✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न

र
रमताराम यांनी
Sun, 09/11/2011 - 17:42  ·  लेख
लेख
(अलिकडेच मिपाकर चित्रगुप्त यांनी मृत्यूपूर्वीच्या स्थितीबद्दल चर्चा करणारा धागा काढला होता. त्यापासून स्फूर्ती घेऊन निळोबांनी 'मृत्यूसमयीच्या व्यवस्थेबद्दल' चर्चा करणारा धागा काढला आहे. इजा झाला, बिजा झाला तर तिजा म्हणून मृत्यूपश्चात जीवनाबद्दल आपण धागा काढावा नि आपले अनेक दिवस मळमळणारे प्रश्न भळभळून विचारून टाकावेत असा विचार करून हा धागा टाकला आहे.) मी जडवादी आहे की अंधश्रद्ध की आणखी काही मधले हे आपल्याला ठाऊक नाही (साला त्याबाबत वाद घालण्याची हुशारी पण आपल्यात नाही). पण हां आपल्याला लै प्रश्न पडतात राव. पुनर्जन्म नि पारलौकिक हे दोन विषय तर आपल्या डोस्क्याला लै म्हंजे लैच त्रास देतात. त्यातील तत्त्व, स्वार्थ, परमार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष (हाण तिज्यायला, हे आठवतील ते जड शब्द ठोकून देणे हल्लीच एका माजी वृत्तपत्र संपादकाकडून शिकलो) वगैरे बाजू जाऊ द्या हो, ते सगळं आपल्याला बाप जन्मी समजणार नाहीच. मी म्हणतोय ते या सगळ्याच्या ऑपरेशनल बाजूबद्दल. आता हेच बघा ना, आमच्या दोस्त लोकांची मारे जोरदार चर्चा घडत होती पुनर्जन्म असतो की नाही. नि आमच्या टकुर्‍यात भलतेच प्रश्न. त्या नादात तिकडे महत्त्वाचे काही मुद्दे येऊन गेले तिकडे लक्षच नाही. बहुमोल असे ज्ञानसंपादनाचे क्षण आम्ही दवडले, पहिल्यापासून आम्ही करंटेच. पण ते असो. निदान आता प्रश्न टकुर्‍यात आलेच आहेत तर निदान त्यांची उत्तरे मिळाली तर ते नुस्कान थोडे तरी भरून काढू म्हटलं नि हे प्रश्न त्या दोघांना विचारले. पहिला प्रश्न पुरा होण्याच्या आतच आमच्यासारख्या मूर्ख माणसाला पुनर्जन्म नसावा - निदान माणसाचा नसावा - याबाबत त्या दोघांचे ताबडतोब एकमत झाले. पुनर्जन्म असतो असा दावा करणार्‍याने माझ्याकडे कीव आलेल्या नजरेने पाहिले नि म्हटले ’तू फक्त आमचे ऐकत जा, जरा तरी अक्कल येईल उगाच तोंड उघडून आपले शहाणपण पाजळू नकोस.’ तर मंडळी मित्र हे असे, आमची ज्ञाननतृष्णा तर ज़ब्ब़र, प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर चैन पडणार नाही (भूत होऊन त्या दोघांच्या मानगुटीस बसतो झालं). मग काय आयतेच सापडलात तर राम जेठमलांनीना.... आय मीन त्यांच्या दहा प्रश्न रोज विचारण्याच्या परंपरेला स्मरून यातले दहा प्रश्न - उपप्रश्नांसह - तुम्हालाच विचारून टाकतो झालं. १. मागल्या जन्मातले आठवते असेच बरेचदा कुणी कुणी दावा करत असल्याचे अधून मधून ऐकायला मिळते. ही आठवण नेहमी मनुष्यजन्माचीच कशी असते? त्यांना आपला मागचा जनावराचा जन्म का आठवत नाही. की ज्या 'गिफ्टेड' लोकांना हे आठवते त्यांना 'लक्ष-चौर्‍यांशीच्या फेर्‍यातून न जाण्याची किंवा किमान दोन मनुष्यजन्म पाठोपाठ मिळण्याची लॉटरी लागलेली असते? तसे नसेल तर मग मागल्या जन्मी मी लांडगा होतो नि ... जाऊ दे जनावराचे आयुष्य वर्णायचे म्हणजे शरीराबरोबर मनालाही लकवा भरलेले लोक अश्लील-अश्लील म्हणून ओरडू लागतील*. तसाही तुमच्या बुद्धिमत्तेवर आणि कल्पनाशक्तीवर आमचा विश्वास आहेच. * पु.लं.च्या ’रावसाहेब” मधून साभार. २. मागल्या जन्मी आपण गुन्हेगार होतो किंवा आपण काही घोर चुका केल्या होत्या असे कोणालाच कसे आठवत नाही? ३. मागल्या जन्मी केलेल्या पापांचे भोग या जन्मी भोगावे लागतात असे म्हणतात. मग मागच्या जन्मी मला जन्मठेप झाली होती नि चौदा ऐवजी दहा वर्षातच मी खपलो होतो, तर सरकार मला या जन्मी उरलेले चार वर्ष तुरुंगवास भोगायला भाग पाडू शकेल काय? याचे उत्तर ’नाही’ असे असेल तर मग मागल्या जन्मीची पापांची फळे या जन्मी भोगावी लागतात हा ’कर्मसिद्धांत’ही खोटा म्हणावा का? ३.