Skip to main content

..बेंगलोर पासपोर्ट सेवा केंद्रामधील गम्मत..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 08/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
माझा पासपोर्ट नुकताच एक्स्पायर झाला त्यामुळे नव्या पासपोर्टसाठी अर्ज केला होता. मोठ्या मुश्किलीने अर्ज केल्यानंतर दोन महीन्यांनी पासपोर्ट सेवा केंद्रात अपॉईंटमेंट मिळाली. जाताना पुन्हा हेलपाटा नको म्हणुन लागणार्या सर्व कागदपत्रांची दोन दोन झेरोक्स प्रत बरोबर ठेवली होती. थोडक्यात माशी कुठेही शिंकु नये ह्याची योग्य खबरदारी घेतली होती. पण शिंकायची तिथे माशी शिंकलीच. माझे अप्लिकेशन फेटाळुन लावण्यात आले. कारण.. माझ्याकडे माझे स्वतःचे अ‍ॅड्रेस प्रूफ डॉक्युमेंट नव्हते. पण मी विवाहीत आहे आणि माझ्या पत्नीच्या नावाचे तसे डॉक्युमेंट आहे. त्यामुळे माझ्या बाळबोध बुध्दीनुसार माझे मॅरेज सर्टिफिकेट आणि बायकोचे अ‍ॅड्रेस प्रूफ ह्या दोन कागदपत्रांनुसार माझ्याही अ‍ॅड्रेस प्रूफ चा प्रश्न निकालात (!) निघु शकला असता. पण तिथला अधिकारी माझ्यापेक्षा हुशार निघाला. त्याच्या नुसार.. तुमच्या मॅरेज सर्टिफिकेटनुसार तुम्ही विवाहीत आहात हे सिध्द झाले. तुमच्या पत्नीच्या अ‍ॅड्रेस प्रूफ कागदपत्रानुसार ती अमुक अमुक ठिकाणी राहते हे सिध्द झाले. पण तुम्ही आणि ती एकत्र राहाताहात ह्याचा कुठालाही पुरावा नाही. सबब अर्ज फेटाळुन लावण्यात येत आहे. .. मेंदु मध्ये झिणझिण्या घेऊन मी बाहेर पडलो. पासपोर्ट ऑफिस मध्ये जायच्या आधी माझा जर अ = ब असेल आणि ब = क असेल तर तर्कशास्त्रानुसार अ = क ह्या सिध्दतेवर विश्वास होता पण आता अ = ब ह्या गृहितकावरच माझा विश्वास राहीला नाही. ! आता स्वतःच्या अ‍ॅड्रेस्-प्रूफसाठी कराव्ह्या लागणार्या द्रविडी प्राणायामाची मानसिक तयारी करतो आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4435
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

समस्त पासपोर्ट कार्यालयामध्ये एकापेक्षा एक विद्वान लोक भरलेले आहेत. तुम्ही वाट्टेल ती कागदपत्रं घेऊन गेलात तरी पहिल्या झटक्यात तुमचा अर्ज स्विकारतील तर त्यांच्या खात्याला बट्टा लागतो. बरं, नक्की काय हवं आणि ते कसं नसावं, ह्याबद्दल कोणतीही माहिती धड देणे नाहीच. त्यामु़ळे, मिष्टर प्रो.आंबोळी ह्यांच्यासारखेच म्हणतो: "ऑल द बेस्ट!" अर्रर्रर्र....पण तुम्ही त्या कर्मचार्‍याला म्हणाला नाहीत का, "चला, जरा चहा घेऊया!" ? ;)

अहो तुम्ही त्याचे (काळ्या) पैश्यानी हात ओले न करण्याचा हा प्रताप आहे ! बाकी सर्व उणीवा निर्माण करणे हा त्याचा नेहमैइचा धंदा ! :)

Address proof म्हणून टेलिफोन बिल वगैरे चालते ना ? मुंबई पास्पोर्ट ऑफिसात टेलिफोन बील एम्.टी.एन्.एल. चे असेल तरच घेतात!. इकडे बी.एस. एन. एल. चे चालत असावे.

अ‍ॅड्रेस्-प्रूफसाठी कराव्ह्या लागणार्या द्रविडी प्राणायामाची मानसिक तयारी करतो आहे. बर्रोब्बर.......आत्ता मला या शब्दाचा अर्थ कळाला

In reply to by शाहरुख

ओके, जर अधिकार्‍याचे चुकले नसेल तर असे पृफ म्हणुन काय आणुन द्यावे बरं ? चार साक्षीदारांना बरोबर घेउन जावे काय ?

In reply to by आनंदयात्री

माझ्या अनुभवातून सांगायचे झाल्यास पासपोर्ट ऑफिस त्यांना निश्चित हवी असलेली कागदपत्रे आणून दिल्यास अजिबात त्रास देत नाही. पण त्याचबरोवर त्यांना ह्याच्याऐवजी ते बघा असा समजावायचा प्रयत्न केल्यास ते अजिबात बधत नाहीत... आय फाईंड इट रादर अ‍ॅडमिरेबल!!! जर अधिकार्‍याचे चुकले नसेल तर असे पृफ म्हणुन काय आणुन द्यावे बरं ? मला वाटतं तुमच्या नांवावर तुमच्या घरच्या अ‍ॅड्रेसवर आलेले एखादे इलेक्ट्रिसिटी, पाण्याचे, वगैरे बिल चालेल... चार साक्षीदारांना बरोबर घेउन जावे काय ? ट्राय करून बघा! पण त्या साक्षीदारांना त्यांचं प्रूफ ऑफ अ‍ॅड्रेस बरोबर घेऊन यायला सांगा!! नायतर ते तुमचेच शेजारी कशावरून?:)

In reply to by पिवळा डांबिस

हॅ हॅ हॅ. आजकाल एसएसएन, ब्लु लेटर वैगेरे वैगेरे हिरवा माज चालु आहे :) प्रश्न धागाकर्त्याला सोयीचा म्हणुन विचारला.

In reply to by पिवळा डांबिस

एम.टी.एन.एल/बी.एस.एन.एल चे बिल अ‍ॅड्रेस प्रूफ साठी पुरेसे आहे. पण मी इकडे भाडेकरु म्हणुन राहत असल्याने सगळीकडे ऑफिसचा पत्ताच संपर्कासाठी दिला आहे. आणि बँकाचे इ-स्टेटमेंट येते. आतापावेतो तर रेशन कार्डाव्यतिरिक्त कुठल्याही कागदपत्राची अ‍ॅड्र्सप्रूफसाठी गरज पडली नव्हती. आणि ह्यावेळी गाफिल राहण्याचे कारण म्हणजे माझी ही समजुत की जर पती अथवा पत्नी दोहोंपैकी एकाचा पासपोर्ट हा दुसर्याच्या पासपोर्टच्या पत्ता पडताळणीसाठी ग्राह्य दस्ताऐवज समजला जातो तर पासपोर्टव्यतिरिक्त ग्राह्य धरला जाऊ शकणारा एकाचा एखादा दस्ताऐवज दुसर्यासाठीही ग्राह्य धरला जाऊ शकेल. पण इथे अ = ब,ब= क म्ह्णुन अ = क नेहेमीच खरे ठरेल ह्याची निश्चित काही खात्री नाही. आता लवकरात लवकर बँकामधला पत्ता बदलावा लागेल. बाकी चार साक्षीदार पत्ता सांगण्यासाठी नाही तर "पत्या"वर पोहोचवण्यासाठी जास्त उपयोगी पडतील असे वाटते. (ह.घ्या)

In reply to by कानडाऊ योगेशु

बाकी चार साक्षीदार पत्ता सांगण्यासाठी नाही तर "पत्या"वर पोहोचवण्यासाठी जास्त उपयोगी पडतील असे वाटते. (ह.घ्या) तुम्ही मुंबई किंवा पुण्यात रहात असाल तर सांगा. चार मिपाकरच साक्षीदार (आणि साथीदार!!) म्हणून उपलब्ध करून देईन!! आपल्या तशा सॉल्लीड ओळखी आहेत!!!!! ;)

In reply to by पिवळा डांबिस

सहमत आहे. तुमच्या घराचा पत्ता विचारल्यावर तुमच्या घराचा पत्ता द्या ना. बायकोचा कशाला देताय? बायको कामानिमित्त दुसर्‍या गावी राहाते असेही असू शकते ना? पासपोर्ट हे फार महत्वाचे डॉक्युमेंट आहे, ते इशु करण्याआधी इतकी काळजी नको का घ्यायला? तुम्हीच योग्य ती कागदपत्रे नेली नाहीत आणि कर्तव्हदक्ष ऑफीसरच्या नावाने का बोटे मोडताय.

In reply to by पिवळा डांबिस

सहमत आहे. तुमच्या घराचा पत्ता विचारल्यावर तुमच्या घराचा पत्ता द्या ना. बायकोचा कशाला देताय? बायको कामानिमित्त दुसर्‍या गावी राहाते असेही असू शकते ना? पासपोर्ट हे फार महत्वाचे डॉक्युमेंट आहे, ते इशु करण्याआधी इतकी काळजी नको का घ्यायला? तुम्हीच योग्य ती कागदपत्रे नेली नाहीत आणि कर्तव्हदक्ष ऑफीसरच्या नावाने का बोटे मोडताय.

In reply to by अलख निरंजन

अहो मी कुणाच्याच नावाने बोटे मोडत नाही आहे. सरकारी दफ्तरबाजीतला मला अनुभवायला मिळालेला विनोद फक्त सांगितला. मैत्र ह्यांनी प्रतिसाद लिहिल्याप्रमाणे एकत्र राहणार्या कुटुंबात प्रत्येकाचे वेगवेगळे अ‍ॅड्रेस प्रूफ कुठुन आणायचे? गॅस कनेक्शन,वीज बिल,पाणी बिल इ. कागदपत्रे सहसा घरातल्या कुणातरी एकाच्याच नावावर असतात.मग अशावेळी इतरांनी तसे कागदपत्रे कुठुन आणायचे? माझ्यासाठी सध्यातरी ही इतकी मोठी अडचण नाही आहे.बँकेमध्ये जाऊ पत्ता बदल करुन घ्यावा लागेल. पण समजा एखाद्याची पत्नी सामान्य गृहीणी आहे.आणि तिला पासपोर्ट हवा असेल तर तिने कुठली कागदपत्रे दाखवावीत?

पुनर्प्रयत्नसाठी शुभेच्छा! या पासपोर्टवाल्यांचं (आणि आजकाल कुणाचंही) काही सांगता येत नाही हो! असेच असतात ते.......आणि लोकही ना इतकी फसवाफसवी करतात की त्यांनाही हे असे धोरण अवलंबावे लागते. खरी पंचाईत आपली होते. इतका वेळ ट्रॅफीकजॅममध्ये अडकून आल्याने असा वैतागलेला प्रतिसाद देतिये......बाकी काही नाही!

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. शाहरुख, तुम्ही म्हणता तसे अधिकार्याचे काहीच चुकले नाही ह्या विधानाशी मी सहमत. आणि सेवाकेंद्रातला बाकी अनुभव चांगला होता. हा प्रकार पैसा देवुन करुन घेण्याजोगाही नक्कीच नव्हता आणि नाहीही. अधिकार्यांना नियमांबर हुकुमच वागण्याचे कागदोपत्री आदेश असल्याने त्याचाही नाईलाज झाला असावा. आणि झाल्याप्रकाराबद्दल ( आणि पासपोर्टचीही सध्या मला इतक्या तातडीने आवश्यकता नसल्याने) मला मनस्ताप होण्यापेक्षा त्यातील विनोद अनुभवता आला.

In reply to by कानडाऊ योगेशु

अधिकार्यांना नियमांबर हुकुमच वागण्याचे कागदोपत्री आदेश असल्याने त्याचाही नाईलाज झाला असावा.
हे बरोबर आहे. आणि ते तसेच असावे. वास्तविक कुठल्याही देशात हे असेच असते व असावे. कारण इथे अ = ब, आणि ब = क म्हणून अ = क ही असोसिअ‍ॅव्हीटी लागू होत नाही, होऊ नये. सरकारी खात्यात अनेक प्रकारे त्रास होतो, किंबहूना त्रास व मनस्तापच अधिक व काम कमी, हे खरे आहे,. आणि अनेक प्रतिक्रिया ह्याच त्राग्यातून आलेल्या आहेत. माझा स्वतःचा भारतीय कॉन्सुलेटचा अनुभव संमिश्र आहे. पण तरीही ह्या प्रकरणात सदर अधिकार्‍याचे कौतुक वाटले. दहशतवादामुळे गेली काही वर्षे निर्माण झालेल्या अत्यंत दूषित वातावरणात अशा नियमांवर बोट ठेऊन चालण्यानेच आपणा सर्वांना सुरक्षित रहाण्यास मदत होणार आहे.

बंगळुर पासपोर्ट ऑफिसचा माझा अनुभव तरी चांगला आहे. तिथे कोणत्याही एजंटशिवाय काम होते.फक्त आपली कागदपत्रे व्यवस्थित असावित. याउलट ठाण्यातील पासपोर्ट ऑफिस ग्रेट आहे. तिथे एजंट शिवाय पानही हलत नाही. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

बंगळुर पासपोर्ट ऑफिसचा माझा अनुभव तरी चांगला आहे. तिथे कोणत्याही एजंटशिवाय काम होते.फक्त आपली कागदपत्रे व्यवस्थित असावित.
हेच्च सांगतो ना बाप्पा ! बाकी वर प्रदिप ह्यांनी जे लिहले आहे त्यच्याशी सहमत आहे. सरकारी अधिकारी अधिकार्‍यांना अशा बाबतीत 'लॉजिक' लाऊन काम करण्यास परवानगी नसावी, किंबहुना तसे करणे योग्य होणार नाही. नियम जरी जाचक वाटत असले तरी आपण ह्यामुळे केवळ शिथिल नियमांमुळे चुकीच्या हेतुसाठी हे वापरणारे किंवा देशविधातक शक्तींना मदत होत नाही ह्याचे सुख मानावे. बाकी अजुनही आख्खी सिस्टिम सडलेली/विकलेली नाही आणि पदावरचे लोक मुर्दाड नाहीत ह्यावर माझा संपुर्ण विश्वास आहे. तुम्हाला मुद्दामुन त्रास दिलेला नाही, तो केवळ त्याचे काम करत होता. :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

बाकी अजुनही आख्खी सिस्टिम सडलेली/विकलेली नाही आणि पदावरचे लोक मुर्दाड नाहीत ह्यावर माझा संपुर्ण विश्वास आहे. तुम्हाला मुद्दामुन त्रास दिलेला नाही, तो केवळ त्याचे काम करत होता.
डानराव योग्य बोललात. मला त्या अधिकार्याचा राग आला नाही.त्या बिचार्याला जसे सांगितले गेले असणार तश्याच पध्दतीने तो काम करत असणार. पण कुणाही अधिकार्याने (व्यक्तिने) इतकेही तर्कदुष्ट असावे का? हा प्रश्न नक्कीच पडला. बाकी देशविघातक कृत्ये करणार्या व त्यांना साथ देणार्या सरकारी मंडळींना केवळ असा काही तर्क रोखु शकेल असे वाटत नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

>>पण कुणाही अधिकार्याने (व्यक्तिने) इतकेही तर्कदुष्ट असावे का? हा प्रश्न नक्कीच पडला. कधी कधी तर्कदुष्ट व्हावे लागते. पारपत्र हा भारताच्या नागरिकत्वाचा पुरावा आहे. शिवाय एकदा पारपत्रावर पत्ता आला की तो तुमचा अधिकृत पत्ता होणार. मग तिथे नियमानुसार काम करणे क्रमप्राप्त आहे. आणि त्याने असा नियम नसताना तुमची केस पास केली तर तो स्वतः अडचणीत नाही येऊ शकत? पारपत्राचे सोडा, विनोद म्हणजे हिरव्या देशात एकदा एका आजोबांकडून सज्ञान आहे हे तपासण्यासाठी वयाचा दाखला मागितलेला पाहिला आहे, दारू विकताना. तर्कशास्त्र सरळ होते. कायदा सांगतो की दारू घेणारा १८ पेक्षा जास्त वयाचा पाहिजे आणि ते तपासून घेतले पाहिजे. मग त्या दुकानदाराने तो कायदा शब्दश: पाळला.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पारपत्राचे सोडा, विनोद म्हणजे हिरव्या देशात एकदा एका आजोबांकडून सज्ञान आहे हे तपासण्यासाठी वयाचा दाखला मागितलेला पाहिला आहे, दारू विकताना. तर्कशास्त्र सरळ होते. कायदा सांगतो की दारू घेणारा १८ पेक्षा जास्त वयाचा पाहिजे आणि ते तपासून घेतले पाहिजे. मग त्या दुकानदाराने तो कायदा शब्दश: पाळला.
कुणी ज्येष्ठ नागरिक बस भाड्यात नियमानुसार सवलत मागताना हा असाच प्रकार बर्याच बस-कंडक्टरना करताना पाहीले आहे. ह्यातही एक हाईट पाहीली होती.सवलत मागणार्या व्यक्तिकडे दोन-तीन वर्षांपूर्वीचे ओळखपत्र होते.त्यातील वयानुसार ती व्यक्ति ज्येष्ठ नागरिक नव्हती.पण त्यानंतर एका वर्षाने झाली.कंडक्टरने ओळखपत्रावरील वयानुसार नॉनएलिजिबल ठरवुन त्या व्यक्तिला पूर्ण तिकिट घ्यायला लावले.

आहे खरी गम्मत... या सरकारी खात्यांमधील कामाचे काही खरे नाही ब्वॉ. मी पण यासाठीच पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागात जायला घाबरतो आहे. काय आहे , ज्याच्याबद्दल तक्रार करायची तो राहायचा मोकळाच , अन पोलिस टाकायचे मलाच तुरुंगात.

निव्वळ भिकारचोटपणा आहे. आपल्या इथले अनेक कायदे हे केवळ पैसे खाण्यासाठीच केलेले आहेत असे वाटते. नाहक अडवाअडवी. एजंटकरवी गेल्यावर हे भिकारचोट लोक त्याचा डॉक्युमेंटवर पासपोर्ट अर्ज दाखल करून घेतात. हरामखोर. आमचे नशीब म्हणजे आमच्या वडीलांच्या नावाचे लाईटबील स्वीकारले अ‍ॅड्रेसप्रूफ म्हणून. नाहीतर तुमचे वडील हेच तुमचे वडील आहेत हे सिद्ध करणारे डॉक्युमेंट आणा म्हणले असते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तुमचे वडील हेच तुमचे वडील आहेत हे सिद्ध काही सांगता येत नाही रे! आम्ही न्यु यॉर्कच्या हापिसातून आमचे पासपोर्ट नुतनीकरण करून घेतले तर मेल्यांनी दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लावला. तुमचा मुलगा हा तुमचाच आहे हे सिद्ध करण्यासाठी दीड महिन्यांनी दुसरा फॉर्म पाठवला. तो भरून पाठवला त्यानंतर महिनाभराने पासपोर्टस आले. तोपर्यंत आमची भारतवारी जवळ येउन ठेपली. आता ठरलेल्या दिवशी निघतो की नाही या विचाराने जीव वर आला होता. भारतातील पारपत्र कार्यालयाचा छोटा भाऊ म्हणून या हापिसाकडे पहायला हरकत नाही. एकाही फोनला उत्तर नाही दिले त्यांनी. पण पहिले पासपोर्टस मुंबईतून करून घेतले होते ते काम दोन मिनिटात झाले (अवपाद असावा.).

पासपोर्ट ऑफीस व्यवस्थित असतं. ते फक्त सर्व लोकांना एकच वेळ देतात आणि सकाळी भली मोठी रांग लागते. ते सोडता अतिशय नीट असतं की त्यांना काय काय कागद पुरावा म्हणून लागतात / चालतात. गेल्या १ वर्षात मी स्वतः धरून माझ्या माहितीत ४-५ जणांनी व्यवस्थित रीत्या नवीन पासपोर्ट, नूतनीकरण, तत्काल ई. वेगवेगळी कामे करून घेतली कोणालाही पैसे न देता, एजंट शिवाय, फक्त एक दिवस पासपोर्ट ऑफिसला जाऊन. अर्थात हे सगळं पुण्यातलं. बंगलोरच्या ऑफिसचा अनुभव नाही. घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर स्वतंत्र सरकारी वास्तव्य पुरावा असणं खरंच अवघड आहे हेही खरं. नुकतंच एका बँकेशी व्यवहार करताना त्यांनी एका घरातल्या तीन व्यक्तींचा एकाच पत्त्यावर स्वतंत्र पुरावा मागितला. आता एका पत्त्यावर वीज बिल, टेलिफोन बिल, इतर गोष्टी किती विविध कुटुंबियांच्या नावावर असू शकतात. सुदैवाने तिथे पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चालते. पण बरेचदा ते जिथे राहत होतो पूर्वी तिथे कधीतरी ५-१० वर्षांपूर्वी केलेले असते. भाड्याच्या जागांमध्ये रजिस्टर्ड लिज लायसन्स फक्त चालते. साधे स्टँप पेपर वर केलेले असेल तर पुरत नाही...