Skip to main content

अबोल प्रीत, उमलतेय..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 14/06/2011 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
अबोल प्रीत, उमलतेय पाकळी हळू हळू कि नेत्र सांगती कथाच आपुली हळू हळू?? हृदय भरून वाहती, तुझेच स्पंद अंतरी भरेल का मनातली हि पोकळी हळू हळू?? सुरेल मारवा तुझाच भारला इथे तिथे तुझाच पूरिया घुमेल राऊळी हळू हळू तनूवरी शहारला जसा तुझाच स्पर्श रे उधाणले उरांत श्वास वादळी हळू हळू तुझाच गंध घेउनी, खुलेल कंप लाजरा भिजेल देह कस्तुरीत ...मखमली हळू हळू कधी सरीत अन कधी तुझ्या उन्हांत नाहते पहा तुझीच घेरतेय सावली हळू हळू.. - प्राजु
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6596
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

प्राजु ताई, मस्त मस्त मस्तच झालीये कविता!! अप्रतीम!!
तुझाच गंध घेउनी, खुलेल कंप लाजरा भिजेल देह कस्तुरीत ...मखमली हळू हळू
क्या बात!!

"तनूवरी शहारला जसा तुझाच स्पर्श रे उधाणले उरांत श्वास वादळी हळू हळू तुझाच गंध घेउनी, खुलेल कंप लाजरा भिजेल देह कस्तुरीत ...मखमली हळू हळू" मस्त.. मजा आली..

तुझाच गंध घेउनी, खुलेल कंप लाजरा भिजेल देह कस्तुरीत ...मखमली हळू हळू क्या बात है.........हळू हळू ....हळू हळू "सरकती जाये रुखसे नकाब आहीस्ता आहीस्ता" ची आठवण झाली

कविता जशी शेवटाला येत जाते,तशी ती अधिकाधिक खुलत जाते...हे तत्व या रचनेला सर्वाथानं लागु आहे...लाजवाब

अबोल प्रेम भावना शब्दातून सरस उतरल्या आहेत. मला आवडलेल्या ओळी- तुझाच गंध घेउनी, खुलेल कंप लाजरा भिजेल देह कस्तुरीत ...मखमली हळू हळू कधी सरीत अन कधी तुझ्या उन्हांत नाहते पहा तुझीच घेरतेय सावली हळू हळू.. अजून येऊ द्या अशाच सुंदर कविता. -दिलीप बिरुटे

अबोल प्रीत बहरली कळी हळूच उमलली आज लाभले सखे सौख्य जे मला हवे...........असे रमेश देव-सीमा देव ह्यांच्या मराठी चित्रपटातील एक गाणे आहे, त्याची चाल आपल्या डोक्यात होती का कविता लिहीताना ??? बाकी कविता व शब्दरचना उत्तम आहे...

In reply to by ईश आपटे

मला वाटतं ते गाणं, सूर तेच छेडिता, गीत उमलले नवे, आज लाभले सखे सौख्य जे मला हवे........... असं आहे... चूभूद्याघ्या... बाकी मूळ कविता छान! आवडली!! मनात एक विडंबनही आकार घेत आहे!! ;)

अप्रतिम ! कविता आवडली .

शब्दांच्या नाजूक विणीची भावपूर्ण कविता. सुरेल मारवा तुझाच भारला इथे तिथे तुझाच पूरिया घुमेल राऊळी हळू हळू फार सुंदर. कल्पना आवडली

प्राजक्ता, कविता हा माझा प्रांत नव्हे, पण तुझ्या कविता मी आवर्जून वाचतो. मला त्यातले शब्द खूप आवडतात, पण जुन्या पठडीतला असल्यमुळे 'वृत्ता'त गडबड झाल्यामुळे (ज्याला हल्ली meter म्हणतात) मला मधेच थोडेसे 'ठेच लागल्या'सारखे वाटते. तू 'वृत्ता'कडेही लक्ष द्यावेस असे मला वाटते. रागावणार नाहींस याची खात्री आहे!

हळूवार उमलत जाणारी भावपूर्ण कविता

कविता आवडली , सूर तेच छेडिता ! हे गाणेच आठवले (प्रथम) हृदय भरून वाहती, तुझेच स्पंद अंतरी भरेल का मनातली हि पोकळी हळू हळू??.......मला भावलेल्या ओळी.

छान कविता प्राजु, शब्दयोजना मस्तच झालीय!