Skip to main content

दहशतवादावर प्रॅक्टिकल उपाय भारताकडे आहे का?

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 14/07/2011 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
काल मुंबईवर आतांकवादी हल्ला झाला...नेहमीप्रमाणेच.. खरंतर हे दुर्दैव की 'नेहमीप्रमाणे' हा शब्द वापरावा लागावा! :( आधी बसलेला धक्का, मग दु:ख, मग उद्वेग आणि शेवटी चीड या क्रमाने माझ्या भावना बदलल्या. मग सुरू झाले ते प्रतिक्रीयांचे पूर. "नालायक सरकार" पासून ते "कसाब" आणि "षंढ समाजा"पासून ते "परकीय शत्रु" पर्यंत मी अनेकांना दुषणे दिली. आणि तुमच्या-माझ्यासारख्यांच्या या कोलाहलाचे रुपांतर "सरकार" या आपल्यातील एका संस्थेला टारगेट करण्यात झाले. सरकारचा यावेळी दोष आहे की नाहि हे तूर्त बाजूला ठेवले तरी हे नाकारता येणार नाही सरकार दहशतवादाशी दोन हात करण्यात अयशस्वी ठरलं आहे हे नक्की! पण फक्त सरकार अपयशी ठरलं आहे म्हणून आपण वेगळे राहु शकतो का? सरकार अपयशी ठरलंच मात्र अहेही तितकंच खरं आहे की सरकार आपल्यातूनच बनलंय. तेव्हा, गेल्या अनेक वर्षातील घडामोडी बघता हे स्पष्ट आहे की कोणतेही सरकार असो, आपण भारतीय समाज म्हणून दहशतवादाशी लढण्यात अपयशी ठरलो आहेत. (ज्यात सरकार आले, सरकारी संस्था आल्या व तुम्ही-आम्हीही आलोच) मात्र प्रश्न असा पडतो की या दहशतवादाशी लढायला आपल्याकडे काय योजना आहे? या दहशतवादाशी कसं लढावं? यासाठी काहि उपाय अनेकदा सुचवले जातात उपाय१: बहुतांश अतिरेकी शेजारील देशांतून येतात तेव्हा त्या देशांवर हल्ला करून 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा'. असं षंढासारखं जिण्यापेक्षा / अश्या भ्याड हल्ल्यात मेल्यापेक्षा युद्धात मेलेलं काय वाईट? किंवा अतिरेकी क्यांपांवर हल्ला करून 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा' किंवा कसंही करून कोणती तरी 'अग्रेसीव' अ‍ॅक्शन घेऊन 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा' (मात्र युद्ध करून हा प्रश्न सुटेल की चिघळेल याचे उत्तर चिघळेल असेच येते) उपाय२: चर्चा हाच प्रश्न सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे. सरकारने विविध घटकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा. (मात्र अतिरेकी चर्चेस तयार नाहीत, त्यांच्या मागण्या माहित नाहित, असल्याच तर त्या कोणतेही सार्वभौम राष्ट्र मान्य करु शकणार नाही मग चर्चा कसली करायची?) उपाय३: अंतर्गत बचाव (संरक्षण) फळी सक्षम करणे. गुप्तहेर, स्पेशन कमांडोज, प्रगत पोलिसिंग वगैरे वगैरे (काहि प्रमाण योग्य वाटते. मात्र किती व कसे याची उत्तरे नाहीत. शिवाय हा बचावात्मक पवित्रा असल्याने इतके करूनही हल्ला होण्याचा धोका आहेच. अनेकांना भारताने या मुद्द्यावर बचावात्मक होऊ नये असे वाटते) तेव्हा चर्चेसाठी प्रश्न असे आहेतः
  • वरीलपैकी एखादा उपाय तुम्हाला योग्य वाटतो का? नसल्यास तुमच्यामते काय उपाय आहे?
  • दहशतवादाला प्रभावीपणे संपवू शकेल असा प्रॅक्टिकल उपाय मुळात भारतीय समाजाकडे आहे का?

वाचने 29273
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

चांगली चर्चा आहे. बदल-केलेला-उपाय-२ आणि ३ यांचे मिश्रण बहुधा अंगीकारावे. (२मध्ये बदल : ) अतिरेकी चर्चेस तयार नसतात. हे अंशतःच खरे आहे. अतिरेकी आणि अतिरेक्यांना समर्थन देणारे असे एकसंध नसतात. पैकी काही लोकांशी चर्चा केली तर अतिरेक्यांच्या संघटनेत फूट पडते. आसाममधील काही अतिरेकी चळवळींच्या बाबतीत या पद्धतीला यश मिळालेले आहे. (१००% सुरक्षा हे लक्ष्य शक्य कोटीतले नाही. आपल्या कुठल्याही आवडत्या नेत्याने किंवा मुत्सद्द्याने तरी १००% यश कधी मिळवले होते काय?)

उपाय ३ हा योग्य वाटतो. अंतर्गत बचाव (संरक्षण) फळी सक्षम करणे. गुप्तहेर, स्पेशन कमांडोज, प्रगत पोलिसिंग वगैरे वगैरे हे सर्व सक्षम असते तर अतिरेकी हल्ले झाले नसते. भारताच्या सीमा मोठ्या आहेत हे खरे, २४/७ पोलिसिंग करणे शक्य नाही म्हणूनच social intelligence महत्वाचा ठरतो. स्थानिक लोक,पोलिस देशद्रोह करायला कसे/का राजी होतात ह्याचा विचार झाला पाहिजे.

हम्म....या धाग्यावर मारे लोक भारी चर्चा करताहेत, उपाय सुचावताहेत पण ज्या लोकांच्या हातात हे निर्णय घेणे आहे ते लोक अशा चर्चांना फाट्यावर मारतात त्याचे काय? बाकी नोकरशाहीतल्या तज्ञांना हे उपाय, मार्ग माहित नसतील किंवा त्यांनी याचा विचार केला नसेल हे मान्य करणे अवघड आहे.

In reply to by शिल्पा ब

सहमत आहे. त्याच प्रमाणे ज्या लोकांच्या हाती हे निर्णय घेणे आहे ते केवळ हातावर हात ठेवून बसून राहतात हेही मान्य करणे अवघड आहे.

In reply to by नितिन थत्ते

>> त्याच प्रमाणे ज्या लोकांच्या हाती हे निर्णय घेणे आहे ते केवळ हातावर हात ठेवून बसून राहतात हेही मान्य करणे अवघड आहे पूर्णपणे सहमत आहे. ते लगेच उच्च्स्तरीय बैठक घेऊन सर्व देशाला सतर्कतेचा इशारा देतात ..... केवढं काम करत असतात ते ! .... घामाघूम होऊन जातात, इतके की अंगातले सूट दिवसाकाठी ४/५ वेळा बदलावे लागतात .... शिवाय 'मॅडम्'ना कुर्निसात करायला कितीवेळा वाकायला लागतं त्यांना, तेसुद्धा ह्या वयात .....

शिल्पा म्हणते त्याप्रमाणे आपल्याला जे काहि उपाय सुचतात ते सर्व , आणि त्या व्यतिरिक्त जे काहि खरेखुरे उपाय असतील ते आपापल्या परिने त्यात्या विभागाचे लोक (सरकारी/बिगर सरकारी) करत असतीलच. नागरीक पातळीवर आपण दहशतवाद्यांना शोधु शकत नाहि (सापडले तर पब्लीक त्यांचा जीव नक्की घेतील) आणि त्यांचं उच्चाटन देखील करु शकत नाहि. एक गोष्ट मात्र खटकते... केवळ दहशतवाद बोकाळलाय म्हणुन नव्हे, तर एकुणच आपलं सामाजीक - राष्ट्रीय चारित्र्य बघुन, आपण लहान मोठ्या समस्यांना ज्याप्रमाणे रिअ‍ॅक्ट करतो ते बघुन सारखं जाणवतं कि आपण बलोपासनेचं महत्वच नाकारतो. बळ म्हणजे केवळ दंडातल्या बेटकुळ्या नव्हे... ते तर आवश्यकच आहे... पण सम्रुद्ध-सुरक्षीत आयुष्य जगायला जी शारिरीक-मानसीक-बौद्धीक ऊर्जा लागते (चेतना सुद्धा म्हणणार होतो, पण चेतना वगैरे शब्दांवर मिपावर जो वादंग माजतो तो याठिकाणी अव्होईड करायचा आहे मला) ती ऊर्जा प्राप्त करणे, साठवणे, चॅनलाइझ-युटीलाईझ करणे, याकरता आपल्या दैनंदीन जीवनात काहि जागाच नाहि. दहशतवाद असो कि भ्रष्टाचार, जात्याधारीत-धर्माधारीत बेबनाव असो कि बेरोजगारी, नैसर्गीक आपत्ती असो कि इकॉनॉमीक स्लोडाऊन, जेंव्हा सकारात्मक मानसिकतेने जोर लाऊन कार्य तडीस नेण्याची वेळ येते तेंव्हा आपल्याला दौर्बल्याची, षंढपणाची जाणीव होते... याचं कारण आपण मूळातच ऊर्जेकडे पाठ फिरवून बसलेलो तर नाहि ना??

(१) लोकसंख्या नियंत्रणात आणा. मग भले संजीव गांधींनी अवलंबिला तो मार्ग अवलंबवा. (२) पोलीसांना अद्ययावत शस्त्रास्त्रे पुरवा (३) जे अतिरेकी (कसाब आदि) मिळाले आहेत त्यांचा तर नायनाट करा, ही झुरळं फार माजली आहेत. (४) बीफ अप द पोलीस फोर्स (त्यात गुप्तहेरखातंही आलं) (५) पोलीस आणि आर्मीचं मानसिक बळ वाढवा. (म्हणजे ऐनवेळी युद्धात कच खाऊ नका., पोलीसांचे पगार वाढवा, कुटुंबाला संरक्षण द्या) मग बघा ते जीव तोडून लढतात की नाही!

उपाय १ अतिशय जालीम आहे. पण त्याचे परिणामही तेवढेच जालीम असतील हे सुज्ञाला सांगणे न लगे. उपाय २ जो सध्या सरकारने अमलात आणला आहे आणि तो इच्छाशक्ती नसल्याने तकलादू बनला आहे. उपाय ३ अमलात आणलात पाहिजे जो दीर्घकालीन आहे आणि त्यामुळे लगेच परिणाम नाही मिळणार. पण भविष्याच्या दृष्टीने तो उपयुक्त आहे. उपाय ३ अमलात आणण्यासाठी काही सरकारकडून घोषणा होण्याची वाट बघण्यात काही अर्थ नाही असे मला तरी वाटते. त्यात फक्त वैयक्तिक सक्षमीकरण अंतर्भूत आहे. - पिंगू

दहशतवादाच्या मुळाशी काही प्रमुख वैचारिक केंद्रे आहेत. ही केंद्रे दहशतवादाला सरळ प्रोत्साहन देत नाहीत पण त्यासाठी लागणारी पार्श्वभूमी तयार करणारी ब्रेन पॉवर पुरवतात. योग्य ते नेटवर्क साधून देतात असे दिसून येते. मात्र कोणत्याही दहशतवादी कृत्यात सरळ सहभाग सर्वसाधारणपणे दिसून येत नाही. हे चक्र थांबले पाहिजे असे वाटते. या विद्यापीठातील ब्रेन टँक चे विचार मूळपदावर आणून सामान्य कसे करता येतील, हे पाहणे जरूरीचे आहे. किंवा या वैचारिक टोळ्या फुटल्या पाहिजेत. यासाठी शक्य असतील ते सर्व उपाय केले पाहिजेत. हे झाले तर काही घडू शकेल.

In reply to by निनाद

अतिरेकी विचारसरणीची काही केंद्रे आहेत. मुस्लिमांची आणि इतरांचीही. मुस्लिमांमधे देवबंदी आणि बरेलवी अश्या दोन विचारसरण्या आहेत. दोन्हीची मुळे भारतातच आहेत. देवबंद येथील पीठ अखिल मुस्लिम जगतावर वैचारिक अधिराज्य गाजवते. ते अतिजहाल विचारसरणीविषयी प्रसिद्ध आहे. हिंदूंच्या अशा पीठांची मूलस्थाने सर्वांना माहित असतीलच. प्रश्न असा आहे की ही केंद्रे नष्ट कशी करावीत ? मुळात करावी का? एक तर सरळ तोफा,बॉम्ब वगैरेंच्या साहाय्याने तेथील इमारती व रहिवासी उद्ध्वस्त करावे.(आपल्या नालंदावगैरेचे झाले त्याप्रमाणे. ती अर्थात दहशतवादाची उगमस्थाने नव्हती.) ठीक आहे. केली उद्ध्वस्त. मग दहशतवाद संपला का? की छोट्याछोट्या गटांमधून तो अधिकच धगधगू लागला आणि सूडाची आग अधिकच धुमसू लागली? खरे तर या सर्वांचा (दहशतवादामागच्या वैचारिक बैठकीचा) मुकाबला करण्यासाठी धैर्य(पेशन्स) तर हवेच पण अर्थ आणि कूटनीतीही हवी; कारण आपल्याला समोरच्या बाजूला आपल्या मनाप्रमाणे बदलवायचे आहे, त्यासाठी आमिष हवे आणि त्यांची वैचारिक बाजू कमकुवत,चुकीची आहे हे सूक्ष्म रीतीने त्यांच्यावर बिंबवायचे आहे.ढोबळ आणि भडक प्रचाराचा नेमका उलटा परिणाम होतो. त्याशिवाय आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट हवी. ती म्हणजे आम्ही शिस्तबद्ध आहोत,सावधान आणि जागरुक आहोत,,समाजहितासाठीचे छोटे छोटे नियम देखील आम्ही कसोशीने पाळतो, त्यामुळे आमच्याकडे सुव्यवस्था आहे,आमचे जगणे अधिक सुखी व कटकटमुक्त(हॅसल्-फ्री) झाले आहे हे आम्ही त्यांना व सर्वांनाच दाखवून द्यायला हवे.आणि हे केवळ त्यांना दाखवून देण्यापुरतेच नव्हे तर अंतिमतः ते आमच्याच हिताचे आहे म्हणून हवे. पण हे सर्व थंड डोक्याने व आवश्यक तो कालावधी घेऊन करायचे तर पुन्हा आम्ही षंढ ठरणार! काय करावे? या शृंगा(षंढा)पत्तीतून चुटकीसरसे कसे सुटावे?

उपाय २ हा शक्य आहे. दहशतवाद्यांशी आम्ही वाटाघाटी करत नाही म्हणणारे देखील अप्रत्यक्ष संधान बांधून असतात. योग्य त्या लोकांना ओळखुन त्यांच्याशी वाटाघाटी करुन (आठवा - चांगला तालीबान, वाईट तालीबान) उपाय ३ ला तर पर्यायच नाही. याच बरोबर सार्वजनीक जीवनात शिस्त, वाट्टेल तिथे गाळे उभे न होउ देणे, महत्वाच्या जागी गर्दी न होउ देणे, तिथे न रेंगाळणे, वाहतूकीत सर्वांनी शिस्त बाळगली तर ती शिस्त न पाळणारी व्यक्ती पटकन ओळखु येते त्याच प्रमाणे सर्वांनी सार्वजनीक जागी किमान शिस्त पाळली. कचरा केला नाही तर अमुक फूटपाथ, अमुक प्लॅटफॉर्मवर ठेवली गेलेली वस्तू लगेच नजरेत भरु शकते. जितकी सार्वजनीक शिस्त आपण पाळू तितके सार्वजनीक संशयास्पद हालचाली टिपणे सोपे.