१ समजा वरील प्रश्नाचे उत्तर 'होय' असे असेल तर मग माझ्या नव्या जन्मात मी कोणत्या कायद्यानुसार गुन्हेगार ठरवला जाणार. भारताऐवजी मी बुर्किना फासो नावाच्या देशात जन्मलो तर हा चार वर्षांचा हिशोब तिथे पुरा होणार की की मी भारतीय कायद्याच्या 'ज्युरिस्डिक्शन' मधे पुनर्जन्म घेईपर्यंत कॅरी-फॉरवर्ड होत राहणार? ४. आपल्याकडे दिवंगत झालेले आजोबा/पणजोबा वा आजी/पणजीच नातवाचा/नातीचा जन्म घेऊन आली असे अनेकदा म्हटले जाते. माझ्या बाबत असे असेल तर मीच माझा नातू/पणतू ही स्थिती पाप-पुण्याच्या हिशोबाच्या दृष्टीने जरा गुंतागुंतीची होणार नाही का? ५. नवरा नि बायकोचे सात-जन्मांचे कॉन्ट्रॅक्ट असते ते सलग सात जन्मांचे की सलग सात (लक्ष-चौर्‍यांशीपैकी) 'मनुष्यजन्मांचे'? तसे असेल तर ते दोघेही एकाच वेळी मनुष्य म्हणून, विरुद्ध लिंगी, समवयस्क, एकाच भूभागावर, एकाच धर्मात, एकाच जातीत, पत्रिका जुळावी अशा मुहूर्तावर, आपल्या देशी दोघांच्या आईबापांचेही 'कन्सेंट' मिळावेत अशा आईबापांपोटी... वगैरे निकष पुरे करत योग्य वयात लग्न करण्याची प्रोबॅबिलिटी किती, ती किमान ७ भागिले लक्ष-चौर्‍यांशी इतकी आहे काय? मुळात लक्ष चौर्‍यांशीच्या हिशोबात एकाहुन अधिक मनुष्यजन्म मिळतात का? मनुष्यजन्म दुर्लभ असतो, लक्ष चौर्‍यांशीत एकदाच मिळतो असे ऐकून आहे, तर दुसरीकडे हे सात मनुष्यजन्माचे कॉन्ट्रॅक्ट एकाच व्यवस्थेमधे कसे काय बसते ब्वा? ५.१ मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले दोघे या जन्मी विरूद्ध जेंडर घेऊन (मागल्या जन्मीची स्त्री पुरूष म्हणून नि पुरूष स्त्री म्हणून) जन्मले नि या जन्मी पती-पत्नी झाले तर हा जन्म सात जन्माच्या कॉंट्रॅक्टमधे धरला जातो की नाही? ५.२. मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले हे दोघे या जन्मी अन्य धर्मीय म्हणून जन्मले (मागील जन्मीच्या पापाची फळे, दुसरे काय.) आणि या जन्मी पुन्हा पती-पत्नी, शोहर-बीवी अथवा हज्बंड-वैफ बनले तर तो जन्म या सात जन्मांच्या काँट्रॅक्ट मधे काऊंट होतो का? ६. दोन जन्मांच्या मधे भूतयोनी नावाचा आणखी एक प्रकार असतो म्हणतो. त्यातही पुन्हा हडळ, वेताळ, डाकीण, खवीस, समंध, मुंजा, ब्रह्मराक्षस वगैरे जातीव्यवस्था आहेच. मेल्यानंतर अतृप्त इच्छा वगैरे राहिल्या असतील वा काही भयंकर गुन्हा वगैरे केला असेल तर हा मधला टप्पा पार करावा लागतो म्हणे. म्हणजे थोडक्यात मनुष्ययोनीतले पापपुण्याचे हिशोब इकडे कॅरी- फॉरवर्ड होतात. मग भूत असताना केलेल्या गुन्ह्यांचे/पुण्याचे क्रेडिट मनुष्ययोनीतील पुढील जन्मात कॅरी- फॉरवर्ड होते का? थोडक्यात पाप-पुण्याच्या बाबतीत 'टीडीआर' असतो का? लक्ष-चौर्‍यांशीच्या हिशोबात हा मधला काळ एक योनी म्हणून धरतात की फक्त वास्तव जन्मच काऊंट होतात? रिलेटिविटीला स्मरून एखाद्या भुतासाठी त्याचा जन्मच वास्तव नसतो का, नि त्याच्या जगातील समजानुसार पुढला मनुष्य जन्म हा भूत होणे म्हणून काऊंट होतो का? मग भुताच्या इच्छा अपुर्‍या राहिल्या तर त्याला मनुष्य जन्म मिळतो असे भुतांचे धर्मग्रंथ त्यांना सांगत असतील का? ६.१ प्रत्येक धर्मात या ना त्या प्रकारे भूतयोनीचा उल्लेख असतोच. मृत झाल्यानंतर प्रत्येक धर्माची वेगळी अशी भूतयोनी असते की सर्वधर्मातील भुते एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने किंवा असेच भांडत-तंडत रहात असतात? ७. पाप-पुण्याचा हिशोब एकमेकाला छेदून बाकी शून्य उरते तेव्हा मोक्ष मिळतो असे म्हणतात. आता हा इक्विलिब्रियम अनायासे साधण्याची वाट न पाहता चित्रगुप्त महाराज एखाद्या जन्मी ज्या क्षणी बाकी शून्य होते तेव्हा उरलेले आयुष्य जगून हा बॅलन्स पुन्हा बिघडवण्याचा चान्स न देता त्याच क्षणी मि. यम यांना त्या व्यक्तीचे प्राण हरण करण्याचा आदेश देऊन (किंवा ज्या देवाला असा आदेश देण्याची पावर आहे त्याला रेकमेंड करून) 'अकाउंट क्लोज्ड' चा शिक्का का मारत नाहीत? ७.१. पाप-पुण्याच्या ज्या अकाउंट मधे क्रेडिट-डेबिट होत असते ते अकाउंट माझे असून मला त्या अकाउंटचा नंबर कसा ठाऊक नाही? ही गोपनीयता माझ्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणे आहे असे माझे प्रामाणिक मत आहे, तुम्हाला काय वाटते? ७.२ काही नाही तर निदान मला नेटबँकिग अ‍ॅक्सेस देऊन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे बॅलन्स-चेक सुविधा का दिली जात नाही? ती मिळावी यासाठी काय प्रोसिजर असते? ७.३. वरील अकाउंट कोणत्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने ट्रॅक केले जाते? त्या सॉफ्टवेअरचे क्यू.ए. देवांनीच/पारलौकिक अस्तित्व असलेल्या जीवांनीच केले आहे की माणसांनी? माणसांनी केले असेल तर आपल्या अकाउंटला फक्त क्रेडिटच पडत राहील याची सोय प्रोग्रॅमर्स नि क्यू.ए. वाल्या डॅम्बिस लोकांनी संगनमताने करून ठेवली नसेल याची खात्री कशी करून घेतली होती? ७.४. माझ्या भुताचे नि माझे अकाउंट एकच असते का? थोडक्यात मला मोक्ष मि़ळतो तेव्हाच माझ्या भुतालाही मोक्ष मि़ळतो का? ८. मी जिवंतपणी केलेले एखादे चांगले काम मेल्यानंतरही चालू राहिले नि त्यातून आणखी काही चांगुलपणाचे क्रेडिट निर्माण झाले तर चक्रवाढव्याजाच्या नियमानुसार ते माझ्या अकाउंटला क्रेडिट मिळते का? याचे उत्तर 'हो' असे असेल तर मला मोक्ष मिळाल्यानंतर - थोडक्यात माझे अकाउंट क्लोज झाल्यानंतर - हे क्रेडिट कुणाला ट्रान्स्फर व्हावे यासंबंधी मी काही 'मोक्षपत्र' करू शकतो का? असल्यास ते कुठे रेजिस्टर करावे लागते? चित्रगुप्ताने त्यावर योग्य ती कार्यवाही न केल्यास त्याच्या लाभधारकाला कुठल्या व्यवस्थेकडे दाद मागावी लागेल? ९. फार जास्त पाप झाले तर दिवाळे जाहीर करून अकाउंट क्लोज करण्याची सोय आहे का? १०. पाप-पुण्याच्या हिशोबात खुद्द चित्रगुप्त महाराज नि त्यांचे सहकारी घपला करीत नसतील याची काय खात्री. की त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी 'सिविल सोसायटी'च्या पारलौकिक खात्याचा एखादा प्रतिनिधी उपोषण करीत असतो का? उरलेले सारे त्या भ्रष्टाचाराचे - खरेतर त्या भ्रष्टाचाराचा आपल्याला फायदा होत नाही म्हणून खंतावलेले - विरोधक पांढरी टोपी घालून स्वर्ग-नरकात दुचाकीवर ट्रिपल सीट बसून घोषणाबाजी करत हिंडत असतील का? ते उपोषण 'शांभवी'च्या सेवनाने सोडले जाते की अमृतसेवनाने? आणखी अनेक प्रश्न आहेत पण सगळे सांगत बसलो तर 'सास भी कभी बहू थी' सारखी मालिकाच होईल. (तसेही त्यात पुनर्जन्म होतेच म्हणे ) तूर्तास थांबतो. किमान एवढ्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकलो तरी खूप झाले. तुम्हालाही काही प्रश्न, उपप्रश्न असतील तर...........अजिबात विचारू नका, आधीच डोस्क्याची मंडई झालीये, त्याची लोकसभा व्हायला नको, क्काय?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26712 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

कळलं?

श्रावण मोडक
Tue, 09/13/2011 - 20:06 नवीन
पुनर्जन्म या धाग्यावरच मी आयडींचा विषय का काढला ते कळलं आता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

संगीतसभा !!

अर्धवटराव
Tue, 09/13/2011 - 04:21 नवीन
हिमेश रेशमियाला यंदा बालगंधर्व महोत्सवाचं आग्रहाच निमंत्रण आहे... असं त्याला मनापासुन वाटतय !! (पुनर्जीवीत) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

_/\_

आत्मशून्य
Tue, 09/13/2011 - 11:22 नवीन
शक्य आहे या जगात काहीही शक्य आहे, पण गंमत इथचं आहे की सध्या जो तो केवळ हिमेश बनण्याच्याच मागे लागलाय.. आणी बालगंधर्वांना मात्र...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

:-)

सहज
Mon, 09/12/2011 - 15:51 नवीन
देवा, तुमचा लेख आम्हाला तरी भरपूर पुनर्जन्म घेतल्याशिवाय पूर्णपणे समजायचा नाही. उत्तरे तर फार पुढची गोष्ट :-) _/\_
  • Log in or register to post comments

बर्‍याच दिवसांपासून ह्या

प्रभो
Mon, 09/12/2011 - 19:00 नवीन
बर्‍याच दिवसांपासून ह्या ररांच्या लेखांना काय प्रतिसाद द्यावा ह्याचा विचार करत होतो. सहजमामांशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

च्यायला ह्यांचं गणित वेगळंच दिसतंय.

Nile
Tue, 09/13/2011 - 02:36 नवीन
लक्ष चौर्‍यांशीतले दोन जन्म एकाच वेळे मिळालेत की काय इथे? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

>> माणसांनी केले असेल तर

शुचि
Mon, 09/12/2011 - 19:18 नवीन
>> माणसांनी केले असेल तर आपल्या अकाउंटला फक्त क्रेडिटच पडत राहील याची सोय प्रोग्रॅमर्स नि क्यू.ए. वाल्या डॅम्बिस लोकांनी संगनमताने करून ठेवली नसेल याची खात्री कशी करून घेतली होती? >> हाहाहा >> मागल्या जन्मी आपण गुन्हेगार होतो किंवा आपण काही घोर चुका केल्या होत्या असे कोणालाच कसे आठवत नाही? >> =)) =)) =)) फुटले या मुद्द्यावर तर :) >> मृत झाल्यानंतर प्रत्येक धर्माची वेगळी अशी भूतयोनी असते की सर्वधर्मातील भुते एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने किंवा असेच भांडत-तंडत रहात असतात? >> मस्त!!!! खूप दिवसांनी निखळ मनोरंजन झाले :)
  • Log in or register to post comments

तुमचं माहिती नाही पण...

पिवळा डांबिस
Mon, 09/12/2011 - 23:08 नवीन
गेल्या जन्मी मी बहुतेक नरभक्षक वाघ/ चित्ता/ बिबळ्या वगैरेपैकी एक असावा.... त्याची शिक्षा म्हणून या जन्मात नरभक्षक प्राण्यांना खायला आवडेल असा एक गुबगुबीत माणूस झालो.... आता हेच रॅशनाल वापरलं तर पुढला जन्म बहुतेक पापलेटाचा मिळणार!!!! :)
  • Log in or register to post comments

खिक्

रमताराम
Tue, 09/13/2011 - 00:36 नवीन
या न्यायाने आम्हालाही किमान मांदेलीचा पुनर्जन्म मिळायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अर्र तिच्या!!!

Nile
Tue, 09/13/2011 - 01:55 नवीन
म्हणजे इथल्या सगळ्या शाकाहारी काकवा, मावश्या अन आज्ज्या पुढल्या जल्मी काय भेंडी, गवार अन काकडी होणार का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

चवळी

नितिन थत्ते
Tue, 09/13/2011 - 10:12 नवीन
त्यांची इच्छा चवळी होण्याची पण असेल हो पण भोपळी मिरची होण्याची शक्यताच जास्त असावी. (पाशवी शक्ती तुटून पडतायत आता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

जपून हो थत्ते काका!

Nile
Tue, 09/13/2011 - 11:47 नवीन
नाहीतर तुमचापण भोपळा व्हायचा पुढल्यावेळी अन पाशवी शक्त्या त्याचं भरीत करायच्या. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

भोपळा

नितिन थत्ते
Tue, 09/13/2011 - 14:49 नवीन
पुढल्यावेळी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अरेव्वा आजचा मुहुर्त पाशवी शक्ती कसा काय जाऊ देतील ?

वाहीदा
Tue, 09/13/2011 - 16:03 नवीन
आज तर तुमचा वाढदिवस आहे ना ... मग आजच असायला हवे :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

बरोबरच आहे की

रमताराम
Tue, 09/13/2011 - 20:15 नवीन
शंका का आली. प्रथम तुमचा 'पुढचा जन्म' लवकर मिळावा यासाठी हा जन्म फार लांबणार नाही याची तजवीज करतीलच ना. मग त्या पुढल्या जन्मी भरीत. दोन जन्मठेपेंची शिक्षा देणं म्हणजे काय ते समजलं का आता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

>>गवार हक्कभंगाचा प्रस्ताव

अर्धवट
Tue, 09/13/2011 - 10:30 नवीन
>>गवार हक्कभंगाचा प्रस्ताव येउ शकेल असे निरीक्षण नोंदवतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

जबरदस्त लेख

पैसा
Tue, 09/13/2011 - 19:35 नवीन
आणि महा जबरदस्त प्रतिक्रिया. वाचनखूण साठवावी असा विचार करते आहे!
  • Log in or register to post comments

बघा

रमताराम
Tue, 09/13/2011 - 20:36 नवीन
इथेच मराठी माणूस मार खातो. फाऽऽऽर विचार करतो आपण. आता आमचेच बघा ना. हे ढीगभर प्रश्न पडलेत. चला यावरून आणखी एक गोष्ट आठवली. एक गोम तुरुतुरू चालली होती. तिचे अनेक पाय छान लयीत पडत होते. चालता चालता ती एका कासवाजवळ पोचली. तिला तुरुतुरू चालताना पाहून आपल्या संथ गतीबद्दल त्याला थोडी लाज वाटली नि तिच्याबद्दल असूया. त्याचबरोबर त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं की इतके सगळे पाय असताना नेमका कुठला पाय कधी उचलायचा नि कधी पुढे टाकायचा हे कसे जमत असेल तिला. न राहवून हा प्रश्न त्याने तिला विचारला. गोम विचारात पडली. दोन पावले (खरेतर अनेक पावले दोनदा) पुढे मागे चालत तिने निरीक्षणाद्वारे याचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न चालू केला. बराच वेळ झाला तरी तिला याचे उत्तर सापडेना. कासव केव्हाच पुढे निघून गेले होते. आता त्या गोमीकडे पाय होते पण गती हरवली होती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चुकीच्या वेळेस मेले होते मी!

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/15/2011 - 09:43 नवीन
चुकीच्या वेळेस मेले होते मी! काय भारी धागा काढलाय रमतारामने ... मला मेलीला मरायला हीच वेळ सापडली होती! मला एक मिपा सदस्य आठवले ज्यांना या विषयात चांगली गती आहे असं वाटतं. पण ररांनी जेवण देऊन माझं तोंड बंद केलं आहे आणि ड्रींक देऊन हातही बांधले आहेत.
  • Log in or register to post comments

वा!

अप्रतिम
Mon, 10/03/2011 - 12:33 नवीन
अत्यंत खुमासदार,खुसखुशीत पण विचार करायला लावनारा लेख. मझा आला.
  • Log in or register to post comments

पुनर्जन्माबाबत हल्ली संशोधन

रमताराम
Sat, 08/04/2012 - 12:12 नवीन
पुनर्जन्माबाबत हल्ली संशोधन वगैरे करण्याचे बाष्कळ नि मनोरंजक दावे होऊ लागलेले ऐकून आमच्या या लेखाची आठवण झाली. यात 'असले स्वयंघोषित संशोधक मागल्या जन्मी कोण असावेत?' असा एक प्रश्न अ‍ॅड करावा असे वाटू लागले आहे.
  • Log in or register to post comments

मस्त लेख .

वीणा३
Sun, 08/05/2012 - 02:47 नवीन
मस्त लेख :).
  • Log in or register to post comments

शुचि तै / ढालगज भवानीचा लेख "कर्मविपाक"

मन१
गुरुवार, 05/02/2013 - 13:04 नवीन
शुचि तै / ढालगज भवानीचा लेख "कर्मविपाक" http://www.misalpav.com/node/24675
  • Log in or register to post comments

आपण

डिजेबॉय
गुरुवार, 05/02/2013 - 14:00 नवीन
आपण खोरशेद भावनगरी यांचे "The laws of spirit world" हे पुस्तक वाचावे, त्यात सर्व उत्तरे मिळतील.
  • Log in or register to post comments

तूर्त एव्हढेच..

