✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोराची चिंचोली

स
सर्वसाक्षी यांनी
गुरुवार, 09/22/2011 - 00:34  ·  लेख
लेख
a अखेर आम्ही खरोखरच निघालो! अनेक बेत अनेकदा ठरतात आणि विरतात. तर आम्ही मोराच्या चिंचोलीला निघालो. नेहेमीप्रमाणे निघायला उशीर झालाच. त्यात भर म्हणजे खंडाळा घाटात ऐन बोगद्याच्या तोंडावर रेडीएटर मधुन भसाभस वाफ निघु लागली आणि आमची मिनीबस बघता बघता वाफेने भरली. तेवढाच फुकटात वाफेचे स्नान घेण्याचा विचार होता, पण पाणी भरेपर्यंत सर्वांनी खाली उतरायचे ठरले. पाणी आणायला तशी १०-१५ मिनिटे लागणारच होती. उतरून समोर पाहतो तर डोंगरमाथा धुक्यात शिरला होता. वातावरण निर्मिती तर झकास झाली. मंडळींनी फोटु काढले, चहा घेतला आणि आम्ही मार्गाला लागलो. मोराची चिंचोली हे गांव चाकणच्या पुढे पुणे-नाशिक मार्गावर लागताच डाव्या हाताला शिक्रापूर फाट्यावरुन आत सुमारे १८ किलोमिटर अंतरावर आहे. या गावात सुमारे दोन हजार मोर असल्याचा सरकारी दावा होता. आम्हाला ५-१० दिसले तरी चालणार होते. मस्त गावात जायचे, गावच्या घरगुती जेवणावर ताव मारायचा, जसे आणि जितके दिसतील तसे आणि तितके मोर पाहायचे, उनाडायचे असा हा 'कृषी पर्यटनाचा' कार्यक्रम. मधे मधे रस्ता खराब होता. शेवट्चा पल्ला तर दिव्यच. पण हल्ली आम्हा मुंबईकरांना खड्ड्यांची सवय झालेली असल्याने कुणी खड्ड्यांबद्द्ल फारशी तक्रार केली नाही. पोहोचेपर्यंत साडेबारा झाले होते. मालक वाट्च पाहत होते. 'तुम्ही साडे दहाला येणार म्हणुन पोहे करुन ठेवले होते आणि तुमची वाट्च पाहत होतो' मालक सामोरे येत म्हणाले. मग उशीराचे कारण सांगत हात पाय धुतले आणि सतरंज्यांवर बैठक घेतली. 'एक वाजत आलाय तेव्हा पानं घेतो, गरम गरम जेवा आणि मग भटका मनसोक्त' हे मालकांचे म्हणणे एकदम मान्य झाले. पलिकडे मस्तपैकी शेणाने सारविलेल्या जमिनीवर पाने मांडली जात असताना मालक अलगद पावली जवळ येत म्हणाले, 'आवाज न करता, धसमुसळेपणा न करता हळुच पलिकडे चला. मोर आलाय.' हा मोर १४-१५ वर्षांचा असून तो अगदी लहान असल्यापासून त्यांच्याकडे येत असल्याने तो धीट झाला आहे पण तरीही गलका वा भारी हालचाली झाल्या तर तो निघुन जाईल असा इशारा देत मालकांनी आम्हाला त्या दिशेला नेत मोर दाखवला. मी कॅमेरा सरसावत पुढे गेलो आणि जमेल तसे फटाफट फोटु टिपले. या पक्ष्याचा रुबाब काही वेगळाच. a a peacock3 एव्हाना मोराची मर्जी फिरली. बेटा चक्क उड्डाण घेत एका झाडावर सावलीत जाउन निवांत बसला. आम्हाला एकाएकी पोटात कावळे कोकलत असल्याची जाणीव झाली. आम्ही बसताच ताटे वाढली गेली. गरम गरम ज्वारीची