Skip to main content

सिंघम

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 16/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
परवा 'सिंघम' पाहिला. मनाची आणि मेंदूची व्यवस्थित मशागत करून गेलो असल्याने मनोरंजनाचे पीक तरारुन आले. चांगल्याचा वाईटावर सणसणीत विजय याखेरीज कुठलेच बोधामृत नाही, कुठलाच मेसेज नाही, कुठल्याच गोष्टीचा धांडोळा-बिंडोळा घेण्याचा प्रयत्न नाही, कथेत कुठलाच वेगळेपणा नाही आणि तरीही 'सिंघम' पुरेपूर मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांसमोर मनमोकळेपणाने रीता करतो. एक प्रामाणिक पोलीस अधिकारी, एक अतिवाईट प्रवृत्तीचा गुंड-राजकारणी आणि त्यांच्यातला संघर्ष हेच चित्रपटाचे कथाबीज. शेवट अपेक्षेप्रमाणे गोड! मध्ये-मध्ये तोंडी लावायला काजल अग्रवाल या छान दिसणार्‍या नायिकेचे लाडीक 'एक लडकी थी दीवानी सी' छाप प्रेमचाळे, विजय पाटकर, अशोक सराफ यांचे विनोदी प्रसंग आणि दोन-तीन गाणी! आणि प्रेक्षकांना गुंगवून ठेवण्यासाठी रचलेली अतिशयोक्त तरीही देखणी मारामारी, मुख्य अभिनेत्यांचा भडक आणि शब्दबंबाळ अभिनय, आणि खेचक संवाद असा मसाला. 'सिंघम' यशस्वी नसता झाला तरच आश्चर्य वाटले असते. रोहित शेट्टीचे दिग्दर्शन एकदम कडक आहे. चित्रपटाचा वेग प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. सगळ्या व्यक्तिरेखा मराठी आहेत. चित्रपट घडतोच एका गोवा-महाराष्ट्र सीमेवरच्या गावात आणि मुख्य गोव्यात. मराठी पार्श्वभूमी असल्याने काही मोजके संवाद मराठीत आहेत. मराठी प्रेक्षकांच्या टाळ्यांसाठी मराठी पार्श्वभूमी, उत्तरेतल्या प्रेक्षकांसाठी दे-दणादण मारामारी, दक्षिणेतल्या काही मोजक्या प्रेक्षकांसाठी दक्षिणी स्टाईलचा बेधडक नायक आणि खलनायक अशा सगळ्या प्रेक्षकांचा सारासार विचार करून रोहित शेट्टीने 'सिंघम' बनवला आहे. बर्‍याच दिवसांनी असा फॉर्म्युला चित्रपट आल्याने मल्टीप्लेक्सेसनाही प्रेक्षकांनी गर्दी केली. 'सिंघम' बघत असतांना मला राहून-राहून 'खाकी' ची आठवण येत होती. इतंकच काय "पोलीस अगर चाहे तो मंदीर में उतारी हुई चप्पल तक चोरी नही हो सकती...", "ये सम्मान सिर्फ पोलीस को मिलता हैं, प्राईम मिनिस्टर या राष्ट्रपती तक को नही मिलता...", "हमारा डिपार्टमेंट हमारी ही ठोकने पे तुला हुआ हैं..." हे संवाद थोड्या-फार फरकाने जसेच्या तसे 'खाकी'तून उचललेले आहेत. 'खाकी'मध्ये 'बच्चे का खिलौना तक चोरी नही हो सकता..." असा संवाद आहे तर 'सिंघम'मध्ये "चप्पल तक चोरी नही हो सकती..." असा संवाद आहे. कथासूत्र देखील थोड्या-फार प्रमाणात 'खाकी'सारखे आहे. अर्थात 'खाकी' हा जरा वरच्या दर्जाचा होता. गंमत म्हणजे 'खाकी' फारसा चालला नाही, मात्र 'सिंघम' धो-धो चालला. कारणे बरीच आहेत. 'खाकी'मध्ये म्हातारा आणि लोकप्रियतेचा भर ओसरलेला अमिताभ नायक होता, 'सिंघम'मध्ये तरुण आणि सध्याचा आघाडीचा हीरो अजय देवगण नायक होता. आणखी एक महत्वाचे कारण माझ्या मते असे जाणवते की 'खाकी' २००३ चा होता आणि 'सिंघम' २०११ चा. २००३ ची परिस्थिती तशी बरीच चांगली होती. कॉग्रेसच्या आघाडीचे सरकार ठीक-ठाक सुरु होते. भ्रष्टाचाराची प्रकरणे इतक्या मोठ्या प्रमाणावर बाहेर निघत नव्हती, आयटीमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते, अर्थव्यवस्था तेजीत होती, प्रेक्षकांमध्ये सामान्यपणे आनंदाचे वातावरण होते. अशा परिस्थितीत 'खाकी' सारखा राजकारण्यांच्या गैरकृत्यांना एकहाती आळा घालणारा नायक आणि त्याचे धैर्य याचे चित्रण करणार्‍या चित्रपटाचे कुणाला फारसे कौतुक वाटले नसावे. सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकातील रौद्रावतार धारण केलेला नायक मागच्या १५ वर्षात लोप पावला होता कारण भारताची आर्थिक आघाडी मजबूत बनलेली होती; ग्लोबलायझेशनचा फायदा कमी-अधिक प्रमाणात सगळ्यांनाच होत होता; मासिक प्राप्ती वाढली होती; महागाईने इतके भयंकर डोके वर काढलेले नव्हते. याउलट आताची परिस्थिती आहे. टूजी स्कॅम, कॉमनवेल्थ, आदर्श, भूखंड घोटाळे, खाण घोटाळे, तेल आणि वाळू घोटाळे, महागाई, मंदीचे सावट, नोकर्‍यांवरील संक्रांत अशा कित्येक नकारात्मक घटनांनी आजची जनता त्रासलेली आहे. राजकारणातील गुंडगिरी आणि गुंडगिरीला मिळणारे राजकारणातले भक्कम स्थान याविषयीचा राग 'सिंघम' मधून व्यक्त होताना दिसतो. अर्थात माझे हे मत पूर्णपणे चुकीचे देखील असू शकते. सामान्य जनतेच्या मनातल्या त्या-त्या काळातील भावभावनांना हात घालून चित्रपट बनवण्याची परंपरा तशी बरीच जुनी आहे. अगदी 'गॉन विथ द विंड' आणि 'राशोमॉन" पासून तर 'दीवार', 'जंजीर' आणि आताच्या 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' पर्यंत ही परंपरा कायम आहे. यातच 'सिंघम'चे यश दडले असावे. 'सिंघम' एकदा मनोरंजन या एकमेव कारणासाठी बघण्यास हरकत नाही. एका फटक्यात गुंडांना २०-२० फूट लांब फेकणारी दृष्ये, उंच उडून धराशायी होणार्‍या मोटारी, अगडबंब गुंडांना पाणी पाजणारा धट्टाकट्टा अजय देवगण असे अतिशयोक्त प्रसंग खूप देखणेपणाने चित्रित केलेले आहेत. शेवट मात्र तितकासा रोचक जमलेला नाही. तिखटजाळ मटणाचे अचानक गिळगिळीत भेंडीच्या भाजीत रुपांतर व्हावे तसे मुख्य खलनायकाचे डरकाळ्या फोडणार्‍या नराधमातून एका सैरभैर झालेल्या जीवाच्या आकांताने धावणार्‍या बकरीत रुपांतर फारच अतर्क्य आणि हास्यास्पद वाटते. लेखणीची धार शेवटच्या प्रसंगांत एकदम बोथट झाल्यासारखी वाटते. पण एक 'एस्केपिस्ट' सिनेमा म्हणून या चुका क्षम्य आहेत. अजय देवगण आणि प्रकाश राज यांच्या मुख्य भूमिका कथेला अनुसरून आहेत. मागणीप्रमाणे दोघांनी भडक भूमिका केलेल्या आहेत. काजल अग्रवाल छान दिसते. सचिन खेडेकरची कॉमेडी बर्‍यापैकी हसवते. अशोक सराफचा हतबुद्ध हवालदार छान पण अगदी साच्यातला वाटतो. अशोक सराफचा हवालदार बघून 'कुरुक्षेत्र' मधला सयाजी शिंदे पटकन आठवतो. प्रदीप वेलणकरचा डीआयजी अगदीच तकलादू. अनंत जोग नेहमीप्रमाणे एक बेरकी पात्र समर्थपणे रंगवतात. त्यांचा नार्वेकर 'सरकार'मधल्या भ्रष्ट पोलीस अधिकार्‍याची आठवण जागवतो. मुरली शर्मा या गुणी अभिनेत्याने अजय देवगणच्या वरिष्ठ अधिकार्‍याची भूमिका छान केली आहे. या माणसाची चित्रपट बघतांना खरच चीड येते यातच त्याच्या अभिनयाचे यश दडलेले आहे. सोनाली कुळकर्णी अश्रू ढाळणार्‍या अन्यायग्रस्त पत्नीच्या भूमिकेत आता 'फिट' बसायला लागली आहे. अजून कुठे 'फिट' बसणं आता तिला शक्य नाहीये हे हा चित्रपट बघून लक्षात येते. हळू-हळू तिची निशिगंधा वाड आणि मग रीमा लागू, स्मिता जयकर होणार हे नक्की. शीर्षकगीताव्यतिरीक्त अजय-अतुल यांची कामगिरी तशी यथा-तथाच आहे. शीर्षकगीतदेखील तसे सामान्यच आहे पण ठेक्यामुळे आणि जानदार चित्रीकरणामुळे सुसह्य वाटते. रोहित शेट्टीने केलेले मारामारीचे प्रसंग मस्त जमले आहेत. असा हा 'सिंघम' एकदा बघायला हरकत नाही... टीपः लेख घाई-घाईत लिहिल्याने विस्कळीत आणि भरकटलेला वाटण्याची शक्यता खूप जास्त आहे; गोड मानून घ्यावा. या ढिसाळपणाबद्दल क्षमस्व!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5386
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

परीक्षणात नमूद केल्याप्रमाणेच आहे. टाईंमपाससाठी उत्तम

टोटल एंटरटेंमेंट. गृपसोबत बघायला गेलात तर खरोखर धमाल चित्रपट...

हळू-हळू तिची निशिगंधा वाड आणि मग रीमा लागू, स्मिता जयकर होणार हे नक्की
एक्दम भारी ! - (जुन्या 'सोनालीचा' जुना पंखा) सोकाजी

हळू-हळू तिची निशिगंधा वाड आणि मग रीमा लागू, स्मिता जयकर होणार हे नक्की
एक्दम भारी ! - (जुन्या 'सोनालीचा' जुना पंखा) सोकाजी

सिंगल स्क्रीन थिएटरला बघावा असा चित्रपट ! २ तासांनी बाहेर पडताना आपापली डोकी सोबत घेऊन जाणे ! :) जे पी

छान परिक्षण .. सिनेमा एकदा पाहण्यासारखा. व्हिलन मात्र आवडला .. मजेने अवांतर: आणि हा आत्ताचा अमिताभ आणि भेंडी दोन्ही ही गोष्टी आवडत असल्याने त्यांच्याबद्दल निगेटीव्ह मत आवडले नाही. अमिताभ चे माहित नाही.. पण घरातील समस्त भेंडीला एकत्र करुन आजच खावुन न्याय देतो.

अतिशय सुरेख आणि मस्त परिक्षण. चित्रपटाच्या सर्व अंगांची दखल घेतलेली आहे हे वाचताना जाणवते.
शीर्षकगीताव्यतिरीक्त अजय-अतुल यांची कामगिरी तशी यथा-तथाच आहे. शीर्षकगीतदेखील तसे सामान्यच आहे पण ठेक्यामुळे आणि जानदार चित्रीकरणामुळे सुसह्य वाटते.
मला तरी ते गाणे ऐकताना सतत 'दबंग दबंग.. ह्या दबंगच्या शीर्षकगीताचीच आठवण येत होती. ठेका अगदी तसाच आहे आणि गाण्याची कोरिओग्राफी देखील अगदी तशीच वाटते. तसेच रोहित शेट्टीचे कौतुक आहेच मात्र ह्या चित्रपटातील काही 'खास' आणि दमदार प्रसंगांसाठी ओरिगिनल* सिंघमच्या टिमचे आणि दिग्दर्शक हरीचे कौतुक करायला हवे. मला तर अजय देवगण येवढाच सूर्याचा सिंघम देखील खूप आवडला. *हा शब्द असाच लिहितात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

खराय रे परा... किती गोष्टी कॉपी कराव्या? आमचा चित्रपट वेगळा आहे म्हणून कितीतरी सीन्स जसेच्या तसे उचलले आहेत... त्यात रोहीत शेट्टीचं योगदान अजीबात नाही. असं असतानाही अगदी चित्रपट आवडला. दे धमाल करमनुक झाली!

In reply to by अनामिक

कमाल झाली, आता तो ऑफिशियल रीमेक असताना सीन्स सारखे असणार नाहीत तर काय ? काय बोलणार आता ?

२००३ ची परिस्थिती तशी बरीच चांगली होती. कॉग्रेसच्या आघाडीचे सरकार ठीक-ठाक सुरु होते.
-हे काही योग्य नव्हे. 'खाकी' released on January 23, 2004. काँग्रेस युपीए १ सत्तेवर आले ते 22 मे 2004 रोजी. त्याअगोदर भाजप एन्डीएचे सरकार होते. बरे परिस्थिती बरीच चांगली होती असे म्हणायचे कसे? तसे असते तर एन्डीएचे सरकार गेले असते का? गुजरात दंगल/कत्तल + कॉफिन स्कॅम विसरलात का? छे, हे काही पटले नाही. बाकी सर्व ठीक. जय सिंघम.

In reply to by विसुनाना

विसुनाना, नजरचूकीने २००३ लिहिले गेले. आणि काँग्रेसचे सरकार थोडे उशीरा आले. ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. गुजरात दंगल, कॉफीन स्कॅम वगैरे नक्कीच होते पण आज जशी जनता त्रस्त झालेली आहे आणि सगळ्यांच्याच डोक्यावर महागाई, मंदीची जी टांगती तलवार आहे तशी परिस्थिती तेव्हा खचितच नव्हती. कॉफीन स्कॅम आज-कालच्या स्पेक्ट्रम घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, आदर्श घोटाळा इत्यादींच्या मानाने खूप छोटा होता. भ्रष्टाचाराचे जे उघडे-नागडे दर्शन सध्या अक्राळ-विक्राळ स्वरुपात नित्य घडते आहे तितके ते त्यावेळेस नव्हते. भाजपच्या काळात प्रचारात गफलत झाली आणि भाजप सत्ता गमावून बसला. अर्थात भाजप भ्रष्टाचारात कमी रुतलेला होता असे मात्र नसावे. आमचे आमदार किती गबर झाले यावरूनच भाजपच्या राज्यकारभाराची प्रचिती येत होती. शिवाय प्रमोद महाजनांचे रिलायन्स प्रेम किती उफाळून आले होते हे ही सगळ्या जगाला माहित आहेच. सात-आठ वर्षांपूर्वी जनतेने इतके कमालीचे अस्वस्थ व्हावे अशी परिस्थिती नव्हती. खुल्या आर्थिक धोरणांची फळे दिसत होती आणि वातावरण थोडे सैलावलेले होते हे माझे मत होते. ट्रॅफिक, घरांचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, पायाभूत सुविधांचा प्रश्न इतके आ वासून उभे नव्हते जितके ते आज आहेत. गुजरातची दंगल हा एक मोठा डाग होता खरा पण संप्पोर्ण देशातल्या जनतेने अस्वस्थ व्हावे किंवा सगळा देश संतप्त व्हावा अशी परिस्थिती त्यावेळेस उद्भवलेली नव्हती. एकूणच त्यावेळेसचे वातावरण बर्‍यापैकी शांत, सुरळीत आणि जनतेच्या भावनांना नियंत्रणाबाहेर न जाऊ देणारे होते. आज तशी परिस्थिती नाही. २००४ पासूनच मुंबईवर कितीतरी दहशतवादी हल्ले झाले आणि आपली सुरक्षा चव्हाट्यावर आली. सरकार आणि राजकारणी यांच्यावरचा विश्वासच उडाला. २००८ चा दहशतवादी हल्ला तर हादरवून टाकणारा होता. २००९ मध्ये पुन्हा कॉग्रेसच सत्तेवर आली कारण दुर्दैवाने तेव्हा आणि आतादेखील भारतासमोर दुसरा सक्षम पर्याय नाहीये हे कटू सत्य आहे. २०१४ मध्ये काही चमत्कार होणे अपेक्षित आहे पण शेवटी आपण निवडून देणार कुणाला? एकीकडे दरोडेखोर आहेत तर दुसरीकडे चाचे एवढाच तो काय फरक. भाजपमध्ये सध्यातरी काही धुगधुगी दिसत नाहीये. शिवाय ते ही भ्रष्टाचारात बरबटलेले आहेतच (खाण घोटाळा, कॉफीन घोटाळा, बंगारू लक्ष्मण). अजून कोण आहे मग ज्याच्याकडे भारतातल्या जनतेने अपेक्षेने पहावे? अशा अस्वस्थतेचा सध्याचा काळ आहे... असो. आपले पुनश्च: एकदा धन्यवाद. --समीर

वर म्हंटल्याप्रमाणे चित्रपट आवडला आणि परिक्षणही! अवांतर - ती नायीका अजय देवगणला सिंघम सिंघम म्हणून का हाक मारते? नाही म्हणजे त्याचं नाव बाजीराव असताना अडनावाने आपल्या प्रियकराला हाक मारणे म्हणजे काहीतरीच... नाही का? या सिंघमच्या जागी जोशी, निंबाळकर, पटवर्धन असं काहीही किंवा तुमचं स्वतःच नाव लावून बघा!

परीक्षण आवडले, बघेन निवांत वेळ असेल आणि टीपी करायला दुसरे काही नसेल तेव्हा.. स्वाती

मराठी प्रेक्षकांच्या टाळ्यांसाठी मराठी पार्श्वभूमी, उत्तरेतल्या प्रेक्षकांसाठी दे-दणादण मारामारी, दक्षिणेतल्या काही मोजक्या प्रेक्षकांसाठी दक्षिणी स्टाईलचा बेधडक नायक आणि खलनायक अशा सगळ्या प्रेक्षकांचा सारासार विचार करून रोहित शेट्टीने 'सिंघम' बनवला आहे>> आता हे वर्गीकरण आपण कसे केलेत ? -- एकूण सिनेमा दबंग स्टायलच आहे 'कमीने से याद आया, तुम्हारा बाप कैसा है' अशा तर्‍हेचे डायलॉग बाकी व्हीलन प्रकाश राज फारसा लक्षात रहात नाही पण त्याचा सहायक म्हणजे अशोक समर्थ मात्र लक्षात राहतो जबरदस्त अभिनेता. सर्वात लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे त्याचा आवाज !