Skip to main content

लिपस्टिक - भाग २

लिपस्टिक - भाग २

Published on 27/07/2011 - 08:01 प्रकाशित मुखपृष्ठ
"हॉटेल शालीमार चलो भैया ..." अंजू ने रिक्षावाल्याला पत्ता सांगितला आणि दोघी रिक्षेत बसल्या. रिक्षेत बसल्यावर मीनाने तिची पर्स उघडली आणि सगळ्या गोष्टी वर खाली करू लागली, "अगं हे तू कितव्यांदा करते आहेस काल पासून ?" अंजूने विचारले. "अन्जे तूला कळत नाही आहे का, माझी नोकरी जाऊ शकते" मीना पुन्हा वैतागली. "भैया याहासे लेफ्ट लो, एक शोर्ट कट है, आगेसे राईट फिर आगयां ..., अगं मीने सगळे ओके होईल मी आहे ना" रिक्षा शालीमार हॉटेल जवळ थांबली, दोघी उतरल्या. "भैया तुम वेटिंग पे रुको, मीने तू बस मी आलेच जाऊन २ मिनिटात, मग तुला मॉल ला सोडते आणि मी परत स्टेशन वर जाते, हीच रिक्षा पुढे घेऊ" अंजू मीनाला सांगत होती, मीनाचे तिच्याकडे अजिबात लक्ष नवते तिच्या छातीची धडधड वाढली होती, "अगं कळले का तुला राणी?" अंजू पुन्हा एकदा मीनाला हलवत म्हणाली आणि तिला तिने रिक्षेत आत बसण्याचा इशारा केला. अंजू आता हॉटेल शालीमार मध्ये आत निघाली. "लवकर ये ग अन्जे ..." मीना इतक्या हळू आवाजात म्हणाली कि हे बहुधा तिच्या पुढ्यात उभ्या असलेल्या रिक्षावाल्याला देखील ऐकू गेले नसेल. बहुधा तिने स्वताला समजूत घातली कि अंजू येईलच २ मिनिटात. "ओ ताई गर्दीच्या वेळे आधी इथून बाहेर पडायला पाहिजे, इथून कुठे जायचे आहे?" रिक्षावाला मीनाला विचारात होता. मीनाची त्याच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती, तिचे पूर्ण लक्षं हॉटेल च्या दरवाज्याकडे होते, तिने पुढचा संवाद टाळण्यासाठी फ़क़्त मान डोलवत "पता नाही भैया ..." असे उत्तर देऊन पुन्हा आपली मान हॉटेलच्या दिशेने वळवली. हॉटेल शालीमार हे एक अगदीच साधे लॉज वजा खानावळ वजा हॉटेल होते. विटकरी रंगाची ३ मजली इमारत, जिच्या खिडक्या पिवळ्या रंगात रंगवल्या होत्या, रंग बराच जुना होता आणि गडद असूनही त्यावर लिकेज बुजवलेले ते काळे पांढरे पट्टे अगदी उठून दिसत होते, ते पट्टे बहुधा मागच्या पावसाळया नंतरचे असावेत. हॉटेलचे प्रवेश द्वार देखील अगदी एखाद्या घराच्या दारासारखे होते आणि त्याला बाहेरून लोखंडी शटर होते जे अर्धे उघडे होते. त्या दारापर्यंत जायला ६ कि ७ पायर्या होत्या, त्या पायर्यांवर लाल भडक पायघड्या (पाय पुसण्याच्या) घातल्या होत्या. अजून कचर्याची गाडी बहुतेक आली नसावी कारण त्या पायर्यांवरच एका बाजूला कचर्याचे २ मोठे पिंप होते त्यातून बराच कचरा बाहेर सांडला होता. हे नक्कीच पायार्यान्खाली झोपलेल्या कुत्र्याचे काम असणार. वर हॉटेल च्या नावाची एक पांढरी पाटी होती भली मोठी, त्यावर लाल अक्षरात "हॉटेल शालामार" असे लिहिले होते, ली ची वेलांटी कधीच पुसली गेली होती बहुदा. मीनाचे लक्ष उगाच हॉटेल च्या बाहेर लावलेल्या एका जुनाट मारुती ८०० कडे गेली. नंबर मराठीत लिहिला होता "महाराष्ट्र १२ - ए ७४१९". मीनाची धडधड वाढली ... हि नक्की त्याचीच गाडी असेल. अंजी म्हणाली होती मारुती आहे त्याच्याकडे, आणि पुण्याचा नंबर म्हणजे हो हो नक्कीच त्याची गाडी असणार. गाड्या घोडे सांभाळायला पैसे आहेत मग साल्याला ... मीना स्वताशीच बोलता बोलता थांबली कारण तिला अंजू बाहेर पडताना दिसली. ती रिक्षातून पटकन खाली उतरली आणि पळत पळत अंजू जवळ जायला लागली, रिक्षावाला ओरडणार तेवढ्यात त्याला मागच्या सीट वर पर्स दिसली आणि त्याने आवरते घेतले. "आहे का ग अन्जे?" मीनाला धाप लागली होती, "नाही" .... मिनाचा चेहरा अचानक पडलेला पाहून अंजूला कळले कि आपले उत्तर चुकले ती पटकन मिनाचा हात हातात घेऊन म्हणाली. "अगं म्हणजे असेल, रूम बंद आहे आणि शिरीष नाही आहे ..." अंजू अजून पुढे बोलत होती तिला मधेच अडवून मीना म्हणाली "अगं नाही म्हणजे काय? कुठे गेला तो, ती गाडी त्याचीच आहे ना? आणि इतक्या सकाळी कुठे गेला तो? रूम उघडा न म्हणव हॉटेल वाल्यांना त्यांच्या कडे किल्ली असेल कि डुप्लीकेट" ... मीना आता जवळ जवळ थरथर कापू लागली होती. "अगं मीने शांत हो, पहिले ती रिक्षा सोड, मी फोन केला होता शिरीष ला हॉटेल मधून तो स्टेशन वर आहे येईलच १० मिनिटात मग रूम उघडेल" अंजू तिची रिक्षा कडे चालत चालत समजूत घालू लागली. "भैया कितना हुआ? आगे नाही जानेका हमको" अंजू ने मीनाची पर्स रिक्षातून काढली आणि रिक्षावाल्याला पैसे दिले. "च्यायला पहिलेच बोलायचे ना, उगाच सकाळी सकाळी टाईम ची खोटी" .... रिक्षावाला उगाचच धुसफुसत मुद्दाम जोरात रेस करत रिक्षा काढून निघून गेला. अंजू ने मागे वळून पहिले तर मीना गायब ... तिने इकडे तिकडे पहिले ... मीना हॉटेल शालीमार च्या पायर्या चढत होती .... क्रमश:

याद्या 3050
प्रतिक्रिया 10

रिक्षावाला एवढा प्रेमाने "ओ ताइ" असे चक्क मराठीत बोलत असुनसुद्धा त्या दोघी त्याच्याशी हिन्दीत बोलत आहेत. त्या दोघींचा पक्षी लेखकाचा तीव्र निषेध - (मराठी असल्याचा 'माज' असणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

पण रिक्षावाला अन्जुशी बोललाच नाही ... तिने सवयीने हिंदी वापरले .... आणि मीनाची मनस्थितीच नव्हती भाषा काळजीपूर्वक वापरायची ... ======

In reply to by सोत्रि

येवढ्या तातडीने निषेध करू नका राव.. जरा हे वाचा... >>>तिने पुढचा संवाद टाळण्यासाठी फ़क़्त मान डोलवत "पता नाही भैया ..." असे उत्तर देऊन मराठीत बोलली असती तर आणखी संवाद वाढला असता ना, म्हणून मुद्दाम दुरीया बनाके रखी! समझे जनाब?

In reply to by अरुण मनोहर

कसला भारी 'बादरायण संबंध' लावला आहे राव तुम्ही, म्हणजे आता दोन 'मराठी माणसांनी' बोलताना संवाद वाढवायचा नसेल तर हिंदीत बोलायचे तर... वाह वाह !!! वाह जनाब !!! क्या बात कही आपने। (हे वाक्य आता मी हिंदीत बोललो) ;) - (दुरीया न बनानेवाला जनाब) सोकाजी

लिखान - वर्णन छान. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत. फक्त मुळ मुद्दा काय आहे, हे अजुन २ भागात ही कळले नाही. मुळ मुद्द्याच्या ओढीने लेखन पुढे वाचत गेल्यावर वाचक खिळुन राहतो हे बरोबर आहे, पण मग पहिले दोन्ही भाग एकत्रच हवे होते असे वाटते. मोठे भाग असल्यावर मुळ मुद्दा काय असेल याकडे वाचक जास्त लक्ष देतो. तरीही लहान लहान गोष्टीतुन चित्र उभे करण्याची ताकद मस्त आहे तुमच्या शब्दात.