सगळ्यांचे प्रतिसादाबद्द्ल आभार. (काल घरी जालाशी संपर्क नसल्याने चर्चा सुरू करूनही पुढे प्रतिसाद देऊ शकलो नाही. क्षमस्व) पर्याय ३ ला / त्याला समांतर उपायांना बर्‍याच जणांचा पाठिंबा दिसतो आहे. हा पर्याय वरवर पाहता चांगला वाटतो. मात्र हा पर्याय दुधारी आहे. त्यात काहि धोके आहेत ते असे १. केवळ जनतेनेचे नीट वागावे, पोलिसांना सक्षम करावे वगैरे म्हणणे सोपे आहे. यातील पहिला भाग (जनतेने नीट वागावे/अ‍ॅलर्ट रहावे वगैरे) योग्यच आहे आणि त्यासाठी अनेक सामाजिक संस्था [निदान मुंबईत तरी] प्रभावी काम करत आहेत. दुसरा भाग, पोलिसांना सक्षम करणे म्हणजे दांडक्यांऐवजी आधुनिक शस्त्रे देणे इतकेच जर असते तर हे कदाचित ठिक असते. त्यातही २६/११ नंतर पोलिसांच्या अनेक वस्तुंमधे, वाहनांमधे, शस्त्रांमधे बदल झाले आहेत. (आणि अर्थातच ते पुरेसे नाहित). मात्र पोलिस सक्षमीकरण अनेक पातळ्यांवर करावे लागेल. त्यातील दोन मुख्य असे: अ. पोलिसांना अधिकचे अधिकार देणे, जसे केवळ संशयावरून स्थानबद्ध करण्याची मुभा, शस्त्र चालवण्याच्या व्याप्तीत वाढ वगैरे व त्याचा दुरुपयोग होणार नाहि याची काळजी घेणे. अमेरिकेने याचा अवलंब केल्यावर ग्वाटानामो बे व्हायला वेळ लागला नाहि हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तसे इथे हवे आहे का? ब. आपल्याच नागरीकांवर लक्ष ठेवणे. ज्यात फोन टॅप करण्याचे, वैयक्तिक इमेल्स, परे वाचण्याचे वगैरे प्र्ससंगी मुलभूईत अधिकारांवर घाला घालणारे अधिकार समाविष्ट आहेत. यामुळे आपल्याच नागरीकांवर सतत संशयाचे भूत असेल. २. प्रत्येकाला लष्करी शिक्षण देणे आवश्यक करावे असे वर श्री. चतुरंग म्हणतात. हे त्यांचे मत तत्कालिक उद्वेगापोटी असेल याची खात्री आहे. कारण याचे दुरगामी परिणाम भयंकर आहेत हे आपण जगात अनेक देशांत वेळोवेळी बघितले आहे. ३. न्यायव्यवस्था वेगवान करावी: जर पोलिस सक्षमीकरण आहे तर न्यायव्यवस्था वेगवान कशी व्हावी? पोलिसांनी आपल्याला मिळालेल्या विस्तारित अधिकाराचा दुरूपयोग केलेला या वेगवान न्यायप्रक्रियेत पकडणे जवळजवळ अशक्य होते. ४. यात लोकांचा लोकांच्या राज्यावरील अधिकार कमी होऊन लष्कर, पोलिस अश्या घटकांचे अधिकार प्रसंगी लोकांपेक्षा अधिक होण्याचा धोका वाढतो. असाच बागुलबुवा उभा करून पाकिस्तानात लष्कर वेळोवेळी सत्ता आपल्या हातात घेत असते. तेव्हा पर्याय ३ वरवर ठिक वाटला तरी तो वापरल्याने काहि बाह्य दुखणी कमी होऊ शकली तरी नव्या अंतर्गत दुखण्यांना जन्म दिल्यासारखे होईल असे वाटते.

In reply to by ऋषिकेश

३. न्यायव्यवस्था वेगवान करावी: जर पोलिस सक्षमीकरण आहे तर न्यायव्यवस्था वेगवान कशी व्हावी? पोलिसांनी आपल्याला मिळालेल्या विस्तारित अधिकाराचा दुरूपयोग केलेला या वेगवान न्यायप्रक्रियेत पकडणे जवळजवळ अशक्य होते.
विशेषतः अधोरेखित केलेल्याबाबतः न्यायालयांच्या प्रदीर्घ (उन्हाळी) सुट्ट्या बंद केल्या आणि न्यायाधीशांची रिक्त पदं भरली तरी बराच फरक पडावा. उदाहरणादेखल काही दुवे दिले आहेत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रदीर्घ (उन्हाळी) सुट्ट्या आणि रिक्त पदे. न्यायालयाच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्ट्या आणि न्यायाधीशांची रिक्त पदे ह्या बाबी सर्वस्वी भिन्न होत. शक्यतो विचार करिताना ह्या बाबींचा स्वतंत्ररीत्या विचार व्हावा - एकत्रितरीत्या नव्हे. १. प्रदीर्घ उन्हाळी सुट्ट्या :- ह्या बंद / कमी केल्या तरी ध्येयपूर्तीसाठी काही सहाय्य होवू शकेल अशी आशा करणे सर्वस्वी व्यर्थ आहे. कारण असे की न्यायालयांचे कार्य हे संपूर्णतः त्यांकडे खटले घेवून येणार अधिवक्ते आणि पोलिस ह्यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून आहे. न्यायाधीशांकडे येणार्‍या कार्याचे स्वरूप पाहता आहेत त्यापेक्षा अधिक सुट्ट्या त्यांस जर मिळाल्या, तर त्यांच्या कार्याची गती वाढेल असे वाटते. २. रिक्त पदे भरती :- न्यायाधीश ह्या पदावर भरती करणेसाठी लायक व्यक्ती शोध करून सापडत नाहीत, आणि ज्या व्यक्ती खरोखरी लायक आहेत, त्यांची त्या पदावर कार्य करण्याची अजिबात तयारी नाही ही २०११ ची स्थिती आहे. ह्या प्रश्नातून जोवर सुटका नाही, तोवर ध्येयपूर्तीसाठी काही सहाय्य होवू शकेल अशी आशा करणे सर्वस्वी व्यर्थ आहे. न्यायव्यवस्था वेगवान करणे हे इच्छित ध्येय पूर्ण करण्याकरिता उपरोल्लेखित सूचनांच्या व्यतिरिक्त निराळा विचार करणे क्रमप्राप्त ठरेल. हैयो हैयैयो -

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

न्यायव्यवस्था वेगवान करावी ही या चर्चेत मागणी गुन्हेगारांना कमी वेळेत शासन व्हावे म्हणून करायला हवे अशी मागणी आहे.(जसे कसाबसारख्या गुन्हेगाराला आठवड्यात फासावर चढवा वगैरे वगैरे ) सुट्ट्या कमी करणे आणि न्यायाधिशांची रिक्त पदे भरल्याने या दृष्टीकोनतून वेग वाढणार नाही त्यासाठी कायद्यातच असे बदल करावे लागतील ज्याचा दूपयोग होणे सहजशक्य होईल. याच कारणाने तर मोका, टाडा वगैरेला विरोध झाला होता / होत आहे. टाडाखाली दाखल केलेला खटला अतिशय जलद निवारण केला जाऊ शकत असे. त्याचा वचक आणि फायदा झाला होताच. तरीही तो बंद करावा लागला. आणि तसा प्रसंग असलाच तर वेगळे विषेश न्यायालय स्थापन करून न्यायालयाने काहि केसेस मार्गी काढल्या आहेत. कसाबची केस तर नेहमीच्या न्यायप्रक्रीयेत अनेक अंगांनी केलेला मोठा बदल होता.

अमेरिकेवर एक हल्ला झाला ११ सप्टेंबर २००१ रोजी व त्यानंतर एक अयशस्वी प्रयत्न झाला 'अंडरवेअर बाँबर'चा. यावरून अमेरिकेने केलेले उपाय परिणामकारक आहेत असे दिसते. त्यामुळे त्यांच्याकडून या विषयीची माहिती मिळवून त्याच धर्तीवर आपले प्रयत्न बेतावेत असे मला वाटते. समान हितसंबंधांमुळे अमेरिकासुद्धा या बाबतीत आपल्याशी परस्पर-सहकार्य करायला उत्सुक असेल असे वाटते.

In reply to by सुधीर काळे

जरी या प्रतिक्रीयेवर प्रतिसाद देत असलो तरी प्रतिसाद केवळ श्री काळे यांना उद्देशुन नाहि
अमेरिकेने केलेले उपाय परिणामकारक आहेत असे दिसते.
सहमत आहे. अमेरिकेने केलेले उपाय अमेरिकेत परिणामकारक ठरले.
त्यामुळे त्यांच्याकडून या विषयीची माहिती मिळवून त्याच धर्तीवर आपले प्रयत्न बेतावेत असे मला वाटते.
याच्याशीही काहि प्रमाणात सहमत आहे. मात्र त्या धर्तीवर पेक्षा त्याचा अभ्यासकरून भारतीय समाजाला योग्य असे नियम बनविण्याची गरज आहे. मात्र ते अमेरिकन नियमां इतके 'जाचक' असावेत का हा वादाचा मुद्दा आहे. दुसरे असे की अमेरिकेचे उपाय प्रभावी ठरण्याचे अजून एक मुख्य कारण त्या देशाच्या सीमेवर एकही 'शत्रु' राष्ट्र नाही. किंबहुना दहतवादाची केंद्रे त्या देशाच्या सीमेला लागून नाहीत. अश्यावेळी त्यांच्या उपायांचा अभ्यास जरूर करावा मात्र सारखे तिथे ९/११ नंतर अजूनही मोठा हल्ला झालेला नाहि हे सत्य असले तरी सारखे उगाळू नये असे वाटते, कारण दोन्ही देशांची भैगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती खूप वेगळी आहे. (हे म्हंजे अमेरिकेत अजूनही एकही महिला राष्ट्र्पती झालेली नाहि हे सतत उगाळण्यासारखे वाटते)

In reply to by ऋषिकेश

म्या कुठे उगाळले? एकदाच तर म्हटले! आणि चांगल्याला चांगले म्हटले इतकेच. माझ्या मते अमेरिकेने अंगिकारलेले High tech उपाय चांगले आहेत. त्यात biometricsचा उपयोग, all-body scan वगैरे पद्धती आपल्यालाही अंगिकारण्यायोग्य आहेत. त्यांनी अंगिकारलेले जे उपाय आपल्याला सोयीचे व उपयुक्त वाटतील (व आपल्याला परवडतील) तेवढे घ्यावेत असे मला वाटते. एक 'शू-बाँबर' व एक 'अंडरवेअर बाँबर'ची घटना होताच ज्या तातडीने जोडे उतरविण्याची सक्ती केली गेली व all-body scan सुरू केला गेला ते कौतुकास्पद नक्कीच आहे. अमेरिकेच्या सीमेवर शत्रुराष्ट्र नाहीं हे खरे पण अमेरिकेची सीमा तशी सच्छिद्रच आहे. त्यामुळे आत येणे तितके अवघड नाहीं. शेवटी पटेल ते आपण घ्यावे..... नाहीं तर आहेच "ये रे माझ्या मागल्या"!

In reply to by सुधीर काळे

म्या कुठे उगाळले? एकदाच तर म्हटले!
कृपया प्रतिसादातील पहिले वाक्य वाचावे. प्रतिसाद केवळ तुम्हाला उद्देशुन नव्हता. शिवाय अमेरिकेने केलेल्या उपाय योजना वाईट आहे किंवा त्या स्वीकारू नयेत असेही मी म्हटलेले नाही. फक्त त्या अमेरिकेत यशस्वी ठरण्यामागे अनेक कारणे आहेत तेव्हा तसेच्या तसे अनुकरण न करता तुम्ही मुळ प्रतिसादात म्हणता तसे त्या 'धर्तीवर' करता यावेत. जर चर्चा बघितली तर अमेरिकेचे उदा अनेकदा येते आहे म्हणून उगाळणे हा शब्दप्रयोग केला. असो. माझ्या प्रतिसादामुळे जर तुम्हाला वैयक्तीक रोख आढळला असेल तर क्षमस्व. तसा उद्देश नव्हता.

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश यांच्या वरील प्रतिसादाशी बहुतांशी सहमत. थोडे अधिक (असहमती अथवा विरोधातले असे नाही): मात्र त्या धर्तीवर पेक्षा त्याचा अभ्यासकरून भारतीय समाजाला योग्य असे नियम बनविण्याची गरज आहे. मात्र ते अमेरिकन नियमां इतके 'जाचक' असावेत का हा वादाचा मुद्दा आहे. अमेरीकेत "जाचक" (आणि त्यातील काही "रिडीक्यूलस") नियम हे बहुतांशी केवळ विमान प्रवासासाठीच वाटणारे आहेत. बाकी कुठे काही जाचक नियम वाटलेले नाहीत. भारतीय समाजाला "योग्य" नियमांपेक्षा केवळ "योग्य" शिस्तिची गरज असावी असे वाटते. (याचे अधिक कारण पुढे येईल). दुसरे असे की अमेरिकेचे उपाय प्रभावी ठरण्याचे अजून एक मुख्य कारण त्या देशाच्या सीमेवर एकही 'शत्रु' राष्ट्र नाही. किंबहुना दहतवादाची केंद्रे त्या देशाच्या सीमेला लागून नाहीत. नुसते इतकेच नाही. आपल्या संदर्भात दहशतवादी बोलणे/वागणे/दिसणे आदींनी सहजच आजूबाजूंच्या लोकात मिसळू शकतो. अमेरीकेत ते होत नाही/होऊ शकत नाही. आपल्याकडे २६/११ च्या हल्ल्याच्या वेळेस आणि त्यामुळे नंतर अलीकडच्या बाँबस्फोटात देखील जाणवलेली जनतेची गंभीर चूक म्हणजे पोलीसांना काम करून देण्यासाठी स्वतः अशा स्थळांपासून दूर रहाणे. पण आपले पब्लीक अक्षरशः तळहातावर शीर घेऊन बिनधास्त मधे मधे करते.... ह्या संदर्भात शिस्त निकडीची आहे असे वाटते. कारण दोन्ही देशांची भैगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती खूप वेगळी आहे. या तिन्हींपैकी "सामजिक" परीस्थितीमुळे आपण मागे पडतो आहोत असे वाटते. असो...

चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचे अनेक आभार. विविध अंगांनी व मुद्देसुद चर्चा झाली. जर साधारण चर्चेचा सुर पाहिला तर अजूनही काहि भारतीयांना असे वाटते की 'उपाय एक' अनिवार्य आहे. तर उपाय २ चा उपयोग होऊ शकते असेही तुलनेने अल्पशा काहिंना वाटते. उपाय ३ अनिवार्य आहे असे बहुसंख्यांचे मत दिसते. मात्र या तिसर्‍या उपायाचे स्वरूप, तीव्रता किती असावी याबद्दल विविध मते आहेत. तिसर्‍या उपायाबरोबरच जलद सुनावणीही अनेकांना महत्त्वाची वाटते. माझे मतः चर्चेच्या सुरवातीला असलेल्या माझ्या मनातील गोंधळ चर्चेअंतीही फारसा कमी झालेला नसला तरी आशादायक किरण दिसत आहे. भारतीय समाजाकडे (आपल्या समाजाला मानवेल असा व कमीत कमी साईड इफेक्ट असतील असा) प्रॅक्टिकल उपाय नसावा असा अंदाज होता. चर्चेनंतरही मला असे वाटते आहे की दहशतवाद पूर्ण रोखणे अशक्य असले तरी वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे २+३ वापरून त्याला बहुतांश रित्या थोपवता येऊ शकेल. मला वैयक्तीक रित्या उपाय ३ फार तीव्रतेने, घाईने वापरला जाऊ नये असे वाटते. अवांतरः मात्र सरकारवर असाच दबाव राहिला व लोकांचा सरकारवरील विश्वास क्मी होत गेला तर गैरसरकारी संस्था जसे लष्कर, न्यायालये, नागरी व्यवस्थापक सरकारच्या वरचढ होऊ नयेत अशी इच्छा आहे. समांतरः अशी एखादी घटना (देव करो न होवो) जर भविष्यात कधी झाली, तर वरील चर्चेनंतरही पुन्हा तत्कालिक क्षोभकारक (नीजर्क?) प्रतिसाद येतील असे वाटते.

In reply to by ऋषिकेश

अवांतरः मात्र सरकारवर असाच दबाव राहिला व लोकांचा सरकारवरील विश्वास क्मी होत गेला तर गैरसरकारी संस्था जसे लष्कर, न्यायालये, नागरी व्यवस्थापक सरकारच्या वरचढ होऊ नयेत अशी इच्छा आहे. >>> हा एक गैरसमज आहे. भारतिय संविधानात कोणा एका संस्थेला/व्यक्तीला वरचढ होण्याएवढे सर्वाधिकार दिलेले नाहित. [तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख असलेल्या राष्ट्रपति पदा बद्दल सुद्धा असेच म्हणता येइल का?] सध्याचे राजकिय नेते स्वतःचे - सहकार्‍यांचे गैरकृत्य/भ्रष्टाचार/निश्क्रियता या मुळे होउ शकणार्‍या त्यांच्यावरील संभावित कारवाई मुळे बचाव करण्या करीता हे असले गैरसमज पसरवत आहेत. सरकार वर दबाव येतोय तो त्यांच्या चुकांमुळे, निश्क्रियते मुळे, गैरकृत्यांमुळे, भ्रष्टाचारामुळे आणि सामान्य जनतेप्रति असलेला बेजबाबदारपणा, मुजोरपणा या मुळे. इतर संस्थानी वरचढ होउ नये ही काळजी जर सरकारला किंवा राजकीय नेत्यांना असेल तर त्यांनी स्वत: मध्ये सुधारणा कराव्यात. राजकीय पक्ष/ नेते यांचं प्रयोजन हे देशाला, सर्व सामान्य जनतेला पुढे घेउन जाण्या करीता आहे फक्त स्वतःला किंवा पक्षाला किंवा आपल्या सहकार्‍यांना पुढे घेउन जाण्याकरीता नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. सर्व सामान्य जनता ही लोकशाही चालवण्या/टिकवण्या करीता जेव्हढी प्रतिबद्ध आहे त्या पेक्षा कित्येक पटीने जास्त राजकीय पक्ष/ नेते हे प्रतिबद्ध आहेत (कारण राजकारण हा त्यांचा पुर्णवेळचा व्यवसाय आहे. संसदेत निवडून येणे, सत्ता मि़ळवणे आणि ती उपभोगणे हा जसा या व्यवसायाचा भाग आहे, नफा आहे, कारण आहे तसेच या व्यवसायाच्या ज्या काही जबाबदार्‍या आहेत, कर्तव्ये आहेत त्या पार पाडणे सुद्धा आवश्यक आहे. हा देश/जनता जो काही खर्च त्यांच्या वर करते त्याचा पुरेपुर मोबदला देणे, देशाला लाभ मिळवूण देणे हे त्यांच्या करीता आवश्यक आहे). देशाचं शासन/कारभार योग्य प्रकारे चालवायला जर सध्याची संसदीय प्रणाली अयशस्वि ठरत असेल तर भविष्यात ही प्रणाली बदलली सुद्धा जाउ शकते आणि जर हे झालंच तर त्याला जबाबदार हे सध्याचे स्वार्थि राजकीय पक्ष/ नेतेच राहणार. जाता-जाता: उपाय-२ आणि उपाय-३ या वर आमचं सरकार पुर्वीपासूनच कार्य करतंय आणि करत राहणार असं दिसतय. उपाय-१ आमच्या देशाला आर्थिक दृष्ट्या परवडणार नाही. देशातील एक मोठी संख्या उपाशी पोटी राहत असताना किंवा कुपोषणा मुळे मरत असताना असला खर्चीक उपाय परवडणार नाही. तसेच सरकारने या पुढे कुठल्याही अतिरकी हल्ल्या नंतर अतिरेक्यांचा शोध धेणे, सापडल्यास अटक करणे, खटला चालवणे वै.वै. हे सगळे न करता यावर होणारा पैसा वाचवून तो पैसा सर्व सामान्य जनतेला अन्न, औषधे पुरवण्या करीता करावा हीच एक विनंती. [ हो विनंतीच मागणी नाही कारण मी विधान सभेत किंवा संसदेत निवडून आलेलो नसल्या मुळे लोकशाहीत मला सरकार जवळ मागणी करता येत नाही फक्त विनंती करणेच तेवढे शक्य आहे.]