भाकरी, पिठले, मटकीची मसालेदार उसळ, दह्यातली कोशिंबीर, ठेचा, लोणचे, खारवलेल्या मिरच्या, भात, आमटी असा बेत होता. सगळे तुटुन पडले. वर मालकांचा प्रेमळ आग्रह. आता पुढे दोन आव्हाने होती. एक - हात जमिनीला न टेकता वा आधार घेता उठुन उभे राहणे आणि दुसरे - आडवे होण्याचा मोह टाळणे. हातावर पाणी पडताच आम्ही भटकायला निघालो. डावीकडे असलेल्या कृत्रिम तलावाच्या कडेला अनेक पक्षी वावरत होते. माझे लक्ष्य एका चिमणीसारख्या दिसणार्‍या पक्षांच्या जोडीने वेधले. मी कॅमेर्‍याचा किरण साधेपर्यंत एक उडाला, दुसरा सापडला. नांगरलेल्या भुसभुशीत जमिनीत चालायला मजा येत होती. शेतातुन जाताना पलिकडच्या वाफ्यात डोलणारी कणसे टिपायचा मोह आवरला नाही. मध्यभागी असलेल्या विहिरीच्या बरोबर वरती सुग्रणीची दोन घरटी झाडाला लटकत होती. विहीरीकाठच्या बारक्या झाडांवर व माजलेल्या गवतावर चतुर भिरभिरत होते. आम्ही मळा ओलांडुन दाट झाडीतुन पायवाट तुडवित एका माळावर येउन पोचलो. वाटेत आम्हाला म्हशी दिसल्या. एकीने तर अगदी पोज देऊन आपली छबी टिपुन घेतली. हीच ती 'मिस मोराची चिंचोली' दिड दोन तास भटकंती झाल्यावर आम्ही परतलो. अचानक मागच्या अंगाने मोराचे टाहो ऐकु येऊ लागले. आम्ही त्वरेने मागल्या बाजुला गेलो. दोन मोर होते खरे पण दूर सुरक्षित अंतरावर. मागे दाट झाडी पण पुढे उघडा नंगरलेला मळा. जराही पुढे जायची सोय नाही. चाहुलीने बुजले तर बेटे पळुन जायचे. मात्र अमचे नशिब बरे होते. एका मोराने पिसारा फुलविला. मोरांना उन जराही सहन होत नसावे. मळभ येताच बाहेर पडणारे हे मोर उन येताच सावलीच्या दिशेने सरकायचे. pcock dance 2 copy आम्ही चार पांच जण जमेल तितके झाडाच्या आडोशाने पुढे गेलो आणि शांतपणे आडोशाला कॅमेरा लावुन वाट पाहत बसलो.पुन्हा थोडे सावट येताच झाडीत गेलेला मोर थोडे सावट येताच पुन्हा प्रकट झाला. मोराचा रंग मागच्या झाडीला साजेसा, प्रकाश फारसा कडक नाही आणि पुन्हा अंतर यामुळे मोर टिपणे हे एक आव्हान होते. pcock dance 5 copy बघता बघता एकीकडे दूरवर असलेल्या जोडीदाराला साद घालत त्या मोराने आपला पिसारा उघडला. pcock dance 3 copy सोसाट्याचा वारा येताच छ्त्री उलटावी तदवत पिसारा मागुन उलट पुढे आलेला तो मोर मला अत्यंत देखणा वाटला. असा प्रकार पाहायला मिळणे ही पर्वणी. pcock dance 6 copy तासभर मोर पाहुन आम्ही चहाला परत आलो. निघायची वेळ झाली होती.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
मौजमजा
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
18808 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

