lobbying चांगल्या अर्थाने अपेक्षित आहे. आधिचे विजेते बघितलेत तर सर्वजण ज्ञानपीठ मिळवण्याच्या तोडीचे आहेत हे दिसून येईल.एखादा लेखक लोकांना ज्ञानपीठपात्र वाटत असेल तर लोकांना निवडसमीतीच्या तसे निदर्शानास आणून दाखवावे लागेल. विदा गोळाकरुन्/समाजातील ईतर लेखकांकडून्,विद्यापीठांकडून्,समी़क्षकांकडून वगैरे... मराठी वा बंगाली लेखकांना ज्ञानपीठ मिळत नाही तेव्हा हे असे lobbying होते नसावे किंवा ईतर भाषिक लेखकांचे लॉबिंग मोठ्या प्रमाणावर होते असावे किंवा आधि चर्चिलेली शक्यता- somebody else is more capable then them.

In reply to by चिरोटा

'लॉबिंग'च्या अर्थाबाबत थोडी संदिग्धता येऊ शकते, ती आधी दूर करुया. 'लॉबिंग'चा अर्थ - निदान माझ्या माहितीप्रमाणे तरी - सर्वसाधारणपणे नकारात्मक घेतला जातो. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले तर : (श्री गुगळे यांच्या वरील एका प्रतिसादातील आयती तयार यादी घेऊन) "जात, धर्म, लिंग, वय, प्रादेशिकता, भाषा, वैयक्तिक संबंध (चांगले अथवा वाईट), आर्थिक अथवा शारिरीक प्रलोभन अशा ( थोडक्यात म्हणजे एखाद्या साहित्यिकाच्या साहित्याच्या गुणवत्तेशी अजिबात निगडीत नसलेल्या अशा) भलत्याच निकषांच्या जोरावर त्या साहित्यिकाचे नाव त्याच साहित्यिकाने स्वतः किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीने पुढे वा मागे ढकलणे" म्हणजे lobbying असा अर्थ मी गृहित धरतो. या नकारात्मक अर्थाचे lobbying होत असेल तर अर्थातच हा (कोणत्याही भाषेतील) इतर साहित्यिकांवर अन्याय आहे हे तरी आपल्याला मान्य व्हावे. हे असे होते का हे निश्चितपणे माहित नाही व तेच शोधण्यासाठी हा प्रपंच. अर्थात असे होत नसेल तर मग प्रश्नच मिटला. 'लॉबिंग'चा वर चिरोटा व चेतन सुभाष गुगळे यांनी लावलेला अर्थ मात्र सकारात्मक आहे. 'एखाद्या साहित्यिकाच्या साहित्याच्या गुणवत्तेच्या जोरावर त्या साहित्यिकाला समर्थन वा विरोध करणे' ... याला मी तरी justification असा सकारात्मक प्रतिशब्द वापरीन. कोणता शब्द वापरावा हा शेवटी फक्त terminology अथवा convention चा भाग आहे, तेव्हा निदान यात तरी खोलात शिरण्याची गरज नाही. कोणताही प्रतिशब्द वापरला तरी असा सकारात्मक प्रचार होणे यात काही गैर दिसत नाही. आता प्रश्न शेवटी असा उरतो की जर 'ज्ञानपीठ' (किंवा इतर कोणत्याही) पुरस्कारासाठी lobbying होत असेल तर ते वरील सकारात्मक ('justification' या) अर्थाने की नकारात्मक ('fielding लावणे' या) अर्थाने? - दिपोटी

वरील प्रतिसादांपैकी श्री. गुगळे यांचे प्रथमपासूनचे म्हणणे विषयाला सोडून किंवा भरकटलेलं मुळीच वाटलं नाही. उलट जशी चर्चा व्हायला हवी तशीच त्यांनी केली आहे असं वाटतं. बाकी त्यांच्या मतावर मतमतांतरे होऊ शकतीलच. पु.लं.च्या विषयी: त्यांना ज्ञानपीठ देण्याने काही खास फरक पडेलसे वाटत नाही. जितक्या लोकांच्या मनात ते जिव्हाळ्याच्या ठिकाणी आहेत आणि त्यांना वाचत जितके लोक मोठे झाले आहेत ते पाहून ज्ञानपीठही छोटे ठरावे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

तुमच्या दळवी किंवा "तें" विषयींच्या प्रतिकूल मताला मी पाठिंबा देत नसून तुम्ही जे मुद्दे मांडलेत आणि ज्या पद्धतीने मांडलेत ते अत्यंत वैध असून चर्चा करताना जे अपेक्षित असते तसेच आहेत आणि त्यात मूळ चर्चेला / मुद्द्याला / विषयाला सोडून काही भरकटलेले नाही असं माझं म्हणणं आहे. शिवाय चर्चा म्हटली की काही नवीन मुद्देही येणारच. तुम्ही मांडलेला अँगल मुद्दाम विरोधी म्हणून मांडलेला आहे असं वाटत नाही. त्यात सुस्पष्टपणा असल्याने ते तुमचं प्रामाणिक मत आहे.

In reply to by गवि

तुमच्या दळवी किंवा "तें" विषयींच्या प्रतिकूल मताला मी पाठिंबा देत नसून .......सुस्पष्टपणा असल्याने ते तुमचं प्रामाणिक मत आहे. >> होय. हे मी समजून घेतले होतेच. मुख्य म्हणजे मी वर स्पष्टीकरणात मांडलेल्या बी. आर. चोप्रा व गिरीश कर्नाड यांच्या उदाहरणाशी सुसंगत आहे.

In reply to by गवि

पु.लं.च्या विषयी: त्यांना ज्ञानपीठ देण्याने काही खास फरक पडेलसे वाटत नाही. जितक्या लोकांच्या मनात ते जिव्हाळ्याच्या ठिकाणी आहेत आणि त्यांना वाचत जितके लोक मोठे झाले आहेत ते पाहून ज्ञानपीठही छोटे ठरावे. - गवि साहेब अगदी एक नंबर बोललात!

मि पा वरुन काही नॉमिनेशन्स पाठवावीत का ?

In reply to by कुंदन

बिसीबेळेभात डॉट कॉम आणि दाल रोटी डॉट कॉम वरून निवडसमीतीच्या सदस्यांना दर रविवारी मिठाई,गुलाबगुच्छ पाठवले जातात असे ऐकून आहे.

उत्तम चर्चाविषय. तूर्त जर यामागे थोडे फार काही लॉबी करून होत असले तर ते बाजूला ठेवावे. कारण ते थोडेफार होत जरी असले तरी निवड ही चांगल्याच साहित्यिकांची झाली आहे असे दिसते. माझ्या मते या अशा सन्मानास पात्रतेसाठी एक प्रमाण 'बरेचसे साहित्य कालातीत असावे' असे असावे. काही साहित्य आणि त्याहीपेक्षा साहित्यिक आपल्याला आवडत असले, तरी त्यांचे सर्व साहित्य कालातीत असते असे मला वाटत नाही.

एक माहिती सर्वांसाठी पु. ल. देशपांडे यांची निवड ज्ञानपीठासाठी होण्याचे घाटत होते. परंतु त्यांच्या साहित्याचे इंग्रजीमधे भाषांतर करणारा कुणी भेटला नाही म्हणजे मराठी टू इंग्रजी. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. अन्यथा त्यांचा दर्जा नि:संशय ज्ञानपीठचा होता

In reply to by आशु जोग

ही माहिती निदान माझ्याकरिता तरी नवीन आणि अतिशय मोलाची आहे. म्हणजे आपण कल्पनाही करू शकणार नाही अशीही काही कारणे असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. इथे मांडल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by आशु जोग

परंतु त्यांच्या साहित्याचे इंग्रजीमधे भाषांतर करणारा कुणी भेटला नाही म्हणजे मराठी टू इंग्रजी. बरोबर आहे. "पुढचे दोन तास मी एका हातात घरची वीट आणि दुसर्‍या हातात बाजारची वीट घेऊन त्याच्यामागे त्याचं घर बघत फिरत होतो. एखाद्या गोष्टीचा अतिशय कंटाळा येणे याला वीट येणे का म्हणतात ते मला त्यादिवशी कळलं." कसं करणार भाषांतर..??

In reply to by गवि

ह्या वरुन एक आठवले. स्वतः पुलंनी त्यांच्या एका लेखात "पाश्चात्यांना खरकटं म्हणजे काय हे कसे समजावणार " असे म्हटले होते. लेफ्टओव्हर वगैरे ठीक आहे , पण खरकटे म्हणल्यावर जो अर्थ ध्वनीत होतो तो कसा काय समजावणार.

In reply to by मराठी_माणूस

अगदी अगदी.. आणि त्यातही नुसते लेफ्टओव्हर म्हणजे खरकटे नव्हे. अमुक पदार्थ ताजा, न उष्टावलेला असला तरी त्याचा स्पर्श झालेला हात खरकटा होतो. काही पदार्थांच्या बाबतीत तसं नाही... असंही काहीतरी त्यात आहे... सरळसोट नॅरेटिव्ह कथा कादंबर्‍यांची भाषांतरं त्यातल्यात्यात बरी होतात. पण भाषेवरच (भाषासौंदर्यावरच) आधारित साहित्याचं भाषांतर केलं तरी ते वाचणार्‍याला त्यातली छटा कळणार नाही आणि मोठा पुरस्कार देणाइतकं योग्य ते वाटणारही नाही. बापू काणे सेक्रेटरी जेव्हा म्हणतो "सुशी मेक्स फस्क्लास झुणका" ..... हे वाक्य तर सरळ इंग्रजीतच आहे.. पण त्यामागच्या भावनेला जे संदर्भ लागतात ते कुठून येणार इंग्रजीत? शिवाय पुलं फ्रान्सविषयी एकदा म्हणाले होते की "त्यांची ती द्राक्षसंस्कृती आणि आपली रुद्राक्षसंस्कृती" किंवा आमच्याकडे सर्वजण देशपांडे आहेत आणि ही (सुनिताबाई) तेवढी उपदेशपांडे आहे.. अहो कोट्यांवरच ज्याचा सगळा भार आहे ते भाषांतरित नाहीच होऊ शकत. चिंवि जोशींबाबतही मला वाटतं हेच होईल. मराठीच फार थोर आहे म्हणून नव्हे.. उलट बाजूने इंग्रजीतल्या भाषिक खाचाखोचा मराठी भाषांतरात तरी कशा आणणार?

In reply to by गवि

चांगला मुद्दा मांडलात. पण भाषेवरच (भाषासौंदर्यावरच) आधारित साहित्याचं भाषांतर केलं तरी ते वाचणार्‍याला त्यातली छटा कळणार नाही आणि मोठा पुरस्कार देणाइतकं योग्य ते वाटणारही नाही. "ती फुलराणी" हे भाषाविषय असलेल्या नाटकाचे भाषांतर असुन देखील त्याचा तेव्हढाच आनंद मिळतो हाच पुलंच्या असामान्य प्रतीभेचा अविष्कार .

In reply to by मराठी_माणूस

>>"ती फुलराणी" हे भाषाविषय असलेल्या नाटकाचे भाषांतर असुन देखील त्याचा तेव्हढाच आनंद मिळतो हाच पुलंच्या असामान्य प्रतीभेचा अविष्कार . ते भाषांतर नसून रुपांतर आहे. उर्वरित वाक्याशी सहमत. अवांतर :- काही तरी गंडले आहे. मी प्रतिसाद देण्याआधीच जे प्रतिसाद इथे होते, ते माझ्या प्रतिसादाचे उपप्रतिसाद म्हणून दिसत आहेत. तरीही मी हा प्रतिसाद संपादित पण करू शकलो. काहीतर गडबड आहे. मिपाच्या तांत्रिक मंडळाने इथे लक्ष द्यावे.

In reply to by गवि

मध्यंतरी मिपावरच तेंडुलकरांच्या घाशीरामची पोर्टेबिलीटी कमी असल्याबद्द्लची चर्चा वाचली होती. म्हणजे त्यातली प्रवृत्ती सर्वत्र असेलही पण हे श्राद्ध, कोतवाली इ. भाषिक संदर्भ परकीय भाषांमधे कसे न्यायचे याबद्द्लची चर्चा होती. असो.

ताज्या बातमीनुसार, चंद्रशेखर कंबरा यांना ह्या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे असे वाचण्यात आले आहे..... http://in.news.yahoo.com/blogs/thewatercooler/magic-kambara-writing-100…

कन्नडमधे कितीतरी ज्ञानपीठ विजेते होउन गेले पण त्या लोकांचे एकच दु:ख आहे. तिकडे वाचणाराच कुणी नाही सुधा मूर्ति यांच्या काही पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या ९ आवृत्त्या खपल्या पण कन्नडमधील पहिलीच आवृत्ती अजून संपली नाहीये

In reply to by आशु जोग

सुधा मूर्ति यांच्या काही पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या ९ आवृत्त्या खपल्या पण कन्नडमधील पहिलीच आवृत्ती अजून संपली नाहीये कन्नड तसेच मराठी आवृत्तीं किती प्रतींच्या होत्या?

In reply to by आशु जोग

पण त्या लोकांचे एकच दु:ख आहे. तिकडे वाचणाराच कुणी नाही
खरे आहे. बेंगळूरमध्ये पहाल तर जुने कन्नड ग्रंथ मिळायची मारामार असते. पूर्ण शहरात १० हून अधिक दुकाने नसतील कन्नड ग्रंथ विकणारी.अनेक जण मैसूरला जातात पुस्तके घ्यायला.अनेक उच्चशिक्षित लोक ज्ञानपीठ काय्,साहित्य अकादमी काय ,संगीत वगैरे बाबतीत अनभिज्ञ असलेले मी पाहिले आहेत. मी,माझे काम्,माझे कुटूंब एवढाच विचार असतो. पं.भीमसेन जोशींचे निधन झाले तेव्हा तरुण पिढीला ते कन्नडिगा आहेत आणी त्यांनी कन्नड गाणी गायली आहेत हे माहित नव्हते,

'ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र? येथी मराठी साहित्यिक म्हणजे मराठी भाषेत लिहिणारा साहित्यिक असे गृहित धरतो. कारण द रा बेंद्रे हे ज्ञानपीठ विजेते कन्नड कवी मराठी भाषक होते!

पी व्ही नरसिंहराव हे कसे विद्वान आहेत आणि कित्येक भाषांवर त्यांचे कसे प्रभुत्व आहे हे सांगताना तेलुगु माणूस थकत नाही पण त्यांनी लिहिलेले एखादे पुस्तक सांगा म्हटले तर तो अडखळतो व्यक्ती आणि वल्ली चे तेलुगु रुपांतर नरसिंहराव यांनी केले आहे.

In reply to by आशु जोग

पी व्ही नरसिंहराव हे कसे विद्वान आहेत आणि कित्येक भाषांवर त्यांचे कसे प्रभुत्व आहे हे सांगताना तेलुगु माणूस थकत नाही
हे नविनच ऐकतोय. ईतक्या वर्षात एकही तेलगु मित्राने त्यांची महती गायल्याचे आठवत नाही.चिरंजीवीबद्दल म्हणाल तर ठीक आहे.एकूणच तेलगु मध्यम्/उच्च वर्ग पुस्तके,साहित्य,भाषा,संस्कृती ह्या वेळ 'व्यर्थ' घालवणार्‍या गोष्टींना जीवनात फार थारा देत नाही असे माझे निरिक्षण आहे. आपल्या तेलेगु मित्राला चार तेलगु कवी/लेखकांची नावे विचारा.!

In reply to by चिरोटा

एकूणच तेलगु मध्यम्/उच्च वर्ग पुस्तके,साहित्य,भाषा,संस्कृती ह्या वेळ 'व्यर्थ' घालवणार्‍या गोष्टींना जीवनात फार थारा देत नाही असे माझे निरिक्षण आहे. आपल्या तेलेगु मित्राला चार तेलगु कवी/लेखकांची नावे विचारा.!
अतिप्रचंड सहमत चिरोटाजी......

माझ्या वैयक्तिक मते तर विजय तेंडुलकर, पुल देशपांडे, जयवंत दळवी, चिंत्र्यं खानोलकर ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र आहेत / होती ('ज्ञानपीठ' पुरस्कार मरणोत्तर दिला जातो की नाही याबद्दल माहिती नाही). आपले काय मत आहे? पु.ल.देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि तो सार्थच वाटतो. प्र. के. अत्रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे की नाही हे मला ठाउक नाही. पण मिळालेला असेल असे वाटते. जर मिळाला नसेल तर तो त्यांच्यावर झालेला सगळ्यात मोठा अन्याय होय. भारतात होउन गेलेला आजवरचा सर्वश्रेष्ठ लेखक जर कोणी असेल ते आचार्य अत्रे हेच होय, असे प्रामाणिक मत आहे. साहित्याचे असे एकही दालन नाही, असा एकही कोपरा नाही की जिथे हा माणून मुक्तपणे आणि समर्थपणे वावरला नाही. कविता (मॄदू, गंभीर,विनोदी,विडंबन सगळ्या प्रकारच्या), नाटके (गंभीर,विनोदी,राजकीय्,सामाजिक अशी सगळ्या प्रकारची), चित्रपट कथा (गंभीर,विनोदी,राजकीय्,सामाजिक अशी सगळ्या प्रकारच्या), चरित्र लेखन, आत्मचरित्र लेखन, नाटकातील पदांची रचना करणे, चित्रपटातील गाणी लिहिणे, लहान मुलांसाठी वाचनमाला, शैक्षणिक पुस्तकांचे लिखाण,प्रचंड प्रमाणावर वॄत्तपत्रीय लिखाण आणि ऐतिहासिक कादंबरीसुद्धा, ही यादी संपतच नाही. जर त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा झाला तर विडंबन काव्याचे ते जनक आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर असा लेखक गेल्या दहा हजार वर्षांत होउन गेलेला नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

>>पु.ल.देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि तो सार्थच वाटतो. आयला, हे काय नवीनच ??

In reply to by अप्पा जोगळेकर

तो ज्ञानपीठ नव्हे, साहित्य अकादमीचा पुरस्कार. पहिला लेखकाला असतो व दुसरा पुस्तकाला, असा माझा अंदाज आहे.

In reply to by फारएन्ड

तो ज्ञानपीठ नव्हे, साहित्य अकादमीचा पुरस्कार या दुरुस्तीबद्दल आभार. माझ्याकडून चूक झाली.