Skip to main content

गाथा, खरेच इंद्रायणीत तरंगली ?

लेखक शरद यांनी शनिवार, 01/10/2011 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
गाथा तरंगली का? परवा आमच्याकडे शरदबोवा आले. हे शरदबोवा कोण असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का ? सांगतो. हे थापा मारतात ; पण अगदी बेमालूम ( हे प्रमाणपत्र मॅडम प्रियाली यांनी दिले आहे तेव्हा ते खरे आहे असे आपण धरून चालू. ) त्यांच्या थापा अगदी विश्वासार्ह वाटतात. आल्यावर त्यांनी एकदम विचारले " काहो, तुकारामांची गाथा इन्द्रायणीतून वर आली, यावर तुमचा विश्वास आहे की नाही ? " मी काही उत्तर देण्याआधीच ते म्हणाले ' घाई करू नका. तुम्हाला पुरावाच देतो " त्यांनी त्यांच्या पोतडीतून काही कागद काढले व म्हणाले " परवा देहूला गेलो होतो, तेथे बूवांची अस्सल गाथा सापडली आहे. त्यातले दोन अभंग मला मिळाले आहेत. हे पहा. " त्यांनी पिवळसर दिसणारे दोन अभंग माझ्यासमोर सरकावले. त्यांना हात न लावता मी विचारले " अहो, पण हे अस्सल कशावरून ? माझा तुकाराम महाराजांवर विश्वास आहे, पण .....". बोवांना मला काय शंका आली आहे याची कल्पना आली. त्यांनी तावातावाने विचारले " मी थापा मारत आहे असे म्हणावयाचे आहे ना ? ठीक आहे. आणा एका बादलीत पाणी. " मी बादली आणली. बोवांनी एक अभंग बादलीत बुडापर्यंत बुडवला. थोडा वेळ तेथे दाबून ठेवला व हात काढला. काय आश्चर्य .. कागद हळूहळू वर येऊन तरंगू लागला. घरातील सगळी माणसे गोळा झाली होती. प्रत्येकाने हाच प्रयोग केला. कागद हळूहळू वर येतच होता.कागदावरची अक्षरे जशीच्या तशीच. आमची लेक फिस्कारली " लॅमिनेट केले असेल !" प्रत्येकाने अगदी काळजीपूर्वक कागद तपासला. लॅमिनेशन नव्हते. मुलाने शंका काढली " व्हार्निशिन्ग केले असेल. " लगेच आर्टपेपरची एक जाहिरात आणून त्याचे तुकडे पाण्यात बुडवले. कागदाला काही झाले नाही पण कागद बूडालेलाच राहिला. तो काही तरंगेना. आमचे बुचकळ्यात पडलेले चेहरे पाहून बोवांचा चेहरा लोणी मिळालेल्या बोक्यासारखा दिसू लागला. बोवा म्हणाले " आता अन्निसच्या कार्यकर्त्यांना बोलवा " आता घाटपांडे काकांना कोथरूडहून बोलवावे असा विचार करत होतो तो बोवाच म्हणाले " तुमच्या त्या पारशी मित्रांना बोलवाना " मी कोड्यात पडलेलो पाहून ते म्हणाले " ते कोण यनावाला सर आहेत ना? बोलवा त्यांनाच ". मी म्हटले " बोवा ते पारशी नाहीत." बोवा म्हणाले "नसतील नसतील, मला वाटले दारूवाला, बंदुकवाला तसे यनावाला ! " आता यनावाला सर रोजच भेटतात. तेव्हा तसे करावयाचे ठरले. त्यांना त्यांच्याच घरी प्रयोग करावयास द्यावयाचे ठरले उगीच आमच्या पाण्यात काही "जड पाणी " (Heavy water) आहे म्हणून अभंग तरंगतो असे वाटावयास नको. बोवा म्हणाले " त्यांना अभंगांची काळजी घ्यावयास सांगा. म्हणजे पाण्यात कितींदाही बुडवा, पाहिजे तर अगदी चवदा दिवस नको पण रात्रभर पाण्यात ठेवा म्हणावे पण नंतर मला माझे अभंग मिळाले पाहीजेत." मला एकदम पटले. आता दूधका दूध, पानीका पानी. (हे यनावाला मिपावरील सर्व वाचकांना माहित नसतील ; प्रा. य.ना. वालावलकर हे अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्राध्यापक होते.आठ वर्षे सकाळमध्ये रोज शब्दकोडी टाकत. उपक्रममधील तर्कक्रीडा ही कोडी लोकप्रिय होती. देव, चमत्कार वगैरेवर ते पोटतिडिकेने लिहतात.अजिबात विश्वास नाही.) त्याप्रमाणे मी अभंग घेऊन श्री यनावालांच्या घरी गेलो. बरोबर आमचे एक मित्र प्रा. काळे यांनाही घेतले.(साक्षिदार असलेला बरा!) अभंग यनावालांना दिले व काय करावयाचे ते सांगितले. त्यांनाही तसेच आढळले. त्यांनीही कागद तपासून पाहिले. मी त्यांना शरदबोवांबद्दल काही सांगितले नाही. त्यांनी सांगितलेले मान्य केलेले मुद्दे असे : (१) काजळापासून केलेल्या शाईवर (India Ink)पाण्याचा परिणाम होत नाही. तुकारामाच्या वेळी जर ही शाई मिळत असेल तर अक्षरांवर पाण्याचा परिणाम होणार नाही. (२) हा कागदाचा विशिष्ट गुण (किंवा विशिष्ट कागदाचा गुण) आहे. जर असा कागद तुकारामांना मिळाला असेल तर अभंग पाण्यातून वर येणे शक्य आहे. (३) वरील दोन गोष्टी जुळण्याची शक्यता असल्याने " तुकारामांची गाथा तेरा दिवसांनी इंद्रायणीतून वर आली " ही समजूत खरी असणे शक्य आहे. ( तुकाराम महाराज इंद्रायणीकाठी काही न खाता तेरा दिवस बसणेही शक्य आहे ; आमचे अण्णा नाही का दिल्लीत बसले होते ?) घाटपांडे काकांना फोन केला. ते आले. त्यांनी परिक्षा केली. रिझल्ट तेच. ते प्रतिसाद देतीलच. आणि हो, तुमच्यापैकी कोणाला पुण्यात माझ्या घरी येऊन प्रयोग करावयाचा असेल तर बोवा अभंग परत घेऊन जाईपर्यंत यावयास काहीच हरकत नाही. मी हल्ली कोणालाही काहीही शिकवत नाही . एकेकाळी कॉलेजातल्या मुलामुलींना शिकवत होतो, पण नंतर लग्न केले व गेली ४५ वर्षे एक शिक्षिका मलाच शिकवत असते ; तेव्हा हल्ली मी फक्त फुकटचे सल्ले देतो. आजही एक देतो.. जर चमत्कार वगैरे गोष्टी आपल्याला पटत नसतील तर " ह्याsss, सगळ्या थापा " असे म्हणावयाच्या आधी " हे शक्य आहे का ? " याचाही विचार करा. अभंगांचे छायाचित्र खाली दिले आहे. img021 शरद

वाचने 17395
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

धाग्याचा उद्देश समजला नाही. (कन्फ्यूज्ड) नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

?????????????

In reply to by विनायक प्रभू

:( :( :( :( :( :( :( :( :( :( :( :(

In reply to by नितिन थत्ते

हा धागा तिथून इथे थत्तेचिच्चांच्या प्रतिसादासकट हलवला गेला काय? असे काही होते हे माहितच नव्हते. ;) पण माझा प्रतिसाद का बरे नाही हलला... वाटेत संपादित तर नाही झाला. :-( असो.

उपक्रमावर बुडवलेला लेख मिपावर तरतो या चमत्कारावर आमचा पूर्वापार विश्वास आहे. ;) आता आणखी काही फ्याक्ट्स - १. मॅडम प्रियालींना शरदबोवांनी 'महाभारतात बुरखा पद्धती होती' अशी गोळी चारायचा प्रयत्न केल्याने त्यांनी शरदबोवांना ते प्रमाणपत्र दिले असावे. ;) २. यनावाला मिपाकरांना माहित आहेत. ते येथील सदस्य असून त्यांनी येथेही लेख टाकले आहेत. ३. शरदबोवांनी परकाया प्रवेश केल्याने आमचे शरदकाका हरवले आहेत.

In reply to by प्रियाली

शरदबोवा कळले (तेच ते थापा मारतात ते) पण मॅडम प्रियाली कोण? मिपा सदस्य आहेत का? शोध घेतला असता मॅडम प्रियाली सापडल्या नाहीत.

In reply to by नितिन थत्ते

त्या बहुधा उलट्या पायांनी अदृश्य रुपात वावरत असतील किंवा तुकारामाच्या गाथा त्यांनीच अमानवी शक्तीने तरवल्या असतील पण नक्की म्हैती नै. तुम्हाला काही अधिक कळले किंवा मॅडम प्रियाली भेटल्या तर मला नक्की कळवा.

In reply to by नितिन थत्ते

अरे बापरे थत्ते चाचा अनेक घडामोडीत ( घडा पोएक्षा मोडीतच जास्त) ज्यांचा अदृश्य हात/पाय असतो अशांचा तुम्हाला पत्ता लागला नाही हे आश्चर्यच आहे.

In reply to by नितिन थत्ते

अरे बापरे थत्ते चाचा अनेक घडामोडीत ( घडा पोएक्षा मोडीतच जास्त) ज्यांचा अदृश्य हात/पाय असतो अशांचा तुम्हाला पत्ता लागला नाही हे आश्चर्यच आहे.

In reply to by विजुभाऊ

लोचटपणा पुरे झाला विजू. आले लगेच दोनदोन प्रतिसाद देऊन आणि दुसर्‍यांना शहाणपणा शिकवून स्वतः प्रताधिकारातील चित्र सहीत वापरत आहेच.

In reply to by विसुनाना

आम्ही बी हेच म्हंतो. बुवांच्या पिवळसर हातकागदावरील अभंग बादलीतील पाण्यात तळाशी बुडवून ठेवले ते वर आले हे खरेच आहे.कार॑ण आम्ही ते पाहिले. त्या कागदावर प्रियालीचे नाव असते तरीही ते वर आलेच असते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

त्या कागदावर प्रियालीचे नाव असते तरीही ते वर आलेच असते.
तुकाराम सदेह वैकुंठाला गेले हेही आपण ऐकले असेलच. :)

In reply to by विसुनाना

विसुनाना, दुव्यातला दगड मी स्वतः माझ्या हाताने उचलून परत पाण्यात बुडवून पाहायचा प्रयत्न केला आहे रामेश्वरम्ला(२००० मधे ) पण तेव्हा त्याच्यावर जाळी वगैरे काही प्रकार नव्हता.

(हो आम्हाला फारशी समज नसल्याने फक्त प्रश्नच पडतात.) ती दोन पाने तुकोबांच्या मूळच्या गाथेतील असतील तर ती शरदबोवांना कशी मिळाली? पुरातत्त्वखात्याने शरदबोवांना स्पेशल केस एग्झेम्शन देऊन ते कागद त्यांच्याकडे ठेवण्याची परवानगी दिली आहे काय? तुकोबांच्या वारसांना हे ठाऊक आहे काय? त्या गाथेवरचा कॉपीराईट संपला असला तरी मूळ प्रतीवर वारसांचा, प्रकाशकांचा हक्क रहात नाही काय? ते हस्ताक्षर तुकोबांचे आहे नि ही अस्सल मूळची तुकोबांची गाथा आहे याची तुकोबांची नाडीपट्टी काढून वा कुंडली मांडून खात्री करून घेतली आहे काय? गेला बाजार विठ्ठलाला कौल लावून पाहिला होता का? त्या कागदावर मी काही लिहिले तरीही कागद तरतील का, की जोवर त्यावर फक्त तुकोबांचे लिखाण आहे तोवरच ते तरतील? असा प्रयोग करून खात्री करून घेतली आहे काय? जर मी एखादे अक्षर लिहूनही ते तरत असतील तर तो गाथेचा गुण नव्हे तर कागदाचा गुण आहे हे सिद्ध होत नाही काय? जर माझा 'हस्तक्षेपाने' ते बुडू लागले तर तुकोबांचे अभंग कोणाही येरागबाळ्याच्या स्पर्शाने बाधित होतात असे म्हणावे का? आणि असे असेल तर इतकी वर्षे अनेक अपात्र मंडळी त्या गाथेचा व्यापार मांडून बसले आहेत त्यांच्या प्रभावाने मी बाजारातून विकत आणलेली गाथा कमी पावरची होते का? ओरिजिनल पावरची गाथाप्रत मिळवण्यासाठी काय करावे लागेल? वरील प्रतीच्या छायाप्रती (मराठीमधे जिला झेरॉक्स असे म्हणतात) तशा काढून विकल्या तर त्यातील गाथा अधिक चांगली समजेल काय?

In reply to by रमताराम

ती दोन पाने तुकोबांच्या मूळच्या गाथेतील असतील तर ती शरदबोवांना कशी मिळाली?
गाववाले, एकझॅटली हाच प्रश्न आम्हालाही पडला होता. त्यातील "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी" हा वारकरी संप्रदायाचा क्रमांक दोनचा अभंग आहे. (क्र. एक - "रुप पाहता लोचनी" हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग). अगदी पुरातत्व खातं वगैरे याच्याशी संबधीत नसलं तरीही तुकारामांचे वारस मुळच्या तुकाराम गाथेतील पाने अशी इकडे तिकडे होऊ देतील असं वाटत नाही. असो. शरदराव प्रकाश टाकतीलच. :)

जुन्या हस्तलिखिताच्या पोथ्यांची पाने जाड गवती कागदा पासुन बनलेली असतात,तसेच त्याची शाइ बनवताना त्यात बिब्ब्याचा उपयोग करतात म्हणुनच एकदा लिहिल्यावर ते अक्षर कधिच मिटत नाही(म्हणुनच त्याकाळी अक्षर प्रत्यक्ष न खोडता आल्याने त्यावर हरताळाची पुड फासायचे),,, मी स्वतः मळलेल्या जुन्या पोथ्यांचे कागद बादलीत चांगले ४/५तास भिजवून नंतर वाळत टाकलेत,,,ते खराब होण्याचे सोडाच,चांगले स्वच्छ होउन मिळत...ही कागदाच्या व शाइच्या गुणवत्तेची कमाल आहे... या सगळ्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही...ताडपत्रही पाण्यात भिजत नाहीत,तरंगतातही..आणी तुकारामाचे अभंग तर लोकमुखी जिवंत राहीले ,म्हणजेच लोकगंगेनी ते तारले,म्हणजे यातही काहीही संशोधन करण्यासारखे राहिलेले नाही,,,अर्थातच धागा कर्त्याच्या विषयातलं,अजुनही काही सत्य बाहेर यायचं राहीलं असेल तर ते येइलच...ते नंतर विचारात घेता येइल,पण तूर्तास एवढेच..! अवांतर -तुकारामांचे अभंग बुडवले ,,, तर ते कुणी?नंतर ते वर आले तर चमत्कारानी आले,की वरील युक्तिवादानुसार?की अणखीन कशानी?याची सांगोपांग चर्चा डॉ.आ.ह.साळुंखे लिखित ''विद्रोही तुकाराम'' मधे आलेली आहे,जिज्ञासुंनी ती अवश्य वाचावी.

तुकोबांचं अक्षर चांगलं होतं. शुद्धलेखनही चांगलं आहे.

In reply to by श्रावण मोडक

त्या काळात लिखाणासाठी मोडी वापरात होती ना? हे कागद तर बाळबोधीत लिहिलेले दिसतायत!

In reply to by पैसा

त्या काळात लिखाणासाठी मोडी वापरात होती ना?
माहिती नै बॉ आप्ल्याला. त्या काळी असलेल्या कोणाला तरी विचारावे लागेल. ;)
हे कागद तर बाळबोधीत लिहिलेले दिसतायत!
हे मात्र खरंय. पुराव्यानं शाबीत करता येतं, असं दिसतंय. ;)

In reply to by श्रावण मोडक

काहीजण मिपावर अजून असण्याची शक्यता आहे! सगळ्यानी आपाअपले पाय तपासून बघा.

In reply to by पैसा

त्या काळातले नसतील तरी आपापले पाय तपासून घेण्यास हरकत नाही परंतु शहाजीराजांच्या काळी जयराम पिंड्यांनी लिहिलेल्या राधामाधवविलासचंपू या ग्रंथाची पाने पाहून वि.का. राजवाड्यांनी ती लिपी अडिचशे वर्षांपूर्वीचे मराठी वळणाचे बाळबोधी असल्याचे म्हटले आहे. :)

मजाच आहे. तुकारामाच्या अभंगाच्या कथेबाबत जितके कुतूहल वाटत नाही, तितके या विवक्षित कथेतील घटनेबाबत वाटत आहे. पिवळे कागद बादलीत किती वेळ बुडून राहिले? कथेमधील यनावाला आणि शरदराव यांचे हृद्य संबंध असावेत : शरदराव यनावाला यांच्या घरी तेरा दिवस गप्पा मारत राहातील यावर सहज विश्वास बसतो. तितका वेळ बुडाल्यानंतर कागद तरंगले असावेत. (पण हा तपशील द्यायला हवा होता, असे वाटते.)
बोवांनी एक अभंग बादलीत बुडापर्यंत बुडवला. थोडा वेळ तेथे दाबून ठेवला व हात काढला. काय आश्चर्य .. कागद हळूहळू वर येऊन तरंगू लागला.
येथे शरदरावांसारख्या चांगल्या लेखकाने नको इतके सैल वर्णन केलेले आहे. हाताने दाबून ठेवणे, आणि वर येणे हे थोड्याच वेळात (म्हणजे काही मिनिटांत - तासाभराच्या आतच) झाल्यासारखा भ्रम सामान्य मराठी वाचकाला होईल हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे होते. शरदोबांनी कागद दाबून ठेवणे आणि हळूहळू कागद तरंगत येणे या सगळ्या गोष्टींना काही दिवस लागले, हे स्पष्ट करायला हवे होते. (तुकारामाच्या कथेचा काय संबंध आहे ते कळलेच नाही. या प्रकारचा कागद तुकारामाला मिळाला असण्याची शक्यता आहे, असा काही संबंध असावा. असेल तर यनावाला यांनी पिवळे कागद तेरा दिवस बुडून कसे राहिलेत, त्याबद्दल कुठलेच स्पष्टीकरण त्यांच्या तीन "मान्य मुद्द्यांत" दिलेले नाही. "काही कागद तरंगतात" इतकाच एक मुद्दा आहे. शिवाय काजळाचा एक मुद्दा आहे. त्या दोन मुद्द्यांच्या जुळण्याच्या शक्यतेतून तिसर्‍या मुद्द्यातील वर येण्यापूर्वीचे "तेरा दिवस" कुठून आलेत? या कथेतले यनावाला म्हणजे तर्काच्या बाबतीत भलत्याच उड्या मारतात!) (या कागदाचा प्रयोग करण्याची काय गरज होती कोणास ठाऊक. प्रेते आधी बुडतात आणि मग काही दिवसांनी सडून तरंगतात. काही-काही देशांत मेंढीच्या कातड्या/आतड्यांचा पार्चमेंट-कागद बनवतात. हा पार्चमेंट कागद नीट कमावला नाही तर सडू शकतो. पार्चमेंट कागद नीट कमावलेला नसण्याची शक्यता आहे. तो तुकारामाला मिळण्याची शक्यता आहे. पाण्यात न-धुतली जाणारी शाई त्याने वापरण्याची शक्यता आहे. कडक थंडीमुळे प्रेतवत कागद सडायला दोन-चार दिवस लागण्याऐवजी तेरा दिवस लागणे शक्य आहे. या सगळ्या शक्यता एकावर एक रचून तरंगण्याची कथा बनू शकते की!)

In reply to by शाहिर

देव. राजा. आई व मित्र यांचा उल्लेख एकेरी करण्याची व्याकरणात / बोलीत जुनीच पद्धत आहे. "आज शिवाजी राजा झाला राजा झाला " या गाण्यात शिवाजी हा उल्लेख एकेरीच आहे. ज्ञानेश्वराला ग्यानबा तसे शिवाजी ला शिवबा तुकारामाला तुकोबा अशा जवळीकीने एकेरी उल्लेख हे आदरार्थीच असतात. मी देवाला गेलो( मी रामाला गेलो, मी विठ्ठलाला / विठोबा ला गेलो , मी कॄष्णाला गेलो, मी दत्ताला गेलो) हे मी कुठल्या देवाच्या देवळात गेलो हे सांगण्यासाठीच वापरतात. आज मी पपू श्री श्री श्री रामसाहेबांच्या देवळात गेलो असे कुणी म्हणत नाहीत किंवा मी आज रामांच्या देवळात गेलो असेही कुणी म्हणत नाही. शिवरायांच्या बाबत शिवाजी हा एकेरी उल्लेख द्वेषाचे राजकारण उकरुन काढण्याकरिता वापरला गेला आहे.

बुडालेली गाथा काही दिवसांनी वर आली यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मराठी संकेतस्थळांवर काही विशिष्ट लेखकांचे जुने धागेही असेच वरचेवर वर येत असतात, हे पाहून इतर पुराव्यांची काही गरज वाटली नाही ;)

In reply to by नंदन

तुकारामाची गाथा जर खाली बुडूनच राहीली असती तर ती आपल्याला वाचायलाच मिळाली नसती गृहीतके:- १) तुकारामानेच गाथा लिहीली आहे २) ती कुणीतरी इंद्रायणीच्या खोल पाण्यात बुडवली आहे. त्यासाठी दगड बांधुन ती पाण्यात टाकण्यात आली होती ३) काही दिवसांनी तो दगड सुटला व गाथा नदी च्या पृष्ठभागावर तरंगत आली ४) शाईने लिहिलेल्या मजकूराला कुठलीही हानी पोचली नाही
मराठी संकेतस्थळांवर काही विशिष्ट लेखकांचे जुने धागेही असेच वरचेवर वर येत असतात, हे पाहून इतर पुराव्यांची काही गरज वाटली नाही
हे आपोआप घडते का? असे घडले नाही तर धागे आणि लेखक कायमचे स्मृतीआड होतील हे भय नाही का?;)

सर, आता तुम्ही म्हणत आहात आणि पुराव्यानिशी सिद्ध करत आहात तर तुक्याला सॉरी संत तुकारामांना असा नैसर्गिक कागद आणि न मिटणारी शाई अभंग लिहिण्यासाठी मिळाली असावी असे ग्रहित धरतो. बाकी, तुकोबाच्या अभंगाच्या वह्या लोक गंगेने तारल्या असे म्हणायच्या ऐवजी असा खराब न होणार्‍या नैसर्गिक कागद आणि लेखनाची सोय तुकोबाच्या काळात होती, अशी तळटीप यापुढे देत जाईन. :) एकेकाळी कॉलेजातल्या मुलामुलींना शिकवत होतो, पण नंतर लग्न केले व गेली ४५ वर्षे एक शिक्षिका मलाच शिकवत असते ; हाहाहा. जेष्ठ नागरिकांच्या समस्या अजून काही सुटल्या नाही असेच म्हणावे काय ? :) -दिलीप बिरुटे (शरद सरांचा विद्यार्थी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.......................तर तुक्याला सॉरी संत तुकारामांना असा नैसर्गिक....................... तुमच्यासारख्या प्रा. डा च्या लेखी वरील हेटाळणीपुर्वक उल्लेख ? मनातील प्रा डा च्या प्रतिमेला बारीक ओरखडा पडला एवढेच कळवितो...बाकी चालु द्या.

In reply to by बद्दु

काही संकेत पाळणे अपेक्षित होते बाकी चालु द्या

In reply to by बद्दु

>>>>> तुमच्यासारख्या प्रा. डा च्या लेखी वरील हेटाळणीपुर्वक उल्लेख ? अर्रर्र.....! क्षमा असावी. श्री संत तुकारामांचा हेटाळणी करण्याची माझा उद्देश नाही. संत तुकाराम माझा लाडका आणि आवडता संत आहे. कारे पुंडया मातलासी । उभे केले विठ्ठलासी ॥ ऎसा कैसा रे तू धीट । मागे भिरकावली वीट ॥ संत तुकाराम भक्त पुंडलिकाचा ’काय रे पुंड्या’ असा जो प्रेमापोटी उल्लेख करतात त्याप्रमाणे माझंही संत तुकारामावर प्रचंड प्रेम असल्यामुळे मीही प्रेमाने त्यांना ’तुक्या” म्हणतो. आपल्याला तो उल्लेख हेटाळणीपूर्वक वाटला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. -दिलीप बिरुटे (धीट)

आमच्या जवळच्या नदीत बुडवून ठेवलेली आहे. तेरा दिवस होऊन गेले, रोज जाऊन पाहून येतो अजूनतरी एकही कागद वर आलेला दिसला नाही. बहुदा गाथेचे ३_१३ (का ३_१४? ;) )होऊन गेलेत कोण जाणे? (बोकाराम) चतुरंग

In reply to by चतुरंग

नको त्या गोष्टी पाण्यात टाकल्याने जलप्रदूषणास कारणीभूत ठरल्याबद्दल तुमच्यावर कार्यवाही होऊ शकेल. ;) (तीन_तेरा एक्स्पर्ट) प्रियाली

३_१४ हे ३_१३ च्या पुढचे व्हर्जन आहे .. बाहेरच्या जगात ३_१३ होतात ..मि पा वर ३_१४ होतात

>> शरदबोवा कोण असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का ? सांगतो. हे थापा मारतात ; पण अगदी बेमालूम कोण उपाध्ये का ?

श्री.शरद यांच्या प्रस्तुत लेखात माझ्या संबंधी जो उल्लेख आहे त्या संदर्भातः-- एका उथळ(४००मिमी व्यास,१५० मिमी उंची) टबात ऐशी मिलिमिटर उंचीपर्यंत पाणी भरले.श्री.शरद यांनी एक आयताकृती(१०० मिमी x ७५ मिमी) जाडसर कागद आणला होता.हॅण्डमेड असावा.त्यावर फिकट पिवळसर डाग दिसत होते.कागदावर "सुंदर ते ध्यान.." हा अभंग काळ्या शाईत लिहिला होता. लेखन बोरूचे/टाकाचे नसून आधुनिक पेनाने केलेले होते.तो कागद पाण्याच्या पृष्ठभागावर ठेवून हाताने तळापर्यंत नेला.चार/पाच सेकंद तिथे ठेवला. नंतर हात काढून घेतला.पाच/सहा सेकंदांत कागद पाण्याच्या पृष्ठभागी येऊन तरंगू लागला.अभंगाची अक्षरे पुसली गेली नव्हती .तसेच शाई पसरली नव्हती.हे सत्य आहे. . माझे मत:-- यात कोणताही चमत्कार नाही हे सांगणे न लगे..अशा प्रकारच्या शाईनिर्मितीचे तंत्रज्ञान पूर्वीपासून ज्ञात होते. आजही अशी शाई बाजारात मिळते. या गुणधर्माचा ,[विशिष्ट गुरुत्व (स्पेसिफिक डेन्सिटी) १ ] कागद निर्माण करणे सहज शक्य आहे.

In reply to by यनावाला

>>लेखन बोरूचे/टाकाचे नसून आधुनिक पेनाने केलेले होते बघा सांगत नव्हतो? तुकारामांच्या काळी आधुनिक पेनाचा सुद्धा शोध भारतात लागलेला होता. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

@-बघा सांगत नव्हतो? तुकारामांच्या काळी आधुनिक पेनाचा सुद्धा शोध भारतात लागलेला होता.... अणी, त्या पेनानी लिहावं,हा शोध अत्ता लागला ;-) कारण त्याकाळी बोरु सारख्या बोरिंग लेखण्यांना धार्मिक साहित्य लेखनाचा मान होता,पण तुकाराम विद्रोही असल्याने, ''पाखंड लेखणी'' वापरीत असे... पाखंड लेखणी मंजे-पेन,,, हि: ह्हा :-D

In reply to by अत्रुप्त आत्मा

कारण त्याकाळी बोरु सारख्या बोरिंग लेखण्यांना धार्मिक साहित्य लेखनाचा मान होता,
स्वा. सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध आठवले. पुर्वीच्या काळी विजेच्या दिव्यांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे मंदिरांच्या अंधारलेल्या गाभार्‍यांमध्ये समया तेवत ठेवणे हाच प्रकाश पाडण्याचा उपाय होता. आज विजेच्या दिव्यांचा वापर ही मुलभूत गरज झाली आहे. पण तरीही देवापुढे मात्र समयीचाच उजेड हवा. कारण देवापुढे समई तेवत ठेवणं पवित्र आहे. तिथे विजेचा दिवा नाही चालणार. ;)

आणि हो, तुमच्यापैकी कोणाला पुण्यात माझ्या घरी येऊन प्रयोग करावयाचा असेल तर बोवा अभंग परत घेऊन जाईपर्यंत यावयास काहीच हरकत नाही. आधी तुंम्हाला यात चमत्कार काय वाटतो?...ते सांगा ,मग आंम्ही तपासायला यायचा मुद्दा येइल... ज्यात काहीही अनाकलनीय म्हणजेच चमत्कार वाटावं असं काहीच नाही... त्याच्या बाबतीत प्रश्न तुंम्हीच उपस्थित केलाय, तो काय तो इथेच आधी स्पष्ट करा...मग बघू तुमच्याकडे यायचं की नाही ते... तेव्हा हल्ली मी फक्त फुकटचे सल्ले देतो. आजही एक देतो.. १)जर चमत्कार वगैरे गोष्टी आपल्याला पटत नसतील तर ". अहो शरदराव,चमत्कार आंम्हाला अणी तुम्हालाही पटण्याचा प्रश्नच येत नाही हो.समजा एखादी गोष्ट आज चमत्कारा सारखी वाटतीये,तर ती मला किंवा तुम्हाला पटली काय नाइ पटली काय? त्यानी तिच्या स्वयंसिद्ध खरेखोटे पणाला बाधा पोचत नाही. २)ह्याsss, सगळ्या थापा " असे म्हणावयाच्या आधी " हे शक्य आहे का ? " याचाही विचार करा. हा तर तुंम्ही विज्ञाननिष्ठां वर केलेला बेजबाबदार उलटा आरोप आहे...विज्ञाननिष्ठ लोक जेंव्हा या असल्या गोष्टींना ''थापा'' म्हणुन म्हणतात, तेंव्हा " हे शक्य आहे का ? " हे त्यांनी सर्वसामान्य तर्क व विज्ञानाचे नियम याच्या अनुषंगानीच अधी ताडलेलं असतं...म्हणुन ते याला थापा म्हणतात, आणी चमत्कारांचा पुढे तपासल्यावर नेहमीच बोय्रा वाजतो, हा पुर्वानुभवही गाठिशी असतो...तेंव्हा न तपासता काहीही बोलायची पद्धत श्रद्धाळुंची असते,,,विज्ञाननिष्ठांची नव्हे...तुंम्ही हे उलट श्रद्धाळुंना जाऊन शिकवा जरा,की ''कित्ती महान चमत्कार आहे हा....!'' असे म्हणावयाच्या आधी " हे शक्य आहे का ? " याचाही विचार करा...

गाथा बुडवल्यानंतर वर आली ह्या गोष्टीवर आमचा विश्वास आहेच पण ती तशी आली नसती तरी काहीही फरक पडला नसता. जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अभंग पुन्हा लिहिले असते अथवा वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे लोकामुखी जिवंत राहिले असतेच. अभंगाचे बाड वर येण्यापेक्षा तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग हाच आमच्यासाठी खरा चमत्कार आहे. दारुड्या व्यक्तीचा संसार वाचवणारा हा चमत्कार आहे, दांभिकाला दांभिकता सोडायला लावणारा हा चमत्कार आहे, दुसर्‍याच्या धन, सम्पत्ती, बायको (नवरादेखील) यांच्याकडे वाईट नजरेने बघण्यापासून रोखणारा हा चमत्कार आहे , 'असाध्य ते साध्य, करीता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे' असे सांगून 'तू लढ, तू भीड' असे सांगणारा हा चमत्कार आहे. विंचू पिंडीवर असला तरी त्याला नमस्कार न करता चपलेने ठेचावा हे सांगणारा, 'सर्प, विंचू नारायण त्यासी वंदावे दुरुन ' असे सांगून व्यावहारिक शहाणपण देणारा हा चमत्कार आहे. संध्याकाळी जेवायला काय असा प्रश्न असताना 'आनंदाचे डोही, आनंद तरंग' असे म्हणण्याची ताकद असलेला हा चमत्कार आहे. आणखी काय लिहू?

तुकरामाच्या वेळि आजचे शुद्ध् लेखनाचे नियम न्हवते .... लिपिहि वेगळि होति