जाम भारी रे, तसंच पुढं

५० फक्त
गुरुवार, 09/22/2011 - 00:46 नवीन
जाम भारी रे, तसंच पुढं जैनमंदिरात जाउन यायचं की, बाकी गेला कुणाकडं होतात, त्या कालेजात का त्याच्या पलिकडं आनंदराव थोपटेंचं घरगुती केंद्र आहे तिथं. आम्ही तिथंच गेलो होतो, हा त्याचा रिपोर्ट -http://misalpav.com/node/16602
  • Log in or register to post comments

बरोबर ओळखलत

सर्वसाक्षी
गुरुवार, 09/22/2011 - 23:12 नवीन
आम्ही थोपट्यांकडेच उतरलो होतो. 'माऊली' मळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

साक्षी

श्रावण मोडक
गुरुवार, 09/22/2011 - 01:02 नवीन
साक्षीबुवांच्या धाग्यावर आल्याचं समाधान झालं.
  • Log in or register to post comments

येक नंबर काढलेत फोटु... आमचा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/22/2011 - 01:18 नवीन
येक नंबर काढलेत फोटु... आमचा तुम्हाला वन्स मोर :-)
  • Log in or register to post comments

वाह!!! पुढच्या फेरीत इथे

शिल्पा ब
गुरुवार, 09/22/2011 - 01:23 नवीन
वाह!!! पुढच्या फेरीत इथे नक्की जाउन येईन. खुपच छान.
  • Log in or register to post comments

एकदम झकास फोटो

पाषाणभेद
गुरुवार, 09/22/2011 - 01:28 नवीन
एकदम झकास फोटो
  • Log in or register to post comments

झक्कास...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/22/2011 - 01:36 नवीन
झक्कास छायाचित्रे, सर्वसाक्षी. दिल मांगे मोर.....
  • Log in or register to post comments

सुपर्ब!!!

शुचि
गुरुवार, 09/22/2011 - 03:43 नवीन
सुपर्ब!!!
  • Log in or register to post comments

मस्त

प्रचेतस
गुरुवार, 09/22/2011 - 08:24 नवीन
मोरांचे अतिशय देखणे फोटो
  • Log in or register to post comments

क्या बात.. क्या बात.. क्या

गवि
गुरुवार, 09/22/2011 - 09:11 नवीन
क्या बात.. क्या बात.. क्या बात.. तो चिमणीसारखा दिसणारा पक्षी लार्क ऊर्फ चंडोल असावा. मस्त फोटो..
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सर्वसाक्षी
गुरुवार, 09/22/2011 - 23:42 नवीन
गवि, माहितीबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सर्वसाक्षी काका, जबरा फोटो

किसन शिंदे
गुरुवार, 09/22/2011 - 09:39 नवीन
सर्वसाक्षी काका, जबरा फोटो काढलेत तुम्ही आणी हे ठिकाणही मस्तच आहे, आत्ताच्या वेळेला गावी गेलो कि इथे आवर्जुन जाणार.
  • Log in or register to post comments

सुंदर

मृत्युन्जय
गुरुवार, 09/22/2011 - 12:03 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

अप्रतिम ...

गणेशा
गुरुवार, 09/22/2011 - 12:52 नवीन
अप्रतिम ...
  • Log in or register to post comments

मस्त

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 09/22/2011 - 13:00 नवीन
एकदम जबर्‍यादस्त फटू.
  • Log in or register to post comments

मस्त फोटो. नितिन थत्ते

नितिन थत्ते
गुरुवार, 09/22/2011 - 17:21 नवीन
मस्त फोटो. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

सर्वच छायाचित्रे अप्रतिम

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 09/22/2011 - 18:04 नवीन
सर्वच छायाचित्रे अप्रतिम आहेत. फक्त एकाची caption लिहीताना चूक झाली असावी असे वाटते. जिला मिस मोराची चिंचोली म्हंटलेय ती बहुधा मिस नसावी.
  • Log in or register to post comments

>>जिला मिस मोराची चिंचोली

मनराव
Tue, 09/27/2011 - 16:29 नवीन
>>जिला मिस मोराची चिंचोली म्हंटलेय ती बहुधा मिस नसावी<<< लोकांची कल्पकता पाहून अंमळ गम्मत वाटली........ बाकी फोटू एकदम झक्कास..........फक्त मिस (? यांच्या मते) मोराची चिंचोलीचा न्हवेच तर सगळेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

अप्रतिम

स्मिता.
गुरुवार, 09/22/2011 - 18:16 नवीन
मोराचे क्लोज अप तसेच पिसारा फुलवलेले, सर्वच फोटो अप्रतिम. पिसारा फुलवलेला मोर तासभर बघायला मिळाला म्हणजे नशिबवान आहात. -(पिसारा फुलवलेला मोर कधिही न पाहिलेली) स्मिता
  • Log in or register to post comments

सुप्पर...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/22/2011 - 18:23 नवीन
एक लंबर फोटो आले आहेत. बाकी, मोरांनी तर तुम्हाला खास मोकळ्या मैदानात येऊन माझे फोटो काढा असा आग्रह धरल्या सारखे वाटले. 'मिस मोराची चिंचोलीनेही छान पोज दिली आहे. :) मोराच्या चिंचोलीच्या बातम्या अधून-मधून पेप्रात येत असतात. मोरांच्याझुंडीचं एखादं दृष्य वाट्याला येते की काय असे लेखन संपेपर्यंत वाटत होते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो खूप छान आले आहेत.

अनामिक
गुरुवार, 09/22/2011 - 18:58 नवीन
सगळेच फोटो खूप छान आले आहेत.
  • Log in or register to post comments

मस्त फोटो!

पैसा
गुरुवार, 09/22/2011 - 19:52 नवीन
पाहून अत्यानंद जहाला! मोरांचे फोटो अप्रतिम आहेतच पण पायवाटेचा फोटो फारच आवडला.
  • Log in or register to post comments

मित्रा फोटो पाहताना खरेच छान

आशु जोग
Fri, 09/23/2011 - 00:10 नवीन
मित्रा फोटो पाहताना खरेच छान वाटले तिथे जाऊ शकत नाही तर निदान फोटो तरी -- फोटो नीटपणे १, १ पाहतो आहे मोरांमधला दुसरा मोर आणि शेवटचा मोर अतिशय छान पण काही फोटो तो क्षण पकडताना नीट फोकस न झाल्यासारखे वाटले उदा - चिमणी -- कोणता कॅमेरा वापरतोस !
  • Log in or register to post comments

चिमणी

सर्वसाक्षी
Fri, 09/23/2011 - 20:42 नवीन
फोकस तर बरोबर आहे, कदाचित डोळे गडद पट्ट्यात असल्याने प्रकाशबिंदु स्पष्ट न दिसल्याने तसेच आंगावरच्या पिसांमुळे तसा भास होत असावा. कॅमेरा निकॉन डी ६० आहे. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

मोराचे सगळे फोटू आवडले.

रेवती
Fri, 09/23/2011 - 07:22 नवीन
मोराचे सगळे फोटू आवडले. कणसावर मोती लावल्यासारखे वाटतायत. पिवळा चतुर खोटा वाटावा इतका मस्त!
  • Log in or register to post comments

भारीच एकदम.

जागु
Fri, 09/23/2011 - 14:55 नवीन
भारीच एकदम.
  • Log in or register to post comments

मस्त!

फारएन्ड
Fri, 09/23/2011 - 17:02 नवीन
सगळे फोटो आवडले! वर्णनही मस्त. त्यांची एक वेबसाईटही दिसते आहे. तेथूनच संपर्काचा नं वगैरे घेतला होता का आणि फोनवरून त्यांनी रिझर्वेशन केले होते का?
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर फोटू!

चतुरंग
Fri, 09/23/2011 - 17:07 नवीन
मोर हा अत्यंत देखणा पक्षी आहे हे या फोटोतून सिद्ध होते. पिवळ्या चतुराचाही मस्त आलाय एकदम शार्प फोकस! थोपटे आणि माऊलीमळा याबद्दल जरा आणखीन माहिती द्यावीत - दूरध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम. रंगमोर
  • Log in or register to post comments

फोटु आणि फोटो वरील सही दोन्ही

मदनबाण
Fri, 09/23/2011 - 20:39 नवीन
फोटु आणि फोटो वरील सही दोन्ही दिसले. ;) फोटु छानच आहेत. :)
  • Log in or register to post comments

आनंदराव थोपटे हे केंद्र

५० फक्त
Sat, 09/24/2011 - 23:10 नवीन
आनंदराव थोपटे हे केंद्र घरगुती पद्धतिंनं चालवतात, अगदी त्यांच्या घरातच, वर लिंकलेल्या माझ्या धाग्यात अगदी त्यांच्या घरातल्या चुलीचे फोटो आहेत. त्यांचे नं ९६८९१२५०४७ / ९६७३१३२४९७
  • Log in or register to post comments

फोटो आणि वर्णन मस्तच आहेत

जाई.
Sat, 09/24/2011 - 23:35 नवीन
फोटो आणि वर्णन मस्तच आहेत
  • Log in or register to post comments

मस्त फोटो आणि अर्थात

श्यामल
Tue, 09/27/2011 - 11:30 नवीन
मस्त फोटो आणि अर्थात वर्णनसुद्धा ! :smile:
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा