Skip to main content

तुझ्या घरासमोरचा रस्ता...

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 11/06/2008 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या घरासमोरचा रस्ता, अजून तसाच वळतो का गं? कोपर्‍यावरचा गुलमोहर, अजून तसाच जळतो का गं? तसाच आहे का गं अजून, नदीकाठचा काळा पत्थर? हात हातात घेता क्षणीच, सूर्य तसाच ढळतो का गं? डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? पार आणखी पिंपळ तिथला, अजून आहे तसाच तेथे? मनात येता उत्कट काही, तसाच तो सळसळतो का गं? वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं? -अविनाश ओगले
लेखनविषय:

वाचने 6648
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

सर्व द्विपदी एकाच वाचण्यात मनात शिरल्या. पुन्हापुन्हा वाचली. अत्यंत सुंदर! (स्वगत - ओगले सरकारांच्या आठवणींचा पिंपळ चांगलाच सळसळतो आहे! ;)) चतुरंग

डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? क्या बात है! बहोत बढिया!

काय सुंदर सुंदर कविता करताय राव! कविता जाम आवडली. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

खूप छान... डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? ह्या ओळी सगळ्यात जास्त आवडल्या.....

>>वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं? किति सुन्दर लिहिलं आहे तुम्ही. अगदी हृदयस्पर्शी..

डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? छान! (रिकामटेकडा)बेसनलाडू

ओगलेशेठ, आयला काय कविता केली आहे राव तुम्ही! साला वाचूनच खलास झालो. कॉलेजलाईफमधल्या खूप आठवणी जाग्या झाल्या..! एकसे बढकर एक ओळी आहेत, नक्की कुठल्या ओळीला दाद देऊ तेच कळत नाहीये! :) अतिशय सुरेख, एक उत्कृष्ट काव्य वाचल्याचा आनंद मिळाला... आपला, (ऋणी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हेच म्हणतो ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

खूप सुरेख!! सगळ्या ओळी सुरेख जमल्यात.

खुप छान लिहिली आहेस कविता... कॉलेजचे दिवस आठवले रे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

सर्वच ओळी आवडल्या

मित्रा काय लिहतोस, कविता मलाहि सुचतात ,पण तू लाजवाब पुष्कराज

अविनाशजी, तुमच्या लिखाणाची पंखा झालेय मी....... फारच सुरेख लिहिता तुम्ही !! डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? ..........अप्रतिम !!

उत्तम कविता, आवडली !

ओगलेशेठ काय छान कविता आहे ही.. अप्रतिम.. मागे तुमचे भातुकलीच्या खेळामधली वरचे काव्य पण मनाला चटका लावून गेले होते.... पुण्याचे पेशवे

का कुणास ठाउक, पण 'श्रीकांत पारगावकर'ची आठवण आली वाचल्यावर. हे गाणं तो छान म्हणेल.

लई भारी, जाम आवड्ली राव.

...शब्द आहेत, जपून ठेवावेत असे. आणखी कविता वाचायला आवडतील तुमच्या, शोधायलाच हव्यात.

वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं?
सगळीच कविता आवडली...ह्या दोन ओळी तर ...खल्लास! - मनिष

ओगले साहेब, इतकी सुंदर कविता आहे आपली की, कोणती एकच ओळ आवडली हे सांगणे कठीण आहे... अप्रतिम...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/