Skip to main content

शोध

शोध

Published on 12/08/2011 - 14:50 प्रकाशित मुखपृष्ठ
नाव काय रे तुझं? कमच्या. कमच्या! हे कुठलं रे नाव? कुठला रे तू? कोणत्या गावाचा? लोक विचारयचे. कमच्या चुपच राहायचा. अरे काय विचारतोय? इथे कसा काय आलास तू? बापाचं नाव काय? आडनाव काय? माहीत नाही. कमच्या म्हणायचा. अरे रे! च, च... लोकं म्हणायचे. अनाथ दिसतंय पोर. वणवण फिरतंय पोर, काडी सारखा लुकडा दिसतोय ना म्हणून कमच्या म्हणत असावे ह्याला. लोकं स्वत:च निष्कर्ष काढायचे. काम मिळायचे. राहायला खायला ही मिळायचे, पण ते सगळ्यांपासुन दूर. कमच्याला जेव्हा पासून कळायला लागले होते तेव्हा पासून जात ही गोष्टं फार मोठी आणि महत्वपूर्ण आहे हे समजत होते, पण आपली जात कोणती आहे हेच त्याला माहीत नव्हते. कसं माहित असणार, खूप लहान असताना यात्रेच्या ठिकाणी काळोखात रडत असलेला तो सापडला होता असे ऐकून होता. ज्यांना तो आपले समजत होता ते त्याचे खरे घर, आई, बाप, भाऊ बहीण नाहीत हे त्याला नंतर कळले होते. जेव्हा पासून तो आपला खरा भाऊ नाही तेव्हा पासून भावा बहिणी मध्ये अन त्याच्यात एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला होता. बालपण जेव्हढे निरागस असते तेव्हढेच परिणामाची कल्पना नसल्या मुळे क्रूर ही होते. बाकी लोकं तर दूरचे. त्याचे मित्रही त्याला ना जातीचा ना पातीचा म्हणायला लागली, तेव्हा तर पूर्णपणे बदलून गेला होता. आता त्याला घरच्यां मोठ्या सगळ्यांच्या व्यवहारातल्या, वागणुकीतील फरकाचे, त्याच्या सोबत होत असलेल्या भेदभावाचे कारण ही कळू लागले. एक दिवशी स्फोट झाला. त्याला त्याच्या भावाच्या मित्रांनी खूप जास्त चिडवले. झाली मारामारी. भाऊ ही मध्ये पडला मित्रांच्या बाजूनी. भावाला पण मार बसला कळत नकळत. मग परिणामाच्या भीतीनी कमच्या रडत रडत घर, गाव सोडून पळून आला. कायमचाच. आपल्या लोकांच्या शोधात. आपल्या जातीच्या शोधात. ती कशी मिळणार हा प्रश्नं पडायचे त्याचे वय नव्हते. पण कसाही करून शोध घ्यायचाच, आणि शोधले तर ती मिळणारच, हा भाबडा विश्वास असण्याचे मात्र होते. तो गाव, गाव भटकला. जातीच्या शोधात. लहानपणापासून काम करायची, जे मिळेल ते खायची, मार खायची सवय होतीच. जिथे जायचा तिथे आश्रय मिळायचा. त्या बदल्यात काम ही घेतले जायचे. आपल्याला आई बाप नाही घर नाही हे त्याला समजून चुकले होते. कामाची त्याला खंत नव्हती. पण आपले लोकं कोण? आपले! आपल्या जातीचे? जे आपल्याला आपल्या माणसा सारखे वागवतील. माणसा सारखे! त्यांच्या शोधत तो होता. त्याच्या एवढी कितीतरी पोरं शेतावर लोहाराच्या भात्यावर, अजून इकडे तिकडे काम करीतच होती. पण ती त्याच्या सारखी एकटी नव्हती. अनाथ असली तरीही. कारण त्यांना त्यांची जात होती. कुणा ना कुणाचा आश्रय होताच. त्याच्या सारखे त्यांना हलकी कामे करावी लागत नव्हती, दूर वेगळे बसून जेवावे लागत नव्हते. कुणाच्या गोठ्यात झोपावे लागत नव्हते. जास्त श्रम करूनही मिळणारा मोबदला कमी. आणि सन्मान तर नाहीच. कारण एकच जात. जातीचे निश्चित नसणे. खालची असो वा वरची सगळे आपापल्या जातीच्या कोशात सुरक्षित होते. कमच्याची परिस्थिती वेगळी होती. जगात त्याचे कुणीच नव्हते तो पूर्णपणे एकटा होता. अनाथ म्हणून तो एकटा होताच. पण जात नसल्या मुळे माणूस म्हणून ही! त्याला कुठेच जागा नव्हती. लोक त्याला दूरच ठेवत होते. जर तो खालच्या जातीचा असला तर? समाजाचे भय. आणि पूर्वपार चालत आलेल्या संस्कारांचे भय. दया करायला जावं तर ग्रामण्याची, बहिष्काराची भीती. जर त्याची जात माहीत असती तर मात्र इतकं कठीण झालं नसतं. कुठे ना कुठे आश्रय मिळालाच असता. आपली जात कोणती असावी? इथे तर कितीतरी जाती आहेत. लहान आणि मोठ्या. आपली जात कोणती असावी? मोठ्या जातीतले लोकं आपल्याला दूर ठेवतात कारण त्यांना भीती आहे की जर मी खालच्या जातीतला असलो तर? मग खालच्या जातीचे काय? ते घेतील बहुतेक आपल्याला त्यांच्यात. बहुतेक काय नक्कीच. मग आपल्याला आपले लोकं मिळतील. आपलही कुणी ना कुणी ना कुणी तरी राहील. हे लोकं गावकुसा बाहेर राहतात. त्यांनी माहिती मिळवली होती. तो त्यांच्या कडे गेला. मी तुमच्याच जातीचा. तो म्हणाला. अरे पण तुझ नाव गाव काय? कमच्या. बापाचं नाव? आडनाव? कमच्या चूप. काय रे माहीत नाही का? नाही. मग तू आमच्याच जातीचा कसा? मी खालच्या जातीचा आहे. अरे पण नक्की कोणत्या? आमच्यातही खूप जाती आहेत. अं! कमच्या विचारात पडला. तू नक्की कोणाचा रे? सगळ्यात खालच्या जातीचा आहे मी. ते कुठे राहतात? कमच्या म्हणाला. ते तिथं पल्याड. ती दूर घरं दिसतात ना बघ ती दूर, तिथे. पण तूला नक्की कोण हवाय? पुढंच ऐकायला कमच्या कुठला थांबतोय. तो निघाला सरळ त्या घरां कडे. कमच्या तिथे पोहचला. काय रे पोरा इकडं कुठं? कुठे चाललास? तिथे बसलेले लोकं म्हणाले. कुठे नाही तुमच्या कडेच आलोय. आमच्या कडे? कोण रे तू? काय तुझं नाव. कमच्या. अच्छा! कोणाचा रे तू? तुमचाच. अं! आमचाच? म्हणजे नक्की कुणाचा? तुमचाच. अरे पण कुठला? तू काय तुझ्या बापाचं नाव? आडनाव काय? माहीत नाही. कमच्या म्हणाला. मग रे कसं? काही पण नाही माहीत तुला? नाही. कमच्या म्हणाला. काहीच माहीत नाही? लोकं म्हणाले. नाही अजून काहीच माहित नाही. कमच्या म्हणाला. अरे नाव नाही, गाव नाही, तुला बापाचं नाव माहीत नाही. मग आमचा कसा रे तू? एक सांग तुला धरम तरी नक्की माहीत आहे का तुझा? अं! धरम ते म्हणजे काय? धरम ही गोष्टं कमच्या पहिल्यांदाच ऐकत होता. सगळे हसले. आता रे बाबा धर्म म्हणजे काय हे पण माहीत नाही तुला? बरोबर आहे! कीती लहान आहे तो. आसरा शोधत फीरतय पोर. दुसरा म्हणाला. अरे पण बाबा तू जर दुस-या धर्माचा निघालास तर तुझ्यामुळे जातच नाही पण धर्मच बाटेल ना आमचा. एक म्हणाला. हो तेही खरंच. अजून एक म्हणाला. आता रे कसं? काय करावं? लोकं आपसात बोलतच होते. कमच्या समजला. इथे ही तेच होणार जे सगळी कडे होतं. इथे ही तो परकाच राहाणार. इथेही आपल्याला जागा नाही. आपल्याला कुठेच जागा नाही. तो झपझप निघाला तिथून. ए पोरा! कुठे चाललास?मागून आवाज आले. कमच्या अजून वेगात चालू लागला. ए पोरा! ए! इकडे तर ये. कमच्या वळला नाही. आता तर तो धावूच लागला होता. कमच्याच्या डोक्यात विचार सुरु होते. जाती तर कीती तरी आहेत. मग धर्म कीती? आपल्याला कुठेतरी जागा आहे का? हे बाटणे म्हणजे काय? आपला धर्म कोणता? ते तर आपल्याला माहीत नाही. धरम, धर्म हे काय आहे? शोधायलाच हवे. आता तो गावा पसुन बराच दूर रानात आला होता. इथे त्याला खुप मोकळे वाटत होते. तो एका झाडा खाली बसला. सावली देतांना झाडाने त्याला धर्म विचारला नाही. पाणी पिताना झ-याने त्याला जात विचारली नाही. इथे कुठलाही भेदभाव नव्हता. माणसांच्या जगा पेक्षा हे जग फार सुंदर होते. (समाप्त)
लेखनप्रकार