In reply to by समंजस

उपाय-१ आमच्या देशाला आर्थिक दृष्ट्या परवडणार नाही. अशा बोलण्यात कांहीं अर्थ नाहीं असे मला वाटते. माझ्या मते आपल्यापेक्षा पाकिस्तानला दसपट परवडणार नाहीं. एकदा करून पहावेच असे मला वाटते. पण हल्ला निवडून अशा जागी करायचा कीं सार्‍या जगाची सहानुभूती आपल्यामागे असायला हवी! उदा २६/११ नंतर प्रशिक्षणकेंद्रांवर. याउलट कुठल्याही शहरावर उदा. इस्लामाबादवर केल्यास सहानुभूती पाकिस्तानला मिळेल. हा डावपेचांचा भाग आहे. यशस्वी उपाययोजना करता येईल असे मला वाटते व करायलाच हवी. सध्या या लोकांना कसलीच भीती नाहीं. कधी-कधी योग्य वेळी केलेली चुकीची उपाययोजनासुद्धा कांहीं न करता स्वस्थ बसण्यापेक्षा चांगली ठरेल असेच मला वाटते.

उपाय क्र. १: एकादी गंभीर घटना घडताच ताबडतोब एकादी त्या घटनेशी संबधित पण इतर गोष्टींपासून दूर अशी उपाय योजना केली तर परिणामकारक ठरू शकते. उदा: २६/११ नंतर प्रशिक्षणकेंद्रांवर हल्ले करायला हवे होते (इस्लामाबादवर नाहीं). त्यामुळे सर्वंकश युद्ध पेटणार नाहीं पण दहशतवाद्यांच्या मनात धडकी नक्कीच भरेल. सध्या या दहशतवाद्यांची खात्री आहे कीं भारत कांहींही करणार नाहीं. त्यामुळे ते 'बिन्धास'पणे आपल्या काळ्या कारवाया करतात. जरा तरी जरब बसेल अशी उपाययोजना आपण केलीच पाहिजे. असे केले तर सरकारवरचा जनतेचा विश्वासही वाढीला लागेल व आपल्या सैनिकांचे, पोलीसदलाचे मनोधैर्यही वाढेल. आताची 'एक षंढ राष्ट्र' अशी आपली जगातील प्रतिमा बदलेल व ती बदललीच पाहिजे! (म्हणूनच प्राजक्ताने इथे नुकतीच प्रकाशित केलेली कविता माझ्या काळजाला भिडली!)

In reply to by सुधीर काळे

२६/११ नंतर प्रशिक्षणकेंद्रांवर हल्ले करायला हवे होते (इस्लामाबादवर नाहीं). त्यामुळे सर्वंकश युद्ध पेटणार नाहीं
असे होणे शक्य वाटत नाही. तुम्ही कोठेही हल्ला करा सर्वकष युद्ध पेटेलच. पाकिस्तान तर गप्प बसणारच नाही मधल्यामधे आपण आणि पाकिस्तान अनुक्रमे अमेरिका आणि चीनच्या शक्तीप्रदर्शनाचे साधन होऊ शकतो किंवा एकटे पडून पाकिस्तान + चीन (+आता कदाचित नेपाळ(माओवादी)) यांच्या पैकी कोणाच्याही भावी हल्ल्याला सतत तयार रहावे लागु शकते. हल्ला करणे अगदी यशस्वी हल्ला करणे (तुलनेने) सोपे असावे(?**) . मात्र त्याचे 'आफ्टरइफेक्टस' अधिक धोकादायक आहेत. (**आपल्या व पाकिस्तानच्या सामरिक तुलनेवर एक चांगला संकलित लेख रेडिफवर वाचला होता. दुवा मिळाला तर इथे देतो. त्यानुसार आपली परदेशाला लागून असलेली एकूण सीमा पकडल्यावर चीन + पाकिस्तानने एकत्र आव्हान दिले तर आपली ताकद अगदीच तुटपुंजी आहे. सर्वंकष विचार करता पाकिस्तानपेक्षा आपण केवळ हवाई दलात प्रगत आहोत)

इतिहास वाचताना जाणवते की पूर्वीच्या काळी दहशतवादी हा शब्द नसला, तरी अनेक प्रकारे मोठ्या प्रमाणावर हत्या होत असत. अगदी खुद्द पेशवे, होळकर, शिंदे वगैरे मराठी मंडळी सुद्धा लुटालूट, कत्तली करण्यात मागे नव्हते. दसर्‍याला मोहिमेवर निघायचे म्हणजे परमुलखात जाऊन लुटालूट करून सोने लुटुनी आणावयाचे.... मल्हारराव होळकरांच्या सैन्यात मुख्यत्वेकरून पेंढारी असत. पेशवे साठ लाख, ऐशी लाख घेऊन कुणाच्याही बाजूने लढत.. अर्थात दहशतवाद हा कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाहीच, त्यावर जालीम उपाय करणे अत्यावश्यकच आहे. तरी एकूण लोकसंख्येपैकी काही टक्के लोकांची विविध प्रकारे घडणारी हिंसा ही पूर्वापार चालत आलेली वस्तुस्थिती आहे, एवढेच इथे म्हणायचे आहे.

In reply to by चित्रगुप्त

पेशवे साठ लाख, ऐशी लाख घेऊन कुणाच्याही बाजूने लढत..
च्यायला इंग्रज साले मुर्खच ! उगा ताकद आणि पैसा वाया घालवला. पेशव्यांनाच ५-५० लाख दिले असते तर पेशव्यांनी भारत पालथा घालायला मदत नसती केली ?