आनन्दा
गुरुवार, 05/02/2013 - 16:20 नवीन
ते उपोषण 'शांभवी'च्या सेवनाने सोडले जाते की अमृतसेवनाने?
णिसेध णिसेध णिसेध हा शंभू या शब्दाचा अपमान आहे... सौजन्य - फेसबुक पान - संभाजी ब्रिगेड!!
  • Log in or register to post comments

ररां चा होय!!

ढालगज भवानी
गुरुवार, 05/02/2013 - 18:22 नवीन
आहाहा हाच लेख कोणी लिहीलाय म्हणून मध्यंतरी खूप शोधत होते. भयंकर तार्कीक व अफलातून लेख आहे.
  • Log in or register to post comments

पुनर्जन्म आहे कि नाही काही

महेश नामजोशि
Fri, 05/03/2013 - 16:21 नवीन
पुनर्जन्म आहे कि नाही काही माहित नाहि. पण बर्याच वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती कि बंगालमधील एक मुलगी खूप लांबवर फिरायला गेली असताना तिला तेथील घर, तेथील माणसे ओळखीची वाटली. तिने माणसांची नावेही सांगितली. तिला आठवले कि ती लहान असताना नदीवर जात असे. तेथील लोकांनाही आश्चर्य वाटले इतकी माहिती तिने सांगितली. यावर चर्चा व्हायला हवि. आपल्याला मागच्या जन्माचे व पुढील जन्माचे समजले तर आश्चर्य होईल. मी एकदा मित्राबरोबर एका दक्षिणी माणसाकडे गेलो होतो. ती माणसे एखाद्याचे भूत, वर्तमान व भविष्य अगस्ती नाडी म्हणून जो त्यांच्याकडे जी पोथी असते ते बघून सांगतात. आश्चर्य म्हणजे बरेचसे तंतोतंत जुळत असते. अर्थात मागच्या जन्माबद्दल त्यांनी काहीही सांगितले तरी आपल्याला काय कळणार आहे. विश्वास ठेवावाच लगेल. महेश नामजोशी
  • Log in or register to post comments

ती माणसे एखाद्याचे भूत,

बॅटमॅन
Fri, 05/03/2013 - 16:29 नवीन
ती माणसे एखाद्याचे भूत, वर्तमान व भविष्य अगस्ती नाडी म्हणून जो त्यांच्याकडे जी पोथी असते ते बघून सांगतात. आश्चर्य म्हणजे बरेचसे तंतोतंत जुळत असते.
नाडी नाडी धाग्या धाग्याते नाडी, पाडी पाडी जिल्ब्यांवर जिल्ब्या पाडी तेवढे नाडी सोडून बोला हो, उगा कुणाच्या नाडीला हात घालू नका.
अर्थात मागच्या जन्माबद्दल त्यांनी काहीही सांगितले तरी आपल्याला काय कळणार आहे. विश्वास ठेवावाच लगेल.
विश्वास गया पाणिपतमे जी, काय्कू उस्कू वापस लाता जी तुमऽ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश नामजोशि

अरे देवा.. अगस्ती नाडी..

गवि
Fri, 05/03/2013 - 16:57 नवीन
अरे देवा.. अगस्ती नाडी.. हे राम.. -(कै.) गवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश नामजोशि

छान

रमताराम
Fri, 05/03/2013 - 17:36 नवीन
मागच्या जन्माबद्दल त्यांनी काहीही सांगितले तरी आपल्याला काय कळणार आहे. विश्वास ठेवावाच लगेल. >> आता कसं, माझे मागल्या जन्मी तुम्ही चारशे कोटी रूपये देणं होतात ते देऊन टाका बरं पटकन. अस्सं प्रामाणिक असावं माणसानं. रच्याकने तुम्हाला न कळणार्‍या गोष्टींवर विश्वास ठेवता? भलताच सोपा उपाय आहे राव. आधी सांगितला असतात तर सालं आयुष्य फारच सोपं झालं असतं, कारण आम्हाला जगण्यातलं सालं शष्प कळंत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश नामजोशि
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा