लेखनप्रकार
आदरणीय अण्णा,
गेल्या पंधरा दिवसांमध्ये जनलोकपाल बिल आणि भ्रष्टाचार विरोध हे मुद्दे आधारभूत धरुन तुम्ही जी अभूतपूर्व चळवळ उभी केली आणि त्याला जे जबरदस्त यश मिळाले त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. सुरुवातीला मुजोर वाटणारे सरकार लोकांच्या दबावामुळे अंशतः का होईना पण झुकले हे या चळवळीचे मोठेच यश म्हटले पाहिजे. पण त्याहीपेक्षा मोठी आणि नमूद करण्याजोगी अॅचिव्हमेंट ही की या निमित्ताने चेकाळलेल्या सरकारपर्यंत एक धोक्याचा मेसेज गेला. आपण आपल्याला हवे तसे उन्मत्तपणे आणि मस्तवालपणे वागू शकतो, आपल्याला कोण विचारणार अशा मस्तीत सरकार वावरत होते. ती धुंदी उतरली. शिवाय, लोकांच्या मनात आपणदेखील सरकारला जाब विचारु शकतो, आंदोलनाच्या माध्यमातून दणके देऊ शकतो असा विश्वास निर्माण झाला तो वेगळाच. नाहीतर आमच्यासारख्या सामान्य नागरिकांचा आणि चळवळींचा संबंध फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरताच होता. इतके मोठे यश तुम्हाला तूर्तास तरी पुरेसे वाटत नाही काय ? तुम्ही स्वतःच या लढ्याचा उल्लेख 'स्वातंत्र्याची दुसरी लढाई' असा करता. शिवाय वेळोवेळी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे दाखलेसुद्धा देता. मग तेच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती वर्षे झगडावे लागले याची वेगळी आठवण तुम्हाला करुन दिली पाहिजे काय? भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई तुम्ही उपोषणाच्या एका फटकार्यामध्येच जिंकाल आणि आसुसलेली विजयश्री ताबडतोब तुमच्या गळ्यामध्ये माळ घालेल असे तुम्हाला वाटत नसेल अशी आशा आहे.
तुमच्या उपोषणाच्या वाढणार्या एकेका दिवसाच्या समप्रमाणात आणि घटणार्या एकेका किलोग्रॅमच्या व्यस्त प्रमाणात आम्हा सामान्य नागरिकांची चिंता वाढत चालली आहे. आणि अनेक दशकांनंतर देशाला राष्ट्रीय पातळीवरचे नेतॄत्व मिळाले ते महिन्या- पंधरा दिवसांपुरतेच टिकणार की काय अशी भीती मनात डोकवायला लागली आहे. 'जनलोकपालच्या निमित्ताने केलेल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत पण या निमित्ताने झोपलेल्या सरकारला जाग येईल आणि नंतर वेळोवेळी चळवळी करुन सरकारला वठणीवर आणता येईल' हे वास्तव तुम्ही मनामध्ये गॄहीत धरले असेल असे आजपर्यंत वाटत होते. पण तुमचा इरेला पेटल्यासारखा आविर्भाव पाहून वस्तुस्थिती काही वेगळीच असावी असे वाटते. शिवाय काल बाळ ठाकरे यांनी 'आता केजरीवाल,बेदी,भूषण यांना उपोषणाला बसू द्या आणि तुम्ही उपोषण सोडा' अशी जी खोचक सूचना केली त्यामध्येसुद्धा बरेचसे तथ्य असावे अशी शंका येते. आमचे दाढीवाले मामा म्हणतात त्याप्रमाणे या चळवळीमध्ये बॅड एलिमेण्ट्स घुसवण्याचा सरकारी प्रयत्नसुद्धा अंशतः यशस्वी होतो आहे. हे असे आणखीन किती दिवस चालू राहणार? चिघळत गेलेली चळवळ म्हणजे नाद गेलेलं भांडं. लोकं वाट बघून बघून कंटाळतील आणि नंतर आपापल्या मार्गाने चालू पडतील. चुकूनसुद्धा जर असे झाले तर तुम्ही इतक्या मेहनतीने आणि कष्टाने उभा केलेला हा सगळा डोलारा बघता बघता जमीनदोस्त होईल आणि जर का दुर्दैवाने तुमच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर नंतर जनतेमध्ये इतके नैराश्य पसरेल की पुढची आणखीन काही दशके दुसरा कोणताही अण्णा असे आंदोलन करण्याची हिंमत करु शकणार नाही. तुम्ही घोड्यावर बसून लढताहात, तुमचे सहकारी आरामशीरपणे अंबारीत बसून गगनभेदी आरोळ्या ठोकताहेत पण सत्य जमिनीवर आहे असे राहून राहून वाटते. तेंव्हा फक्त तुमच्या स्वतःसाठीच नाही तर तुमच्याकडे आशेने डोळे लावून बसलेल्या आमच्यासारख्या सामान्य माणसांकडे आणि तुमच्या लाडक्या राळेगण वासीयांकडे बघून तरी हे उपोषण तुम्ही सोडावे असे कळकळीने सांगावेसे वाटते.
तुमचा निस्सीम चाहता,
सौरभ जोगळेकर
मिसळपाव
सहमत ...
अण्णा हजारे, आता बास करा ! हा
सहमत
उपोषण मागे घेऊ नये !!
अगदि परफेक्ट इगो इश्यु झालेला
सहमत आहे. तुटेपर्यंत ताणू
लेखा मधे , अण्णांनी आंदोलन
उपोषण बंद करून काय साध्य होणार आहे ?
आण्णा आता बास करा!