दोन कविता ... श्री. महानोर
दोन कविता .. श्री. महानोर.
आज श्री महानोर यांच्या दोन कविता एकदम घेत आहे. एक कवी म्हणून ही निवड नव्हे तर एकच कवी दोन निरनिराळ्या व्यथा कशा उलगडवून सांगतो ते पहाण्याकरिता. पहिली व्यथा आहे एका खेडेगावातल्या मध्यमवयीन स्त्रीची. दुसरी आहे वृद्ध आईवडिलांची; ते खेडेगावातील असतील वा शहरातील, भारतातील वा अन्य कुठल्याही देशातील. या दृष्टीने दुसरी कविता/व्यथा जास्त व्यापक, जागतीक आहे असे प्रथमदर्शनी वाटते. पण ते खरे आहे कां ? ते तर बघूच. पण त्याच बरोबर या दोहोंतला फरक जाणवतो तो त्यांत कवीने वापरलेल्या दोन आकृतिबंधांनी ( मला म्हणावयाचे आहे Forms, पण चपखळ मराठी शब्द समोर येत नाही, त्यातला छंद हा एक भाग झाला. रुपके हा दुसरा, विश्राम (pauses) हा तिसरा, ...योग्य शब्द आपण सुचवता ? ), असो. आधी कविता बघा.
---- सरलं दळण
ओवी अडली जात्यात ;
उभ्या जन्माचा उमाळा
कळ सोसून डोळ्यांत. रानातल्या कविता (१९६७)
खेड्यातली पहाट. सारे घर अजून जागे व्हावयाचे आहे. एकटी गृहिणी उठून सर्वांच्या भाकरीची सोय करण्यासाठी जात्यावर बसली आहे. रोजचे हे कष्टमय काम सुसह्य होण्यासाठी गाणे, ओवी त्यासाठी. सुखदु:खांच्या संबंधांचा भावनात्मक आनंद मिळवणे हा मुख्य उद्देश. आठवणी येतात त्या लहानपणच्या खेळाच्या, मुलाबाळांच्या, घरधन्याच्या वा विठूच्याही. साधारणत: हे सुखदु:खाचे पदर येत्या दिवसभराच्या कामाला उभारी देण्यास उपयोगी पडतात. पण एखादा दिवस असाही येतो की जाते अडते.सहज फिरेनासे झाले कीं जात्याची पाळी उचलून, हात फिरवून, साफ करावयाचे व परत चालू करावयाचे. नेहमीचेच आहे. पण आज दळण सरले आहे आणि अडली आहे ती ओवी, थांबलेल्या जात्यांत. आता काय उचलणार व काय काय साफ करणार ? हा उमाळा, हुंदका आहे सार्या जन्माचा व डोळ्यातील कळ तेथेच, डोळ्यातच अडवावयाची आहे. तिला अश्रूंची वाट करून द्यावयाची सोय नाही ! म्हणावयाची घरधनीण पण भावना व्यक्त करावयाला सर्वांसमोर तर परवांगी नाहीच पण आता ती एकटी आहे, सगळे अजून सकाळच्या साखरझोपेत आहेत, तरीही नाही. काय असहाय्यता आहे पहा.
रुपक सहज समजण्यासारखे. दळण.. आयुष्य; ओवी... आंतर्भावना; जाते... धकाधकीचे जगणे, गळ्यातून बाहेर न पडणारा हुंदका व डोळ्यातून बाहेर न पडू शकणारी अश्रूधार. स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी. हे सुन्न करणारे चित्र उभे करावयास "ओवी" च उत्तम. पण तीही अडखळली आहे दोनदा. आठ आठ अक्षरांच्या तीन ओळींपेक्षा पहिली ओळ तीन अक्षरांनी लहान आहे. हा पहिला विश्राम. दळण सरले असले तरी त्या आधीचे खडतर , दीर्घ आयुष्य समोर उभे करणारा. आयुष्य संपत आले तरी दु:ख संपणारे नाही हे सांगणारा. दुसरा येतो दुसर्या ओळीनंतर. तुम्ही सहृदयेतेने विचार करत असाल, " बाई ग , हे ही दिवस जातील, चांगले दिवस पुढे येतील ". एवढी सहानभूती व्यक्त करावयास वेळ देऊनच मग कवी त्यातील विफलता उघडी करतो; आयुष्य गेले तसेच पुढेही जाणार आहे !
असे बघा, ही कहाणी फक्त खेडेगावातील जात्यावर दळण दळणार्या स्त्रीचीच आहे का ? सकाळी उठून, मुलाबाळांचा -नवर्याचा डबा करून, दहाची शाळा गाठणार्या व संध्याकाळी दमूनभागून, तपासावयाच्या वह्यांचे गठ्ठे आणणार्या शिक्षिकेची कथा नव्हे काय ? दिवसाभरात आईची गाठ न पडल्याने गळ्यात मिठी मारावयास आलेल्या लेकरालाही उचलून घ्यावयाचे त्राण न उरलेल्या आईची व्यथा अशीच ना ? सरलं दळण ही व्यथाही सार्वत्रिकच आहे.
राघू रानभर उडून जातात
हिरवी झाडे हिरमुसतात ;
सायंकाळी वाट पाहून . रानातल्या कविता
आभाळागत बरसतात.
लहानपणी आईच्या पदराला चिकटून असणारी,सवंगड्यांबरोबर खेळावयास गेली तरी अधूनमधून "आई आहे" एवढे बघून जाणारी मुले शाळेत जाऊ लागली, १२-१३ वर्षांची झाली की हळुहळु मित्रांत जास्त रमू लागतात. आपण मजेने म्हणतो, " आतां पंख फुटले, आता कशाला आईची आठवण होईल ? " पण जसजसे आपले वय होत जाते, संध्याछाया हृदयाला भिववू लागतात, तेव्हा यातली "मजा " नाहीशी होऊ लागते. आता भूमिका बदलेली असते. गरज आपल्याला असते व त्यांना बाहेरचे विशाल आकाश खुणावत असते. ज्या वृक्षाच्या घरट्यात आपण वाढलो त्या घरट्याचेच आकर्षण उरलेले नसते मग वृक्षाची आठवण तरी कशी रहाणार ? सुरवातीला परदेशी गेलेला मुलगा वर्षातून एकदा चक्कर मारावयाचा तो आता दोन-दोन, तीन-तीन वर्षे झाली तरी भेटत नाही. उदास होऊन मूक अश्रू ढाळण्यापेक्षा काहीच करणे हातात नसते. महानोरांनी ही असहाय्यता चर ओळीत कशी पकडली आहे पहा.
राघू रानभर उडून जातात म्हणतांना रा रा ची पुनरावृत्ती अलंकार साधण्यासाठी नाही. पक्षी उडतात म्हणण्यात समोर कावळे-घारी येतील. राघूला पोरसवदा मुलाचा पदर आहे. मोठा झाला तरी यांना तो अजूनही लहानच वाटत आहे. तीच गोष्ट हिरमुसणार्या हिरव्या झाडांची. झाडे हिरवी आहेत, वठलेली नाहीत. त्यांच्यातला प्रेमळपणाचा ओलावा अजून आहे हे आर्जवून सांगितले आहे. प्रेमळ आहेत म्हणूनच ती रागवत नाहीत, त्रागा करत नाहीत. गुपचुपपणे आतल्याआत, हिरमुसतात. रागवणार कुणावर ? आपल्याच लाडक्या लेकरांवर ? खरे म्हणजे "पक्षी जाय दिगंतरा " हे सत्य समजावून घेतले पाहिजे, पण माया वेडी हेच खरे. अगदी अंतापर्यंत वाट पाहून शेवटी अश्रूंचा बांध फुटतो. "बांध फुटतो " हा नेहमीचा वाक्प्रयोग. महानोर त्याला बरसणार्या, ते ही आभाळाप्रमाणे, मेघाची उपमा देतात. आभाळात पोचलेल्या वृक्षांना, त्यांना वाढवणार्या आकाशातील बरसातीचीच आठवण होणार. इथला एक बारकावा म्हणजे घनदाट छाया. उर्वरित सर्व आयुष्यच झाकाळून टाकणारी.
ही व्यथा त्रिकालाबाधित आहे; सर्व जगतातील आहे. तुम्ही अडाणी आहात- सुशिक्षित आहात, गरीब आहात - श्रीमंत आहात, खेडेगावात रहाता - महानगरात ; भारतात की अमेरिकेत ...काय फरक पडतो ? ही व्यथा जीवनाचा एक अपरिहार्य अवयवच आहे.
दोन्ही कवितांमधील साम्य म्हणजे दोन्ही चार ओळींच्या आहेत. तीन -तीन वाक्ये आहेत. हे बाह्य, दुय्यम साम्य झाले. त्या मितभाषी आहेत. जे सांगावयाचे ते अगदी थोडक्यात, सूत्रमय भाषेत सांगितले आहे. दोन्ही ठिकाणी रुपकाचा वापर आहे. वाचकालाच अर्थ लावावयाचा आहे. व्यथा सार्वजनिक आहेत, व्यक्तिसापेक्ष नाहीत. आणि फरक काय ? पहिली कविता "ओवी " आहे. तिला एक लय आहे. ती गुणगुणत वाचता येते. एक मार्दव अंगीभूत आहे. दुसरी तशी नाही. एक प्रकारचा तुटकपणा वाचतांना जाणवतो. शब्दांत पकडणे अवघड आहे पण एक अलिप्तता सूप्तपणे वावरत आहे याची ओझरती छाया कवितेवर आहे. पहिली व्यथा घरातली आहे तर दुसरी घर न उरलेल्या सदनिकेतली !
शरद
याद्या
2158
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
अतिशय छान ना.धो.महानोर आणि