✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अण्णा, प्लीज जपा..!

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 08/22/2011 - 12:27  ·  लेख
लेख
प्रिय अण्णा, सर्वप्रथम तुमच्याबद्दल अत्यंत आदर व्यक्त करतो. तुमचं स्वच्छ चारित्र्य, तुमची साधी राहणी, तुमची सात्त्विकता, तुमच्यातली सादगी, तुमच्यातली निरागसता, तुमचं सेवाव्रत या सर्वांना माझा सलाम. अगदी मनापासून. अण्णा, खूप भावता तुम्ही मला.. आता काही मुद्दे - १) काही दिसांपूर्वी तुम्ही आणि तुमची टीम असं म्हणत होतात की सरकारनं त्यांच्या लोकपालपदासोबत तुमचंही जनलोकपाल बील संसेदेपुढे किमान सादर तरी करावं; मग संसद त्यावर जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य असेल. किंवा त्यावर आधारीत पुढील वर्चा किंवा आंदोलनाची दिशा ठरवता येईल. २) पण सरकारने नेहमीप्रमाणे सगळ्यांना धोका दिला आणि फक्त स्वत:चंच बील सादर केलं. त्यामुळे सरकारच्या या फसवणुकीविरुद्ध तुम्ही उपोषणाला बसलात ज्याला माझ्यासकट अनेकानेकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. ३) या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही हेही म्हणत होतात की तुम्हाला सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही, तुम्ही फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध एक सशक्त कायदा आणू इच्छिता. ४) परंतु काल तुम्ही सरकारला असा इशारा दिलात की सरकारने ३० ऑगस्ट पर्यंत हे बील पास करावं किंवा जावं! (पायउतार व्हावं), जे 'हे सरकार पाडण्यात मला काहीही स्वारस्य नाही..' या विधानाशी विसंगत ठरतं..! ५) अण्णा, अनेक सरकारांनी गेल्या ४२ वर्षात काहीना काही कारणं, सबबी सांगून लोकपाल बील अस्तित्वात आणलं नाही हे अगदी मान्य. त्याकरता जनतेतल्या प्रचंड असंतोषाला तुम्ही तोंड फोडलंत हेही नक्कीच खूप मोठं काम. परंतु एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो की, अ) जरी एखाद्या कायद्याला ४२ वर्ष उशीर झालेला असला तरी, ब) किंवा आज प्रचंड लोकपाठिंब्याच्या बळावर तुम्ही लौकरात लौकर हा कायदा करण्यास सरकारला भाग पाडलं असलं तरी, क) किंवा याच लोकबळावर तुम्ही सरकारच्या सिंहासनाला धक्का लावलेला असला तरी, येत्या चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे. आणि म्हणूनच ३० तारखेच्या आत आमचंच लोकपाल बील जसंच्या तसं पास करा नाहीतर चालते व्हा, हा मला तरी थोडासा अट्टाहासच वाटतो. परंतु हा केवळ तुमचाच अट्टाहास आहे/असेल असंही मला मुळीच वाटत नाही. या मागचा तुम्हाला पुढे करून आपला अजेंडा मांडणारा बोलविता धनी कोण आहे हे मला माहीत नाही..! असं वाटण्याचं कारण असं की महाराष्ट्रातही तुम्ही अनेक आंदोलनं/उपोषणं केली आहेत आणि आवश्यक तिथे किंवा बहुतांशी वेळेला समजुतीनं घेऊन आवश्यक ती माघार घेऊन संबंधितांना आवश्यक ती स्पेसही दिली आहे असा अनुभव आहे. परंतु या वेळेला मात्र इतर काही मंडळींकडून तुम्हाला मुद्दामून जिवघेण्या जिद्दीला भाग पाडलं जात आहे असा मला संशय आहे..! ६) अण्णा, अजून काही गोष्टी मांडू इच्छितो - अ) आम्ही तुम्हाला ओळखतो अण्णा, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया ह्या गेल्या ३-४ महिन्यातच अचानक उगवलेल्या व्यक्तिंना मी किंवा इतर भारतीय जनता ओळखत नाही. यांच्या अजेंड्याबद्दल, किंबहुना 'त्यांच्यात काहीही हिडन अजेंडा नाही..' असं निदान मी तरी छातीठोकपणे म्हणू शकत नाही..! ब) एक कर्त्यव्यदक्ष पोलिस अधिकारी या नात्याने मी किरण बेदींना नक्कीच आदारपूर्वक ओळखतो. परंतु ह्या आंदोलनात मात्र 'त्यांच्याकडेही काहीही हिडन अजेंडा नाही..' असं का माहीत नाही, परंतु मी ते म्हणू शकत नाही..! तेव्हा अण्णा, लहान तोंडी मोठा घास घेतो आणि इतकंच सांगतो, की अण्णा जपा. स्वत:ला जपा..! आज तुम्ही अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि किरण बेदी यांच्या पूर्णपणे नसलात तरी बर्‍याच अंशी कह्यात गेला आहात असं मला जाणवतं आहे आणि भितीही वाटते आहे. अण्णा, तुम्ही खूप आपले वाटता म्हणूनच इतक्या मोकळेपणाने लिहितो आहे. दिल्ली, आपला देश इत्यादींबद्दल मलाही नि:संशय खूप आदर आहे. परंतु अण्णा, आजही तुम्ही राळेगणसिद्धीला हवे आहात, देशापेक्षाही महाराष्ट्राला प्रथम हवे आहात इतकंच नम्रपणे सांगू इच्छितो.. अजून काय लिहू..? तुमचाच, तात्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना
शुभेच्छा
मत
माध्यमवेध
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
49994 वाचन

💬 प्रतिसाद (138)

प्रतिक्रिया

+१

प्रियाली
Mon, 08/22/2011 - 16:04 नवीन
केजरीवाल हे आयआयटी खडकपूरमधून शिकलेले असून बहुधा ते नंतर टाटा स्टीलमध्ये होते. तेथून त्यांनी निघून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जॉइन केले आणि तेथे ते अतिरिक्त आयकर आयुक्त होते असे कळते. झी टीव्हीवर झालेल्या सारेगामापमध्ये अण्णा केजरीवालविषयी म्हणाले होते की "हा मनुष्य वेडा आहे. इतका उच्चशिक्षित असून आणि मोठ्या पदावरची नोकरी सोडून आज केवळ दोन जोडी कपडे घेऊन तो माझ्यासोबत वणवण भटकतो आहे." असो. अण्णांना प्रभावी बोलता येत नाही. त्यांची भाषणे सुरचित नसतात. हे काम केजरीवाल उत्तम करतात असे जाणवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

>>>अण्णांना प्रभावी बोलता येत

प्रशांत
Mon, 08/22/2011 - 16:14 नवीन
>>>अण्णांना प्रभावी बोलता येत नाही. त्यांची भाषणे सुरचित नसतात. हे काम केजरीवाल उत्तम करतात असे जाणवले. म्हंजे केजरीवाल मुळे अण्णां टिम चांगली झाली म्हणायचे काय तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

माझे मत

प्रियाली
Mon, 08/22/2011 - 17:00 नवीन
म्हंजे केजरीवाल मुळे अण्णां टिम चांगली झाली म्हणायचे काय तुम्हाला ?
केजरीवालमुळे समोरच्याला काय सांगायचे आहे ते सांगणारा वक्ता अण्णांना मिळाला. अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत हिंदी समोरच्याला गोंधळवून टाकणारे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत

विसोबा खेचर
Mon, 08/22/2011 - 17:15 नवीन
अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत हिंदी समोरच्याला गोंधळवून टाकणारे असते.
यावरून आमचे भीमण्णा आठवले. भीमण्णा मूळचे कानडी परंतु तेही काही वेळेला मराठी मिश्रित असं लय भारी हिंदी बोलायचे...:) (भीमण्णांचा भक्त अन् हजारे अण्णांचा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

कायद्याची भाषा

प्रियाली
Mon, 08/22/2011 - 17:17 नवीन
यावरून आमचे भीमण्णा आठवले. भीमण्णा मूळचे कानडी परंतु तेही काही वेळेला मराठी मिश्रित असं लय भारी हिंदी बोलायचे...
कायद्याची भाषा बोलताना स्पष्ट आणि रोखठोक बोलणे आवश्यक असते. भीमसेन जोशींना कायद्याची भाषा बोलावी लागली असती तर त्यांनीही एखादा वकील किंवा स्पष्ट बोलणारा वक्ता पुढे केला असता. चांगले हिंदी न बोलता आल्याने आबांची स्थिती कशी झाली होती ते आठवा. आपली, (स्पष्टवक्ती)प्रियाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तात्या, टकल्या बापटाचा संताप

वपाडाव
Mon, 08/22/2011 - 18:18 नवीन
तात्या, टकल्या बापटाचा संताप यायचा बाकी आहे ना अजुन.... तो येउ द्या जरा लौकर....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

झी टीव्हीवर झालेल्या

मराठी_माणूस
Mon, 08/22/2011 - 16:26 नवीन
झी टीव्हीवर झालेल्या सारेगामापमध्ये अण्णा केजरीवालविषयी म्हणाले होते सारेगमप मध्ये अण्णा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

हो

प्रियाली
Mon, 08/22/2011 - 17:00 नवीन
सारेगमप मध्ये अण्णा?
हो अण्णा आणि केजरीवालही. पूर्ण कार्यक्रम येथे बघा - http://youtu.be/pm7iXs0b0CQ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

http://en.wikipedia.org/wiki/Arvind_Kejriwal

सुधीर काळे
Tue, 08/23/2011 - 15:33 नवीन
ह्ये वाचा आनी इच्चार करा! http://en.wikipedia.org/wiki/Arvind_Kejriwal
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

+१ आनी ह्ये पन वाचा

वाहीदा
गुरुवार, 08/25/2011 - 12:44 नवीन
शनिवार सप्टेंबर ३० , २००६ ला आलेला हा लेख तात्या, तुम्ही जरुर वाचा : Fighting the odds - Arvind Kejriwal : http://www.telegraphindia.com/1060930/asp/weekend/story_6784531.asp अरविंद केजरिवाल या सारखे किती जण आपल्यात आहेत ? हा माणूस अचानक उगवलेला नाही त्याचा लढा वाचा अन मग ठरवा त्याच्याकडे कुठला हिडन एजेंडा असू शकतो ते.... वाईट माणसे जगात आहेत याचा अर्थ चांगली माणसे पूर्णतः गायब झाली असा होत नाही.. अजून तरी काही चांगल्या लोकांमुळेच जगात कुठेतरी चांगल्या घडामोडी होतात. जगात प्रत्येक बदमाशागणिक, असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात , तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. या अब्राहम लिंकन च्या ओळीवर विश्वास ठेवा, मी व्यक्तीपुजा कधीच करित नाही पण किरण बेदी अन अरविंद केजरिवाल या दोन्ही व्यक्तींवर माझा तरी विश्वास आहे. तुम्हें हो ना हो हमको तो इतना यकींन है, टिम-अण्णा में कोई भ्रष्टाचारी नहीं हैं, नहीं है ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

टुकार

आदिजोशी
Mon, 08/22/2011 - 17:43 नवीन
कळवळ कळली, पण हा लेख इथे टाकून काय उपयोग? तो अण्णांपर्यंत पोचवा. केजरीवाल आणि किरण बेदी ह्यांचे आत्तापर्यंतचे आयुष्य आणि प्रामाणिकपणाचे रेकॉर्ड बघता त्यांच्यावर शंका घेण्यासाठी आधी पुरावे शोधणं आवश्यक आहे. केजरीवाल ३-४ महिन्यात उगवले असं लिहून लेखकाने आपला ह्या विषयावरचा अभ्यास आणि एकंदरीत ह्या विषयाची जाण जगजाहीर केलीच आहे. किबोर्ड आहे आणि लोकं वाचत आहेत म्हणून काहीही टंकू नये. लोकांचा वेळ जातो आणि हाती काही लागत नाही. देशापेक्षाही महाराष्ट्राला प्रथम हवे आहात इतकंच हे विधान म्हणजे तर भंपकपणाचा कळस आहे. ज्या माणसाने उभ्या देशाला प्रेरणा दिली, लाखो लोकांना स्वयंस्फूर्तीने चेतना दिली त्या माणसाने केवळ महराष्ट्रापुरते रहावे असा विचार आण्णांचा खरा चाहता करूच कसा शकतो? उगाच अण्णांबद्दल फार प्रेम आहे हे दाखवण्याच्या नादात, भावनेला हात घालणारी छापील वाक्ये लिहिता लिहिता तारतम्य सुटलेले दिसते. आनंद आहे.
  • Log in or register to post comments

सहमत!

चतुरंग
Mon, 08/22/2011 - 19:32 नवीन
अरविंद केजरीवाल अभ्यासू आणि हुषार माणूस आहे. विकीवर त्यांची बरीच माहिती आहे. तू नळीवर अनेक विडिओ सुद्धा आहेत. किरण बेदींबद्दल तर मी काही वेगळे सांगावे असे नाहीच. व्यवस्थेच्या आत राहूनही व्यवस्थेशी लढा देत राहणार्‍या अशा माणसांकडे हिडन अजेंडा आहे असे म्हणणे म्हणजे अवसानघात करण्याचा प्रकार आहे. भावनेच्या भरात लेखन करुन मूळ मुद्याला नख लावले आहेत तात्या. अण्णांनी देशव्यापीस्तरावरच काम करायला हवे. त्यांना हिंदी नीट येत नाही त्यामुळे मीडिया आणि इतर मुलाखत घेणारे यांच्या कायदेविषयक प्रश्नांना समर्पक आणि सडेतोड उत्तरे देणारे केजरीवाल सारखे सहकारी असणे अत्यंत आवश्यक आहे. -रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

असेच म्हणतो. सबंध लेखामधेच

अप्पा जोगळेकर
Mon, 08/22/2011 - 20:29 नवीन
असेच म्हणतो. सबंध लेखामधेच भंपकपणा दिसला. देशापेक्षाही महाराष्ट्राला तुम्ही प्रथम हवे आहात म्हणजे काय ? महाराष्ट्रापेक्षा राळेगण सिद्धीला तुम्ही प्रथम हवे आहात असं तिथले गावकरीसुद्धा म्हणतीलच. उगाच अण्णांबद्दल फार प्रेम आहे हे दाखवण्याच्या नादात, भावनेला हात घालणारी छापील वाक्ये लिहिता लिहिता तारतम्य सुटलेले दिसते. +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

+१+१+१

सुधीर काळे
Tue, 08/23/2011 - 15:36 नवीन
+१+१+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

शिर्षक सोडल्यास लेख सगळा काही

रेवती
Mon, 08/22/2011 - 18:15 नवीन
शिर्षक सोडल्यास लेख सगळा काही पटला नाही. आण्णांबद्दल प्रेम वाटणे आणि त्यांच्या चळवळीबद्दल आदर वाटणे यामध्ये सापडून गोंधळ झाल्यासारखा वाटतो आहे. त्यांनी सगळा देश हलवून सोडला असताना राळेगणसिद्धीच्याच लेव्हलला विचार करून चालणार नाही (यात त्यांच्या गावाला कमी लेखत नाहिये.). बाकी भेटायला गेलेल्या कर्यकर्त्यांच्या बाबतीत झाले ते फार आश्चर्यजनक वगैरे नाही. गावाहून अमूक एक माणूस येऊन भेट देवून गेल्याचे निरोप मात्र वेळेवर पोहोचल्याशी कारण! हे काही आण्णांच्याच बाबतीत होत नाहिये. कोणताही मनुष्य महत्वाच्या कामात अडकलेला असताना अगदी घरचे लोकही भेटू शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

Just a thought Can we bribe

विजुभाऊ
Mon, 08/22/2011 - 18:54 नवीन
Just a thought Can we bribe the Government to pass Jan Lokpal Bill??????????
  • Log in or register to post comments

+१ आणि हा हा हा

कानडाऊ योगेशु
Mon, 08/22/2011 - 19:08 नवीन
मल्टी करोड रुपयांच्या घोटाळ्यांच्या जमान्यात सरकारला एका "हजारे" ची किमंत ती काय? अण्णांच्या आडनावात अजुन काही शून्ये असायला हवी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मल्टी करोड रुपयांच्या

वपाडाव
Tue, 08/23/2011 - 14:56 नवीन
मल्टी करोड रुपयांच्या घोटाळ्यांच्या जमान्यात सरकारला एका "हजारे" ची किमंत ती काय? अण्णांच्या आडनावात अजुन काही शून्ये असायला हवी होती.
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

+२

llपुण्याचे पेशवेll
Tue, 08/23/2011 - 17:43 नवीन
म्हणजे आणांचे आडनाव हजारे ऐवजी करोडे असते तर जास्त प्रभाव पडला असता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

अर्रे वा

पल्लवी
Mon, 08/22/2011 - 21:15 नवीन
facebook comment जिन्दाबाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अबक ...यांचा हिडन अजेंडा .....

कुंदन
Mon, 08/22/2011 - 18:58 नवीन
>>एक कर्त्यव्यदक्ष पोलिस अधिकारी या नात्याने मी किरण बेदींना नक्कीच आदारपूर्वक ओळखतो. परंतु ह्या आंदोलनात मात्र 'त्यांच्याकडेही काहीही हिडन अजेंडा नाही..' असं का माहीत नाही, परंतु मी ते म्हणू शकत नाही..! कोण आणि कोणाबद्दल शंका घेतो आहे हे वाचुन अंमळ हसु आले.
  • Log in or register to post comments

केजरीवाल,बेंदीसारख्या

कानडाऊ योगेशु
Mon, 08/22/2011 - 19:05 नवीन
केजरीवाल,बेंदीसारख्या मंडळीमुळे अण्णांच्या उपोषणाची तांत्रिक बाजु भक्कम झाल्यासारखी वाटते. परवाच पेपरात वाचले कि किरण बेंदींनी अण्णांचे उपोषण हे "आमरण" नसुन "बेमुदत" आहे असे प्रसारमाध्यमांना सांगितले. सरकारमध्ये जर कपिल सिब्बल,मनिष तिवारींसारखी शब्दच्छल करणारी बदमाष मंडळी असतील तर अण्णांकडेही त्याला सडेतोड उत्तरे देणारी मंडळी असायलाच हवीत.
  • Log in or register to post comments

सहमत. आण्णांचे उपोषण तसेच जरा

रेवती
Mon, 08/22/2011 - 19:29 नवीन
सहमत. आण्णांचे उपोषण तसेच जरा घाईघाईने निर्णय घ्यायची सक्ती वगैरे त्यांना स्वत:लाही पटत असेल असे नाही पण बदमाश कंपनीशी किती दिवस नियमाप्रमाणे वागत राहणार? कधीतरी आहे त्या तयारीनिशी, थोडे नियन पाळून तर थोडे झुगारून मैदानात उतरावेच लागणार होते. किरण बेदी, केजरीवाल यांची सगळीच मते पटली नाहीत (असे धरले) तरी आण्णांची बाजू जरा तरी बरी झाली. जरा 'उंगली टेढी' करून का होईना कामाशी गाठ घालणेही महत्वाचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

जय हो, अरविंदभाई!

सुधीर काळे
Tue, 08/23/2011 - 15:42 नवीन
असयालाच हवीत आणि आहेत. मला केजरीवालांची पुढच्या लढाईची योजना फारच आवडली. ते म्हणाले कीं ही लढाई जिकल्यानंतर पुढचा मनसुबा आहे निवडणुकातील घाण उपसून ती प्रक्रिया पारदर्शक करणे. बस्स. असे झाले तर आपल्यासारखे लोकही निवडणूक लढवायला कचरणार नाहींत. असेच नवे-नवे विषय त्यांनी हातात घ्यावेत आणि विजयी व्हावे! जय हो, अरविंदभाई!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

भारतीय लोकांचा प्रॉब्लेम हा

नगरीनिरंजन
Mon, 08/22/2011 - 19:39 नवीन
भारतीय लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही फार हुशार आहोत. स्वतः काही करत नसलो तरी काही करू पाहणार्‍या इतरांबद्दल अनेक शंका आम्ही घेतो. केजरीवाल आणि बेदी या दोघांनाही सरकारी नोकरीतच अमाप धनदौलत गोळा करता आली असती असे वाटते. असो.
  • Log in or register to post comments

+१

गणेशा
Tue, 08/23/2011 - 19:25 नवीन
मनातली गोष्त बोललात.. आवडले आणि बरोबर पण वाटलेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

डॉ. अभय बंग

विकास
Mon, 08/22/2011 - 20:39 नवीन
दोन दिवसांपुर्वी लोकमत चॅनलवर निखिल वागळेंनी घेतलेली, डॉ. अभय बंग यांची मुलाखत शेवटची पाच-एक मिनीटेच पाहीली/पाहू शकलो. त्यात त्यांनी आंदोलनाच्या बाजूने खूप प्रभावी मते मांडली आणि नेहमीप्रमाणेच त्यांची मते पटणारीच होती. फक्त त्यात एक बोलताना जे काही थोडेफार ऐकले त्यामुळे "संशय का मनी आला" अशी अवस्था झाली. त्यांच्या मते राहूल गांधींनी यात मधे पडावे, ह्या मुद्यावर बोलताना, ते असे देखील म्हणाले की नाहीतरी त्यांना पंतप्रधान होयचे आहे, काँग्रेसला त्यांना पंतप्रधान करायचे आहे, तर मग ही संधी त्यांनी सोडू नये... ज्यांना अण्णांवर आक्षेप आहे त्यांनी अजून दारूगोळा भरण्यासाठी खैरनार यांची देखील लोकमतवरील मुलाखत पहावी. बाकी, "कोण आणि कोणाबद्दल शंका घेतो आहे हे वाचुन अंमळ हसु आले." ह्या कुंदनच्या वाक्याशी सहमत. :-)
  • Log in or register to post comments

चांगली मुलाखत

धनंजय
Mon, 08/22/2011 - 23:24 नवीन
चांगली मुलाखत. मुद्दामून पाहाण्यासारखी. सुरुवातीची वीसेक मिनिटे आयबीएन लोकमतच्या यूट्यूब वाहिनीवरती बघता आली. (चित्रफितीत तेवढाच भाग आहे.) जयप्रकाशनारायणांच्या चळवळीशी साम्यस्थळे आणि फरक सांगितले आहेत. लोकांतली चेतना, निवडणूक-राजकारणाबाहेरील सामाजिक कार्यकर्त्याचे नेतृत्व, सरकारच्या वेगवेगळ्या कातडीबचाऊ आणि चुकलेल्या प्रतिक्रिया, ही साम्ये. जयप्रकाश नारायणांना राजकारणही चांगले कळत होते, अण्णा हजारेंना नाही; जयप्रकाशनारायणांकडे शिस्तीच्या कार्यकर्त्यांची संघटना होती, अण्णा हजारेंकडे नाही; आणि गर्दी थोड्या काळासाठी चेतवलेली असते, त्यानंतर काय होईल याबद्दल चिंता : हे फरक. "राहुल गांधी" हा भाग यूट्यूब फीत संपली तोवर आला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

शक्य आहे

विकास
Mon, 08/22/2011 - 23:42 नवीन
"राहुल गांधी" हा भाग यूट्यूब फीत संपली तोवर आला नव्हता. मी ती मुलाखत शनीवारी लाईव्ह बघितली होती. रेकॉर्डींग जर सगळे ठेवले नसेल तर माहीत नाही. चांगली मुलाखत. मुद्दामून पाहाण्यासारखी. सहमत. त्यात शेवटी निखिल वागळे म्हणाले होते की, बंग जेंव्हा बोलतात तेंव्हा विचारांना चालना मिळते. ते त्यांचे (बंग यांचे) भाष्य ऐकताना सतत जाणवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

गर्दी थोड्या काळासाठी

रेवती
Mon, 08/22/2011 - 23:43 नवीन
गर्दी थोड्या काळासाठी चेतवलेली असते असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

फक्त त्यात एक बोलताना जे काही

अप्पा जोगळेकर
Tue, 08/23/2011 - 20:38 नवीन
फक्त त्यात एक बोलताना जे काही थोडेफार ऐकले त्यामुळे "संशय का मनी आला" अशी अवस्था झाली. ह्या मुद्यावर बोलताना, ते असे देखील म्हणाले की नाहीतरी त्यांना पंतप्रधान होयचे आहे, काँग्रेसला त्यांना पंतप्रधान करायचे आहे, तर मग ही संधी त्यांनी सोडू नये... त्यांनी राहुल गांधीं आणि काँग्रेस पक्ष यांची धोरणात्मक भूमिका काय असावी याबाबत काँग्रेसला सल्ला दिला. त्यामधे त्यांनी काही चुकीचे सांगितले असे वाटत नाही. जर राहुल गांधीने या प्रकरणात इनिशिएटिव्ह घेउन यशस्वी तडजोड केली असती तर तो भावी पंतप्रधान म्हणून योग्य आहे असा संदेश जनतेमध्ये गेला असता. शिवाय जनतेचा फायदा झाला असता तो वेगळाच. पण अशा प्रकारे ओनरशिप घेउन एक पाउल पुढे टाकण्यासाठी तो अकार्यक्षम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्यांना अण्णांवर आक्षेप आहे त्यांनी अजून दारूगोळा भरण्यासाठी खैरनार यांची देखील लोकमतवरील मुलाखत पहावी. ज्यांनी अभय बंग यांची मुलाखत पाहिली आहे त्यांच्या मनातील जवळ जवळ सगळ्याच शंका फिटून जातील. अण्णांची जनलोकपाल विधेयकाची मागणी लोकशाहीच्या विरुद्ध आहे असा जो आक्षेप नोंदवला जातो त्याला चांगले उत्तर त्यांनी दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मला वाटले...

विकास
Tue, 08/23/2011 - 22:53 नवीन
त्यांनी राहुल गांधीं आणि काँग्रेस पक्ष यांची धोरणात्मक भूमिका काय असावी याबाबत काँग्रेसला सल्ला दिला. त्यामधे त्यांनी काही चुकीचे सांगितले असे वाटत नाही. मला वाटले. हेच जर उदाहरण म्हणून कुमार केतकर यांनी मुलाखतीत बोलले असते तर चुकीचे वाटले नसते. पण जेंव्हा डॉ. बंग यांच्या सारखी सन्मान्य व्यक्ती बोलते तेंव्हा त्यातून जनमत निर्माण होऊ शकते. आज काही झाले तरी काँग्रेस हा सत्ताधारी घाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे, बहुमतवाला पक्ष नाही. त्याच्या एका सरचिटणिसाला महत्व देत, नाहीतरी त्याला काँग्रेसला पंतप्रधान करायचेच आहे, असे म्हणणे आणि ते मान्य करून बोलणे पटले नाही. त्यात लोकशाही दिसली नाही तर घराणेशाही ग्रूहीत धरलेली दिसली. त्याच बरोबर अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे त्यांनी जाता जाता १९७५ चा अर्थात आणिबाणीचा मुद्दा आणला. "असे परत होण्याचे भय आहेच" असे म्हणत. वास्तवीक जे स्वतः जेपींच्या नवनिर्माण आंदोलनात होते, त्यांना कल्पना असावी की असली आणिबाणी आणण्याची घटनेतील तरतुद नंतरच्या जनता पार्टीने खूप अवघड करून नंतरच्या सर्वच सत्ताधिशांच्या अनिर्बंध अधिकाराला वेसण घातले होते. इतका भाग सोडल्यासः ज्यांनी अभय बंग यांची मुलाखत पाहिली आहे त्यांच्या मनातील जवळ जवळ सगळ्याच शंका फिटून जातील. ह्याच्याशी सहमतच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

फक्त पंतप्रधान, राहुल गांधी अथवा पृथ्विराज चव्हाण

सुनील
Mon, 08/22/2011 - 20:44 नवीन
http://www.samachar.com/Anna-says-he-will-speak-to-Rahul-PMO-or-Chavan-liwtL4echgd.html?source=recommended_news अण्णा फक्त पंतप्रधान, राहुल गांधी अथवा पृथ्विराज चव्हाण यांच्याशीच बोलणार! चला, ग्राऊंड वर्क सुरू झाले तर!
  • Log in or register to post comments

म्हणजे...

विकास
Mon, 08/22/2011 - 20:53 नवीन
अण्णा फक्त पंतप्रधान, राहुल गांधी अथवा पृथ्विराज चव्हाण यांच्याशीच बोलणार! आता मला पृथ्वी देखील त्रिकोणी असू शकते असे वाटू लागले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मला तर

प्रियाली
Mon, 08/22/2011 - 21:30 नवीन
हेहेहे! मला सोने जांभळे असते असेही वाटू लागले आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

माझंही असंच काही ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/23/2011 - 00:29 नवीन
ज्योतिष, धर्म, नीतिनियम, ईश्वर ह्यांची अनुमाने आधी समजून घ्यावी आणि मग प्रत्यक्ष प्रमाण हाती धरावे, असं वाटायला लागलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

+१

नंदन
Tue, 08/23/2011 - 00:31 नवीन
ईर्शाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अण्णा काळजी घ्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/22/2011 - 21:40 नवीन
श्री अण्णांनी काळजी घ्यायला हवी ही गोष्ट खरीच आहे. आजूबाजूला या आंदोलनाच्या निमित्ताने सोबत कोण असतील आणि सर्व चारित्र्यवान आहेत का ? सध्या तपासणीची ही वेळ नाही असे वाटते. लेखनातील काही मुद्दे पटण्यासारखे असले तरी- केजरीवाल, सिसोदिया, बेदी यांच्यावर शंका घेणारे तुम्ही काही एकटेच नाही. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या लोकांकडे बराच पैसा जमा झाला आहे आणि वरील मंडळींच्या मागे भविष्यात चौकशांचा ससेमिरा मागे लागला तर हे लोक जाळ्यात सापडतील अशा आवया काही कमी नाहीत. आणि उद्याचं काही सांगता येत नाही. जनलोकपाल विधेयकाचा हट्ट म्हणजे भारतीय संविधानाला धक्का पोहचविण्याचा प्रकार आहे. संसदेचा अवमान आहे. उद्या राष्ट्रविघातक गोष्टींसाठी अशा उपोषणाचा मार्ग कोणी चो़खाळला तर वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टींचा प्रचार सुरुच आहे. आपल्याच महाराष्ट्रात श्री अण्णा हजारे आणि त्यांच्या आंदोलनांकडे अनेकदा संशयानं पाहिल्या गेलं आहे. विद्वान मंडळी या आंदोलनाला स्वप्नाळू लोकांचं स्वप्नाळू आंदोलन म्हणून हिणवत असले तरी आपण बॉ सदरील आंदोलनाने भारावून गेलो आहोत. असो, -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

विद्वान मंडळी या आंदोलनाला

llपुण्याचे पेशवेll
Tue, 08/23/2011 - 17:48 नवीन
विद्वान मंडळी या आंदोलनाला स्वप्नाळू लोकांचं स्वप्नाळू आंदोलन म्हणून हिणवत असले तरी आपण बॉ सदरील आंदोलनाने भारावून गेलो आहोत. सहमत. जनता इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली आहे हे आमच्या दृष्टीने महत्वाचे. गांधींप्रमाणे आण्णांनीही डोक्यावर काठ्या बसणार नाहीत आणि घरदार बुडणार नाही असा मार्ग सुचवल्याने जनाधार मोठ्या प्रमाणावर लाभला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गांधींप्रमाणे आण्णांनीही

गवि
Tue, 08/23/2011 - 17:54 नवीन
गांधींप्रमाणे आण्णांनीही डोक्यावर काठ्या बसणार नाहीत आणि घरदार बुडणार नाही असा मार्ग सुचवल्याने जनाधार मोठ्या प्रमाणावर लाभला आहे. परफेक्ट. यू सेड इट..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

?

पंगा
Tue, 08/23/2011 - 20:04 नवीन
गांधींप्रमाणे आण्णांनीही डोक्यावर काठ्या बसणार नाहीत आणि घरदार बुडणार नाही असा मार्ग सुचवल्याने जनाधार मोठ्या प्रमाणावर लाभला आहे.
???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

अशा भ्रमित करणार्‍या पोस्टस

आशु जोग
Mon, 08/22/2011 - 22:36 नवीन
अशा भ्रमित करणार्‍या पोस्टस येत असतात अशी आंदोलने झाली असली की 'बाबा रामदेव जागा हो' इ. त्याकडे फार लक्ष द्यायचे नसते (पण आता आदरणीय मनिमोहन यांना काही सुनवा, कलमाडी यांना काही सुनवा म्हणजे ही वेळच येणार नाही ते सोडून हा काय टी पी ) >> परंतु अरविंद केजरीवाल ह्या गेल्या ३-४ महिन्यातच अचानक उगवलेल्या व्यक्तिंना मी किंवा इतर भारतीय जनता ओळखत नाही << अज्ञान की ढोंग ? स्वतःबद्दल बोला भारतीय जनतेबद्दल नको http://www.misalpav.com/node/18840 "संभवामि युगे युगे" असे वचन देऊन गेलेले भगवान श्रीकृष्ण अण्णांच्या रूपात आले आहेत! असे छान माहितीपूर्ण धागे वाचकांनी वाचावेत सुधीरकाकांचे. -- लेखकाचे या ठिकाणचे स्थान मला ठाऊक आहे पण मी बोलणार आहे
  • Log in or register to post comments

लेख आवडला

क्लिंटन
Mon, 08/22/2011 - 23:35 नवीन
बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर आलेला तात्यांचा लेख आवडला.अरूंधती रॉयचा हा लेख वेळ मिळाल्यास जरूर वाचा. मला पहिल्यांदाच अरूंधती रॉयचे विचार पटले.
  • Log in or register to post comments

लेखावरील प्रतिक्रियादेखील

शुचि
Tue, 08/23/2011 - 01:19 नवीन
लेखावरील प्रतिक्रियादेखील वाचनीय आहेत. बर्‍याच लेखाच्या विरोधात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

पोटदुखी

विकास
Tue, 08/23/2011 - 01:48 नवीन
आज सकाळीच तो लेख वाचनात आला आणि अरूंधती रॉय यांना पोटदुखी झाली आहे असे वाटले. करप्शन म्हणजे, "... of a social transaction in an egregiously unequal society" हे वाचून तर शाब्दीक कसरतींचे भलतेच कौतुक वाटले. शॉपिंग मॉल मुळे फेरीवाले अडचणीत आले आणि मग रस्त्यावर धंदा करायला त्यांना नगरपालीकेच्या अधिकार्‍यांना आणि पोलीसांना पैसे द्यावे लागतात, "तर त्यात काय चुकले (Is that such a terrible thing?)", या विधानाने त्यांचे ज्ञान मर्यादीत आणि आकस अमर्याद आहे हे समजले. कारण मुंबईचेच उदाहरण द्यायचे झाले तर मॉल हा शब्द अस्तित्वात येण्याआधी खैरनार यांनी फेरीवाल्यांना, "विनाफेरीवाला क्षेत्रातून" बाहेर काढले होते, हे आठवले. आता खैरनार हे त्यांना भ्रष्ट अधिकारी वाटत असतील तर गोष्ट वेगळी आहे. त्या शिवाय जर हे मॉल काढणार्‍या कंपन्यांमुळे होत असेल असे वाटले तर मग त्यांचा मॉललाच विरोध हवा. पण तो विरोध मॉलला नाही, विना फेरीवालीक्षेत्रात काम करणार्‍या फेरीवाल्यांना नाही, तर विरोध आहे तो त्यासाठी लाच देऊन "सिस्टीम" चालू ठेवण्याच्या विरोधाला! हे केवळ एक उदाहरण झाले. "Nationalism of one kind or another was the cause of most of the genocide of the twentieth century. Flags are bits of colored cloth that governments use first to shrink-wrap people's brains and then as ceremonial shrouds to bury the dead." असे देश/राष्ट्र संकल्पनेबद्दल मते असलेल्या बाईंना, अण्णा अथवा त्यांच्या पाठीराख्यांनी, भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला विरोध करणार्‍यास "सच्चे भारतीय" म्हणले नाही म्हणून का राग यावा? त्यांनी इतर कुठले (पक्षीय अथवा धार्मिक) झेंडे न वापरता केवळ भारताचा झेंडा वापरला तर कशाला पोटशूळ उठावा. वर शेवटी भ्रष्टाचार कसा गंभिर आहे असे म्हणत भारताची तुलना अफगाणिस्तानशी करणार... अर्थात हा लेख अरुंधती रॉय यांचा असल्याने अजून काय अपेक्षा करायची म्हणा! म्हणून वाचला पण नंतर इग्नोर केला होता. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

"येन-केन प्रकारेण प्रसिद्धा ’रुंधती भवेत्"!

सुधीर काळे
Tue, 08/23/2011 - 15:49 नवीन
हाहाहा! विकासभाऊ, जय हो! रॉय मॅडमचे एकच तत्व आहे ते म्हणजे विरोधी विचार मांडून "येन-केन प्रकारेण प्रसिद्धा ’रुंधती भवेत्"!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

लेख

क्लिंटन
Tue, 08/23/2011 - 19:03 नवीन
मी अरूंधती रॉय समर्थक अजिबात नाही. पहिल्यांदाच मला त्यांचा लेख भावला असेल. यातील "Is that such a terrible thing?" चा मतितार्थ आहे की कॉर्पोरेटच्या लांडालबाड्यांपुढे फेरीवाल्यांना पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पैसे चारायला लागतात ही गोष्ट क्षुल्लक आहे. निदान मला तरी हा अर्थ अभिप्रेत आहे असे वाटले. या लेखातील अजून दुसरा मुद्दा (जो माझ्या मते फेरीवाल्यांच्या मुद्द्यापेक्षा अधिक महत्वाचा आहे) की सध्याचे आंदोलन केवळ सरकारी पातळीवरील भ्रष्टाचाराविरूध्द आहे पण कॉर्पोरेटमधील गैरप्रकार मात्र पूर्णपणे दुर्लक्षले गेले आहेत. मी एका बॅंकेत "क्रेडिट रिस्क मॅनेजमेन्ट" विभागात काम करतो.कोणतेही कर्जाचे प्रपोजल आमच्या विभागाने संमती दिल्याशिवाय पुढे जात नाही.मी बॅंकेत नवीन असताना त्यापूर्वी आठवडाभर पास केलेले एक प्रपोजल मला अभ्यासायला दिले होते (प्रपोजल हाताळताना नक्की काय बघावे याची कल्पना यावी म्हणून). ते प्रपोजल "यमुना कॉरिडॉर" लगत Formula One चा रेसिंग ट्रॅक बांधायला काही कोटी कर्जाऊ देण्यासंबंधी होते. आणि हा ट्रॅक दिल्लीनजिक नॉयडामध्ये उभारला जाणार आहे आणि ३-४ महिन्यात तिथे भारतातील पहिली Formula One ची शर्यतही होणार आहे. या ट्रॅकसाठी जमीन मोठ्या प्रमाणावर लागते आणि ही जमीन तिथल्या शेतकऱ्यांकडून संपादित केली आहे.(आता किती पैशांना हे विचारू नका). अशी जमीन संपादित करायला अनेक प्रसंगी गुंडांचा वापर केला जातो असे वर्तमानपत्रात येतच असते.या गैरव्यवहारांकडे प्रशासनातील लोकांनी कॉर्पोरेटकडून पैसे खाऊन डोळेझाक केली तर त्यात सरकारी अधिकाऱ्यांचा दोष जरूर आहेच पण कॉर्पोरेटमधल्यांचे काय?या Formula One रेससाठी किती तिकिटे आहेत याचे आकडे ऐकले तर डोळे पांढरे व्हायची वेळ येईल. कर्ज देण्यापूर्वी ते कर्ज परत करायची client ची पात्रता आहे हे दाखविण्यासाठी काही आकडेवारी सगळ्या प्रपोजलमध्ये असते तशी यातही होती त्यावरून मला तिकिटांचे आकडे कळले.म्हणजे शेतकऱ्यांना धाकदपटशा दाखवून त्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने हे घशात घालणार आणि त्यांना देशोधडीला लावणार, त्याच जमिनींवर प्रचंड वेगाने गाड्या पळवून स्वत: कोट्यावधी रूपये मिळविणार! यांचे गैरव्यवहार दबावेत म्हणून सरकारी अधिकाऱ्यांचे हात ओले केले तर सगळे परिणाम सरकारी अधिकाऱ्यांना पण हे मात्र नामानिराळे! हा कोणता न्याय झाला? (हे सगळे मी स्वत: डाव्या विचारसरणीचा अजिबात नसूनही लिहित आहे). किंबहुना मी म्हणेन की या प्रकरणी जास्त दोष कंपन्यांमधील लोकांचा आहे! लेखात पुढे लिहिले आहे की या आंदोलनातून सरकारी यंत्रणा बदनाम व्हावी या हिडन अजेंड्याने स्टील कंपन्या, real estate कंपन्या इत्यादी या ’India against corruption' ला पाठिंबा देत आहेत! अजून महत्वाचे वाक्य म्हणजे "The campaign is being handled by people who run a clutch of generously funded NGOs whose donors include Coca-Cola and the Lehman Brothers." केजरीवालांच्या कबीर संघटनेच्या संकेतस्थळावर मी देणगीदारांची नावे शोधायचा खूप प्रयत्न केला पण ती काही मला मिळाली नाहीत. माहिती हक्क कायद्यासाठी संघर्ष करणारे केजरीवाल स्वतःच्या संस्थेला नक्की देणगी कोण देते याबद्दल माहिती का देत नसावेत? तेव्हा कोका कोलाने खरोखरच त्या संस्थेला देणगी दिली आहे का हे नक्की सांगता येणार नाही पण दिली असेल तर मात्र सगळा प्रकार गंभीर आहे.कोका कोला कंपनी पाण्याचा बेसुमार उपसा करते आणि जमिनीखालची पाण्य़ाची पातळी त्यामुळे कमी होत आहे आणि त्यातून कोका कोला प्लॅन्टच्या परिसरात पाणी टंचाई झाली आहे या कारणाने त्या कंपनीविरूध्द ३-४ वर्षांपूर्वी आंदोलन झाले होते असे वाचल्याचे पक्के आठवते.आपल्याकडील Environment Act प्रमाणे अशा प्लॅन्टना परवानगी देण्यापूर्वी अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते.त्याची पूर्तता प्रत्यक्षात करायची गरज नसते कारण संबंधित अधिकाऱ्यांचे हात ओले केले की काम होणाऱ्यातले असते.पण मग असे हात ओले करणारे अजिबात दोषी नाहीत का?आणि असेच लोक सात्विकतेचा खोटा आव आणत या आंदोलनातील महत्वाच्या चेहऱ्यांच्या NGO ना मदत देत असतील तर त्यात काहीच आक्षेपार्ह नाही का? दुसरे म्हणजे लेखात म्हटले आहे "They signal to us that if we do not support The Fast, we are not ‘true Indians.’ " मी गेल्या २-३ प्रतिसादांमध्ये प्रशांत भूषण यांच्या "तुम्ही एक तर आमच्या बाजूने आहात किंवा विरोधात आहात" सदृश वक्तव्याविरोधात लिहिले आहे.अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा न देणारे लोक म्हणजे "भ्रष्ट व्यवस्थेचा फायदा होणारे" आहेत (म्हणजेच सच्चे देशप्रेमी भारतीय नाहीत) असाच प्रशांत भूषण यांचे वक्तव्य झाले नाही का? अरूंधती रॉयने पण त्याविरूध्दच लिहिले आहे. कोणीही उठावे आणि मला (कारण मी या आंदोलनाला पाठिंबा देत नाही-- उद्देशाला मात्र जरूर देतो) "भ्रष्ट व्यवस्थेचा फायदा होणारा" म्हणावे किंवा माझ्या देशभक्तीवरच शंका घ्यावी हा प्रकार मला तरी नक्कीच आवडणारा नाही आणि बाकी कोणी काही म्हणो या प्रकाराचा मला राग येणारच! अरूंधती रॉयने मी यापूर्वी विचार न केलेला नवा मुद्दा मांडला आणि मला तो पटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सर्वप्रथम पुष्कळ नविन माहिती

अप्पा जोगळेकर
Tue, 08/23/2011 - 21:07 नवीन
सर्वप्रथम पुष्कळ नविन माहिती मिळाली त्याबद्दल आभार. भ्रष्टाचाराचे निर्मूलन व्हावे याउद्देशाने चालू झालेले जे आंदोलन आहे त्यामुळे भ्रष्टाचार समूळ नष्ट होणार आहे असा दावा आंदोलकांनी केल्याचे मला तरी माहीत नाही. अशी आंदोलने किंवा असे कायदे टप्प्याटप्प्याने पुढे जात असतात. जर भ्रष्ट सरकारी अधिकार्‍यांना लाच घेण्याबद्दल शिक्षा होत असेल आणि त्यांना लाच देणार्‍यांना होत नसेल तर ती काही फार समर्थनीय गोष्ट नाही.समजा नविन कायद्याने १०० पैकी १०० भ्रष्ट लोक (देणारे किंवा घेणारे) मोकळे सुटण्यापेक्षा त्यातल्या ३०-४० लोकांना जरी शिक्षा होत असेल तरीसुद्धा हा कायदा व्हावा असेच मी म्हणेन. कदाचित उद्या या कायद्यात सुधारणा होउन त्याचा स्पॅन अधिक मोठा होईल आणि ३०-४० ऐवजी ६०-७० लोकांना शिक्षा होईल. जर अरुंधती रॉयसारख्या <संपादित मजकूर> प्रॉब्लेम असेल तर तिने पुढाकार घ्यावा आणि आंदोलकांच्या मसुद्यामधे काही बदल सुचवावा. तसे काही तिने केल्याचे ऐकिवात नाही. केजरीवालांच्या कबीर संघटनेच्या संकेतस्थळावर मी देणगीदारांची नावे शोधायचा खूप प्रयत्न केला पण ती काही मला मिळाली नाहीत. माहिती हक्क कायद्यासाठी संघर्ष करणारे केजरीवाल स्वतःच्या संस्थेला नक्की देणगी कोण देते याबद्दल माहिती का देत नसावेत? तसे करण्यासाठी ते कोणाला बांधील आहेत असे वाटत नाही. They signal to us that if we do not support The Fast, we are not ‘true Indians.’ केजरीवालांनी देणागीदारांची नावे काहीर केली नाहीत म्हणून ताबडतोब ते पैसे गैरमार्गानेच आले असावेत अशी शंका तुम्ही जर घेऊ शकता तर आंदोलनाला पाठींबा दिला नाही म्हणून तुम्ही खरे भारतीय नाही असा निष्कर्ष कुणी काढल्यास तो गैर आहे असे मला वाटत नाही. आणि अरुंधती रॉयच्या बाबतीत बोलायचे तर ती भारतीय नाही हे तर वास्तवच आहे. *** कृपया आपले म्हणणे योग्य रितीने मांडावे अशी समज देण्यात येत आहे - संपादक मंडळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

अरूंधती रॉय यांची मतं पटोत ना

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/23/2011 - 21:36 नवीन
अरूंधती रॉय यांची मतं पटोत ना पटोत, ****** हे विशेषण त्यांच्या* बाबतीत वापरू नये असं वाटतं. *ज्यांची मतं (अजिबातच) पटत नाहीत असे सर्वच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

+१

पंगा
Tue, 08/23/2011 - 21:40 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा