या प्रतिसादात गणेशा यांनी एक सूचना केली होती. ती म्हणजे कवितांचं रसग्रहण करायचं असेल तर मिपावरच्याच एखाद्या नव्या कवीच्या चांगल्या कवितेचं रसग्रहण का करू नये? त्यायोगे कवीला व एकंदरीत सर्वच सदस्यांना आपलेपणा वाटेल. ही सूचना मला मनापासून आवडली. आपण कायम मराठी वाङमयात गाजलेल्या कवितांकडे लक्ष पुरवतो, त्यांचे गोडवे गातो. पण मिपावरदेखील अनेक कविता येतात. त्यातल्या काही आवडलेल्या कविता घेऊन रसग्रहण व चर्चा करायला काय हरकत आहे? याचा फायदा असा होईल की होणाऱ्या चर्चेत खुद्द कवीला भाग घेता येऊन आपल्याला कवितेमागचा दृष्टीकोन 'घोड्याच्या तोंडून' (from the horse's mouth) ऐकता येईल. या माध्यमाचा तो एक फायदा आहे.
म्हणून मी पहिली कविता निवडली आहे ती नगरीनिरंजन यांची ती आणि ते. ही कविता खूप आवडली. मुख्य म्हणजे या कवितेत वेगळं काहीतरी सांगण्याचा, वेगळ्या प्रकारचा प्रयत्न आहे. तिच्यात एक उत्तम कविता होण्याची सुप्त क्षमता आहे. ही कविता निश्चितच छान असली तरी मला उत्तम किंवा उत्कृष्ट वाटली नाही. पण माझी उत्कृष्ट कवितांचा मानदंड म्हणजे मर्ढेकरांची 'गणपत वाणी' वगैरे असल्यामुळे त्यात काही विशेष नाही.
कवितेच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे ही कविता तिच्याविषयी आहे. व तिच्याशी असलेल्या त्यांच्या संबंधाविषयी आहे. ही ती कोण? असा प्रश्न उपस्थित होणं सहाजिकच आहे. कवीने फक्त ती हे सर्वनाम वापरून नक्की कोण याचा निर्णय वाचकावर सोडलेला आहे. त्यामुळे रूपकांना एक लवचिकता येते. हे या कवितेचं एक मोठं शक्तीस्थान आहे.
गावाच्या घराघरातून ती नांदते
आणि प्रत्येक माणसात उगम पावून
खळाळत्या नदीसारखी
गल्लीबोळातून वाहते
इथे गाव या शब्दाला व्यापक अर्थ आहे हे जाणवल्यावाचून रहात नाही. गाव म्हणजे काही घरं इतकं नसून एका विशिष्ट नात्याने परस्परांशी जोडलेला समाज हे उघड होतं. मग ते नातं भौगोलिक असेल किंवा सामाजिक. अशा गावातल्या प्रत्येक घरी ती नांदते. नुसती रहात नाही तर त्या घराची लक्ष्मी होऊन नांदते. त्याचबरोबर ती गावाच्या गल्लीबोळांतून वाहतेही. गावरूपी समाजाच्या घराघरांना जोडणाऱ्या, एकमेकांपर्यंत नेणाऱ्या रस्त्यांवर ती खळाळते. नदीसारखी. एकाच वेळी ती नांदते, उगम पावते व वाहते. या वर्णनातूनच तिचा पाण्यासारखा गुणधर्म लक्षात येतो. पण हे पाणी थोडं वेगळं आहे. माठांमध्ये साठवल्यासारखं त्याचं नांदणं नाही. घरामध्ये हवा दरवळावी व बाहेर वहावी तसं हिचं आहे. पाण्यापेक्षा एक खेळतं, प्रवाही वातावरण म्हणजे ती.
बैलाचा बळी देऊन मांस खाणारा
कंटाळून सोवळ्यात जातो
तेव्हा ती थोडी बदलते
कमरेला झाडू लावणारा
चिडून पुस्तक हाती धरतो
तेव्हा ती थोडी वळते
उमटत असतात लाटा तिच्यात
तिच्यावर विहार करणार्यांच्या क्रीडेने
घुसळली जाते तिच्या तळाशी
गुदमरून बुडणार्यांच्या आकांताने
हिचा प्रवाहीपणाच या दोन कडव्यांतून सांगितलेला आहे. मात्र त्या दोन्हींचा फोकस वेगळावेगळा आहे. पहिल्या कडव्यात हिची दिशा, हिचा प्रवाह, हिचं अस्तित्वच त्या गावातल्या व्यक्तींच्या कृतींनी ठरतं हे सांगितलं आहे. दुसऱ्या कडव्यात, विशेषतः शेवटच्या दोन ओळीत सामान्य माणसावर हिचा कधीकधी घातक परिणाम होतो असं सांगितलं आहे. जात भेद, वर्णाधिष्ठित व्यवसाय हे व यांसारख्या गोष्टी या प्रवाहाचा भाग असतात. प्रवाहातूनच येतात. आणि त्या दाबाखाली काहींना गाडून टाकतात. तर पहिल्या कडव्यात या गोष्टीतील बदल या प्रवाहामध्ये परावर्तित होतात हे सांगितलं आहे. दोन्ही कडव्यांत दोन दोन विरुद्ध उदाहरणं आहेत. एकच गोष्ट सांगणारी. हे छान वाटतं.
या दोन कडव्यांवरून अर्थातच आपल्याला संस्कृतीसदृश काहीतरी डोळ्यांसमोर यायला लागतं. समाजात सर्वमान्य असलेल्या प्रथा, परंपरा, आचार विचार, या सर्वांनी तयार होणारी सर्वांमधून खेळणारी संस्कृती. जिचा अंश सर्वांमध्ये असतो व सर्व जिचे अंश असतात. मात्र आधी म्हटल्याप्रमाणे संस्कृती हा शब्द न वापरल्यामुळे ही काल्पनिक नदी अनेक रूपं घेऊ शकते.
त्याचबरोबर या रचनेतल्या काही गोष्टी खटकायला लागतात. दुसऱ्या कडव्यात तीन ओळींचे दोन गट आहेत. तिसऱ्या कडव्यात दोन ओळींचे दोन गट आहेत. हे तीन ओळींचे असते तर अधिक रुचले असते. तिसऱ्या कडव्यामध्ये मध्ये दुसऱ्या कडव्याची सिमेट्री आलेली नाही. 'ती थोडी बदलते - ती थोडी वळते' मधला एक सोपेपणा, सहजपणा 'तिच्यात लाटा उमटतात - ती घुसळली जाते'. कदाचित मला नक्की बोट ठेवता येत नसेल. कवीचे विचार जाणून घ्यायला आवडेल.
जिवंत असतो गाव रसरशीतपणे
तिच्यातल्या लाटा-भोवर्यांमुळे
नि:स्तब्ध गावतटावर फक्त ते
तिच्या रक्षणासाठी बसलेल्यांचे सांगाडे....
जोपर्यंत ही नदी प्रवाही असते, तिच्यात लाटा असतात, भोवरे असतात तोपर्यंतच खरी चेतना असते. वहातं पाणी स्वच्छ असतं. त्यातल्या घाणीचा निचरा होतो. जर प्रगती खुंटली, प्रवाह संपला तर तिचं डबकं होतं. चिखल गाळ साचतो, व रोगराईला आमंत्रण मिळतं. असं असूनही 'ते' उभेच असतात तिचा प्रवाह रोखायला. तिला तट घालून अडवायला. तेही रक्षणाच्या नावाखाली. गाव जिवंत असतो मात्र ते कुठल्यातरी भूतकाळात वावरत असतात, वैचारिक अर्थाने त्यांना शरीर वा आत्मे नसतात तर पुराणमतवादाचे केवळ प्रतिगामी सांगाडे शिल्लक असतात.
इथे या रूपकाचं उघड वर्णन न करण्याचा फायदा जाणवतो. (मात्र म्हणूनच शेवटच्या ओळीतला रक्षण हा शब्द फक्त संस्कृतीला जोडून येत असल्यामुळे ही लवचिकता कमी होते असं मला वाटलं) कारण संस्कृतीप्रमाणे भाषेलाही हे लागू होतं. परंपरांना लागू होतं. धर्माला लागू होतं. साहित्याला लागू होतं. जिथे प्रवाह, प्रगतीशीलता, बदलांचं स्वागत करण्याची वृ्त्ती असते तिथेच रसरशीत चैतन्य असतं. जिथे हे सांगाडे यशस्वी होतात तिथे केवळ मृत्यू असतो.
मला वाटलं ते मी लिहिलं. वाचकांनी आपल्याला वेगळा अर्थ जाणवला असला तर सांगावं. काही सौंदर्यस्थळं निसटून गेली असतील तर त्यांचा उल्लेख करावा. कवितेत किंवा रसग्रहणात काही त्रुटी असतील तर त्यावर टिप्पणी करावी. कवीने आपली भूमिका मांडावी. आपण सगळेच यातून काही शिकू.
वाचने
3720
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
नवीन कवीच्या चांगल्या कवितेची ओळख
मला पहीले कडवे खूप आवडले -
कविता खूपच आवडली. रसग्रहणही
कवीने असायला हवे तसे गणेशा हे
In reply to कविता खूपच आवडली. रसग्रहणही by रेवती
माफ करा! मला ननि म्हणायचे
In reply to कवीने असायला हवे तसे गणेशा हे by राजेश घासकडवी
धन्यवाद
+१
In reply to धन्यवाद by रामदास
गुर्जी, लगे रहो!
कविता आणि रसग्रहण दोन्ही आवडले
हा
आधी का वाचली नाही कविता
कविता आवडली होतीच, रसग्रहणही
सुंदर
चांगले रसग्रहण
+१
In reply to चांगले रसग्रहण by क्रेमर
मला वाटलं की इथे भाषा,
In reply to चांगले रसग्रहण by क्रेमर
अर्थातच बसू शकतील
In reply to मला वाटलं की इथे भाषा, by अर्धवट
चांगला उपक्रम!
>>एखादं साचलेलं तळं राखावं
In reply to चांगला उपक्रम! by नगरीनिरंजन
धन्यवाद
In reply to चांगला उपक्रम! by नगरीनिरंजन
विंदांकडून काय घ्यावे?
In reply to धन्यवाद by राजेश घासकडवी
नगरी जे लिहितात ते सहज सोप्प
गुरुजी, छान रसग्रहण.
राजेश जी मनापासुन धन्यवाद
उत्तम
मूळ कविता आधी वाचली नव्हती...