मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिक्स व्हेज फ्रित्ताता | Mix di verdure Frittata

पांथस्थ · · पाककृती
नमस्कार मंडळी. आज बर्‍याच (मोठ्या) कालावधीनंतर पाकृ टाकत आहे. लिहण्याची प्रेरणा - सहज, गणपा, धमाल शेठ :) आज आपल्या समोर पेश आहे इटालियन ऑम्लेट - मिक्स व्हेज फ्रीत्ताता - Mix di verdure Frittata. मस्त रविवार सकाळ असावी. एकदम निवांतपणा असावा. सावकाश पेपर वाचत वाचत फ्रित्ताता चा आनंद घ्यावा. मग एखादा कप कॉफीचा. थोडा वेळ टि.व्ही. पुढे. दुपारची झोप. क्या बात है! चला तर मग.... फ्रित्ताता ह्या प्रकारात अंड्याबरोबर भाज्या (मश्रुम्स, सिमला मिरची, ब्रोकोली, अस्पॅरॅगस, टोमॅटो, कांदा, बटाटा ई.ई.) , मांस (सॉसेजेस, बेकन, हॅम, कोळंबी ई.ई.) , चीझ (रीकोटा, पामेजन ई.ई.), हर्ब्स (ओरेगॅनो, सेज ई.ई.) अश्या विवीध सामग्री वापरुन ऑम्लेट बनवले जाते. ह्या प्रकारात अंड्याचा तळ व्यवस्थित जमु दिला जातो. आणी ऑम्लेट पलटण्याऐवजी ओव्हन मधे थोड्या वेळ बेक केले जाते. मी बेक करण्याची कृती वगळली आहे. साहित्यः अंडी - ३ मध्यम आकाराची बटाटा - १ मध्यम आकाराचा टोमॅटो - १ मध्यम आकाराचा कांदा - १ मध्यम आकाराचा शेपु - २ टेबल स्पुन (चिरुन) मिरची - १ लाल मिरची (आवडीप्रमाणे) लसुण - ४/५ पाकळ्या पार्मेजान चीझ - २/३ टेबल स्पुन (आवडीप्रमाणे) मीठ - चवीपुरते ऑलिव्ह ऑईल - १-२ टेबल स्पुन कुकिंग बटर - १-२ टेबल स्पुन कृती: १. बटाट्याचे चार काप करुन घ्यावेत, २. मीठ टाकलेल्या पाण्यात बटाट्याचे काप थोडे उकडुन घ्यावेत (१०-१५ मिनीटे) ३. मश्रुम्स, टोमॅटो, कांदा ह्यांचे बारीक काप करुन घ्यावेत. ४. लाल मिरचीचे एकदम पातळ काप करुन घ्यावेत (कात्रीने सोपे पडतात) ५. शेपु बारीक चिरुन घ्यावा. ६. उकडलेल्या बटाट्याचे बारीक काप करुन घ्यावेत (शक्यतो सालासकट) ७.एका पॅन मधे ऑलीव्ह ऑईल गरम करुन त्यात १ टेबल् स्पुन कुकींग बटर घालावे. ८. बटाट्याचे काप सोनेरी होउ पर्यंत परतुन घ्यावेत ९. बटाटे बाजुला काढुन कांदा परतायला ठेवावा १०. कांदा परतला गेल्यावर मश्रुम्सचे काप टाकावेत. ११. मश्रुम्स मऊ झाल्यावर टोमॅटो टाकावा. १२. टोमॅटो परतला गेल्यावर परतलेला बटाटा, बारीक चिरलेला लसुन, मिरची, शेपु टाकावेत आणी चवीपुरते मीठ घालावे १३. सगळे मिश्रण एका पातळीत पसरुन घ्यावे १४. अंडी फोडुन अगदी हलकेच मिक्स करुन घ्यावीत आणी पॅन मधील मिश्रणावर हळुवार ओतावे १५. वरुन थोडा शेपु, मिरचीवे तुकडे आणी किसलेले चीझ भुरकावे १६. अंडे थोडे व्यवस्थित बसले आणी चीझ थोडे विरघळले की पॅन झाकुन घ्यावी १७. साधारणपणे ५-६ मिनीटात ऑम्लेट तयार होते. फोटू काढत असतांना कन्यारत्नांने ताव मारायला सुरुवात केली :) बघता बघता संपले देखील! मंडळी तेव्हा तयारीला लागा. आपण काही बदल केले तर नक्की कळवा! चाओ!

वाचने 12582 वाचनखूण प्रतिक्रिया 45

सहज 07/08/2011 - 18:38
आद्य बल्लवाचार्य पाथंस्थ यांना पुनरागमाबद्दल धन्यवाद! फ्रिटाटा ओव्हन शिवाय मस्तच! फ्रीटाटा, फळे, ज्युस, चीज... झोप अहाहा....!

इरसाल 07/08/2011 - 19:27
मुस्तच......जाम भाली आयला बटर आणि चीझ मुळे जीभ स्लीप मारायला लागली कि काय. फोटो म्हणजे काही बोलायलाच नको.

पल्लवी 07/08/2011 - 19:51
कातील..कातील म्हणतात ते हेच ! (बाकी, पाककला हा तुमचा अल्लाउद्दिनचा दिवा असेल, तर फोटोग्राफी ही तुमची अंगठी असू शकेल ;) )

गणपा 07/08/2011 - 21:08
पांथस्थांनी आपला लेखन सन्यास सोडलेला पाहुन अत्यानंद झाल्या गेला आहे. :) पाककृती, सादरीकरण, शब्दांकन सगळ्यात अव्वल. शेवटी गुरु तो गुरुच साष्टांग =०O= :) (गुरुवर्यांचा चेला ) - गणा.

In reply to by गणपा

पांथस्थ 08/08/2011 - 21:20
गणपा ब्वा आम्ही कसले गुरु ब्वा, तुमच्या सारखे सातत्य आमच्या कडे नाहि. आमची गाडी जाऊन येऊन असते. तेव्हा तुम्हालाच दंडवत! =० .....predictability over occasional excellence....हा व्यवहारी जगाचा नियम आहे. आणी तुमच्या कडे तर दोन्ही आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वेताळ 08/08/2011 - 13:29
परत लिहताना पाहुन आनंद झाला. एक शंका श्रावणात अंडे शाकाहारी समजावे काय?

In reply to by वेताळ

पांथस्थ 08/08/2011 - 21:14
माफ करावे मालक श्रावण पाळत नसल्याने कल्पना न्हाय बुवा! अवांतरः आमच्या मते जे काय खायचे ते जेव्हा पाहिजे तेव्हा खावे :)

बहुगुणी 08/08/2011 - 06:08
काय लालायित करणारं वर्णन आहे! आता करून पहायलाच हवं लवकरच. फोटो तर मस्तच! (त्या १४व्या फोटोतल्या फेटलेल्या अंड्याचे तरंग...अहाहा!) [ती ४थ्या फोटोतली कात्री कसली खतरनाक दिसते! तिला काय म्हणायचं, कुठे मिळाली वगैरे काही डिटेल्स मिळतील का?]

In reply to by बहुगुणी

पांथस्थ 08/08/2011 - 21:28
ती ४थ्या फोटोतली कात्री कसली खतरनाक दिसते! तिला काय म्हणायचं, कुठे मिळाली वगैरे काही डिटेल्स मिळतील का?
नाव नाहि माहित बुवा. मी बेंगलोरला स्पार हायपरमार्केट मधे घेतली आहे.

In reply to by बहुगुणी

मस्त कलंदर 09/08/2011 - 23:34
थोडं मॉलमध्ये किंवा 'अ‍ॅट होम'/तत्सम दुकानांत शोधलं तर मिळेल. माझ्याकडेही अगदी वरच्या फोटोत दाखवलीय तशी नसली, तरी साधारण त्या जातकुळीतली म्हणावी तसली कात्री आहे. तिच्या मुठीकडचा चित्रात दाखवलाय तो भाग ओपनर म्हणूनही वापरता येतो.

In reply to by धमाल मुलगा

मस्त कलंदर 10/08/2011 - 18:35
अरे ढ लोकांनो, हे सॉस, केचपच्या बाटल्यांवरची झाकणं काढायचं ओपनर आहे. तुम्हाला हवं ते वेगळं ओपनर विक्षिप्तबैंबी गिफ्ट दिलंय.

In reply to by मस्त कलंदर

पंगा 12/08/2011 - 02:20
केचपच्या बाटल्यांवरची झाकणं काढायचं ओपनर आहे.
या ओपनरने फक्त केचपच्याच बाटल्यांवरचे झाकण उघडू शकते?

In reply to by पियुशा

स्पा 08/08/2011 - 12:44
आयला.... काय जळवतात हे लोक... आधी एकतर एकेकटे करून खाणार.. वर त्याची पाक्रु टाकणार.. ते हि कमी म्हणून असे हे असे....... फोटो टाकणार.... :D अवांतर : पियुषा जरा शीक, गणपा पण म्हणे यांचे शिष्य होते :)

In reply to by स्पा

पांथस्थ 08/08/2011 - 21:49
आधी एकतर एकेकटे करून खाणार.. वर त्याची पाक्रु टाकणार..
बेंगळूरात राहणार्‍या (आणी एकुणच) मिपाकरांचे स्वागतच आहे. याना राव आमच्या बेंगळूरला फ्रित्ताता खायला (संदर्भ: मुंबईकर, पुणेकर, नागपुरकर आणी बेंगळूरकर)

धमाल मुलगा 08/08/2011 - 14:46
एका पांथस्थानं बर्‍याच दिवसांनंतर एके जागी तंबू टाकून अंमळ विसावल्याचे दिसते आहे. ;) भल्या मनुक्षा, एव्हढी सुंदर कला दिलीए देवानं, का मग असं आम्हाला वाट पहायला लावतोस? :) आपल्या ह्या मिक्स (हॅम)व्हेज फ्रितातामुळे मंडळ आलरेडी स्वर्गारोहणास निघून गेलेले आहे. पुढील घरगुती कट्ट्याला सोकाजी जर कॉकटेलची जबाबदारी घेत असेल तर (व्हेज/नानव्हेज) फ्रिताता रांधण्याची जबाबदारी मोठ्या आनंदाने स्विकारणेस दस्तुरखुद्द आम्ही तयार आहोत. :D बोला सकलकुकशिरोमणि पांथस्थबाबा क्की ....ज्जऽऽय! :)

In reply to by धमाल मुलगा

सोत्रि 10/08/2011 - 18:36
पुढील घरगुती कट्ट्याला सोकाजी जर कॉकटेलची जबाबदारी घेत असेल तर
ही जर तरची भाषा कशाला महाराज. तुम्ही आदेश द्या, कॉकटेल कीट सह जातीने हजर राहतो. (आधि लग्न कोंढाण्याचे हा आवेश आहे ह्या विधानामागे) :) - (साकिया) सोकाजी

शाहिर 08/08/2011 - 18:01
वि. सू. : पांथस्थ यांची रेसिपी वाचताना लाळेरे बांधावे ..( नेक टाय चा वापर करत येइल)

पांथस्थ 08/08/2011 - 21:25
मंडळी आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! बाकी कोणी काहि म्हणो आम्ही आपली जागा ओळखुन आहो :)