हर्षा!!!
बरी-वाईट कशीही का असेना माझी ही पहिली कथा तात्यांना अर्पण...:)
"हर्षा काल का नाही आलीस गं?" लॅपटॉप उघडून मी ऑफिसचे करतच बसले होते, तेव्हढ्यात दरवाज्यातून आत येणाऱ्या हर्षाला मी विचारलं.
"सॉरी गं ताई, खूप काम होतं घरी म्हणून येत आलं नाही." चेहऱ्यावर असलेली निराशा क्षणभर बाजूला सारत हर्षा बोलली खरी पण तिचा चेहराच इतका बोलका कि, काहीही न सांगता मला खूप काही बोलून जातो.
हर्षा!! एक अल्लड अनं निरागस मुलगी. गोरा वर्ण, बोलके डोळे, हसरा चेहरा आणि सतत बडबड करण्याची सवय यामुळेच कोणाच्याही लक्षात रहावी अशी. घरातून बाहेर पडल्यावर ऑफिसला जाणारया वाटेवरच तिचं घर. जाता-येता नेहमीच घराबाहेर बसलेली माझ्या दृष्टीस दिसते. माझ्याकडे पाहून ओळखीचं हसते. त्यातूनच मग तिची नं माझी ओळख वाढते.
"घरी आई आणि एक मोठा भाऊ आहे. वडील आमच्या लहानपणीच वारलेत. लोकांच्या घरी धुणी-भांडी करून आईनेच आम्हाला लहानाचं मोठ केलयं." काहीही आडपडदा न ठेवता हर्षा सुरवातीलाच मला सगळं सांगते. आई एकटीच काम करून घर चालवते आणि मोठा भाऊ फ़क़्त उनाडक्या करत हिंडतो. आणि त्याचबरोबर त्याला कसलेसे व्यसनही आहे. तीच्या बोलण्यातून मला हे सगळं कळतं.
पण का कळेना? सुरुवातीला माझ्याशी मनमोकळेपणाने वागणारी हर्षा हल्ली खूप अबोल आणि निराश दिसते. घरातली तणावग्रस्त परिस्थिती कदाचित हे कारण त्यामागे असावं.
"जॉब पहा ना ताई माझ्यासाठी एखादा, नुकतीच बारावीची परीक्षा दिलीयं मी." असेच काही दिवस गेल्यावर हर्षा अनपेक्षितपणे मला बोलते. 'घरातल्या कटकटीपासून थोडा वेळ बाजूला राहता यावं' हा हेतू तीच्या बोलण्यातून मला जाणवतो.
"प्रयत्न करून पाहते मी." असं सांगून मी तिला तेवढ्यापुरता दिलासा देते.
आमच्याच ऑफिसमध्ये मॅनेजरला सांगून माझी मदतनीस म्हणून हर्षाची वर्णी लागते. आयुष्याच्या वाटेला एक वेगळेच वळण मिळाल्याने ती अतिशय हरखून जाते आणि तिच्यात पूर्वीसारखा दिसणारा मोकळेपणा मला पुन्हा दिसू लागतो.
'सोळावं वरीस धोक्याचं गं' म्हणतात ना त्याप्रमाणे ऑफिसातल्याच आनंद या माझ्या सहकारयाबरोबर तिचं सुत जुळतं. सुरुवातीच्या हाय, हॅल्लोच्या मैत्रीनंतर एकमेकांत कधी गुंतत गेले ते त्यांनासुद्धा कळत नाही. दोघांचही एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. आनंद हा नावाप्रमाणेच हर्षाच्या जीवनात खूप सारा आनंद घेऊन आलेला असतो.ऑफिस सुटल्यानंतर बाईकवरून फिरायला जाणे हा तर त्यांचा नित्यक्रमच झालेला असतो.
"ताई, आनंदने काल मला बाईक चालवायला शिकवली, खूप मजा आली." हर्षा आनंदित होऊन मला सांगते. मी तिच्याकडे पाहून फ़क़्त हसते. एक वेगळच समाधान मला तीच्या चेहऱ्यावर दिसतं. अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी तिने घरातल्यांपासून लपवून ठेवलेल्या असतात.
रिझल्ट असल्या कारणाने आज हर्षा माझ्याबरोबर ऑफिसला येणार नसते. "रिझल्ट लागल्यावर फोन कर गं मला." जाता जाता दरवाज्यातूनच हर्षाला मी सांगितलं.
"हो" गंभीर आवाजात हर्षाकडून प्रतिसाद येतो. तिचा तो नालायक भाऊ तिच्यासमोरच बसलेला असतो. एक प्रकारचा खुनशीपणा मला त्याच्या डोळ्यात दिसतो...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"काय?" अक्षरश बसल्या जागेवरच मी मोठ्याने किंचाळतेच. ऑफिस मध्ये जाऊन तास/दीड तास होत नाही तोच हर्षाचा फोन आलेला असतो.
"ता आ आ इ ई, मी वि..ष प्या यलयं" हर्षाचा अडखळता आवाज.... कोणीतरी तप्त लोखंडाचा रस माझ्या कानात ओतावा तसे ते तीन शब्द माझ्या कानात घुसतात. बिचारा आनंद! त्याच्या मनातला गुलमोहर बहरण्याआधीच कोसळू पाहत आहे.... नव्हे कोसळून पडला होता. तडक त्याला घेऊन हॉस्पिटलकडे निघाले. ऑफिस ते हॉस्पिटल प्रवासादरम्यान असंख्य विचारांनी मनात गर्दी केली. 'का केल असेल तिने असं?' हा एकाच प्रश्न मनाला खूप सतावत होता.
आम्ही हॉस्पिटलला पोहोचण्याआधीच तिचे सगळे शेजारी-पाजारी गोळा झाले होते.
"दोन विषय गेले ना तिचे म्हणून केलं असेल."
"नाही, नाही सकाळी भावाबरोबर झालेलं भांडण याला कारणीभूत असेल."
"विष घेतल्यावर तिने ऑफिसात फोन केला होता म्हणे."
त्या लोकांच्या चर्चेतून हे सगळं ऐकायला मिळत होत. तिचा भाऊ! सकाळच्या खुनशीपणाच्या जागेवर आता अपराधीपणाचे भाव त्याच्या डोळ्यात दाटलेले. भराभर आनंदबरोबर पहिल्या मजल्यावर पोहचले जिथे हर्षाला ठेवलं होतं. बाजूलाच तिच्या आईने मोठ्याने हंबरडा फोडलेला...उर फोडून ती माउली रडतं होती. नर्सला आम्ही तिच्यावरचा कपडा थोडा बाजूला सारायला सांगितला.
आणि....
एक कोवळा निष्पाप जीव अगदी काळ्या-निळ्या अवस्थेत तिथे निपचित पडला होता.
ती गेली होती.....आयुष्याच्या प्रवासात आनंदला एकट्याला सोडून.....खूप सारे प्रश्न अनुत्तरीत ठेऊन......पुन्हा परत कधीही न येण्यासाठी.
सूचना: एका सत्य घटनेवर आधारित हि कथा आहे आणि अजूनही आम्हाला तिने असं का केलं असाव? हा प्रश्न पडतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
'' अजूनही आम्हाला तिने असं का
मस्त रे!!
फालतु कथा..
तुमचं मत असं असू शकतं हे
ही कथा नसुन भंपक लेखन आहे.
जम्या नय सुधारणेस वाव आहे
येथे मांडलेली कथा ही जर का
ओक्के गणपा.. तुम्ही म्हणता
वरवरचे
+१
लिखान आवडले ... गती थोडीशी
''"आयुष्य म्हणजे आपण पहात
जो जीव विष पिण्याचा निर्णय