मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मेथीचे लाडू

जागु · · पाककृती
साहित्यः मेथीचे पिठ १ वाटी (१०० ग्रॅम) ५ वाट्या गव्हाचे पिठ २ वाट्या रवा १०० ग्रॅम डिंक ५० ग्रॅम हालिम (अळीव) २ वाट्या सुके खोबरे ५ १/२ वाट्या गुळ १ चमचा सुंठपावडर अडीच ते ३ वाट्या साजुक तुप खारीक बदामचे बारीक तुकडे पाककृती: मेथिचे पिठ आदल्या दिवशी तुपात भिजवत ठेवा. त्यामुळे कडूपणा कमी होतो. सुके खोबरे किसुन मंद आचेवर खरपुस भाजुन घ्या. खारीक व बदाम बारीक करुन घ्या. तुपात थोडा थोडा डिंक घालुन तळा व थंड झाल्यावर तो कुस्करुन बारीक करा. चमचाभर तुपात हालिम (अळीव) तळून घ्या. भांड्यात दिड वाटी तुप घालुन रवा व गव्हाचे पिठ मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्या व भाजल्यावर एका परातीत काढा. त्या पिठात तुपात भिजत घातलेले मेथीचे पिठ घाला व हाताने चांगले फेसुन पिठाच्या गुठळ्या मोडा. आता त्यात भाजलेले खोबरे जरा कुस्करुन घाला. बारीक केलेले बदाम व खारीक घाला. सुंठपावडर व डिंक घाला व चांगले मिसळा. आता एका मोठ्या भांड्यात १ चमचा तुप टाकुन गुळ चिरुन टाका. आता गॅस एकदम मंद ठेवा व गुळ विरघळेपर्यंत ढवळा. गुळ विरघळला की लगेच गॅस बंद करा.
From Methi ladu
भांडे गॅसवरुन काढून त्यात लगेच पिठाचे मिश्रण घाला व चांगले ढवळा. आता पटापट लाडू वळून घ्या. झाले लाडू तयार. अधिक टिपा: हे लाडू पौष्टीक असतात. हे लाडू थंडीत खातात. बाळंतीणीसाठी हे लाडू खुपच उपयुक्त ठरतात. पाक करताना गॅस मोठा मुळीच ठेउ नका. एकदम मंद ठेवा नाहीतर पाक पक्का तयार होइल इ लाडू कडक होतील. लाडू वळताना मिश्रण थंड झाले आणि भांड्याला चिकटले किंवा लाडू वळता येत नसतील तर पुन्हा मंद गॅसवर २-३ मिनिटे ठेवावेत म्हणजे मिश्रण ओले होउन लाडू वळता येतील.

वाचने 14458 वाचनखूण प्रतिक्रिया 27

नन्दादीप गुरुवार, 08/11/2011 - 16:25
पा.कृ. विभागात जास्त डोकावत नाही...... (नाहीतर बघून बघूनच वजन वाढायचे)... पण मेथीचे लाडू नाव वाचून मुद्दाम धागा उघडला...आपला आवडता लाडू आहे ना तो. फटू वरून तरी मस्त झालेत.... कधी येऊ खायला????

पल्लवी गुरुवार, 08/11/2011 - 21:20
उग्ग्गाच जास्त पाठवु नकोस... :P लै दिवस झाले मेथीचे लाडू खाउन ! मस्तं रेंगाळत राहणारी डिंक-मेथ्याची गोड्-कडू चव.. अहाहा. पाठव पाठव लवकर !

गवि Fri, 08/12/2011 - 11:14
जागुतै.. मस्त पाकृ. हे लाडू मस्त स्वादिष्ट असतात पण एकदम मेथी दाताखाली आली तर कधीकधी कडूझार तोंड होते. इथे तर तू मेथीचे पीठच वापरले आहेस. त्यामुळे एकसमान कडुत्व येईलसे वाटते. मेथी न घालता बाकीचे जिन्नस वापरुन हे जास्त छान लागतील असं माझं लहानपणापासून मत आहे. असेच एक डिंक वगैरे नसलेले प्लेन खमंग तुपातले मेथीचे लाडूही करतात असे वाटते. खेरीज खालील लाडूंविषयी अधिक माहिती दिल्यास आभारी राहीनः राघवदासाचे लाडू- नुसतेच ऐकले आहेत पण जाणण्यास आणि खाण्यास उत्सुक - अशा नावाचे लाडू खरंच असतात का? नागलीचे लाडू (आजी गेल्यापासून तसे अप्रतिम नागलीचे लाडू मिळाले नाहीत. एकदा विकत मिळाले होते पण डालड्यासारखे मेणचट.. फेकून देण्याच्या लायकीचे.) तंबिटाचे लाडू बाकी शेवलाडू, कुरकुरीत कडक बुंदीचे लाडू हे नेहमीप्रमाणे कोकण गोव्याची आठवण जागवणारे लाडू अत्यंत आवडीचे.

अब् क Fri, 08/12/2011 - 13:00
राघवदासाचे लाडू- नुसतेच ऐकले आहेत पण जाणण्यास आणि खाण्यास उत्सुक - अशा नावाचे लाडू खरंच असतात का? हो असतात खुप छान लागतात! खूप तुप लागत पन त्याला!!

In reply to by अब् क

गवि Fri, 08/12/2011 - 13:07
ते कसे करायचे कळले तर करण्याची इच्छा आहे. आणखी एक नाव आठवत नव्हते.. गूळपापडीचे (की अशाच काही नावाचे..कसल्यातरी पापडीचे चूभूदेघे..) लाडू . याची चव अगदी लहानपणी खाल्लेल्याची अजून जिभेवर आणि आठवणीत तश्शी आहे. पण हे लाडू कुठे गडप झाले कोण जाणे. एखादी एक्स्पर्ट सुगरण कदाचित काही सांगू शकेल अशा आशेवर.

In reply to by गवि

राघवदास आणि गूळपापडी असे लाडू असतात, इतकेच नाही तर ते खायचा प्रसंग माझ्यावर ओढवायचा लहानपणी. मला त्या नावांमुळेच ते कधी आवडले नाहीत. :(

कच्ची कैरी Fri, 08/12/2011 - 13:13
मूळात लाडु हा प्रकारच मला खूप आवडतो ! जनरली ही लाडू हिवळ्यात करतात पण जागुने सांगितल्यप्रमाणे नंदेसाठी करावे लागलेले दिसतात . @गगनविहारी-ते गूळ्-पापडीचे लाडू माझ्या एका चुलत सासुला अप्रतिम करता येतात मी भारतात गेल्यावर त्यांच्याकडुन नक्की शिकुन घेईल व तुमच्यासाठी मिपावर पेश करेल.

स्मिता. Fri, 08/12/2011 - 13:36
वाह! लाडू तर मस्त दिसतायेत. मेथीचे पीठ वगळून केलेले डिंकाचे लाडू तर खूपच आवडतात.

स्वाती दिनेश Fri, 08/12/2011 - 16:42
तुझी पाकृ जरा वेगळी दिसते, आम्ही मेथीचे डिंकाशिवाय किवा डिंकासहित लाडू करतो, पण मेथीत हळीव नाही घालत, हळीव+ ओलेखोबरे+ गूळ असे लाडू करतो. हे लाडू छान दिसत आहेत, स्वाती

तोडलस फोडलस ! जागुतै लाडू कातिल दिसत आहेस एकदम. भारतात असताना एकदा पुण्यात जायचा योग आला होता, तेंव्हा साखरे महाराज का कायशा मठापाशी हे लाडू खायला मिळाले होते. जुन्या आठवणी अशा कुठल्या ना कुठल्या रुपात समोर येतात बघ.

In reply to by मदनबाण

michmadhura Sat, 08/13/2011 - 17:02
अळिवाचे लाडू आताच बाळंतपणानंतर खाल्ले ( मेथीच्या कडु लाडवावर उतारा म्हणुन). बनवायला खूप मेहनत लागते. नारळाचे डोळे असतात तेथे भोक पाडुन त्यातुन अळीव नारळातील पाण्यात भिजत घालतात. चांगले भिजले कि नारळ फोडुन तेच खोबरं वापरुन लाडू बनवतात.

रेवती Fri, 08/12/2011 - 19:50
फोटू छान आलेत. स्वातीताई म्हणते तसेच, अळीवाचे ओला नारळ गूळ घालून ऐकलेले (अर्थातच खाल्लेले) आहेत.;) मेथीच्या लाडवाचा प्रसंग तुमच्याकडे घडल्याबद्दल अभिनंदन! तुझ्या मुलीला बाळ बघून फारच आनंद झाला असणार. प्राजुलाही मेथीचे लाडू हवे असल्यास आमची ना नाही.;)

In reply to by रेवती

प्राजु Fri, 08/12/2011 - 19:59
मला उद्या सुद्धा चालतील. मथीचे असे लाडू खायला मला काहीही कारण लागत नाही. :) (नविन घरात सामान लागलेलं दिसतंय.. नाही वेळ मिळाला माझी खोडी काढायला म्हणून विचारलं.. )

जागु Fri, 08/12/2011 - 23:21
गगनविहारी तंबीटाचे लाडू म्हणजे नेमके कसले ते नाही समजले. राघवदास लाडू असतात. मी करुन रेसिपी टाकेन. गुळपापडीचे लाडूही टाकण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. हो ग रेवती श्रावणी खुप खुष आहे सध्या. प्राजूची तयारी असेल तर मी डबा भरुन पाठवायला तयार आहे. राजकुमार, मदनबाण, स्मिता, धनु, अवक, गणपा, जाई, शुचि, धन्यवाद. स्वाती अग हे बाळंतीणींसाठी पौष्टीक लाडू आहेत. म्हणून त्यात सगळच आहे. नन्दादिप, पल्लवी, पिंगु कधी येताय सांगा. बिपिन तुम्ही नाव पाहुन खाता ? कच्चि कैरी हो हे नणंदेसाठी केले आहेत. इरसाल एकदा खाउन बघा हे लाडू.

रेवती Sat, 08/13/2011 - 01:05
तंबिटाचे लाडू हे तांदळाच्या पिठीपासून तयार करतात. त्याला गोल आकार न देता थोडे चपटे बनवतात. माझ्या माहेरी केले जातात. आईला विचारून बनवता येतात का ते पाहते. प्रतिसाद मात्र मिळाले पाहिजेत हां!;)