याद्या 2682
प्रतिक्रिया 12

In reply to by स्वैर परी

(.)

चान लिहिले आहे. खूप आवडले लिखाण. पुलेशु.

जाता जात नाही, ती ' जात ' असे म्हटले जाते कारण ' जात ' घेता येत नाही, ती जन्माबरोबरच येते. पिता ज्या जाती-धर्माचा असेल त्यानुसार त्याच्या वंशजांची जातकुळी पूर्वापार ठरत आली आहे. ( दैवायत्तम कुले जन्मः, मदायत्तंम तु पौरुषम -- महाभारतातील कर्ण ). परदेशातही जाती आहेत. आपल्याला तो फरक लक्षात आणून दिल्याशिवाय कळत नाही. (संदर्भ-- 'समुद्रापारचे समाज' लेखक मिलिंद बोकील ). जात ही व्यावसायिक कर्मावरून ठरते. सुरवातीला ( भटक्या जमाती एका जागी वस्ती करून राहू लागल्यानंतर ) धार्मिक कर्मे करणारे, शस्त्र बाळगणारे व व्यापार करणारे असे तीनच वर्ण होते. कैदी-गुलाम ( युद्धात हरलेले इतर जमातीचे लोक ) अस्तित्वात आल्यानंतर शूद्र वर्णाची निर्मिती झाली. त्यांना नागरीक्त्वाचे अधिकार नव्हते. त्यानंतर ' आपले ' व ' इतर ' वेगळे ओळखता यावे म्हणून , ' कोणाचा ', कुठल्या जमातीचा हे समजून घेणे आवश्यक झाले. भाषा सारखी असली तरीही नाव, रीवाज, व्यवसाय ह्यातील फरकावरून त्याला आपल्या समाजात स्वीकारायचे की हाकलायचे हे ठरवणे सोपे जात होते. शेवटी 'आपला ' कळप महत्वाचा असतो, कुठल्याही वर्णाच्या लोकांना ...! धर्म दुसर्‍याचा स्वीकारता येतो. जातीचे तसे नाही. विषयापुरते विवेचन केले आहे, मी जाती-व्यवस्थेचा पुरस्कर्ता नाही. खुसपट

पण पुढे काय ? जंगलात, निसर्गात कायमचे राहता येत नाही, शेवटी आयुष्य जगायला समाज लागतोच. मला वाटते कमच्या अजून लहानच आहे, जगाची लबाडी अजून त्याच्या अंगवळणी पडलेली नाही. काही दिवसाने जगाचे टक्के-टोणपे खाऊन (तसे तो खातच आला आहे म्हणा) 'तय्यार' होईल, सोयीस्कर जात/धर्म घेईल आणि समाजात मिसळून जाईल. पण कमाच्याचे व्यक्तिचित्र सुंदरच. लिखते रहो. सौंदर्य

In reply to by सौन्दर्य

तो लहान आहे. अजुन काही ही कळ्ण्याचे, करण्याचे त्याचे वय नाही. उद्या त्यालाही हे स्वीकारावं लागेलच. तरीही व्यवस्थे विरुध्ह बंडाच बिज मात्र मनात राहिलच. त्याचा व्यवहार आणी मत नक्कीच बाकीच्या लोकंसारखं राहणार नाही. हजारो वर्षं खुप काही बंडं असफल झालीत. हजारो लोकांनी प्रयत्न केलेत. एका दीवसात फरक पड्ला नाहीच. पण तरीही जग बदललंच. प्रतीसादा बद्दल सगळ्यांना धन्यवाद, आनि पु.ले.शु.